बालकथा - इंद्रधनुष्याचा रुसवा

निसर्गकथा : इंद्रधनुष्याचा रुसवा

छानशी संध्याकाळ झाली होती. सूर्यबाबा अगदी मावळतीला चालले होते. आकाशात जमलेले काळे राखाडी ढग आणि मध्ये मध्ये भुरभूरणारा पाउस यामुळे मावळतीचे रंग अजूनच सुंदर झाले होते. त्यात भर म्हणून क्षितिजावर सुंदर अगदी अर्धगोलाकार इंद्रधनुष्यही दिसत होते. या सुंदर इंद्रधनुष्याला बघुन मुलमुली आनंदाने नाचत खेळत होती आणि मुलांना बघून इंद्रधनुष्य अजूनच हसत होते. इंद्रधनुष्याच्या या खेळाकडे सूर्यबाबा कौतुकाने बघत होते. आपल्या लाडक्या इंद्रधनुष्याला ते प्रेमाने धनुकला म्हणत. आता सूर्यबाबांची घरी जायची वेळ होतच आली होती त्यामुळे सूर्यबाबांनी आज्ञा केली
“चल धनुकल्या, आता घरी जाऊ. घरी जायची वेळ झाली. उद्या संध्याकाळी हवं तर परत येऊ इथे.”
“अहं. मी नाही येणार घरी इतक्यात,अजून सगळी मुलं खेळताहेत ना खाली.” इंद्रधनुने आपली नाराजी व्यक्त केली.
“पण आपण घरी गेलो की ते जाणारच घरी. आपणच नाही गेलो तर त्यांची आईदेखील रागावेल ना त्यांना. चल चल. पटकन, निघू आता.”
“नको ना हो बाबा..तुम्ही नेहेमी असं करता. मला उशिरा आणता आकाशात फिरायला आणि लवकर चल म्हणता.” अस म्हणून इंद्रधनुने गाल फुगवले. त्याचे ते फुगलेले गाल बघुन सूर्यबाबांना अजूनच हसु आलं.
“तुम्ही हसु नका हो बाबा, मला रुसायचंय आता. मग तुम्ही हसलात की मी कसा रुसणार?”

इंद्रधनुची ही असली मागणी ऐकून बाबांना अजूनच हसु आले. आणि ते हसु लपवायला ते ढगांच्या मागे लपले. बाबा बघत नाहीयेत असे बघून इंद्रधनु आपले पांढऱ्या ढगांचे पंख पसरून हळूच तिथून पळून गेला. इथे सूर्यबाबांनी इंद्रधनु काय करतोय हे पहाण्यासाठी ढगातून डोकं बाहेर काढलं तर काय! इंद्रधनु नाहीच!! बाबांना एकदम काळजी वाटायला लागली. पण आता करायचं काय? आणि नेहेमीची वेळ झाली म्हणजे मावळायलाच पाहिजे. नाहीतर पृथ्वीवरचे पशू, पक्षी, लोक सगळे घाबरतील. सूर्यबाबा काळजी करत करतच घरी गेले.

इथे इंद्रधनु मात्र ‘आता बाबा सारखे सारखे रागावणार नाहीत , घरी चल म्हणणार नाहीत’ अस वाटून तो एकदम खुश झाला होता. "हवं तिथे हवं तेव्हा जायला मिळेल आता. कित्ती मज्जा!" असं म्हणत लपलेल्या ढगातून बाहेर येत सगळी कडे बघू लागला.

तेवढ्यात त्याला एक पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची रांगच रांग दिसली, ते सगळे अगदी धावपळीने घरी जात होते. इंद्रधनु त्यांना म्हणाला, “थांबा ना जरा माझ्याशी खेळा तरी. नेहेमी कसे माझ्या भोवती उडता तसे उडाना. मज्जा येईल.”
त्यातला एक बगळा म्हणाला “नकोरे बाबा. आता सूर्यदेव गेलेत घरी म्हणजे आम्ही जायलाच पाहिजे. आणि नंतर काहीसुद्धा दिसणार नाही अंधारात. अरे हो, आणि तू अजून कसा नाही गेलास बाबांबरोबर घरी?”

हे ऐकून इंद्रधनु घाबरला, त्याला वाटलं आता बगळे सूर्यबाबांना सांगतील की काय. म्हणून तो न थांबता तसाच पुढे गेला. आता खाली खेळणारी मुल सुद्धा घरी गेली होती. आणि इंद्रधनु आकाशात असून सुद्धा कोणीच बघत नव्हत त्याच्याकडे. आता इंद्रधनुला जरा जरा कंटाळा यायला लागला होता. पण तरी हट्टाने तो तसाच चंद्र आणि चांदण्यांची वाट बघायला लागला.

हळूचकन एक चांदणी आकाशात आली. चमचम करत इंद्रधनुकडे बघतच राहिली.
“अरेच्च्या, अजून दिवस मावळला नाही की काय? अशी कशी मी आधीच आले आकाशात?”
इंद्रधनु म्हणाला “नाही नाही. तू बरोबर वेळेवर आलीयेस गं. पण मीच बाबांवर रागावून घरी गेलो नाहीये आज. तू खेळशील ना माझ्याशी?”
चांदणी म्हणाली “पण तुझ्याशी खेळायचं तरी काय? आम्हीतर या आधी कधीच तुझ्याशी खेळलो नाही.”
“पकडापकडी खेळुयात?”
“नको रे. तुला तर पंख आहेत. मला तुझ्या मागून एवढ्या जोरात धावता येणार नाही.”
“बर मग लपाछपी?”
“छे! रात्रीचं कसं खेळणार लपाछपी? आम्ही तर चमचमतो, आणि तू दिसणार सुद्धा नाहीस. मग तुला कोण पकडणार?”
“हं... जाऊदे. मी चांदोबाशी खेळेन, येईलच तो एवढ्यात.”
“वेडाच आहेस. आज अमावास्या आहे ते माहीत नाही होय? आज चांदोबा येत नाही खेळायला, घरीच रहातो.” तेवढ्यात आलेल्या चांदणीच्या मैत्रिणी म्हणाल्या. आणि मग त्यांचे नेहेमीचे दुसरे खेळ आणि गप्पा चालू झाल्यावर इंद्रधनुकडे कुणाचं लक्षच राहीलं नाही.

आता इंद्रधनुला काय करावे सुचेना. अंधारामुळे इंद्रधनु आता कोणालाच दिसत नव्हता. त्यालाही अंधाराची भीती वाटायला लागली होती. ‘पण आता करायचं काय? घराचा रस्ताही माहीत नाही. चांदोबा आला असता तर त्याला रस्ता तरी विचारता आला असता.’ अस म्हणून धनुकल्याला रडू यायला लागलं.रडता रडता केव्हातरी तो तसाच क्षितिजावर झोपून गेला.

इकडे सूर्यबाबाना चैनच पडत नव्हतं. इंद्रधनु काय करत असेल, कसा असेल असा विचार करून अगदी काळजी वाटत होती. कधी एकदा परत उगवायची वेळ होते आणि मी इंद्रधनुला शोधतो असं झालं होतं त्यांना.

झालं! सकाळी नेहेमी पेक्षा जरा लवकरच सूर्यबाबा निघाले उगवायला. उगवायच्या आधीच वाटेत एक चांदणी दिसली . ती घरी निघाली होती.

“काय गं , तुला धनुकला दिसला का कुठे?” लग्गेच बाबांनी तिला विचारलं.
“हो तर. रात्री आला होता खेळायला. पण अंधारात तो दिसत नव्हता म्हणून आम्ही खेळलोच नाही त्याच्याशी.”

बाबांना अजूनच चिंता वाटली.
मग क्षितिजावर उगवता उगवताच त्यांना आकाशात उडणारी पांढऱ्याशुभ्र बगळ्यांची रांगच रांग दिसली . परत बाबांनी त्यांना विचारलं
“तुम्हाला माझा धनुकला दिसला काहो कुठे?”
बगळे म्हणाले “हो तर. काल संध्याकाळी तुमच्या वर रागावून निघाला होता. पण आम्ही नंतर घरी गेल्याने काहीच माहीत नाही.”

सूर्यबाबांना अजून काळजी वाटली.
तेवढ्यात एक घुबड त्याच्या ढोलीत जाताना त्यांना दिसलं. त्यालाही सूर्यबाबांनी विचारलं

“तुला धनुकला दिसला का रे कुठे”?
घुबड रात्री भरपूर फिरून आलं होतं आणि त्याने पश्चिम क्षितिजावर झोपलेल्या इंद्रधनुला पाहिलं होतं.
ते ऐकताच सुर्यबाबांना अगदी हायसं वाटलं. पश्चिम क्षितिजावर आपली किरणे पाठवून त्यांनी इंद्रधनुला हळूच उठवलं. बाबांना बघून धनुकला एकदम खुश झाला. बाबांच्या कुशीत शिरून रडत रडत म्हणाला “मी आता तुमच्यावर कधीच रागावणार नाही. तुम्ही सांगाल ते नक्की ऐकेन.”

“शहाणा रे माझा धनुकला” असं म्हणत बाबांनी पण धनुकल्याला जवळ घेऊन त्याची एक छानशी पापी घेतली.

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle