आज्जी आजोबांची डायरी: भाग २२

सिनिअर केअर होममधल्या चष्मेवाल्या आज्जींना भेटून आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून खरंतर मी माझ्यावर सोपवलेल्या गार्डन ड्यूटीवर जायला हवे होते, मोकळी हवा, छान कडक पण बोचरे नसणाऱ्या उन्हाचा आस्वाद घेत आनंदी आणि हेल्दी आज्जी आजोबांसोबत गप्पा मारायला खाली गार्डनमध्ये असायला हवे होते, पण कुणास ठाऊक का, माझी पावलं नेहमी स्वतःच्या विश्वात हरवलेल्या एका आज्जींच्या रूमकडे वळली. रूममध्ये जाण्यापूर्वी प्रोटोकॉलनुसार वरच्या लेअरवरचे ग्लोव्हज कचऱ्यात फेकून दुसरे घातले.

त्या आज्जीं डोळे मिटून पडलेल्याच होत्या. त्यांना सांगितलं की वास्तविक माझी दुपारची ड्यूटी गार्डनमध्ये असते पण त्या दुसऱ्या आज्जींना चष्मा द्यायला आले, तर तुम्हालाही जाता जाता भेटायला आले. ते ऐकताच आज्जींनी माझा डबल ग्लोव्हज घातलेला हात हातात घेतला आणि अतिशय घट्ट पकडला. मग दुसरा हातही माझ्या हातावर धरला आणि एकदम गाढ झोपी गेल्या.

मी उभीच होते. वाकून उभ्या अवस्थेत तीन चार मिनिटं तशीच अवघडलेल्या अवस्थेत थांबल्यानंतर हळूच माझा हात सोडवून घेऊन जायला निघाले, तर आज्जी उठल्या आणि म्हणाल्या नको जाऊस गं.. बरं वाटतंय मला कोणीतरी सोबत आहे तर.. ह्या आज्जींना त्यांच्या मूळ रूममध्ये आणि कॉरिडॉरमध्ये २-३ वेळा भेटलेले होते, त्या कधीही इतके बोललेल्या नव्हत्या. कायम आपल्या तंद्रीत असत.

आज्जींनी थांबण्याची विनंती केली, म्हटल्यावर मी म्हणाले, ठीक आहे आज्जी, थांबते मग तुमच्याजवळ अजून थोडावेळ.

आता आज्जींनी माझा हात त्यांच्या कमरेवर ठेऊन दाबून द्यायला लावलं. मी जरावेळ त्यांची कंबर दाबून दिली, त्या पुन्हा झोपी गेल्या. आता परत मी तिकडून हळूच निघाले, तर पुन्हा त्या उठल्या. त्यांना म्हणाले, आज्जी खिडकी उघडू का? तर नको म्हणाल्या. रुमचे दार बंद, खिडकी बंद, तुम्ही बाहेर पडत नाही, तुम्हाला ऑक्सिजन कसा मिळणार? असे म्हटल्यावर फक्त पाच मिनिट उघड, मला थंडी वाजते, म्हणाल्या. मग पाच मिनिटांनी खिडकी बंद करून त्यांना उद्या भरपूर वेळ सोबत थांबण्याचं कबूल करून तिकडून बाहेर पडायला लागले, तर त्यांनी पुन्हा माझं नाव विचारलं, जे मी सुरुवातीला सांगितलेलं होतं आणि त्या विसरल्या होत्या. मी 'सकीना' सांगत होते आणि त्या 'साटीना' म्हणत होत्या.

मी म्हणाले, थांबा, लिहून देते, तर कागद, पेन, काहीही सोबत आणलेलं नव्हतं, जे मी इतर फ्लोअर्सवर काम करतांना सोबत बाळगत असते. मग चष्मेवाल्या आज्जींच्या रूममध्ये जाऊन, त्यांना विचारलं, कागद पेन आहे का, तर पेन त्यांनी पर्समधून काढून दिला पण कागद नव्हता. सगळी वर्तमानपत्रंच होती. मग त्यांच्या पर्सनल टॉयलेटमधून त्यांच्या परवानगीने टॉयलेट पेपर घेऊन त्यावर माझं नाव लिहून घेऊन गेले.

आज्जींना तो पेपर दाखवला, मग त्यांनी माझं नाव नीट वाचलं आणि उच्चारलं. त्यानंतर त्यांना 'बाय' करून निघाले, तर मला 'बाय' करून माझ्या नावाचा त्या जपच करत बसल्या.

ह्या फ्लोअरवर खरोखरच कोणाचीतरी, मनापासून वेळ देणाऱ्या व्यक्तीची गरज आहे, हे लक्षात येऊन त्या दिवशी ठरवले, की बॉसने परवानगी दिली तर पूर्ण वेळ क्वारंटाईन फ्लोअरचीच ड्यूटी मागून घ्यायची. गार्डनमधल्या आज्जी आजोबांची अवस्था चांगली आहे. तिथे त्यांना एकमेकांची सोबत आहे, शिवाय त्यांच्यासोबत ऑक्युपेशनल थेरपिस्ट असतात अधूनमधून, आता व्हिजिटर्सही येऊ शकतात आणि त्या भेटीही गार्डनमध्येच होतात, त्यासाठी वेगळा तंबू आणि प्लॅस्टिक पार्टीशन, दोन्ही बाजूला खुर्च्या, अशी करोनापासून बचावाची सुरक्षित सोय केलेली आहे. खरी गरज ह्या आयसोलेटेड फ्लोअरवर आहे, तिथेच आपण जास्तवेळ असायला हवे.

शिवाय ही चष्मा वगैरेसारखी अजूनही बरीच पेंडिंग कामं असू शकतात जी आता करोनामुळे मनुष्यबळ कमी पडत असल्याने कोणावर सोपवावी, हे कळत नसल्याने आज्जी आजोबांची आबाळ होत असेल, तर ती कामंही मला द्यावीत, हेही सांगावे.

मला अर्थातच ह्यासाठी होकार मिळाला. गार्डनमधल्या आज्जी आजोबांची आई बाबांशी व्हिडीओ कॉल वर घडवून आणली, तशी भेट या फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांचीही घडवून आणू का? तेवढाच त्यांनाही काहीतरी चेंज, असे विचारले असता, मला होकार मिळाला. शिवाय त्या फ्लोअरवर सगळे मास्क, ग्लासेस घालूनच वावरतात, शिवाय एप्रन, ग्लोव्हज, आपलं नखही कोणाला दिसत नाही, तर माझा आणि तिथे काम करणाऱ्या इतरांचा फोटो प्रिंट आउट काढून सोबत नेला आणि बोलतांना दाखवला, तर चालेल का? हे विचारले असता बॉसना ही कल्पना अतिशयच आवडल्याचं त्यांनी सांगितलं.

जनरल फ्लोअरवरच्या आयसोलेटेड रुममधल्या आजोबांनी चेहरा दाखवायला लावला होता, त्या डायरीच्या भागाच्या प्रतिसादात माझ्या एका मैत्रिणीने(अंजुताईने) मला हे सुचवले होते, तेच बॉसना सांगितले. मनोमन अंजुताईचे आभार मानले. ताबडतोब मला माझा एक फोटो, जो प्रत्येक फ्लोअरवर सर्व एम्प्लॉयीजसोबत लावलेला होता, तो ए4 साईझ पेपरवर प्रिंट आउट काढून देण्यात आला, त्यावर मी माझं नाव मोठ्या अक्षरात लिहून सोबत घेऊन गेले. शिवाय एक छोटा फोटो लॅमीनेट करूनही दिला मला. हे काम करतांना रिसेप्शन काऊंटरवरची जर्मन सुंदरी मला 'किती गं तू सुंदर!' अशी कॉम्प्लिमेंट देत होती पूर्णवेळ..

एका प्लॅस्टिकच्या पिशवीत माझा फोन, वर्कप्लेसचा कॉर्डलेस लँडलाईन फोन, माझा मोठा आणि छोटा फोटो, एक डायरी आणि पेन, असा सगळा लवाजमा घेऊन क्वारंटाईन फ्लोअरकडे निघाले.
सकाळचा बराचसा वेळ इतर काही कामे करण्यात गेल्याने जेवण आटोपून फ्लोअरवर डायरेक्ट दुपारीच जाऊ शकले.

गेल्या गेल्या आधी सर्व्हरवर रिपोर्टस् वाचायचे काम केले. फ्लोअरवरच्या केअर एम्प्लॉयी(स्पेशलाईज्ड नर्सने) लिहिलेले होते:
१. फ्राऊ.. (त्यांचे नाव) चष्मा मिळाल्याने खुश आहेत. त्यांना आज आंघोळ घातली, कपडे बदलून दिले..

असेच इतरांचेही रिपोर्टस् लिहिलेले होते, ते वाचले. इमेल्स चेक केल्या. आज ह्या फ्लोअरवर एक नवीन आज्जी दाखल झालेल्या असून जे आजोबा होते त्यांना रिहॅबिलीटेशन क्लिनिकमध्ये हलवले असल्याचे कळले. म्हणजे आता एकूण चार आज्जी फ्लोअरवर होत्या. नर्ससोबत थोडावेळ गप्पा मारून, अपडेट्स घेऊन मग चष्मेवाल्या आज्जींना भेटले. खूप दिवसांनी पाणी दिल्यावर कोमेजलेलं फुल कसं टवटवीत दिसतं, तशा चष्मेवाल्या आज्जी त्या दिवशी दिसत होत्या. पेपर वाचण्यात मग्न अशा त्या खुर्चीवर बसलेल्या होत्या. माझ्याशी छान हसून गप्पा मारल्या त्यांनी. त्यांना माझा फोटो दाखवला, त्या अरे वा! मस्त! तुमचा चेहरा बघून छान वाटलं, असं म्हणाल्या.

मग आदल्या दिवशी माझ्या नावाचा जप करणाऱ्या आज्जींना भेटले. त्यादिवशी त्या फ्रेश दिसत होत्या. नर्सने त्यांनाही (आणि फ्लोअरवरच्या इतर सर्वांनाच) आंघोळ घालून, कपडे बदलून फ्रेश केलेले होते, केस छान विंचरून दिलेले होते. आदल्या दिवशीची उदासीनता आणि मरगळ गुरुवारी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत नव्हती. मात्र त्या बेडवरच पडून होत्या. त्यांना माझा मोठा फोटो दाखवला आणि काल तुम्हाला भेटून, तुमच्यासोबत गप्पा मारून गेले, ती मीच, असं म्हटल्यावर, विश्वास नाही बसत, इतके मोठे केस आहेत तुमचे? इतक्या छान दिसता तुम्ही? असे म्हणून हसल्या.

मग त्यांना माझ्या फोनवरचे माझे, माझ्या कुटुंबाचे फोटो दाखवले, आई बाबा दाखवले, त्यांच्याशी बोलणार का? एक गंमत दाखवते बघा, थेट भारतातून ते तुमच्याशी बोलतील, असे सांगितले.

फोन केला, तर फोनवर बाबा होते. त्यांची आज्जीशी ओळख करून दिली. बाबांनी आज्जींना काही प्रश्न विचारले, जसे तुम्ही किती वर्षांच्या, त्यावर त्यांनी चौतीस साली जन्मल्याचं सांगितलं. मिस्टर वारलेले असून दोन मुलं असल्याचं सांगितलं. त्या स्वतः होममेकर होत्या. जॉब कधी केला नाही, असं सांगितलं. आज्जींना खूप मजा आली बाबांसोबत गप्पा मारून.

मग त्यांचा निरोप घेऊन हेमाटोमा कंडिशनवाल्या, जमिनीवर पडून झालेल्या जखमेने डोळ्याभोवती साकळलेल्या रक्ताची वर्तुळे असलेल्या टेलर आज्जींकडे गेले. आता फोनवर आई उपलब्ध झालेली होती. तिने आणि बहिणीनेही आज्जींसोबत गप्पा मारल्या, अर्थातच मी अनुवादक होते. त्यांनाही खूप मजा आली. आईला त्या एकेकाळी टेलर होत्या सांगितल्यावर आईने तिलाही शिवणकामाची आवड असून तिनेही हे काम एकेकाळी छंद म्हणून (आणि अजूनही काही छोटे छोटे फाटलेले शिवण्याची गरज म्हणून आवडीने करते आहे आणि) केलेले आहे, हे सांगितले. आज्जींना छान वाटलं हे ऐकून.

मग चष्मेवाल्या आज्जींना दाखव, असे बहिणीने सांगितल्यावर(तिला तो किस्सा फोनवर आदल्या दिवशी सांगितलेला असल्याने तिला उत्सुकता होती.)
मग त्यांच्याकडेही फोन घेऊन गेले. त्यांनीही छान प्रतिसाद दिला गप्पांना. हे असं इतक्या लांब फोनवर दिसत लाईव्ह बोलता येणं, याचं फार अप्रूप सर्वांनाच वाटलेलं होतं.

नवीन दाखल झालेल्या एका आज्जींना आता नंतर भेटू, हे सांगून घरी जायला निघाले, तर नर्सने आजच भेट असे सांगितले. त्या भेटीचे कारण, त्यांच्यासोबतच्या भेटीचा आणि नर्सच्या प्रेमळ अनुभवाचा किस्सा पुढच्या भागात सांगते.

~सखी जयचंदर/ सकीना वागदरीकर
१४.०५.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle