कानवल्यांची कहाणी

काल सखेग व्हॉट्सअप ग्रुपवर अवलने तयार केलेले अतिशय सुरेख रंगीत कानवले हा विषय चर्चेत होता. अर्थातच ते कसे करतात टीपा, टेपा, टप्पा आणि टीपी असं सगळं रीतसर झालं. त्यात वर्षाने (आपली मँगो रसमलई केक करणारी गोमू ) शक्कल लढवली की तोंडात विरघळणाऱ्या करंजीसाठी एवढा घाट घालायची काही गरज नाही, साधी करंजी खाऊन पाणी प्यावे. यावर व्हायचा तो संसद गदारोळ झालाच. मग तिला मैत्रीचा हात पुढे करत संघमित्राने 'तू कानवले कर. मी येईन खायला' असं आश्वासन दिलं. त्यात अवलने चाणाक्षपणे पुढील शंका रिडायरेकत करण्यासाठी एक युट्यूब व्हीडिओ ची लिंक दिली ज्यात अगदी छान प्रकारे हीच कृती समजवली आहे. परंतु फोटो दिसला की व्यक्ती न पाहाता मागच्या शोकेसमध्ये काय काय दिसतंय हे पाहण्याचा मूळ स्वभाव असल्याने बायकांनी कानवले इग्नोर मारून या काकू कोण यावर ऊहापोह केला. त्याचा आवाज इतका झाला शेवटी इंग्लंडच्या राणीची झोप उडाली. आपल्या पूर्वजांनी कोहिनूर पळवून आधीच जे लांच्छन पदरी घेतले तेच काम आपण भावना (मैत्रीण टीम मधली) ला इथे बोलवून घेऊन केले असल्याचा साक्षात्कार झाला. तिने तातडीने शिपायांना पाठवून भावनाला या अजाण अज्ञानी भारतीय मैत्रिणीना मदत करायचा आदेश दिला. ती हातातली सायकल सोडून पटकन खाली उतरली आणि पटकन उत्तरली, " त्या स्नेहमयीच्या सासूबाई आहेत!" एवढेच बोलण्याचा आदेश असल्याने ती सायकलवरून पुन्हा अंतर्धान पावली. इकडे देशात जल्लोष झाला! गुढ्या तोरणे उभारली गेली. कानवले करण्यासाठी पंचांगे उघडली गेली. स्त्रिया ठेवणीतल्या साड्यांना ऊन देऊ लागल्या. आणि श्रावण मासी कानवले करायचे ठरले. पण कानवले जर यशस्वी व्हायचे असतील तर दर श्रावणी बुधवारी शुचिर्भूत होऊन ही कहाणी वाचावी. त्यापूर्वी अवलने केलेले हे कानवले पाहून धन्य व्हा आणि लगेच यू ट्यूब लिंक वर जाऊन शिकून घ्या!
IMG-20190610-WA0018.jpg

यू ट्यूब लिंक: https://youtu.be/AXGtDqEUMvE
***

ऐका कानवले देवा तुमची कहाणी. आटपाट नगर होतं. त्या नगरात फक्त स्त्रियाच होत्या. पुरुषांना तेथे मज्जाव होता. पुरुष आले की मज्जा जाते अशी त्यांची धारणा होती. तेथे एक आरतीबाई खोपकर राहायची. ती क्रोशाने खोपे विणायची. स्वयंपाक, विणकाम असं खूप काय काय करायची म्हणून तिचे नावच खोपकर पडले. तिने एकदा रंगीत कानवले केले आणि नगरातल्या इतर सख्याना दाखवले. तिची ही कलाकुसर पाहून बायका थक्क झाल्या. तिला विचारू लागल्या, रंग काय सुरेख आलाय! कसं बाई एवढं सुगरणत्व प्राप्त केलंस? सांग की याचं गुपित? कोणते व्रत केलेस, उपास धरलेस नवस केलास तो आम्हालाही सांग म्हणजे आम्हीही घेऊ हे वाण.

मग आरतीबाईने इतर सख्याना कानवल्याची सचित्र कृती सांगितली. तरी त्यांच्या विचित्र शंका ऐकून ती त्रस्त झाली. या बायका मला स्वस्थ बसू देणार नाहीत. आरतीबाईला जरा टिंग वाजलं की त्रास व्हायचा. यावर उपाय म्हणून ध्यानस्थ होऊन आंतरिक शक्तीने तिने एक बटण दाबले की कानवले बनवून देणाऱ्या घरगुती काकू निर्माण केल्या. जेणेकरून हा वसा कित्येक पिढ्याना घेता येईल. हे पाहून नगरातल्या बायकांचा आनंद गगनात मावेनासा झाला. बटण दाबताच चटपटीतपणे कानवले करणाऱ्या या कोण काकू म्हणून सगळ्या नगरात चर्चा झाली.

त्या स्त्रियांत एक नगरची स्त्री पण होती. जराशी खट्याळ आणि नाठाळ अशी ती होती. तिला हुक्की आली की जरा गंम्मत करूया. तिने बायकांना सांगितले की करंजी खाऊन पाणी प्यायले की पोटात जाताना त्याचा कानवला होतो. सगळ्या बायका आपसात कुजबूज करू लागल्या, खरं की काय!

हे ऐकून आरतीबाई खूप कष्टी झाली. आपल्या कष्टाचे हेच फळ का म्हणून तिने आई कणकवलीला साकडे घातले. ती प्रसन्न झाली. त्या खट्याळ मुलीला शिक्षा म्हणून रोज कारंज्याचे पाणी पिऊन दिवस ढकलावे लागतील आणि नगर मधली सगळी कारंजी बंद होतील, नगरमध्ये दुष्काळ पडेल, विळद घाटात हळद पडेल असा शाप दिला.

या शापाने दग्ध झालेल्या त्या खट्याळ मुलीला आपली चूक उमगली. नगर आणि विळद घाटावर तिचे फार प्रेम. तिने आरतीबाईची माफी मागितली. देवी कणकवलीची प्रार्थना केली. देवीनं तिला उ:शाप दिला. बटणवाल्या काकूंकडून कानवले शिकून घेऊन रोज मला नैवेद्य दाखवायचा. ज्या दिवशी मी प्रसन्न होईन तेव्हा गौरी बनून तुझ्या दारी येईन आणि प्रत्यक्ष कानवला खाऊन जाईन. खट्याळ मुलीने हे व्रत घेतले. खरोखर तिला कानवले उत्तम जमू लागले. इतके जमू लागले की ती कानवले केक करू लागली, तिने नवऱ्याला घरही का. नवले ब्रिज जवळ घ्यायला लावले. नवले कॉलेजमधील मुलांना शिकवून शिकवून नवल वाटावे इतके हुशार केले.

तिची ही भक्ती पाहून देवी एक दिवस गौरीच्या रुपात कानवला खायला घरी आली. तिच्या भव्य कुरळ्या केसांच्या दर्शनाने खट्याळ मुलीला मूर्च्छा आली. ती भोवळ येऊन पडलेली पाहून गौरीने आपल्या दिव्य दिटॉक्स जलाने तिला शुद्धीवर आणले आणि शापमुक्त केले. मुलीने गौरीला लोण्याचा केक शिदोरीत दिला. प्रसन्न होऊन खट्याळ मुलीला 23 व्या प्रयत्नात झोक्यावर बसून पण सुंदर सेल्फी काढता येईल असा वर दिला. नगर मध्ये कारंजी उसळली, विळद घाटातली हळद उडाली. सगळीकडे आनंदी आनंद झाला. आरतीबाईने पुन्हा कानवले करायला घेतले, बटणवाल्या काकूंना त्यांच्या अखंड कानवले व्रताच्या भक्तीपूर्ण भावनेमुळे स्नेहमयी सून मिळाली. असे हे कानवले व्रत तुम्ही आम्हीही घेऊ. साठा उत्तरांची कहाणी पाचा उत्तरी सुफळ संपूर्ण.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle