युव्हाल नोआ हरारी या इस्रायली इतिहासकाराचे हे पुस्तक वाचून आपल्याला काय मिळतं? तर आपण ज्यांचा कधीही विचार केला नाही किंवा करत नाही असे प्रश्न. वाचताना कधी कधी वाटावं इतका साहजिक विचार आपण का करत नाही असे प्रश्न.
माणूस वानरापासून उत्क्रांत झाला, टिकून राहीला, आपल्याच भावंडांमध्ये म्हणजे माणसाच्याच इतर जातींमध्ये तो सर्वोत्कृष्ट ठरला,त्याने अग्नीला आटोक्यात आणले, भटका होता तो शेतीमुळे स्थिर झाला, अधिकाधिक पिकवून व्यापर करू लागला, एवढ्या मोठ्या लोकसंख्येने कुठल्या तरी विशिष्ट विचारधारेखाली एकत्र यावे म्हणून धर्माची कल्पना पुढे आणली, तो पाळण्यासाठीच्या एटिकेट्स ना त्याने धर्म ग्रंथ/ पवित्र ग्रंथ असे नाव दिले, पूर्वी एकत्रितपणे खंडच्या खंड पायी फिरणारा आणि विश्वची माझे घर म्हणणाऱ्या माणसाने आता आपापल्या साम्राज्याच्या एकीकडे सीमा आखल्या आणि दुसरीकडे दुसऱ्यांच्या सीमेत घुसून त्यांच्या जमिनीचे तुकडे स्वतःच्या जमिनीला जोडून स्वतःच्या सीमा विस्तारू लागला, विज्ञानाच्या अश्वांवर रूढ झाला, धर्मयुद्ध, महायुध्दातुन पोळून निघून उपरती होऊन शांतता प्रस्थापित होण्यासाठी प्रयत्न करू लागला. आपण स्वतः माणूस आहोत आणि हे सगळं वाचून आपल्याला काय वाटतं? अभिमान वाटतो. भटका ते अशक्यप्राय वाटणाऱ्या गोष्टींचा शोध लावणारा शास्त्रज्ञ म्हणजे केवढी प्रगती केली माणसाने! शाळेत माणसांची गोष्ट पासून आपल्याला हा इतिहास क्रांती, प्रगती या विशेषणांचा वापर करूनच शिकवण्यात आला. पण मग ते चूक आहे का? तर नाही, ते एकांगी आहे. आपल्यावर कायम माणूस आणि इतर प्राणी असे वर्गीकरण ठसवण्यात आले. तेही चूक नाही. कुठला प्राणी आज मानवाच्या बरोबरीचा आहे? पण पुन्हा तेच. ते एकांगी आहे. सेपियन्स हाच दृष्टिकोन आपल्याला बदलायला लावतं. मानवाची प्रत्येक स्टेज ते इतर प्राण्यांना बरोबर घेऊन शिकवतं. माणसाला सगळ्या प्राण्यांसारखाच एक प्राणी म्हणून आपल्याला बघायला भाग पाडतं. आज माणूस जो आहे, जसा आहे मग त्यात फक्त शारीरिक जडघडण नाही तर मानसिक, कौटुंबिक, सामाजिक पातळीवरच्या गोष्टी पण आल्या, तसे त्याला घडवणारे महत्वाच्या टप्पे जीवशास्त्र, गुणसूत्रे यांच्या चष्म्यातून दाखवतं. उत्क्रांतीचे काही बदल मात्र नैसर्गिक आहेत. तिथे गुणसूत्रात नैसर्गिकरित्या घडुन आलेला बदलच कारणीभूत आहे, तिथे माणसाचा हात नाही. पण माणसाने पुढे जाऊन ज्या गोष्टींचे शोध लावले, जे आत्मसात केले त्यात त्याला स्वतःला आणि निसर्गाला काय किंमत चुकवावी लागली या दृष्टिकोनातून लेखक आपल्याला सो कोल्ड क्रांती आणि प्रगती कडे बघायला लावतो. पुस्तकात उत्तरं नाहीत, प्रश्न आहेत. पण डोळ्यावरची विशिष्ट झापड हटवण्यासाठी एखाद्या गोष्टीचा खुलासाच मिळणं आवश्यक नसतं, सुरुवात म्हणून त्याच्यावर प्रश्न निर्माण होणंही पुरेसं ठरतं. आजपर्यंत ज्या गोष्टी आपण मानत आलो, शिकत आलो, अभ्यासत आलो त्या केवळ जीवाश्म आणि गुहाचित्र या काळाच्या ओघात त्यातल्या त्यात शिल्लक म्हणता येतील अशा गोष्टींचा अभ्यास करून शास्त्रज्ञानी फक्त 'असे झाले असेल' म्हणत व्यक्त केलेल्या शक्यता आहेत. अर्थात हेही आपल्याला माहीत आहे. पण ह्या शक्यतांना छेद देणाऱ्या, किंवा त्याच डेटा चा वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करणाऱ्या अजूनही शक्यता आहेत, असू शकतात, किंवा या सगळ्याच चुकीच्या आहेत आणि अजून सत्य तिसरेच आहे जे आता डेटा अभावी आपल्याला सापडणे शक्यच नाही असा आपण कितपत विचार करत असतो? आपल्याला शाळेत शिकवताना, छोटयाशा अभ्यासक्रमात असे शिकवले जात नाही. अशा प्रकारे पुस्तक वाचून आपल्या काही समजुतींना जबर धक्का बसतो. आत्तापर्यंत जे काही मानत आलो त्यात काही तरी तथ्य असेल का असेही विचार करायला ते आपल्याला भाग पाडतं. (अर्थात पुढे जाऊन या विषयात करिअर, अभ्यास असणाऱ्यांना यातल्या पुष्कळशा गोष्टी माहीत असाव्यात)
आता इतकी सगळी तांत्रिक माहिती, तत्वज्ञान असलेलं पुस्तक आपल्या डोक्याला जड जाईल अशी शंका येणे स्वाभाविक आहे. पण तसं अजिबात नाही. उत्क्रांतीबद्दल साधारण बेसिक माहिती आपल्याला आहे एवढी एकच मागणी आहे. पण हे पुस्तक नावावरून वाटतं तसं सगळंच उत्क्रांती बद्दल नाही. फक्त उत्क्रांती बद्दल केवळ पहील्या एक दोन प्रकरणात वाचायला मिळतं. या सगळ्या गोष्टी लेखकाने सामान्य वाचकाला समजेल अशा भाषेत आणि वेळोवेळी उदाहरणं देऊन स्पष्ट केल्या आहेत. शेवटच्या दोन प्रकरणात भविष्यात लावले जातील असे काही फॅन्टसाईज करणाऱ्या पण तितक्याच भयावह वाटणाऱ्या शोधांच्या शक्यता वर्तवल्या आहेत. ते वाचून भविष्यात माणूस माणूस न राहता मशीन होईल की काय अशी भीती वाटते.
पुस्तक मूळ हिब्रू आणि इंग्लिश भाषेत आहे. बिल गेट्स ने त्याच्या आवडत्या पुस्तकात याचा समावेश केला आहे. याचा वासंती फडके यांनी केलेला मराठी अनुवाद ही छान झाला आहे. मी स्वतः इंग्लिश वाचण्याच्या कंटाळ्यामुळे मराठीच वाचणं प्रेफर केलं. खरंतर कोणतेही पुस्तक जमत असेल तर मूळ भाषेतत वाचले पाहीजे. यातल्या उल्लेख केलेल्या शेवटच्या दोन प्रकरणांवरून 'होमो ड्युओस' असा याचा पुढचा भाग आला आहे. एकंदरीत ज्यांना उत्क्रांती, जीवशास्त्र, विज्ञान या गोष्टीत रस वाटतो त्यांच्यासाठी हे पुस्तक उत्तम पर्याय आहेच पण जमलं तर प्रत्येकाने हे पुस्तक एकदा पेशन्स ठेऊन वाचलेच पाहिजे असं मला वाटतं.
