आज्जी आजोबांची डायरी: भाग २०

आज्जी-आजोबांची डायरी: भाग २०

सिनियर केअर होममधल्या माझ्या नोकरीचे स्वरूप ह्या सोमवारपासून बदलेले, हे मागच्या भागात लिहिले आहेच. तर त्यानुसार क्वारंटाईन केल्या गेलेल्या आज्जी आजोबांना वेगळ्या मजल्यावर ठेवले गेलेले असून आता त्यांच्यासोबत क्वालिटी टाईम घालवणं ही अर्ध्या दिवसाची माझी ड्युटी ठरवली गेली असून लंचब्रेकनंतर गार्डनमधल्या आज्जी आजोबांसोबत बोलणे असे माझे काम ठरले. सोमवारच्या कामाबद्दल मागच्या भागात लिहिले आहेच.

मंगळवारी कामावर गेल्या गेल्या आधी आज्जी आजोबांसोबत कोणते खेळ खेळायचे, त्यांना काय आवडते, ते समजून घ्यायला जर्मन कलिग्जना भेटले. त्या संवादामधून समजले की बहुतेक सगळ्यांचा आवडता खेळ आहे "मेन्श एर्गेर्न दिश निष्त" म्हणजे "लोक तुम्हाला त्रास देत नाहीत/ चिडीला आणत नाहीत".. असं मजेशीर नाव असलेला खेळ नक्की कसा असेल, हे बघण्याची मला उत्सुकता निर्माण झाली.

एक ऑक्युपेशनल थेरपिस्ट मला क्रिएटिव्ह रूममध्ये घेऊन गेली. तिने हा खेळ मला दाखवला असता एक लाकडी बोर्ड, त्यात चार बाजूंना प्रत्येकी चार वेगवेगळ्या रंगांच्या सोंगट्या आणि एक फासा हे सगळं त्यात होतं. फासा टाकून जो आकडा येईल, त्यानुसार एकेका प्लेयरने पुढे जायचं आणि आपल्या डेस्टिनेशनला पोहोचायचं. मध्ये इतर प्लेयर्स तुम्हाला बुद्धिबळातल्या खेळाप्रमाणे मारू शकतात, तर मग पुन्हा पहिल्यापासून सुरुवात करायची. असा मजेशीर आणि सोपा, गुंतवून ठेवणारा सोपा गेम, ज्यात अगदी थोडेसे नियम आहेत.

दुसरा एक छान खेळ ज्यात वेगवेगळी चित्रे असून त्यांच्या मागे ऍक्टिव्हिटीज लिहून ठेवलेल्या आहेत. सोंगट्यावरील आकड्यानुसार प्लेयरने कोणती ऍक्टिव्हिटी करायची, हे समजणार. मग त्यात वाक्प्रचार, म्हण, जुन्या किंवा प्रसिद्ध गाण्याचे शब्द ओळखणे, व्याकरण बरोबर सांगणे, एखादी कृती करण्याची ऍक्शन करणे(जसे भाजी चिरणे, झाडांना पाणी घालणे, केक बनवणे असे काहीही) प्रत्येक कार्डावर अशा तीन चार ऍक्टिव्हिटीज असा तो खेळ आहे. असे भरपूर कार्ड्स असल्याने कितीही वेळ हा खेळ चालू शकतो.

अजूनही काही खेळ, त्यापैकी एकात लाकडी बॉक्स असून अक्षरं छापलेले ठोकळे सोबत असून त्यापासून शब्द तयार करून ते त्या बॉक्समध्ये ठेवायचे. कमीत कमी वेळात जास्तीतजास्त शब्द तयार करणारा/री अर्थातच जिंकणार.

अशा प्रकारच्या अनेक खेळांचे दालनच माझ्यासमोर उघडले गेले. मी ही ते बघण्यात गुंगूनच गेले. त्यात कार्ड गेम्स होते, बॉल्स, रिंग्ज वगैरे सारखे शारीरिक हालचालींना चालना देणारे गेम्स होते, शिवाय स्मरणशक्ती वाढवायला मदत करणारी चित्रे आणि माहिती असणारे गेम्सही होते. त्यातले निवडक काही घेऊन मी अतिशय उत्साहात आयसोलेटेड मजल्यावरच्या क्वारंटाईनमधल्या आज्जी आजोबांना भेटायला गेले. सोमवारी थोडक्यात भेटी घडलेल्या होत्याच. त्यांच्यासोबत खेळण्याची उत्सुकता होतीच पण त्यातल्या नवीन आलेल्या आज्जी आजोबांपैकी एका आज्जींची बायोग्राफी भरून घेणे, हे एक काम बाकी होते. ते काम मंगळवारी माझ्यावर सोपवले गेले. हे काम मी आधी कधीही केलेले नव्हते, ते त्या दिवशी पहिल्यांदा करणार होते. आधी ते करून घेऊन मग गेम्स खेळायचे ठरवले.

ह्या बायोग्राफी फॉर्मवरचे प्रश्न इंटरेस्टिंग होते. पहिल्या पानावर ह्या फॉर्मचा उद्देश लिहिलेला होता. "तुम्ही इकडे राहत असतांना तुमची व्यक्तिगत माहिती मिळणे तुमचा इथला स्टे सुखकर व्हावा, तुम्हाला त्या दृष्टीने मदत पुरवणे शक्य व्हावे, या हेतूने आवश्यक आहे. सगळी माहिती लिहिणे, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देणे बंधनकारक नाही." असा साधारण मतितार्थ त्याचा होता.

सुरुवात नाव जन्मतारीख वगैरे प्रश्नांनी होऊन मग शिक्षण, आई वडील, जोडीदार आणि मुलांच्या माहितीकडे गाडी वळवली गेली होती. ह्या सर्वांचा जन्म, शिक्षण, नोकरी व्यवसाय, जोडीदाराला कधी आणि कसे भेटलात, लग्न कधी झालं आणि मग परत स्वतःविषयी प्रश्न, जसे तुमच्यातले स्ट्रॉंग पॉईंट्स काय? तुम्हाला किती वाजता उठायला आवडते, ब्रेकफास्ट, लंच, डिनर किती वाजता घ्यायला आवडते, काही खास आवडीनिवडी किंवा नावडी आहेत का? ऍलर्जीज आहेत का? काही छंद आहेत का? तुमची जबाबदारी घेणारे बाहेर कोण आहेत, ज्यांच्याशी आम्ही वेळप्रसंगी संपर्क साधू शकू. तुमची बिलिफ सिस्टीम काय आहे, तुम्ही मरणासन्न अवस्थेत असाल, तेंव्हा तुम्हाला कोणत्या प्रकारे ट्रीट केले जावे, त्यादृष्टीने काही माहिती, जसे आवडता रंग, गंध, संगीत, पुस्तक, गाणी.. अंत्यसंस्कार कसे असावेत(जाळणे, पुरणे, देहदान, अस्थी विसर्जन) या प्रकारची माहिती.

नवीन आज्जींकडून हा तीन पानी फॉर्म भरून घेण्यात बराच वेळ गेला. एकतर अचानकपणे मला ही जबाबदारी दिली गेली असल्याने फॉर्म वाचण्याइतकाही वेळ मिळालेला नव्हता. त्यात काही असे जर्मन शब्द आणि संकल्पना होत्या, ज्यांचे अर्थ मला माहिती नव्हते. आधी वाचला असता तर डिक्शनरीत अर्थ पाहून जाऊ शकले असते, जे शक्य नव्हते. मग नवीन आज्जींनाच मी ते सगळे शब्दार्थ मी विचारले आणि सोप्या भाषेत मला समजावून सांगा हे त्यांना सांगितले. हा फॉर्म भरून घेतांना आमची एकदम मस्त मैत्रीच झाली. इतकी सविस्तर ओळख मी अगोदर कोणाचीच करून घेतलेली नव्हती.

या प्रकारचे काम हे माझे खरेतर आवडते काम आहे. नाशिकला असतांना सकाळ वर्तमानपत्रातर्फे असे घरोघरी जाऊन सामाजिक, राजकीय कल जाणून घेण्याच्या दृष्टीने सर्व्हे करण्याचे काम केलेले होते. स्थानिक निवडणूकींच्यावेळीही काही जवळच्या उमेदवारांसाठी हे काम स्वयंसेवक म्हणून केलेले होते आणि मला या प्रकारच्या कामांमध्ये खूप इंटरेस्ट आहे, लोकांना त्यांच्या घरी जाऊन भेटणे, गप्पा मारणे, त्यांच्या आवडीनिवडी समजून घेणे मला फार आवडते, हे अचानकपणे आठवले.

तर ह्या नवीन आज्जींसोबत एका तासाच्या वर वेळ मजेत घालवला, त्यातून त्यांच्याविषयी बरीच माहिती कळली. ह्या आज्जी मूळच्या हॅनोवर शहारातल्याच असून टेलरिंग काम करायच्या. कॉश्च्युम डिझायनिंग वगैरेही त्यांनी केलेले आहे. हा त्यांचा फॅमिली बिझनेस असून त्यांनी आई वडिलांकडून हे कौशल्य आत्मसात करून घेतले. त्यांचा भाऊ मात्र वेगळ्या क्षेत्रात काम करायचा. आता हे तिघेही या जगात नाहीत. मिस्टर सगळ्यात पहिल्यांदा कुठे भेटले, या प्रश्नाचे उत्तर त्यांनी घराच्या डोअर स्टेपवर असे दिले. कसे ते काही त्यांना आठवत नाही पण चाळीस वर्षांच्या संसारानंतर तेही मरण पावले. आज्जींना एक मुलगा आणि एक मुलगी आहे. मुलगा परगावी राहतो, मुलगी गावातच राहते. त्यांची बिलिफ सिस्टिम कॅथॉलिक ख्रिश्चन असून बाकी बाबतीत त्यांचे काही स्पेसिफिकेशन्स नाहीत.

आज्जी मागच्याच आठवड्यात संस्थेत दाखल झाल्या असून त्या बाहेरून आलेल्या नवीन व्यक्ती असल्याने त्यांना असे आयसोलेटेड फ्लोअरवर क्वारंटाइनमध्ये ठेवले गेले असूनही त्या खूप हसऱ्या आणि सकारात्मक वाटल्या. त्यांचे बरेचसे दात तुटलेले आहेत आणि त्यांच्या डोळ्यांभोवती साकळलेल्या रक्ताची लाल वर्तुळे आहेत. हे कसे झाले, विचारले असता, "जमिनीवर जोरात अडखळून पडल्याने हे झाले आहे" असे त्यांनी उत्तर दिले. नंतर त्यांची कंडिशन 'हेमाटोमा' असल्याचे त्यांच्या पर्सनल डेटात शोधून वाचले. त्यात अशाप्रकारे रक्तवाहिन्या रप्चर होऊन रक्त बाहेर येऊन त्वचेच्या आत इंटर्नल ब्लिडिंग होते आणि ते असे बाहेरून दिसू शकते, हे समजले.

८५ वय असलेल्या ह्या आज्जींना काय छंद आहेत, हे विचारले असता पुस्तके वाचायला आवडते, असे त्यांनी सांगितले. तुमच्याकडे काहीच पुस्तके दिसत नाहीत, हवी आहेत का, विचारले असता आता मी सगळेच 'शट डाऊन' करते आहे, आता मला काही नको, फक्त शांत पडून राहावेसे वाटते, असे म्हणाल्या.

अशाप्रकारे ह्या आज्जींसोबत भरपूर वेळ थांबल्यानंतर एक गोड अशी नवीन मैत्रीण मिळाल्याच्या आनंदात मी दुसऱ्या आज्जींच्या खोलीकडे जायला निघाले. ह्या आज्जी स्वतः च एकेकाळी नर्स आणि सुईण हे काम केलेल्या असून त्यांच्या तुटलेल्या चष्म्याचा किस्सा पुढच्या भागात सांगते. दुसऱ्याही एक एकट्या पडलेल्या आणि मानवी संपर्कासाठी, स्पर्शासाठी आसुसलेल्या आज्जींचीही गोष्ट नंतर सांगते.

~सखी जयचंदर/सकीना वागदरीकर
०८.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle