चांदण गोंदण : 8

दुपारी तीन वाजता त्याचा फोन वाजला. आज लकिली तो फ्री असताना तिचा कॉल आला होता. त्यानं खुशीतच हॅलो! म्हटलं. त्या मनमोकळ्या, स्वल्पविरामयुक्त हॅलो वरूनच तिनं ओळखलं की आज जरा वेळ आहे, वा वा. तिलाही मध्ये थोडा वेळ रिकामा सापडल्याने जरा पाच दहा मिनिटे तरी गप्पा माराव्यात या उद्देशाने अगदी ऑफिसच्या बाहेर येऊन तिनं कॉल केला होता. विषय तसा त्या दोघांनाही कधी लागत नाहीच. नुसतं बोलता बोलता वेगवेगळे विषय, लोक गुंफले जायचे. कधी सध्या नवीन काय करतोय किंवा इतर अपकमिंग इव्हेंट्स वर वगैरे बोलणं व्हायचं. या सगळ्या वरवरच्या बोलण्याला "हे माझे सगळे अपडेट्स तुला माहीत असणं मला फार आवडतंय" चं एक सुंदर मऊ अस्तर दुहेरी बाजूंनी असायचं. ती कधी कधी मुद्दाम तिरके बोलून त्याला डिवचायची की कसं कुणाला काय गिफ्ट मिळालं पण आपल्याला काय गिफ्ट्स ची हौस नाही वगैरे जे तो अगदी ऐकून घेत दिलखुलास हसत पडती बाजू घ्यायचा. एका शहरात असले तरी कित्येक दिवस भेट होत नसल्याने हा असा एखादा फोन दोन तीन दिवस पुरायचा दोघांना.

फोन झाल्यावर ती जागेवर येऊन बसली आणि अचानक तिच्या लक्षात आलं की आज ऑफिसातून लवकर निघायचे चान्सेस आहेत! O wow! जगातल्या इतर कोणत्याही गोष्टीपेक्षा अर्थातच प्रायोरिटी एकाच गोष्टीला होती - संध्याकाळ ची भेट! लगेच त्याला मेसेज केला
आज भेटायचं?
थोडं थांब, बघून सांगतो.

ही अशी अचानक आनंदाचे बॉम्ब का टाकते. त्याने घाईघाईने संध्याकाळी भेटायचे क्लाएंटस चेक केले. याला उद्या सकाळी येतोस का विचारू, हा.. नुसतंच चौकशा करणार ऑर्डर पुढच्या महिन्यात देईल मग याला फोनवरच कटवू. आणि अजून एकाला मीच जाऊन भेटतो. झालं सगळं क्लियर. मेसेज.

येस! किती वाजता?

जमवणारच होतास तू मला माहीत आहे. या हातात आलेल्या रिकाम्या वेळाची किंमत आपल्याशिवाय कुणाला असणार आहे?!

7
डन.

जगभरातल्या सगळ्या गाड्या नेमक्या याच रस्त्यावर उतरल्यात असं काही नव्हतं खरंतर, पण तिला आज लवकर रस्ता कापायचा असल्याने अगदी असच वाटत होतं. अर्ध्या तासाचं अंतर पन्नास मिनिटात पार करून ठरलेल्या ठिकाणी ती पोचली तेव्हा त्यांची ती चकचकीत स्वच्छ सुंदर गाडी तिची वाटच पाहत होती. गाडी बघूनच तिच्या सगळ्या धडपडीला एक ठेहराव मिळाला. खरंतर त्याच्यामुळे तिच्या एकूणच आयुष्याला ठेहराव मिळाला होता. लग्न वगैरे कधी करू किंवा करणार का नाही हे दोघांचं अजून ठरत नव्हतं. पण गेली पाच सहा वर्षं ते एकमेकांना कमिटेड होते. लग्नाचं आकर्षण नव्हतं आणि खरंतर गरजही. हे जे आहे तेच फार सुंदर अलवार आणि ओढ लावणारं आहे ते तसच जितकं फुलवत ठेवता येईल तेवढं फुलू देऊया की हे त्याने खूप वेळा समजवल्यावर तिलाही पटलं होतं. लग्न त्याच्याशीच आणि कधीही अगदी उद्या पण करता येईल हा एक फिक्स फॉलबॅक असल्याने ती निर्धास्त राहायला लागली होती. एकंदर पाहता सगळंच अनिश्चित असताना आतून विश्वास देणारा हाच तो ठेहराव!

गाडीचं दार उघडून आत बसताना तिनं क्षणात पाहिलं, तिनं दिलेला डार्क नेवी ब्ल्यू शर्ट! आणि मन प्रसन्न करणारं परफ्युम… आपण एवढ्या धबडग्यातून आलो आणि काय अवतार केलाय. स्प्रे पण केला नाही निघताना. तिच्याकडे पाहून त्यानं एक छान स्माईल दिलं आणि पाण्याची बाटली पुढं केली.

कहा जाना है मेमसाब

हसू दाबत भुवया उंचावत ती उत्तरली,
मरीन ड्राइव्ह!

हा हुकमी संवाद झाल्यावर दोघं नेहमी इतकंच जोरदार हसले. सिनेमात गुंडांची सिग्नेचर असते तशी दोघांची ही सिग्नेचर झाली होती. हजारो वेळा पुण्यातल्या मरीन ड्राईव्हला असे ते गेले होते. पाणी पिऊन झाल्यावर तिनं जरा केस ठीक केले आणि हलकेच लिपस्टिक लावली. तोवर त्यानं गाडी नेहमीच्या दिशेला घेतलीही होती. फक्त दोन गोष्टी केल्यावर ती आणखी किती सुंदर दिसू लागते याचं नेहमीप्रमाणे मनातल्या मनात आश्चर्य करत तो हसला. त्याच्या गालावर उमटणाऱ्या त्या रेघेची वाटच पाहत असल्यासारखी पटकन उजवीकडे झुकून तिने हलकेच ओठ टेकले आणि पुन्हा काही झालंच नाही असा चेहरा करून बसली. त्या क्षणी बाहेरून कुणी पाहिलं तर काय वाटलं असेल वगैरे प्रश्न तिला आता पडत नाहीत. कारण लोकांना काही पडलेली नसते हे आता तिला समजलं होतं. आपला वेळ, आपलं व्यक्त होणं, आपली सोबत यापेक्षा दुसरं महत्वाचं काही नाही.

गालावर मिळालेल्या काहीशा अपेक्षित बक्षीसाने तो सुखावला. त्याचे स्टीअरिंगवरचे हात आणखी रिलॅक्स होत आणखी सफाईदारपणे फिरू लागले.

हे बघा मॅडम, ड्रायव्हरचे लक्ष विचलित होईल असे वागू नका.

आम्ही कुठं काय वागलोय? ड्रायव्हरने आपले काम नीट करायला पाहिजे काही झाले तरी. त्याचाच तर पगार मिळतो ना?!

मॅडम, एक महिन्याच्या वर झालाय पगार मिळाल्याला. कसे दिवस काढतोय, आमचं आम्हाला माहीत. ( त्यानं तिच्याकडे बघत डोळे मिचकावले. तिला पण नाजूक हसू फुटलं. पण ती हार मानणारी नव्हती)

पगार हवा असेल तर रोज काम करावं लागेल. आहे तयारी?

करू की. बघा हां, मग तुम्हीच माघार घ्याल.

मनातल्या उकळ्या तो काही लपवू शकला नाही. ते बघून तिने तर आताच माघार घेतली.

काम तुम्हाला हवं ते नाही काही,आम्ही म्हणू ते.
अहो एकूण एकच की. काम हे शेवटी कामच असणार ना. तुमचं आमचं अगदी सेम असणार.

हसत हसत त्याला एक फटका देत, गप रे आता! म्हणाली ती.

तू भेटलीस की इतकं बरं वाटतं ना! मला खरंच गरज होती तुला भेटण्याची.
मला पण.

त्याचा हात आपल्या हातात गुंफून घेऊन तिने त्याचा स्पर्श स्वतःमध्ये मुरवून घेतला. त्यानेही एक मोठा श्वास घेऊन तिचं गाडीतलं मोहमयी अस्तित्व उरात सामावून घेतले. जरावेळ दोघंही शांत राहून एकमेकांना जाणवून घेत राहिले. रस्त्यावरची गर्दी, घड्याळात होत जाणारा उशीर, नंतर करायच्या असलेल्या अनंत गोष्टी या सगळ्याला काही क्षणांपुरता पॉज मिळाला होता.

हे असे फक्त त्याचे आणि तिचे क्षण खूप असोशीने जगून घेतले जात. जेव्हा ते फक्त एकमेकांचे असत, इतर कुठलेही मुखवटे, मुलामे आणि लळेलोंबे सांभाळावे लागत नसत. न्हाऊन झाल्यावर आपलं रोजचंच शरीर जसं स्वच्छ सुंदर नवकांतीमय होऊन जातं तसं रोजचं जगणं लख्ख सुरेख करायची जादू या क्षणांत होती. मुख्य म्हणजे दोघांनाही याची जाणीव आणि कदर होती.

गप्पा मारता मारता अनेक विषय निघाले, विरले. हसत हसत काही निसटते, पुसटसे, तर काही आवर्जून स्पर्श झाले.. ते विरले नाहीत. काही हृदयाच्या अगदी जवळच्या वळणांवर आवाज कापरे झाले, डोळ्यांच्या काठावर पाणी आले. ते पाणी परस्पर मागे जाऊ देण्याच्या शिताफीपेक्षा ते ओझं इथंच हलकं करण्यातला प्रामाणिकपणा जास्त जवळचा वाटायचा. उगाच किरकोळ होते तेही गैरसमज दूर झाले. नव्या जमा होणाऱ्या आठवणींनी मन अगदी भरून गेले.

निघता निघता त्याने तिला विचारलं,
अशीच कायम राहशील ना माझ्यासाठी? जगात कुठेही असलीस तरी?
लग्न केलं तर या कातर निरोपांना एकदाचा पूर्णविराम मिळेल. पण या भेटींचा जो स्वल्पविराम आहे तो तुला पुन्हा भेटायची ओढ लावतो. तू येईपर्यँत तुझी वाट पाहणं, तुझी स्वप्नं बघणं, माझ्या रोजच्या आयुष्यात तुम होती तो वाला खेळ खेळण फार फार आवडतं मला. प्रेमात असण्याच्या या फेजच्याच मी प्रेमात आहे असं म्हण हवंतर. आणि हे सगळं मला मन भरून जगायचं आहे, अनुभवायचं आहे. लग्न केल्यानंतर पण नवे आयाम मिळतील आपल्या नात्याला, नवी दालनं उघडतील तेही कदाचित आवडेल आपल्याला. रेंगाळू तिथेही. पण एकदा पुढं गेलो तर या स्टेजला पुन्हा हे नातं येणार नाही. खरतर कुठलंच नातं एका स्टेजला टिकून राहत नाही. पण ही फेज जास्तीत जास्त अनुभवायचा आपल्याला पर्याय आहे. मग तो इतक्या लवकर आपण बंद करून टाकावा असं नाही वाटत मला... तुलाही असंच वाटतं ना?

त्याच्या लॉजिकल विचारसरणीच्या पुन्हा पुन्हा प्रेमात पडत ती आश्वस्त गोड हसली.तिचा चेहराच सांगत होता की त्याच्या या प्रश्नाला उत्तर नव्हते राणी प्रेम दिवाणी...अर्ध्यावरती डाव थबकला.. कधी पुरी न होवो ही कहाणी...!

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle