आज्जी आजोबांची डायरी: भाग २१

आयसोलेटेड फ्लोअरवरच्या मूळच्या टेलर असलेल्या ८५ वर्षांच्या आज्जींसोबत एका तासाच्यावर वेळ घालवल्यानंतर मी दुसऱ्या आज्जींना भेटायला गेले. ह्या आज्जींना सोमवारी थोडक्यात भेटले, त्याआधीही मी एकदा भेटलेले होते, पण ते त्यांच्या खोलीत खालच्या मजल्यावर.. तेंव्हा त्या आयसोलेटेड नव्हत्या.

त्यांच्या रूममध्ये घरून आणलेले छान फर्निचर होते. गप्पांच्या ओघात त्यांनी स्वतःविषयी बरीच माहीती त्यावेळी दिलेली होती. त्यांनी सुईण म्हणून आणि नर्स म्हणूनही अनेक वर्षे हॉस्पिटलमध्ये काम केलेले होते.

त्यांच्या त्या रूममध्ये गप्पा मारतांना त्या एकदम फ्रेश होत्या. पण आता ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर मात्र त्या डल वाटत होत्या. सोमवारी भेटले, तेंव्हा कळले की त्यांच्या चष्म्याची काडी तुटलेली आहे. तो चष्मा वाचण्यासाठीचा असल्याने त्यांना टीव्ही बघणे, पेपर वाचणे, या सगळ्यावर बंधनं आलेली आहेत. त्यांना त्यामुळे अतिशय कंटाळा आलेला आहे. मी कधी माझ्या मूळ खोलीत परत जाईन, असं त्या मला विचारत होत्या. फक्त चौदा दिवसांचा प्रश्न असल्याने ह्या खोलीत त्यांचे काहीच फर्निचर शिफ्ट केलेले नव्हते. फक्त बेसिक गोष्टी होत्या. जसे बेड, बेडशेजारील टेबल, कॉर्नर टेबल, खुर्ची, कपडे ठेवायला कपाट आणि त्यांची व्हीलचेअर आणि वॉकर. त्यांच्या मूळ खोलीत त्यांचा सोफा, शोकेस, घरून आणलेल्या भरपूर वस्तू, खाली छान मॅट आणि त्यांच्या स्वतःच्या उश्या आणि छान कव्हर घातलेलं पांघरूण, थोडक्यात दोन्ही रुम्सची तुलना करता घरपण असलेली त्यांची ती रूम आणि हॉटेल रूमसारखी ही रूम असा हा जमीन अस्मानाचा फरक असल्याने त्यांना कंटाळा येणं साहजिकच होतं.

ते कमी की काय म्हणून त्यात ह्या तुटलेल्या चष्म्याची भर पडलेली होती. माझा चष्मा कधी दुरुस्त करून मिळेल, हेही त्या मलाच विचारत होत्या.

मी त्याच दिवशी- सोमवारीच त्या फ्लोअरवर जॉईन झालेली असल्याने मला काहीच माहिती नव्हती. लगेच फ्लोअरवरच्या केअर युनिट एम्प्लॉयीला विचारायला गेले, तर तिने सांगितले, आज्जींचा क्वारंटाईन पिरियड अजून आठ दिवस बाकी आहे. पुढच्या मंगळवारी त्या आपल्या खोलीत परत जातील. तुटलेल्या चष्म्याविषयी एका दुसऱ्या एम्प्लॉयीला कळवलेले आहे, जी ह्या प्रकारची सर्व कामे करते, ती रजेवर आहे नेमकी, पण उद्या येईल आणि काम करेल.

मंगळवारी कामावर जातांना रिसेप्शन काऊंटरवरून मला ह्या आज्जींसाठी विकत घेतलेले वर्तमानपत्र दिले गेले फ्लोअरवर घेऊन जायला, त्यांना मग मी विचारलं, आज्जींच्या तुटलेल्या चष्म्याविषयी तुम्हाला कळलं का? तर त्या हो म्हणाल्या. रोज प्रत्येक आज्जी आजोबांना वेगवेगळ्या कारणांनी भेट देणारे सर्वजण सर्व्हरवर महत्वाचं सगळं नोंदवून ठेवत असतात. मी सुद्धा काल हे केलेलं होतंच. हे लिहिलेलं सगळं काही जण रोज वाचत असतात आणि जबाबदार व्यक्तींना कळवत असतात. शिवाय फारच महत्वाच्या गोष्टी इमेलने सर्वांपर्यंत पोहोचतात, त्यामुळे शक्यतो आम्ही सगळे रोजच्या घडामोडींबाबत सेम पेजवर असतोच.

तर चष्म्याचं काम जिच्यावर सोपवायचं होतं ती मुलगी मंगळवारीही आलेली नव्हती म्हणून दुसऱ्या मुलाला कळवलं होतं, पण तो ही आलेला नव्हता. आता मलाच अस्वस्थ व्हायला लागलं. ह्या इतक्या वाचन वगैरे करणाऱ्या आज्जी, ज्या आता आयसोलेटेड आहेत आणि चष्म्याअभावी अपंगत्व असं सर्व बाजूंनी अंधारात गेलेल्या आहेत. ह्यांचं कसं होणार?

ताबडतोब ह्या आज्जींनाच भेटायला गेले मग. कालपेक्षाही आज ह्या अजूनच डल दिसत होत्या. त्यांना म्हणाले, चला आपण टेरेसमध्ये जाऊया, तर म्हणाल्या, नको. इथेच बसते. म्हटलं, बाहेर छान ऊन आहे, बाहेरची हवा खाऊन छान वाटेल, तर त्यालाही नाही म्हणाल्या. मी त्यांना म्हणाले, मग गेम खेळूयात का मी आणलेले, तर चष्म्याशिवाय मला नाही खेळता येणार, म्हणाल्या. त्यांना म्हटलं, अहो, खेळता येतील, मी सांगेन ना, तर नाहीच म्हणाल्या. मग त्यांना आग्रह करून टेरेसमध्ये घेऊन गेले, तर भर उन्हात त्यांना थंडी वाजत होती, पांघरूण आणून देऊ का विचारल्यावर त्यालाही नाही म्हणाल्या, मला खोलीत घेऊन जा, असेच सांगू लागल्या, मग नेलं त्यांना खोलीत परत.

खोलीत जाताच माझा चष्मा आणि माझी खोली हेच पुन्हा त्यांनी सुरू केलं. परत चौकशी केल्यावर आज संध्याकाळपर्यंत तो मुलगा येऊन काम करेल, असं कळलं. आज्जींना तसा निरोप देऊन आले.

पेपर वाचून दाखवू का, म्हणल्यावर, हो म्हणाल्या. मग एक लेख वाचून झाल्यावर, कसं वाटतंय? विचारलं असता, छान, पण बास झालं, अजून नको वाचूस, म्हणाल्या. त्यांच्याशी जरावेळ गप्पा मारून झाल्यावर दुसऱ्या आज्जींकडे गेले.

दुसऱ्या आज्जीही त्यांच्या वेगळ्या फ्लोअरवरच्या रूममधून इकडे मूव्ह केल्या गेलेल्या होत्या. हॉस्पिटलवारी करून आलेल्या असल्याने करोना प्रोटोकॉलनुसार क्वारंटाईनमध्ये होत्या. ह्या आज्जींशी त्यांच्या मूळ रूममध्ये भेटलेले असले तरीही त्यांच्याशी जास्त गप्पा झालेल्या नव्हत्या. त्या कायम आपल्या जगात हरवलेल्याच असत. मात्र व्हीलचेअरवरून कायम फिरतीवर असत. आता क्वारंटाईनमध्ये असल्याने नुसत्या बेडवर पडून होत्या. सोमवार आणि मंगळवार, दोन्ही दिवस त्यांना खेळण्याविषयी, टेरेसमध्ये घेऊन जाण्याविषयी विचारले होते, पण त्यांनीही नकारच दिलेला होता.

एकतर ह्या फ्लोअरवर मोजून चार रहिवासी, त्यांनाही एकमेकांना क्वारंटाइन मध्ये असल्याने भेटण्याची परवानगी नाही. इथली जबाबदारी घेणारा/री एकावेळी फक्त एक एम्प्लॉयी काम करणार. तीन शिफ्टमध्ये त्या वेगवेगळ्या एम्प्लॉयीज येणार, वेगळी ती मी एकच जास्तीची इथे फिरकणारी. स्वच्छता काम करायला एक जण अधूनमधून येऊन जाणार आणि केअर युनिटवाले ते एखादे व्यक्ती मग त्या रहिवाश्यांच्या खाण्यापिण्याची, आंघोळीची, ब्लड शुगर वगैरे चेक करून योग्य ते मेडिसीन्स देण्याची जबाबदारी घेणार. आम्ही सगळे मास्क, चष्मा , ग्लोव्हज, एप्रन, हे सगळं घालून येणार. आमचं नखही कोणाला दिसणार नाही, असे सगळे असतांना वातावरणात उदासीनता येऊन ती आज्जी आजोबांवर रिफ्लेक्ट होणं साहजिकच होतं..

बुधवारी जेंव्हा मी फ्लोअरवर गेले, तेंव्हाही आज्जींच्या चष्म्याचं काम झालेलं नाही, हे समजल्यावर मात्र मी संबंधित लोकांना विचारले की आत्ताच्या आत्ता मी हे काम करायला तयार आहे. मला माहिती आहे की हे माझे काम नाही, पण आज्जींची अवस्था बघवत नाही. रोज ताजं वर्तमानपत्र घेणाऱ्या आज्जींना ते वाचताही येत नाही, टीव्ही बघता येत नाही, बाहेर कोणाला भेटता बोलता येत नाही, हे फार भयानक आहे. मी नाही हे सहन करू शकत. मला ऑप्टिशियनचा पत्ता द्या, मी काम करून येते.

ताबडतोब मला पत्ता दिला गेला. मी तडक निघाले आणि ऑप्टीशियनकडे पोहोचले. तिथे पोहोचताच तिथे काम करणाऱ्या मुलीने माझ्या हातावर डिसइन्फेक्टंट स्प्रे करून बसायला लावले. कोणाचा चष्मा विचारल्यावर सिनियर केअर होमच्या आज्जींचा आहे आणि त्या फार अस्वस्थ आहेत, लवकर मिळाला तर बरे, असं सांगितलं. त्या मुलीने अक्षरशः ५ मिनिटात चष्म्याचं काम केलं. चष्माकेस हवी आहे का, विचारलं असता मी हो म्हणाले आणि बिल किती झालं, ते विचारलं. मुलगी म्हणाली, तुम्ही नोबल सर्व्हिस करता आहात, तर आमच्याकडून हे मोफत. आमचीही सर्व्हिस!! फार कौतुक वाटलं मला त्या मुलीचं.. चष्मा सुंदर चकचकीत पुसून दिलेला होता. चष्मा केसही सुंदर लाल रंगाची आणि एकदम रोबस्ट होती.. अतिशय समाधानी मनाने मी सिनिअर केअर होममध्ये परत गेले. सर्वांना हा किस्सा सांगितला. फार कौतुक वाटलं त्यांनाही.

आता खरं माझी क्वारंटाईन ड्यूटी संपून लंचब्रेकनंतर गार्डन ड्यूटी सुरू होणार होती. पण आज्जींना भलेही माझा चेहरा दिसू शकणार नसला तरी मला माझ्याच हाताने चष्मा द्यायचा होता. अनेक दिवसांनंतर चष्मा मिळल्यानंतर आणि बघता आल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स बघायचे होते. त्यांच्यासोबत मला खेळ खेळायचे होते.

मग जेवल्यावर कलिग्जना माझी इच्छा सांगून पुन्हा त्या फ्लोअरवर गेले. आज्जींना माझ्या हाताने चष्मा दिला. आज्जी प्रचंड खुश झाल्या. किती पैसे झाले, असे त्यांनी विचारल्यावर, फ्री सर्व्हिस मिळाली आज्जी तुम्हाला. ही चष्माकेसही फुकट दिली, हे सांगितल्यावर त्यांनाही खूप छान वाटलं. माझे खूप खूप आभार मानून तडक पेपरच वाचायला लागल्या त्या.. त्यांचा निरोप घेऊन मग समाधानाने त्या सतत पडून असणाऱ्या आज्जींकडे गेले.

त्या आज्जींचा किस्सा पुढच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
११.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle