घरोंदा

घरोंदा

© माधवी समीर जोशी, ठाणे

घर ..ह्या दोन अक्षरी शब्दांत किती आपलेपणा आहे ना. मला हिंदीतील घरोंदा हा शब्द मनाला खूपच भावतो. आपले अगदी लहानपणा पासूनच प्रत्येकांचे घराशी एक वेगळेच घट्ट नाते असते.

घर असावे घरासारखे
नकोत नुसत्या भिंती
इथे असावा प्रेम जिव्हाळा
नकोत नुसती नाती

खरचं नुसत्या भिंतीने घर उभे राहत नाही तर ते भक्कम राहते त्यातील माणसांमुळे तसेंच घरांतील महत्त्वाचा घटक असलेल्या पाळीव प्राण्यांमुळे.पक्षी दरवेळी नवीन घरटे बांधतात, काम झाले की ते घरटं मोडून दुसरी कडे जातात. पण माणसाला थोडे दिवस राहिलेले सुध्दा घर सोडताना जीवावर येते. आपण काही दिवस सहलीला गेलो तरी परत येताना आपल्या घरची ओढ लागते. लहानपणी असंख्य सुट्ट्यात धुडगूस घातलेले आजोळ चे घर तर अगदी मरेपर्यंत मनात घर करून असते.
काही दूर देशी राहणारे लोक फक्त आपल्या गावी जाऊन घर डोळे भरून पाहून येतात.

प्रत्येक घराला स्वतःच एक स्वतंत्र अस्तित्व असते. काही घरे मोकळी ढाकळी असतात तर काही स्वतःच्या कोषात असतात. निगुतीने सांभाळलेली काही ऐतिहासिक घरे अजूनही आपला आब राखून असतात. काही घरांना कायम दारिद्र्याचा शाप असतो तर काही घरांवर कुबेराचा वरदहस्त.काही घरे आपले हात फैलावुन स्वागत करतात तर काही घरांचा दरवाजा ठोठवायला पण धीर होत नाही. हल्ली आपण शहरात नाईलाजाने फ्लॅटमध्ये राहतो.मोठ्या शहरांमध्ये कितीतरी लोकांचं आयुष्य आणि जमापुंजी फक्त मनासारखे घर घेण्यात निघून जाते. मला खात्री आहे प्रत्येकांच्या स्वप्नातील घर नक्कीच असेच असणार.

आठवणींच्या आधी जाते
तिथे मनाचे निळे पाखरू
खेड्यामधले घर कौलारु...

घर आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर आपल्या बरोबर असते. गणपतीच्या आगमनांनी घर प्रसन्न होते तर दिवाळीच्या दिवसांत घर लक्ष दिव्यांनी उजळून निघते.नवीन जन्माला आलेल्या बाळाचे घर हात पसरून स्वागत करते आणि बाळलीला अनुभवते. नवीन आलेली सून ह्याच घराचा उंबरा ओलांडून सोनपावलांनी येते. घर आपल्या बरोबर आनंदात बागडत म्हणुनच जुनेजाणते म्हणतात नेहमीच शुभ बोलावे घर तथास्तु म्हणत असते . जेंव्हा घरातील मुलेमुली शिक्षण किंवा नोकरी निमित्त घर सोडतात तेव्हा घर त्यांना साद घालते..

या चिमण्यांनो परत फिरा रे घराकडे अपुल्या....

घर दुःखात आपल्या बरोबर टीपे गाळते. रूग्णालयात असलेला आजारी माणूस पण घरी परत सोडत आहे ह्या कल्पनेनेच अर्धा बरा होतो. मरणाच्या दारात असलेल्या माणसाला सुद्धा घरघर लागली आहे असे म्हणतात.

प्रत्येकांला कसेही असले तरी आपले घर खूप प्रिय असते कारण तिथे त्याला हरप्रकारे स्वातंत्र्य असते मग तो महाल असो का झोपडी. मला आठवते आहे शाळेत असलेली संत तुकडोजी महाराज ह्यांची ही कविता-

राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या॥

भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पहावे
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या॥....

© माधवी समीर जोशी

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle