वेडींग ड्रेस- 6

.....…......चार दिवस स्वतःला खोलीत कोंडून घेतल्यानंतर व्हिक्टोरिया ब्रेकफास्ट ला डायनिंग हॉल मध्ये येण्यास तयार झाली. मेजर विल्यम्सने तिच्या आणि हेन्री च्या लग्नाला असलेला विरोध काढून घेतला होता. हेन्री शहरातल्या गरीब वस्तीत आपल्या आईबरोबर राहणारा, वडील नसलेला, दुसऱ्यांच्या शेतीत राबून कष्ट करणारा मुलगा. तो एक उत्तम शिल्पकार होता. शिल्पकलेच्या विद्यालयात शिकून व्यावसायिक शिल्पकार होण्याचे त्याचे स्वप्न होते. पण शिक्षणासाठी लागणारे पैसे मिळवण्यासाठी त्याने शेतकामे सुरू केली. लवकरात लवकर पुरेसे पैसे जमा करण्यासाठी तो दुप्पट कष्ट करत असे. त्याची आई तेरेसा हेन्री लहान असल्यापासून विल्यम्स कडे पूर्ण वेळ घरकामासाठी असे. हेन्री मोठा होईपर्यंत आईबरोबर विल्यम्स कडे येत आणि दिवसभर तिथेच थांबत. विल्यम्स चा बंगला गावापासून जरा बाजूला पडत असल्याने व्हिक्टोरियाचा हेन्री हाच एकमेव मित्र झाला. नाही म्हणायला व्हिक्टोरियाला एक लहान भाऊ होता. दोघांत 10 वर्षांचे अंतर. त्याच्या जन्माच्या वेळी व्हिक्टोरिया ची आई गेल्यामुळे त्याचा सांभाळ करण्यासाठी त्याला दुसऱ्या गावी त्याच्या आजीकडे ठेवण्यात आले होते. हेन्री आणि व्हिक्टोरिया तरुण वयात येऊ लागले तसे त्याच्यात मैत्रीच्या पुढचे नाते तयार होऊ लागले. गडद करड्या डोळ्यांचा, उंचापुरा, शेतीची कामे करून मजबूत अंगकाठी कमावलेला हेन्री रुबाबदार दिसु लागला होता. एक दिवस हेन्री ने व्हिक्टोरियाला तिचेच एक छोटेसे सुरेख बस्ट स्कल्पर भेट देऊन तिला आपल्या प्रेमाची कबुली दिली. व्हिक्टोरिया मिनिभराचा विलंब ही न लावता त्याला होकार दिला. सोळा वर्षांच्या व्हिक्टोरियाच्या लग्नासाठी घरात वर संशोधनाची चर्चा होऊ लागताच तिने वडिलांना हेन्री बद्दल सुचवले. विल्यम्सला एखाद्या भणंग मुलाबरोबर आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न लावून देण्याची कल्पना ही सहन होईना. विल्यम्स ने संतापून 'श्रीमंत मुलीला फसवून माय लेकाचा आपल्या संपत्तीवर डोळा आहे' असे आणि अजून नाही नाही नाही ते आरोप तेरेसावर लादले. स्वाभिमानी हेन्री ला सगळ्यांसमोर आपल्या आईचा झालेला अपमान सहन झाला नाही. त्याला कळताच तो दुसऱ्याच दिवशी आईबरोबर आला आणि 'आजपासून माझी आई तुमच्याकडे काम करणार नाही' म्हणून आईला घेऊन गेला. तसेच व्हिक्टोरियाशी असलेले सगळे संबंध तोडण्याचे वचन दिले. बाप लेकीत खटके उडण्यासाठी हे निमित्त ठरले. दोघातला संवाद संपून त्याची जागा वाद, भांडणांनी घेतली. विल्यम्स् पुढे काही चालेना हे पाहून अखेर व्हिक्टोरिया ने स्वतःला खोलीत कोंडून घेतले आणि अन्न पाणी त्यागले. तिच्या खोलीचे दार तोडून तिला बळच खाऊ घालण्याचा प्रयत्न केला गेला. शेवटी तिने स्वतःचा जीव देण्याची धमकी दिली तेव्हा विल्यम्स ने माघार घेऊन अखेर तिच्याबरोबर चर्चा करण्यास तयारी दाखवली.
व्हिक्टोरियाचा आनंद गगनात मावेना. हेन्री च्या घरी जाऊन तिने त्याच्या आईची माफी मागितली आणि लग्नाच्या चर्चेसाठी वडिलांकडून आमंत्रण असल्याचा निरोप ठेवला. विल्यम्स ने दोघांचा यथोचित सन्मान करून पुढच्या महिन्यातला एक रविवार लग्नासाठी ठरवला. लग्नाची तयारी सुरू झाली. व्हिक्टोरिया च्या वेडींग ड्रेस च्या निवडीची वेळ आली. विल्यम्सने आपल्या ओळखीचा वापर करून लंडन वरून खास उंची सिल्कचा व्यापार करणाऱ्यांनाकडून कापड मागवून घेतले. त्यांच्याच शहरात एका गुणी टेलर कडे व्हिक्टोरियाने ड्रेस शिवायला टाकला. ड्रेस वर सोन्याचे पाणी चढवलेल्या धाग्यांचे हाताने नक्षीकाम होणार होते... व्हिक्टोरिया हरखून गेली होती....

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle