वेडींग ड्रेस - 7

पुढचा भाग टाकायला खूपच उशीर करतेय त्याबद्दल बिग सॉरी....!
लिंक लागण्यासाठी आधीचे भाग पटकन वाचायचे असतील तर ही लिंक!

https://www.maitrin.com/node/3733

मेजर विल्यम्सने ने लग्नाला मान्यता दिली पण हेन्री पुढे एक प्रस्ताव ही मांडला. हेन्री ला तो गावातल्या सरकारी कार्यालयात छोटीशी नोकरी मिळवून देऊ शकत होता. जेणेकरून त्यांना महिन्याला स्टेबल रक्कम मिळून दोघांचा संसार व्यवस्थित चालेल आणि मुलीला त्यातल्या त्यात सुखात राहता येईल. हेन्री ला अशी रोजचा ठराविक वेळ घेणारी नोकरी नको होती. त्याला त्याच्या शिल्पकलेच्या सरावाला वेळ मिळणार नाही म्हणून त्याने शेतकाम पत्करले होते. ठराविक सिजन मध्ये जास्तीची कामे झाली की नंतर त्याला बराच वेळ मिळत असे. तसेच तो शिकलेला असल्याने त्याला शेतकामाऐवजी इतर मजुरांच्या कामावर लक्ष ठेवणे, हिशेब ठेवणे अशी कामे दिली जाऊ लागली होती. पण विल्यम्स सारख्या हट्टी, हेकेखोर माणसाने नमतं घेतलंय तर आपणही विकी साठी , दोघांसाठी काहीतरी तडजोड केली पाहिजे असा विचार करून त्याने तो प्रस्ताव मान्य केला. व्हिक्टोरियाला हेन्रीने आपल्यासाठी ही तडजोड करायला नको होते, तिने हेन्रीला पुन्हा त्यावर विचार करण्यास सांगितले. पण हेन्रीचा निर्णय झाला होता. व्हिक्टोरियाला आता आपल्या बाबांबरोबर आपण खूप आततायीपणाने वागलो म्हणून वाईट वाटू लागले.. तिने त्यांची माफी मागितलीच पण इथून पुढे त्यांना त्यांच्याशी ती असे कधीही वागणार नाही असे वचन दिले.
एक दोन दिवसातच नावापुरता इंटरव्ह्यू देऊन हेन्री ऑफिसात रुजू झाला. त्याच्या नोकरीचे तास संपले की तो आणि विकी रोज गावातल्या नदीकिनारी जात असत. हिरवेगार कुरण, आजूबाजूला उंच, घनदाट, रांगेत उभारलेले ओक वृक्ष, लांबवर दिसणाऱ्या निळसर टेकड्या आणि त्याला टेकलेले ढगांचे , मावळतीच्या वेळी केशरी होत जाणारे पुंजके असे सुंदर दृश्य असे. उंचसखल कुरणाच्या कडेकडेने जांभळ्या रंगाच्या छोट्या छोट्या रानटी फुलांची झुडपं होती. अधून मधून पावसाचे शिडकावे चालूच असल्याने कुरणं, झाडं टवटवीत दिसत असत. तिथल्या गवताला सुंदर गंध येत असे. गाव छोटंसं असल्याने आपल्याकडची थोडीफार जनावरं चरायला घेऊन तिथं माणसं येत असत, पण संध्याकाळच्या वेळेला केवळ पानांची, गवताची सळसळ , पाखरांचे आवाज नि नदीच्या प्रवाह यांच्या अस्तित्वाने तो एकांत भरलेला असे. नदी अरुंद होती आणि पलीकडे जाण्यासाठी एक जुनाट लाकडी पण भक्कम पूल होता. बऱ्याचदा दोघे त्या पुलावर पाय खाली सोडून बसत आणि अंधार होइपर्यंत गप्पा मारत असत. गर्द झाडीमुळे तिथे लवकरच अंधार जाणवत असे. लग्न ठरल्यापूर्वी कोणाच्या नजरेत येऊ नये म्हणून दोघे इथल्या पुलावर कधीच येत नसत. कुठल्यातरी दाट झाडयांच्या मध्ये उभ्याउभ्या , गडबडीत त्यांच्या भेटी होत असे. आता मात्र तो लाकडी पूल ही त्यांची ठरलेली जागा झाली होती.
असेच दोन आठवडे निघून गेले. व्हिक्टोरियाला त्या दिवशी सकाळी जोरदार पावसाच्या रौरवानेच जाग आली. तिच्या रूम च्या खिडकीतुन बाहेरचा रस्ता दिसत असे. आज पावसाच्या धारांमुळे पलीकडचं अंधुक दिसत होते. रस्त्याच्या दुतर्फा असलेली झाडं झोडपून निघत होती. बाथरूम मध्ये जाऊन तिने गरम पाण्याचे शॉवर घेतले. गर्द हिरव्या रंगाचा , रेशमी आणि त्यावर जांभळ्या फुलांचे नक्षीकाम असलेला ड्रेस चढवला. लांबसडक फिक्कट ब्लॉन्ड केस कोरडे होण्यासाठी तसेच मोकळे ठेवले.तेवढ्यात दारावर दोनदा नॉक करून तिची मेड चहाचा ट्रे घेऊन आत आली.
" गुडमॉर्निंग मॅम"
" गुडमॉर्निंग डेझी"
डेझी चहा बनवून कप बशी व्हिक्टोरिया च्या हातात देऊन जाऊ लागली तितक्यात तिला काहीतरी आठवले. चटकन मागे वळून तिने तिच्या ड्रेस च्या खिशातून एक पाकीट बाहेर काढले.
"आय एम सो सॉरी मॅम. थोड्यावेळापूर्वीच तुमच्यासाठी एक लेटर आलं आहे."
" ओह, थँक्यु डेझी"
व्हिक्टोरिया ने तिच्या हातातून पाकीट घेताच डेझी निघून गेली. पाकिटाच्या कोपऱ्यात सरकारी स्टॅम्प होता. तिला विशेष वाटले. पाकीट उघडून पत्र बाहेर काढताच तिला खाली काही छोटी जांभळी फुलं दिसली. ते रोज भेटतात तिथल्या झुडपाला येतात तीच होती ती.पत्र हेन्री चे आहे हे तिच्या ताबडतोब लक्षात आले. कुतूहलाने त्यातला कागद घेऊन ती बेडवर खाली पाय सोडून बसली.
"डियर विकी,
मला ऑफिसच्या कामासाठी आज सकाळीच 4 दिवसांसाठी बाहेरगावी जावे लागत आहे. मलाही खूप अचानक निरोप मिळाला. बुधवारी संध्याकाळी नेहमीच्या वेळी आपल्या नेहमीच्या ठिकाणी भेटुयात. मी वाट पाहीन "
लव,
हेन्री

PS: तुला फुलं मिळालीच असतील.

"
बुधवारचा दिवस उजाडला. आज ती दोन कारणांमुळे खूप एक्साईटेड होती. एक म्हणजे चार दिवसांनी हेन्री परत येणार होता नि दुसरं म्हणजे आज तिच्या ड्रेस ची डिलिव्हरी मिळणार होती. दिवस पटापट पुढे सरकला. तिने आपल्या रेशमी ब्लाँड केसांची साईड ब्रेड घातली. ऑफ व्हाईट रंगाचा सिल्क चा गाऊन, त्याच रंगाची एक छोटीशी पर्स आणि काळ्या रंगांची एक छत्री घेऊन ती बाहेर पडली. तिला बाहेर येण्याजण्यासाठी त्यांची स्वतंत्र कॅरीज होती. अगदी फॅन्सी नाही, साधीशीच आणि लहान. तिने ड्रायव्हर ला जागा सांगितली. घोड्यावर चाबूक ओढून ते निघाले. जागेच्या जवळ आल्यावर तिने ड्रायव्हर ला पाठवून दिले आणि ती स्वतः परत येईल असे सांगितले. ती चालत नदीकाठाच्या दिशेने जाऊ लागली. तिच्याकडच्या पॉकेट वॉचमध्ये तिने वेळ तपासून पाहीली तर त्यांच्या नेहमीच्या वेळेला अजून 15 20 मिनिटे बाकी होती. तरीही हेन्री अद्याप यायला हवा होता असे तिला वाटून गेले. तिने आजूबाजूला पाहिले. सहजच ती झुडपांवर उमललेली जांभळी फुलं तोडून तिच्या पांढऱ्या सिल्कच्या रुमालात वेचायला सुरू केले. आजूबाजूला थोडा अंधार पडायला लागला तेव्हा तिची तंद्री तुटली. . पुन्हा पॉकेट वॉच काढून पाहिले तर अर्धा तास होऊन गेला होता. चुकामुक होऊ नये म्हणून ती पुलावर नेहमीच्या जागी जाऊन उभा राहीली. ती या वेळी इथे एकटी कधीच आलेली नव्हती त्यामुळे तिला आजूबाजूच्या शांत वातावरणाची थोडीशी भीती वाटत होती. पाण्याच्या प्रवाहाचा आवाज, पक्षांचा वाढलेला किलबिलाट यांच्या जोडीला आता पावसाची रिपरिप, तडतड चालू झाली होती. तिने तिच्याजवळची छत्री उघडली. अजून अर्धा तास लोटला असावा. अंधार वाढत चालला होता. तिला तिथे थांबणे आता बरे वाटेना. तसेच एरव्ही ती या वेळेआधीच निघालेली असे आणि बरोबर हेन्री असे. उगीच आपण चार दिवसांआधीचे पत्र वाचून इथे आलो, कदाचित हेन्री ला परत येण्यास उशीर झाला असावा, असा सगळा विचार करत ती तिथुन निघण्यासाठी वळणार तेवढ्यात तिला नदीच्या प्रवाहाबरोबर काहीतरी वाहत येताना दिसले. कदाचित एखाद्या झाडाचा ओंडका वगैरे असावा. एव्हाना पावसाने जोर धरला होता. नदीच्या प्रवाहाचा वेग ही वाढला होता त्यामुळे ते नदीत वाहत येणारेही वेगाने तिच्या जवळ येत होते. हळूहळू ते नजरेच्या टप्प्यात आले. व्हिक्टोरियाने अजून व्यवस्थित दिसावे म्हणून छत्री मान आणि छातीच्या आधाराने दाबून धरली आणि दोन्ही हात आधारासाठी बनवलेल्या पुलाच्या लाकडी ओंडक्यावर ठेऊन खाली वाकून पाहू लागली. त्यानंतर तिला जे काहो दृश्य दिसले त्याने तिच्या पायाखालची जमीन सरकली आणि भवताल एकदा वेगात गोल फिरून स्थिर झाला. जवळची छत्री प्रवाहात पडून वाहून जाऊ लागली.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle