चांदण गोंदण : 7

आज सकाळ काही नेहमीची उगवली नाही. तसं दोन दिवसांपासूनच वातावरण तंग झालं होतं, पण प्रश्न उत्तरादाखल बोलणं होत होतं. त्यानं जरा बुद्धीला ताण देऊन पाहिला की आपण काहीतरी मेजर चुकलोय का, काही बोललोय का, काही विसरलोय का.. पण तसं तर काहीच नव्हतं. मग ती अचानक बोलनाशी का झाली?

एरवीची तिची बडबड थांब म्हणावं इतकी असायची त्यामुळे तिला राग आला, चिडली की बोलणं बंद झाल्यावर एखादं शहरच्या शहर ठप्प व्हावं तितकी शांतता पसरते दोघांत. मग ते अंतर वेळ जाईल तसं वाढत जातं आणि ते कापून तिच्यापर्यंत पोचणं त्याला अवघड होऊन बसतं. कधी कधी तर मनातलं हे अंतर दूर करायला तो खरोखर शहराच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत गेलेला आहे तिच्यासाठी. आणि ती ही त्याच्यासाठी. मग नंतर सगळं इतकं सहज सोपं व्हायचं की कशासाठी इतकं ताणलं असं दोघांनाही वाटायचं. पण तो क्षण यायला खूप वाट पाहावी लागायची, तपश्चर्या करावी इतका दैवी असायचा तो क्षण.

त्याला हल्ली धीर धरवत नसे इतका वेळ तिच्याशिवाय. काल दुपारपासून एल मेसेज नाही, सकाळी ऑफिसला आल्यावर नाही. शेवटी न राहवून त्यानं तिला व्हॉट्सअप वर पिंग केलंच.
ओ शुक शुक.

(तिच्या रीड रिसीटस कायम बंद असतात. आपला सतत कुणी ट्रॅक ठेवणं तिला आवडत नाही. मुळात आपण कुणाला प्रत्येक गोष्टी साठी आन्सरेबल नाही असं तिचं म्हणणं. त्यामुळे परमेश्वराची कृपा होईल तेव्हाच मेसेज ला रिप्लाय मिळेल यावर त्याचा विश्वास.)

साधारण पस्तीस मिनीटांनी रिप्लाय आला.

काय

(स्मायली सोडा, कोणतंही विरामचिन्हं न देता शुष्क कोरडा शब्द म्हणजे लढाई मोठी आहे.)
काय करतेयस?
काम

(नेहमीची रसद पुरणार नाही. असले फुटकळ प्रश्न उत्तरं दोघांनाही वात आणतात. जेवलास का झोपलीस का असले प्रश्न विचारायचे नाहीत हे दोघांत कधी ठरलं होतं आठवत नाही पण ठरलंय.)

साधारण तीन तासांच्या शांततेनंतर तो पुन्हा सरसावतो.

काय झालंय? बोलत का नाहीयेस?
(लगेच प्रत्युत्तर)
बोलतेय की.काय होणारे मला.

आता तो गप्प. कुठून सुरवात करणार? काही बोलायची सोय नाही.

तिकडं तिला कळलंय की त्याला कळलंय कुछ तो हुआ है. पण तो ओळखू शकणार नाहीच. पूर्वीच्या राण्या कशा जाहीरपणे कोपभवनात जायच्या... मग राजा समजूत काढायला यायचा. राणी मागेल ते तिला मिळायचं. राजाला काय कमी होतं? पण राणीचा थाट राजा जपायचा. राजापेक्षा राणीचा मान मोठा ठेवायचा.

ठेवायलाच हवा ना? एवढ्या मोठ्या राजाला खूश ठेवणं, त्याचं सुखदुःख वाटून घेणं काय सोपं आहे? शिवाय सतत लढाई आक्रमणाची टांगती तलवार. राज्यात असला तरी राणीच्या वाट्याला कितीसा येत असणार राजा? त्यात आणखी वाटेकरी राण्या असतील तर बघायलाच नको. असा विचार मनात आला आणि तिनं पुन्हा स्वतःशीच तोंड वाकडं केलं. इथं तर सगळाच सुळसुळाट आहे आणि कोपभवनाचं लोकेशन पण आपणच शेअर करा! तिला अगदी वैताग आला. तिनं टाईप करायला सुरुवात केली -

परवाचा फोटो चांगला होता.
कुठला?
किती फोटो टाकलेस परवा फेसबुकवर? का मला एकच दाखवायचं सेटिंग होतं?
(सटकन तिचा पारा चढला. तो अचानक झालेल्या माऱ्याने धडपडलाच पण पटकन सावरलं त्यानं स्वतःला.)

हा, तो होय! असाच सकाळी उन्हात गच्चीवर गेलो होतो चहा प्यायला तेव्हा काढला.
(याला अजून समजलेले नाही? का हा वेड घेऊन पेडगावला जातोय? माझ्याकडूनच वदवून घेणार हा.)

हम्म. मग आता बाकीच्यांना कधी नेतोयस चहा प्यायला गच्चीत?
(मुद्दाम खोचक प्रश्न)

? कुणाला?
(हा नवा बॉम्ब! त्याला आता धोक्याची जाणीव व्हायला लागली होती.)

इतर जाऊदेत, तिला तर नेच ने.
(शेवटी तिनं एकदाचं बोलून टाकलं!)

कुणाला तिला?
(त्याचा टोटल दिल चाहता है मधला समीर झालेला!)

तीच ती, तुझ्या फेसबुक पोस्ट्सची चातकासारखी वाट पाहत असते. कायम पहिली कमेंट टाकायला टपलेली असते. अगदी भरभरून कौतुक ओसंडत असतं नुसतं!

(तिचा फणा आता पूर्ण उभारलेला.त्याला तो शब्दांशब्दातून दिसत असल्याने तो निश्चल पण शरण. पटकन कालच्या पोस्टवर कुणाची पहिली कमेंट आहे ते पाहून घेतो. आधीच्या दोन तीन पोस्ट्स वर पण तिचीच कमेंट. हिचं एकही लाईक पण नाही?! अरेच्चा. हे तर लक्षातच आलं नव्हतं. धन्य!)

Ooooo!! असं आहे काय! ( आणि हसायचे दोन तीन स्मायली)

हसतोस काय? मला हे आवडलेलं नाहीय सांगून ठेवते. मी धोपटेन तिला एक दिवस.
(ती विझत चाललेल्या रागावर मुद्दाम फुंकर घालत पेटता ठेवायच्या प्रयत्नात)

R u jealous? (डोळा मारलेला आणि डोळ्यात बदाम स्मायली)

मग? नसणार का?
(आता रागाच्या जागी रडू यायला लागलेले.)

असावसच तू जेलस! त्याशिवाय तू माझ्यासाठी किती पझेसिव्ह आहेस ते कसं कळणार?
आहेच मी पझेसिव्ह. तू फक्त माझा आहेस. तुझे सगळे फोटो माझे आहेत तुझं घर, तुझी गच्ची, तू केलेला चहा पण माझा आहे.

(तिला त्याला आताच्या आत्ता कडकडून मिठी मारावी वाटत होतं. ते सगळं पुन्हा पुन्हा वाचतांना त्याच्या गालावर हलकेच खळी उमटत होती.)

हो ग राणी माझी. सगळं सगळं फक्त तुझं आहे, तू लाईक केलं नसलंस तरी! (पुन्हा डोळा मारून दात दाखवणारा स्मायली)

असू देत, मी तुला कायमचं लाईक केलंय तेवढं पुरे आहे. ते कधी एकदा त्या ढोलीला कळेल असं झालंय.
(पुन्हा त्या दुसरीच्या आठवणीने चडफडाट.)

आहेच का अजून? मी सांगितले का तिला तसं करायला? मी कधी तिला वेगळा रिप्लाय दिलाय बघ बरं? कोण पहिले कमेंट करेल यावर कुणाचा कसा कंट्रोल असेल?
(नेहमीसारखा अत्यन्त लॉजिकल प्रश्न टाकून त्यानं तिला गारद केलं.)

ते जाउदे. आज भेटणारेस का?
हो तर! आज भेटायलाच हवं. पझेसिव्हनेस कुणाचा जास्त आहे ते बघायचाय जरा...

संध्याकाळची लाखो चमचमती गुलाबी स्वप्नं डोळ्यांत तरंगणारी आणि कालपासूनच्या रुसलेल्या ओठांवर एक खट्याळ हसू दाखवणारा एकही स्मायली तिला सापडत नव्हता या क्षणी...!

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle