तरुण तुर्कांच्या देशात ३

तरुण तुर्कांच्या देशात १
तरुण तुर्कांच्या देशात २

दुसर्‍या दिवशी वेळेवर उठुन, आवरुन मग ब्रेकफास्टला गेलो. मस्त कॉन्टिनेंटल ब्रेकफास्टचा स्प्रेड होता. विविध ब्रेड, चीज, बटर, जॅम, लेट्युस, टोमॅटो, काकडी, ऑलिव्ह्स, अंडी व नॉनव्हेज खाणार्‍यांसाठी त्याचे वेगवेगळे प्रकार, तुर्कीश चहा, कॉफी, ज्युस. असा ब्रेकफास्ट केला की माझा दिवस छान जातो. आपापल्या आवडीने सगळ्यांनी ब्रेकफास्ट केला.

मी आधी लिहिल्याप्रमाणे आय्या सोफिआ, टोपकापी पॅलेस आणि सिस्टर्न बॅसेलिका या तिन्हीसाठी आम्ही 'इस्तंबुल वेलकम कार्ड' या कंपनीचं बुकिंग केल होतं. त्यात गाईड आधी आपल्याला त्या त्या वास्तुची बेसिक माहिती सांगणार अणि मग आपण आपल्या इंटरेस्टनुसार बघायचं अशी अ‍ॅरेंजमेंट होती. या गाईडसच्या वेळा ठरलेल्या होत्या. दिवसातुन पाच-सहा वेळा ते माहिती देत. त्यामुळे आम्हाला आमचा दिवसभराचा प्रॉग्रॅम गाईडच्या प्रत्येक वेळेप्रमाणे ठरवावा लागणार होता.

आई बाबांची बोट राईड काल बुडल्यामुळे त्यांना आज संध्याकाळी ती करायचीच होती. मग त्यांना तोपकापी पॅलेसमधे सगळ्यात कमी इंटरेस्ट असल्याने तो सगळ्यात शेवटी करु असं ठरलं. म्हणजे अगदी त्याला कमी वेळ मिळाला तरी आई बाबा राईडला जातील आणि त्यांच फार काही बुडणार नाही.

बहुतेक सगळ्यांना सगळ्यात जास्त इंटरेस्ट आय्या सोफिआ आणि ब्ल्यु मॉस्कमधे होता. ब्ल्यु मॉस्कला आमच्या मनाने कधीही जाता येणार होतं (असं तेव्हा आम्हाला वाटलं होतं, पण तसं नव्हतं)म्हणुन आधी आय्या सोफिआला जायचं ठरवलं. तिथे गाईडच्या पहिल्या राईडची वेळ ९.०० होती पण आम्ही कितीही ९.०० ला पोचु म्हणलं तरी उशीर हा झालाच. आम्ही पाचेक मिनिट उशीराच पोचलो. मग पुढची दहा वाजताची राईड घ्यायचं ठरवलं.

काल संध्याकाळी अंधारातील लाईट्स लावुन उजळवलेली आया सोफ्या पाहिली होती, आज स्वच्छ सुर्यप्रकाशात ती भव्य गुलाबी वास्तु अजुनच सुंदर दिसत होती.

0C906F49-A21A-4B0E-82EE-BCBF9AF0009E.jpeg

आय्या सोफिआच्या बाहेर कमाल पाशांचे वेगवेगळे फोटो मोठे करुन लावले आहेत.
मग आम्ही हाती असलेल्या वेळात ते फोटो बघत, स्वताचे फोटो काढत टाईमपास केला.

परत एकदा तुर्की चहा प्यायला. तिथे पोचल्यापासुन मी टिपिकल तुर्की माणसाप्रमाणे जेव्हा संधी, वेळ मिळेल तेव्हा हा चहा पितच होते. या आठ दिवसात मी किती चहा प्यायला असेल याला काही गिणतीच नाहिये.

मग बरोबर दहा वाजता गाईड आला, गृपमधे आम्ही एकुन पंधराएक लोकं असावेत. या गृपमधे भारतीय असे आम्हीच. इथे भारतीय जरा कमीच आलेत वाटतं असं आम्ही एकमेकांना म्हणालो पण. ते किती चुकीच होतं ते आम्हाला पुढचे सगळे दिवस समजणारचं होतं.

गाईडने आम्हाला आत नेलं. आय्या सोफिआच्या वास्तु बाहेर उभं राहुन त्याने मग थोडी माहिती सांगितली.

गाईडने सांगितलेल्या माहितीनुसार आय्या सोफ्या (सोफिआ नाही म्हणे, त्याचा उच्चार सोफ्या आहे)म्हणजे पवित्र ज्ञान. आत्ता जी आया सोफ्याची वास्तु उभी आहे, ती तिसरी वास्तु आहे. आधीच्या दोन जळुन गेल्या. दुसर्यांदा बांधलेली आया सोफ्याची वास्तु अंतर्गत बंडात जळाली वा बंडखोरांनी जाळली, तेव्हा तेव्हाच्या राजाने म्हणजेच जस्टिनिअनने त्याच जागी भव्य चर्च बांधायचं ठरवलं. अवघ्या सहा वर्षात आया सोफ्या बांधुन तयार झालं. पुढे व्हॅटिकनचं सेंट पीटर्स बॅसिलिका बांधुन होइपर्यंत आया सोफ्या हे जगातलं सगळ्यात मोठं चर्च राहिलं आहे. गाईडच्या म्हणण्यानुसार आजही हे जगातलं चौथ्या क्रमांकाचं चर्च आहे. खरं तर आता ते चर्च नाहिये, पण असतं तर चौथ्या क्रमांकाचं असतं.
(अवांतरः गाईडने सांगितलं की व्हॅटिकनचं सेंटपीटर्स बॅसिलिका आणि मिलानचं चर्च ही पहिल्या दोन क्रमांकाची चर्चेस आहेत.तिसर्या क्रमांकासाठी लंडनचं सेंट पॉल आणि रशियामधीत सेंट पीटर्सबर्ग येथिल चर्च मधे कॉम्पिटिशन आहे पण बहुधा सेंट पीटर्सबर्गचं चर्च मोठं आहे. मग असं असताना लॉजिकली सेंट पॉल चौथ्या क्रमांकाचं हव, आया सोफ्या चौथ्या क्रमांकाचं कसं हे मला कळल नाही, पण मी विचारल नाही)

काही वर्शांपुर्वी पुरातत्वभागाला आया सोफ्याच्या प्रांगणात बारा मेंढ्या कोरलेला दगड मिळाला. संशोधकांच्यामते या बारा मेंढ्या या येशुचे बारा शिष्य दर्शवतात.

FA9A0987-2403-40A4-86E3-DF03A88B84B4.jpeg

गाईडच्या माहितीनुसार खुप खुप वर्षांपुर्वी लोकं रोज रोज आंघोळ करत नसतं. आंघोळ करायची फ्रीक्वेन्सी ही महिन्यातुन एकदा अशी होती. :hypno: :hypno: सहाजीकच सगळ्या लोकांच्या अंगाला भयंकर वास येत असे. असे हजारो लोक जर एकाच वेळी प्रार्थना करायला चर्चमधे आले तर काय होइल याची कल्पनाच न केलेली बरी. म्हणुन आया सोफ्यामधे येण्यासाठी मुख्य क्रायटेरीआ हा होता की प्रत्येकाने त्यादिवशी आंघोळ केलेली असावी व नविन वा निदान साफ कपडे घातलेले असावेत. येणार्‍या लोकांनी आंघोळ केली आहे ना ते तपासायला तिथे पाहरेकरी असतं. जर एखाद्याने स्वच्छ कपडे घातले नसतील वा त्याच्या अंगाला वास येत असेल तर हे पाहरेकरी त्याला आत जाउ देत नसतं.

आया सोफ्याच्या दरवाज्यातुन आत गेलं की एक पॅसेज लागतो. त्या पॅसेजमधे मुख्य वास्तुत जायला चार दारं आहेत. सगळ्यात पहिल्या दारातुन फक्त राजालाच प्रवेश होता, दुसर्या दारातुन त्याच्या महत्वाच्या सरदारांना, तिसर्या दारातुन समाजातील श्रीमंत व्यापारांना प्रवेश होता तर चौथ्या दारातुन ज्या लोकांनी आंघोळ केली आहे अशा सर्वसामान्य जनतेला प्रवेश होता.
राणी मात्र वरच्या मजल्यावर बसायची, तिला वरच्या मजल्यावर पालखीतुन घेउन जाण्यासाठी रस्ता बनवला आहे.

आया सोफ्याच्या मुख्य खोलीत जाण्याच्या दारावर मोझाइकमधे येशु, सम्राट कॉन्स्टन्टिन व सम्राट जस्टिनिअन यांच चित्र आहे. (याला चित्र म्हणाव का नक्की काय ते माहित नाही. छोट्या छोट्या टाईल्सच कोलाज करुन त्यातुन या तिघांची चित्र चितारली आहेत.).

D4F21FE2-196B-4E25-B478-E9B64AF6D16D.jpeg

जेव्हा ऑटोमन राज्य तुर्कीवर स्थापन झालं तेव्हा त्यांनी आया सोफ्याला हानी न पोचवता (म्हणजे ते न पाडता), चर्चचं रुपांतर हे मशिदीत केलं. यामधे त्यांनी सगळ्या येशु व संबंधीत मोझाईक चित्रांवर पिवळ्या रंगाचा गिलावा दिला. कमाल पाशाच्या कालावधीत, पुर्वीची काही चित्र ही रिस्टोअर केली गेली. आज मुख्य खोलीत आपल्याला चर्चचे अवषेश असलेली चित्र तर मशिदीचे अवशेष असलेला पिवळा गिलावा व अरेबिकमधे लिहिलेली अल्ला, मुहम्मद व त्यांचे चार सक्सेसर्स (अबु बकिर्,ओमर, ओसमान व अली) आणि मोहमंद पैगंबर यांचे नातु हसन व हुसेन यांची नावं सोनेरी अक्षरात दिसतात.

F616ED8B-8C08-4E50-991E-22C0A9F5BEA2.jpeg

C0AE128C-4154-42D1-92C4-EB637D435CCB.jpeg

4F175841-FCD1-4D5F-BA7E-80DEA3295A89.jpeg

या फोटोत पाहिलं तर वर मदर मेरीचं मोझाईक चित्र आहे तर आजुबाजुला अल्ला आणि महंमद पैगंबरांचं नाव लिहिलं आहे.

ही सगळी माहिती देउन झाल्यावर गाईडने आमची रजा घेतली. जाण्याआधी गाईड हे सांगायला विसरला नाही की मागच्या बाजुला एक 'विश कॉलम' आहे व त्यात कॉलममधे एक भोक आहे, त्यात अंगठा घालुन ते ३६० डीग्रीत फिरवलं की तुमची इच्छा पुर्ण होइल, पण आम्ही काही त्याची ग्यारेंटी देत नाही.

हे सांगितल्यावर आईला कधी एकदा त्या इच्छापुर्ती करणार्या भोकात अंगठा घालुन फिरवतो असं झालं होतं. आम्ही चौघांनी (आईच्या दोन मुली आणी जावई) आम्हाला काही लाईनमधे उभे राहुन इच्छापुर्ती करुन घ्यायची नाहिये हे संगितलं. मग आईचा चेहरा एकदमच उतरला. तिच्या लॉजिकनुसार आम्ही सगळ्यांनी जर आमच्या आमच्या इच्छा सांगितल्या नाहित तर तिलाच आमच्यासाठी त्या मागव्या लागणार होत्या आणि त्यामुळे तिला तिची स्वताची इच्छा मागायला चान्स मिळणार नव्हता. तिच्या इमोशनल ब्लॅकमेलला मग भैरवी बळी पडली आणि बाकीचे आम्ही तिघं आम्हाला काहीच इच्छा नाहियेत, आमच्या इच्छा ऑलरेडी पुर्णचं झाल्यात असं म्हणुन कुठे बुड टेकवायला जागा मिळातिये का ते शोधु लागलो.

तिथेच आम्हाला संगमरवरी एक भला मोठा घड दिसला. त्याबद्दल वाचल्यावर असं कळलं की तो ई स पु तिसर्या शतकातील असुन एकसंध एकाच संगमरवरातुन बनवलेला आहे. त्या घडाशेजारीच आम्हाला बसायला जागा मिळाली.

B40B51E3-E922-4B01-BDDA-A00F4504E184.jpeg

त्यादिवशी आपली कोणतीतरी मॅच सुरु होती म्हणुन मनजीत आणि अक्षय यांनी तेव्हढ्या वेळात स्कोर बघुन घेतला. आपण जिंकत होतो त्या खुषीत मनजीतने आई, बाबा, भैरवी यांचा त्यांच्या त्यांच्या इच्छा मागण्याचा व्हिडिओ काढला आणि आम्ही वरच्या मजल्यावर जायला तयार झालो.

वरच्या मजल्यावर मोझाईक स्टाईलमधील जी चित्र आहेत त्यातील विशेष म्हणजे मदर मेरीचं चित्रं. आता आपला मुलगा क्रॉसवर चढणार आहे हे कळल्यावर आईच्या चेहर्यावरील हावभाव त्या चित्रात इतक्या उत्कृष्टरित्या आले आहेत की ज्याचं नाव ते. खरं तर मदर मेरीचं चित्र पुर्ण रिस्टोअरही केलं नाहिये पण तिचा चेहरा मात्र नीट दिसतो. तिच्या चेहर्यावरील आणि डोळ्यातील आर्त भाव ज्या पद्धतीने दाखवले आहेत ते पाहुन आपण थक्क होतो.

B2F6C044-D4EA-4EA8-8E91-082DDE0886B9.jpeg

अशीच बाकीची राणी झोई, देवदुत गॅब्रिअल यांची चित्र पाहुन झाल्यावर मग आम्ही खाली आलो. आजच्या दिवसातलं आया सोफ्या हे पहिलचं ठिकाण असल्याने सकाळच्या उत्साहात आम्ही ते फारच मन लावुन आणि बराच वेळ देउन पाहिलं होतं. आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या. मग आया सोफ्याच्या प्रांगणातच असलेल्या एका कॅफेत जाउन प्रत्येकाने चहा, कॉफी, हॉट चॉकलेट घेतलं आणि आईने तिची पोतडी उघडली. त्यातुन मग बाकरवडी, मेथीचे पराठे, ते तिखट लागले म्हणुन बदामकतली असे अनेक पदार्थ बाहेर आले. बाकीच्यांनी अतिआनंदाने आणि मी नको नको म्हणत कुरकुरत ते खाल्लं.

आता समोरचं असलेल्या ब्ल्यु मॉस्कमधे जाऊ आणि नंतर सिस्टर्न बॅसिलिकेत जाउयात असं ठरलं. आम्ही चौघं निवांत खात असल्याने बाबांचा पेशन्स संपला आणि ते आणि आई ब्ल्यु मॉस्कला जायला पुढे निघाले. आम्ही खाउन उठणार तितक्यातच ते ब्ल्यु मॉस्क आता बंद आहे आता डायरेक्ट तीनला उघडेल ही माहिती घेउन परत आले.

आता तसा एक तास मोकळाच होता, तो उगीच टाईमपास करत घालवला आणि सिस्टर्न बॅसिलिकाच्या गायडेड टुरसाठी निघालो. गंमत म्हणजे या गाईडबरोबर आम्हीच आमचे सहा जणं होतो. बाकी कोणीच नव्हतं.

सिस्टर्न बॅसिलिका म्हणजेच संकन पॅलेस हा सगळ्यांना इन्फर्नोमुळे माहित असेलचं. हसु नका पण मला इन्फर्नोमुळे बाकीच्या कशापेक्षाही जास्त इथे जाण्याची जास्त उत्सुकता होती.
ह्याच नाव सिस्टर्न बॅसिलिका वा संकन पॅलेस असलं तरी ना हे चर्च होतं, ना पॅलेस. ही होती गोडं पाणी साठ्वण्याची जागा. हा पाणसाठा बांधण्याआधी तिथे वर चर्च असावं असा अंदाज आहे.
आपण जनरली बघतो तर सगळी मोठी शहरं, मानवी वस्त्या या प्रामुख्याने नद्यांच्या काठी वसलेल्या आहे, जुनी गावं तर नक्कीच. पण इस्तंबुल याला एक मोठाच अपवाद आहे. इस्तंबुलमधे एकही नदी नाही, त्यामुळे गोडं पाणीच नाही. जे आहे ते सगळं दोन समुद्रांच खारं पाणी. मगं लोकांनी कोणतं पाणी प्यायच? याचं उत्तर म्हणजे जे जमिनीखाली बांधलेले पाण्याचे साठे. पुर्वी यात गोडं पाणी लांबुन आणुन साठवत असतं. सिस्टर्न बॅसिलिका हा एक प्रसिद्ध साठा असला तरी असे अनेक साठे त्याकाळी होते. मग सध्या इस्तंबुलला गोडं पाणी कसं मिळतं हा प्रश्न माझ्या मनात लगेच आलाच. आता गाईडने नक्की काय उत्तर दिलं ते आठवतं नाहिये पण जवळुन कुठुनतरी आणतात बहुतेक.

आम्ही गेलो तेव्हा तिथे काहीतरी काम सुरु असल्याने पाणी नव्हतं. काम पुर्ण झाल्यावर थोडसं पाणी सोडणार असल्याचं कळलं. तिथे आत गेल्या गेल्या एका बाजुला लोकं टर्कीश राजे-राण्याच्या वेषात फोटो काढतं होते. ते बघुन मस्त करमणुक झाली. पिक्चरमधे दाखवल्याप्रमाणे आत सगळीकडे मस्त पिवळे लाल लाईट सोडले आहेत. जमिनीखाली असलेली जागा, त्यामुळे असणारा अंधार, त्यात सोडलेले पिवळे लाल दिवे, मोठे मोठे खांब यामुळे तिथे एकदम गुढ वातावरण झाल्याचं भासतं.

D39CF07D-FE20-4EE3-A354-3F4378294851.jpeg

तिथे एक रडणारा खांब आहे. त्या खांबावर अश्रुंच्या आकाराच डिझाइन कोरलं आहे तर त्यातुन सतत पाणी ठिबकत असतं.
तिथल्या लोकांच्या मते ज्या कारागिरांना हा पाणसाठा बांधायला लावला त्यांना काही फार बर्या परिस्थितीत ठेवलं नव्हतं.. हा खांब त्यांचे कष्ट बघुन रडतोय. आमच्या गाईड मते ही गोष्ट म्हणजे उगीच आपली गळक्या खांबाकडे बघौन सुचलेली गोष्ट आहे. त्या खांबावरील डिझाइन आणि त्यातुन गळणारं पाणी हा फक्त एक योगायोग आहे. तसं बघायला गेलं तर अनेक खांबामधुन पाणी गळतं म्हणे. पण मार्केटींगसाठी गोष्टी या सांगाव्याच लागतात.

थोडं पुढे गेलं की दिसतात सुप्रसिद्ध मेडुसा खांब. मेडुसा ही राक्षशिण ज्याच्याकडे बघते ती व्यक्ती दगड होते. त्यामुळे हिची नजर आपल्यावर पडु नये हाच सगळ्यांचा प्रयत्न असतो. इथे मेडुसाच्या डोक्याने तोललेले दोन खांब आहेत. एक खांब मेडुसाच्या उलट्या डोक्याने तोलला आहे तर दुसर्या खांबाखाली मेडुसाच डोकं कुशीवर झोपलेल्या स्थितीत आहे. त्याचं स्पेसिफिक असं काही कारण नसावं असं बर्याच संशोधकांच म्हणण आहे. कुशीवर झोपलेल्या मेडुसाचं डोकं उलटं ठेवलं असतं तर बहुतेक वरचा खांबं उंचीला जास्त झाला असता. म्हणुन उंची अ‍ॅडजस्ट करण्यासाठी तिचं डोकं या स्थितीत ठेवलं.

F459BB58-4C6A-47B9-BD7C-3951A2165EBA.jpeg

आता अडीच वाजायला आले होते. तोपकाकी पॅलेससाठी अडीचची टुर ही शेवटची टुर होती. त्यामुळे जरा घाई करत आम्ही पॅलेसच्या जवळ गेलो. आत्तापर्यंतचे दोन्ही गाईड छान होते, हा गाईड जरा आगावुच होता. माहिती सांगण्यापेक्षा उगीच बाष्कळ जोक मारण्याकडे आणि स्वताचीच स्तुती करण्याकडे त्याचा कल होता. त्या अर्ध्या तासात त्याने निदान दहावेळा तुम्ही जगातल्या बेस्ट गाईडबरोबर आहात हे सांगितलं असेल. :वैताग: :वैताग: पण त्याच्याकडेच आत जायची तिकिट असल्याने त्याला डंप करणं पण शक्य नव्हतं. त्यामुळे खर तर इथे फार काही मजा आली नाही. आत्तापर्यंत सगळे तसे दमले होते, पाय दुखत होते त्यात हा बोर करणारा गाईड त्यामुळे आम्ही गाइड काय सांगतोय इथे फार काही लक्ष दिलं नाही आणि तोपकापी पॅलेस छान असुन, सुपर्ब जागेवर बांधला असुन त्याची पुर्ण मजा घेता आली नाही.

हा पॅलेस हा मरमरार समुद्राच्या काठावर, बोस्पोरस समुद्रधुनीच्या तोंडावर वसलेला आहे. इनफॅक्ट अशी मोक्याची जागा असल्यानेच तिथे पॅलेस बांधला गेला. एका पॉइंटवर गेलं की तिथुन समुद्र आणि बोस्पोरसची समुद्रधुनी दिसते. मग आम्ही तिथे बराच वेळ घालवला, बरेच फोटो काढले. आता नाही म्हणलं तरी सग्ळ्यांना भुक लागली होती, मघाशी खालेले पराठे जिरले होते. मग पॅलेसमधेच असणार्या एका कॅफेत जाउन लेंटिल सुप, चीज भरलेली पेस्ट्री (आपले पॅटिस), फ्रेंच फाईज असं काही बाही खाल्लं. मी आणि आईने चहा प्यायचा चान्स सोडला नाहीच. त्यावरुन सगळ्यांनी मला किती चहा पिते असं ऐकवलचं.

अंजलीने तिच्या लेखात इथे तोपकापी पॅलेसमधे महंमद पैगंबरांच्या वस्तु आणि केस, दात आहेत असं लिहिलं होतं. ते ब्घण्यात इंटरेस्ट होताच. खाउन झाल्यावर मग आम्ही हे सगळं जिथे ठेवलं होतं ते बघायला गेलो.
खरं तर आम्हाला तोपकापी खंजिर आणि महंमद पैगंबरांचे अवषेश बघण्यात इंटरेस्ट होता पण पब्लिकला जे बघण्यात सगळ्यात जास्त इंटरेस्ट असतो, ते सगळ्यात शेवटी ठेवलं असतं या नियमाप्रमाणे आम्ही त्यांची शस्त्र, चिलखतं आणि बरचं काही पाहुन शेवटी खंजिरापाशी पोचलो.

166F9765-1513-4FCB-A44C-505C6633854F.jpeg

मोठे मोठे पाचु लावलेला रत्न्जडित खंजिर एकदमच राजेशाही होता. आई बाबांना आज जर बोट राईड करायची असेल तर आम्हाला आता निघणं भाग होतं. या गडबडीत महंमद पैगंबरांचे केस, दात बघायचेच राहिले. कदाचीत ते म्युझियममधे ठेवले असावेत. ते आता बघणं शक्य नव्हतं. मी जायच्या आधी हरामवर, तिथे असलेल्या स्त्रियांवर आणि त्यांनी टर्कीच्या राजकारणावर पाडलेल्या छापावर एक डॉक्युमेंटरी पाहिली होती. म्हणुन मला खरं तर हराम आणि पॅलेस नीट बघायचा होता, पण बाकी कोणालाच त्यात फारसा इंटरेस्ट नव्हता. Sad Sad

आता हळुहळु थंडी वाढायला लागली होती, आई बाबांची राईड होइपर्यंत बरीच थंडी वाजेल म्हणुन मी आणि भैरवी आई-बाबांना धक्यावर सोडायला जाउ आणि मनजीत आणि अक्षय सगळ्यांची जर्कीन्स घेउन येतील असं ठरलं.

कालच इस्तंबुल कार्ड घेतलं असल्याने ट्रॅममधुन जाण्यासाठी आम्ही चौघ निघालो. पहिली जी ट्रॅम आली त्यात अतिप्रचंड गर्दी होती. कसबसं आत शिरुन आम्ही गलाटाब्रिजपाशी पोचलो. आम्हाला उशीर झाला म्हणुन बाबांना जाम टेन्शन आलं होतं. मला आणि भैरवीला कालच्या अनुभवावरुन हे माहित होतं की ही बोट कितीही पाच लिहिलं असलं तरी साडे पाच शिवाय सुटतं नाही. अगदी तसचं झालं. आई बाबा आत गेल्यावर आम्ही दोघी एका कट्ट्यावर गप्पा मारत बसलो. किती वेळ झाला तरी बोट सुटेचना. आज शनिवार असल्याने त्या परिसरात फारच गर्दी होती. गर्दीशी फारसा प्रॉब्लेम नव्हता पण त्या गर्दीत निम्याहुन जास्त जनता सिगरेट ओढत होती, त्याचा त्रास होत होता.

शेवटी आई बाबांची बोट निघाली, मनजीत आणि अक्षयही तोपर्यंत आलेच. मग सिगरेटपासुन सुटका करायची म्हणुन समोरच्या इजिप्शियन मार्केट अर्थात स्पाईस मार्केटमधे जायचं ठरलं. तिथही बरीच गर्दी होती.

3075B619-9512-4344-AE39-9A0D3E59D815.jpeg

तिथे जाउन उगीच एका मसाल्याच्या दुकानात शिरलो. आता काही घ्यायचं मनात नव्हतं पण आवडला म्हणुन सुमेक मसाला घेतला. नंतरजुन एका दुकानातुन पुढच्या आठ दिवसत खाण्यासाठी टर्किश डिलाइट घेतले. तिथला विक्रेता आम्हाला प्रत्येक डिलाईटची चव देत असताना गोड म्हणुन मी खात नव्हते. ते त्यालाच बरं वाटेना, मग त्याने मला प्रेमाने पिस्ते खायला दिले. मला आधीच सगळ्या सुकामेव्यात पिस्ते प्रचंड आवडतात, इथले पिस्ते मस्तच होते. मग टर्कीश डिलाईटबरोबर आम्ही थोडे पिस्ते घेतले. बाकीच्यांसाठी मिक्स नटस घेतले. बाजारातुन बाहेर येउन एका पारावर बसुन पिस्ते खात खात गप्पा मारतं बसलो.

थोड्यावेळाने आई बाबा परत आले असतील म्हणुन परत धक्क्यावर जायला निघालो. आम्ही पोचेपर्यंत आई बाबा आलेच होते. परत सगळे प्रचंड दमले होते, सगळ्यांचेच पाय फार दुखत होते म्हणुन आधी हॉटेलवर जाउन, थोडी विश्रांती घेउन मग जेवायला जायचं का आता डायरेक्ट जेवायलाचं जायचं यावर बरीच चर्चा झाली. आम्ही चौघांनी पिस्ते आणि बाकीचा सुकामेवा आत्ताच खाल्ला होता म्हणुन भुकही नव्हती. शेवटी ४ विरुद्ध् १ (आई तटस्थ) अशा फरकाने हॉटेलवर जायचा निर्णय झाला.

मी ही ट्रीप ठरल्यावर सावलीकडुन मसाज ऑइल मागवलं होतं. आई येताना ते घेउन आली होती. आता हॉटेलवर आल्यावर दमलेल्या पायाला सावलीच्या मसाज ऑइलने मस्त मसाज केला. एकदम मस्त फ्रेश वाटलं.

एकदा हॉटेलवर आल्यावर मनजीत मी काही आता जेवायला येत नाही,मला भुकही नाही असं म्हणुन झोपुन गेला. मग आम्ही पाच जणं काल ज्या रेस्टॉरंटवाल्याला नाही म्हणलं होतं आणि उद्या येतो असां प्रॉमिस केलं होतं त्याच्याकडे गेलो. तिथे व्हेजिटेरियन कबाब म्हणुन डिश खाल्ली. आता कबाब म्हणल्यावर डोळ्यासमोर आपले हराभरा कबाब टाईप काबाब येतात ना? तर इथे वेगळचं प्रकरण होतं. इथे एका मातीच्या घड्यात बर्याच भाज्या त्यांच्या स्पेशल मसाल्यात शिजवलेल्या होत्या. तो घडा आगीत भाजुन आतली रस्सा भाजी भात आणि बटट्यांच्या कापाबरोबर दिली. चवीला छानच होती.

जेवता जेवता उद्या कप्पाडोकिआला जायचं होतं त्याबद्दल चर्चा केली. एक वाजताची फ्लाईट होती तर आपण साडे दहाला निघु असं आमचं म्हणणं होतं तर आपण साडे नौलाच निघु हे बाबांच म्हणणं होतं. शेवटी बाबांना कसतरी पटवुन डायव्हरला साडे दहाला यायला सांगितलं.

आज ब्यु मॉस्क बघणं झालं नव्हतं. उद्या सकाळी आधी ब्ल्यु मॉस्कला जायचं होतं.
त्यामुळे हॉटेलवर येउन उद्याचा गजर लाउन पटकन झोपलो.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle