असं असं घडलं...९. काळ, समाज, कुटुंब ... बदल

काळाच्या एका टप्यावर निसर्गाने मानवामधे दोन मोठे बदल केले. आणि मानव इतर प्राण्यांहून वेगळा बनू लागला. एका बद्दल नेहमीच बोललं गेलं. दुसऱ्याचा मात्र अभावानेच उल्लेख झाला.

१. मानवाच्या मेंदूचा विकास झाला, त्याचे आकारमान वाढले. पर्यायाने त्याची बुद्धिमत्ता वाढली.

आणि

२. स्त्रीच्या प्रजनन काळाची सिमितता संपली. म्हणजेच विशिष्ठ काळातच तिची प्रजनन क्षमता असेल असे न रहाता ती कधीही प्रजनन करू शकेल अशी परिस्थिती निर्माण झाली.

या दोन्ही बदलांमुळे एका अर्थाने मानवी समुदाय, समाज निर्माण झाला असे म्हणावे लागेल.

बऱ्याच जणांना हे अतिरेकी, उगाच ताणलेलं विधान वाटू शकेल. परंतु बारकाईने विचार केला तर याची सत्यता पडताळून पहाता येऊ शकेल.

मानवी मेंदू विकसित झाला, स्वाभाविकच मानवाचे डोके मोठे झाले. परंतु हे असे मोठे डोके जन्मत: असणे अडचणीचे झाले असते. असे मोठे डोके घेऊन बाळ जन्मले असते तर आईच्या जिविताला धोका निर्माण झाला असता. स्वाभाविकच जन्मत: स्त्री योनीला झेपेल असाच बाळाच्या डोक्याचा आकार असेल अन जन्मानंतर काही काळ त्याची पूर्ण वाढ होईल अशी योजना निसर्गत: झाली. याचा एक महत्वाचा परिणाम असा झाला की ही मेंदूची पूर्ण वाढ होई पर्यंत मानवी बाळाला संरक्षण, संगोपन अत्यावश्यक झाले. अगदी शब्दश:, स्वत:च्या पायावर उभं रहाण्यासाठी इतर प्राण्यांना जिथे 3-4 मिनिटं पुरतात तिथे मानवी बाळाला मात्र किमान 7-8 महिने लागतात. याचं कारण ही अपूर्ण वाढ हेच कारण! मग अशा अपूर्ण वाढ असलेल्या बाळाला पूर्ण वाढ होई पर्यंत आई, वेल प्रसंगी आजी, इतर सदस्य अत्यावश्यक झाले. का? तर एक बाळ वर्षाचं होतय तोवर त्याच्या आईला दुसरं बाळही होत असे. आणि मानवी बाळ तर किमान 4-5 वर्षा पर्यंत इतर प्राण्यांसारखं पळूही शकत नाही.

म्हणूनच मानवी मोठा मेंदू मानवाला बुद्धी तर देऊन गेलाच पण सोबत मानवी समुहाची, समाजाची देन ही देऊन गेला.

आता दुसरा मुद्दा! इतर प्राण्यांच्या मादीचा प्रजननकाळ सिमित असतो. त्याचमुळे मादी आणि नर यांचा शरीरसंबंधही विशिष्ट काळातच होतो. "मादी माजावर येणं" असा शूब्दप्रयोगही याच मुळे अस्तित्वात आहे. मानवी मादीबाबत मात्र निसर्गाने ही परिस्थिती बदलली. स्त्रीच्या प्रजनन क्षमतेला साधारण वयाची 16-45 ह्या कालावधीत स्त्री कधीही प्रजनन करू शकते, वर्षातला कोणताही काळ तिला ही क्षमता असेल अशी देणगी तिला मिळाली. स्वाभाविकच स्त्रीपुरुष शरीरसंबंध यांना निसर्गाचे फार कमी बंधन राहिले. आपापत: दोघांचे एकत्र असणे निसर्गाच्या बदलावर अवलंबून राहिले नाही.

एकीकडे अपूर्ण वाढ झालेले नाजूक बाळ अन स्त्रीपुरुषांचा सततचा संपर्क यातून मानवी समुदाय एकत्र होत गेला. त्यांचा एकसंध असा समाज बनत गेला.

सुरुवातीला प्रजनन ही प्रक्रिया प्रामुख्याने स्त्रीशी निगडित असल्याने आणि जन्मलेले बाळ आणि त्याची आई यांचे नाते जास्त स्पष्ट असल्याने एक स्त्री आणि तिची मुलं अशा स्वरुपाची समाजरचना तयार झाली. पुढे एक स्त्री, तिची मुलं, तिच्या मुलींची मुलं, त्यातील मुलींची मुलं असा समाज वाढत गेला. स्वाभाविकच मातृसत्ताक कुटुंबपद्धतीची ही सुरुवात होती.

या रचनेमधे प्रथम पुरुष एकाच कुटुंबात नसे. किंबहुना पुरुष त्यामानाने अजूनही भटका होता. एका गुहेतून दुसऱ्या गुहेत, एका जंगलातून दुसरे जंगल असा त्याचा वावर असे. स्त्रिया मात्र आपापल्या मातांच्या गुहेशी बांधल्या गेल्या.

या काळापर्यंत पुरुष आणि जन्मलेले बाळ यांचा अन्वयार्थ फार स्पष्ट नव्हता. त्यामुळे या काळात नातेसंबंधही स्पष्ट नव्हते. स्वाभाविकच नर आणि मादी हेच मुख्य नाते होते. मग एकाच कुटुंबातील स्त्रीपुरुषांचा शरीरसंबंध सहजी होत असे. अगदी मुलगी बाप, बहिण भाऊ, मुलगी काका असे संबंध अत्यंत सहज असत.

कालांतराने पुरुषाचा स्त्रीच्या प्रजननाशी असणारा संबंध जसजसा स्पष्ट होत गेला तसतशी पुरुष आणि बाळ यांच्यातला बाप अन मुल हे नाते उलगडत गेले. भाऊ आणि बहिण हेही नाते प्रस्थापित होत गेले. ही नाती जसजशी ठळक होत गेली तसतशी समाजरचना जास्त आखीवरेखीव होत गेली. याच काळात एक स्त्री आणि एक पुरुष अशी जोडी ठरत गेली. एकी अर्थाने लग्नसंस्थेची ही सुरुवात होती.

यानंतरचा टप्पा होता तो रक्ताच्या नात्यांमधे शरीरसंबंध टाळण्याचा. काही समाजात हे निषिद्ध मानलं गेलं तर काही ठिकाणी स्विकारलंही गेलं.

जिथे नाकारलं गेलं तिथे इतर समाजाशी हे नातं जोडलं गेलं.

हा जो संपूर्ण प्रवास आहे मानवी समाजाचा तो मानवाला रानटी जीवनापासून शेती समाजापर्यंत आणणारा.

या काळात सुरुवातीला शेती ही स्त्री करत होती तर जंगलातली शिकार, इतर कामं पुरुष करत होता. पण जसजसा हा समाज शेती करू लागला, तसतशी त्याची शिकारी अवस्था कमी होऊ लागली. शेतीतील नवनवीन शोध, पेरणी, नांगर यांचा शोध लागला, तशी जंगलाचे शिकारी जीवन मानवाने मागे टाकले. शिकारी सारखे अनिश्चित, प्रचंड ताकद आणि श्रमाचे काम करण्यापेक्षा त्यामानाने निश्चित फळ देणारे, दगदग कमी करणारे शेतीचे काम मानवाने अंगिकारले.

पुरुषही जेव्हा शेतीकडे वळले तेव्हा बाळांच्या वाढीकडे लक्ष वळवणे स्त्रीलाही सोपे गेले. हळुहळू शेती करणारी स्त्री बालसंगोपनाकडे वळली, तर शिकार करणारा पुरुष शेतीकडे वळला. एक जास्त स्थिर, नियमबद्ध समाजरचना उदयाला आली. कामांची विभागणी, मुलांचे संगोपन स्त्रीकडे आणि मुलांच्या वाढीसाठी खाद्य उत्पादनासाठी शेती पुरुषाकडे अशी होत गेली. आणि दोघांना मुलं वाढवण्यासाठी, एकमेकांची गरज असल्यामुळे या काळात खऱ्या अर्थाने लग्नसंस्था बळकट झाली असावी. अर्थात तरीही ही योजना 4-6 वर्षांसाठीच सुरुवातीला असावी.

कालांतराने शेतीसाठीची जमीन आणि तिची मालकी याबद्दल पुरुषांमधे संघर्ष सुरु झाला. जो जास्त ताकदवान, बळवान ( बळ=शारीरिक त्याचे आणि त्याच्या मुलांच्या संख्येचेही) त्याच्याकडे अधिक जमीन, अधिक कसदार, मुबलक पाणी असणारी जमीन अशी संरचना बनु लागली. एका अर्थाने टोळी प्रमुख आणि पुढे राजेशाहीची ही पाळंमुळं होती.

या काळापर्यंत बाळाचे जन्मदाते म्हणून स्त्री आणि पुरुष या दोघाची निश्चिती झाली होती. ही माझी मुले, हे माझे कुटुंब, ही माझी जमीन अशी मालकी हक्काची भावना वाढीस लागली होती. शेती हे जगण्याचे मुख्य साधन होते आणि त्यावर पुरुषाचे वर्चस्व वाढत गेले अन स्त्री कुटुंबाची निर्माती झाली.

हळूहळू स्त्री अन पुरुषांची क्षेत्र बदलत गेली. कुटुंब, मुलांची वाढ, प्रजनन पद्धती, कुटुंबांतर्गत वावराचे संकेत हे सगळं स्त्रीकडे आलं. तर समाजाचे नियम, कायदे, शेती, तिथल्या पद्धती हे सगळं पुरुषांकडे आलं.

जेव्हा दोन समुदायांचे, समाजांचे संघर्ष झाले तेव्हा त्या त्या समाजातील पुरुषांचा लढवय्ये म्हणून महत्व अधोरेखित होत गेले. पुढे माझी शेती, माझी जमीन, माझी मुलं, तशीच माझी स्त्री अशी मनोरचना होत गेली.

प्राचिन काळात, राजेशाही काळात जमीन, अन्नधान्य, हत्यारं, मुलं ही जशी आपली मालकी, आपली संपत्ती तशीच स्त्री ही देखील आपली संपत्ती समजली जाऊ लागली. कुटुंबाचे सगळे अधिकार पुरुषांच्या हाती केंद्रित झाले. याच सुमारास लग्नसंस्था ही आयुष्यभराची योजना झाली असावी.

याचाच पुढचा भाग होता को म्हणजे जशी मी माझी जमीन वाढवू शकतो तशी माझी स्त्रियांची संख्याही वाढवू शकतो. मग जो जास्त बलवान तो अधिक स्त्रियांसोबत राहू लागला. आपले बळ वाढवायचे तर आपली अधिकाधिक मुलं असणे पुरुषाला उपयुक्त वाटू लागले. याच कालखंडात लग्नाला समाजमान्यता आणि राजमान्यता आवश्यक वाटू लागली.

मध्ययुगात तर परिस्थिती अजूनच बिकट झाली. परक्यांचे आक्रमण, त्यापासून माझे कुटुंब वाचवायचे तर त्याचे संरक्षण करायचे म्हणून त्यांना जास्त बंधनात टाकले गेले. आपली मुलं, स्त्री सुरक्षित रहायला हवी तर तिने घरातच, उंबरठ्याच्या आतच राहिले पाहिजे अशी काहीशी भूमिका स्वाकारली गेली. यातून स्त्री अधिकाधिक बांधली गेली, बंद दाराआड केली गेली. कुटुंब, त्यांची बांधणी जास्त कठोर झाली. जाती धर्म इतकच नव्हे तर गोत्र, गाव यांची बंधनं अतिशय काटेकोरपणे स्विकारली गेली.

असे असले तरी कौटुंबिक पातळीवर हा समाज खुप सक्षम होता. जीवन जगण्याच्या पद्धती खुप स्पष्ट होत्या. त्यावर आधारित सणसमारंभ, रिती पद्धती, रुढी यांची एक छान रचना तयार झाली होती. शिवाय एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे ज्ञान, अनुभव, हस्तांतरण करण्याचीही एक पद्धत विकसित जाली होती अन ती पाळली जात होती. याचेही काही दोष, कमतरता होत्या ( जातिनिहाय/ कुटुंबनिहाय/ स्त्रि-पुरुष निहाय काम, ज्ञान वगैरे) पण त्या समाजरचनेत त्या कमतरता निभावल्या जात होत्या.

प्रबोधन काळात इतर समाजांशी आलेला संपर्क, जीवन जगण्याच्या पद्धतीतला अमुलाग्र बदल यातून इथली समाजव्यवस्था बदलू लागली. हा बदल अगदी हळू होता, पण होता.

आता उपजिविकेची वेगळी साधने पुढे आली. कारकुनी, कारखान्यातील कामगार ही दोन नवीन क्षेत्र समोर आली.

यात

१. मालकी हक्क न येता काम आणि मोबदला होता.

२.जबाबदारी न येता मोबदला होता.

३. अधिकार न येता काम करणं होतं. या जीवनपद्धतीचा परिणाम येथील कुटुंब व्यवस्थेवर विविधांगांनी झाला.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle