स्त्री शक्तीचे एक आगळे वेगळे रुप (बदलून - फोटोसह )

अनेक जणं आयुष्यात स्वप्नं पाहतात. अनेक जणं ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नही करतात. असंच एक स्वप्न पाहिलं, चेन्नई स्थित सुबश्री नटराजन यांनी! ते स्वप्न आहे जगातील सर्वात मोठ्या ब्लँकेटचे! आणि त्या स्वप्नाला सत्यात उतरवण्यासाठी त्यांनी अनेकजणींना सोबत घेतलं; त्यांनाही हे स्वप्न पहायला लावलं. इतकच नव्हे तर त्यासाठी सगळी तपशीलवार योजना आखली.

ऑगस्ट पासून ही सर्व तयारी सुबश्री यांनी सुरू केली. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसाठी आवश्यक तो सर्व पत्रव्यवहार त्यांनी केला, गिनिजकडे त्यासाठीचे रजिस्ट्रेशन केले आणि जगातील सर्वात मोठ्या ब्लँकेटचा विडा उचलला.

आधीचे रेकॉर्ड होते 3377 चौरस मीटरचे, आफ्रिकेतील बायकांनी केलेले. ते मोडून 5000चौरस मीटरचे शिवधनुष्य भारतीय महिलांच्या सोबत उचलण्याचे सुबश्री नटराजन यांनी ठरवले. आणि सुरू झाला एक वेगळाच क्रोशा विणकामाचा महा यज्ञ !

फेसबुक वरती गृप तयार झाला. मदर इंडियाज क्रोशे क्विन्स! सुबश्री स्वत: मॅनेजमेंटच्या. त्यामुळे त्यांनी सगळी आखणी रेखीव केली.
ग्रॅनी स्क्वेअरचा पॅटर्न, 40*40इंचाचा चौरस, किमान दोन चौरस प्रत्येकी,पाच मिलिमीटरची सुई, सगळीकडे सहज मिळु शकणारी फोर प्लाय लोकर आणि भारतीय महिला. एव्हढे नियम ठरवले. रंगसंगतीची पूर्ण मोकळीक दिली गेली. आणि मग फेसबुक, व्हॉट्स अप अशा अनेक माध्यंमांतून एक एक जणी जोडल्या जाऊ लागल्या. भारतातील विविध राज्यांतून इतकेच नव्हे तर जगभरातून अनेक भारतीय महिला या उपक्रमात दाखल होऊ लागल्या.

आज दिड हजारहून अधिक महिला या उपक्रमात सामिल आहेत आणि जसजशी ही माहिती सर्वांपर्यंत जातेय तसतसा हा सहभाग वाढतो आहे.
विभागवार गृप्स करून त्या त्या ठिकाणी गृप लीडर करून कामाची योग्य विभागणी केली आहे. शहरांनुसार व्हॉट्स अप गृप तयार झाले. हजारो बायकांचे एक नवेच नेटवर्क तयार झाले. ब्लँकेट्स विणता विणता एकमेकींशी मैत्रीचे नातेही विणले जाऊ लागले. अनेक हरवलेल्या मैत्रिणी पुन्हा सापडल्या, अनेक नव्या मैत्रिणी मिळाल्या. भाषेचा, अंतरांचा, धर्माचा, आर्थिक परिस्थितीचा, अगदी सगळे सगळे अडसर दूर झाले. एकमेकींच्या कलागुणांना, मॅनेजमेंट स्किल्सना कौतुकाची थाप पडू लागली. पुण्यामधील 60हून जास्त महिला यात सामिल आहेत. तसेच 94वर्षांच्या आजींपासून 8वर्षाच्या बालिके पर्यंत सर्वांचा यात सहभाग आहे.

हजारों ब्लँकेट्स तयार होऊ लागली. आता ही ब्लँकेट्स स्थानिक पातळींवर जोडण्याचेही काम सुरु झाले आहे. डिसेंबर अखेर ही सर्व ब्लँकेट्स चेन्नईला रवाना होतील.

31जानेवारी 2016 रोजी चेन्नई येथील नेहरु स्टेडियम मधे या उपक्रमाची सांगता होणार आहे. गिनिज वर्ल्ड रेकॉर्डचे परीक्षक तेथे येतील, अनेक महिला सदस्य ही उपस्थित असतील. आणि जगातील सर्वात मोठे ब्लँकेटचे नवे रेकॉर्ड त्या दिवशी निर्माण होईल.

हा उपक्रम इथेच थांबणार नाही. एकदा रेकॉर्ड जाहिर झाले की हे मोठे ब्लँकेट पुन्हा छोट्या ब्लँकेटमधे सुटे केले जाईल आणि देशभरातील अनेक गरजुंना ते दान केले जाईल. भारतीय महिलांची प्रेमाची उबदार चादर अनेक गरजूंना दिलासा देऊन जाईल.

या उपक्रमातील स्थानिक पातळीवरील एक ब्लँकेट जोडणी नुकतीच पार पडली. दि 19 ऑक्टोबर 2015रोजी पुण्यातील आठ महिलांनी ( रेखा चित्रे, आरती खोपकर, सीमा खिरे, शुभांगी ताम्हणे, शर्मिला शाळीग्राम, कमल ठाकूर, प्रतिम गुप्ते आणि गौरी रोडे ) एकत्र येऊन 7*4अशा 28ब्लँकेट्स जोडली. जवळ जवळ 22 फूट बाय 13 फुट इतक्या लांबीचे छोटे(?) ब्लँकेट तयार झाले.

उपक्रमातील पुण्यातील सर्व महिला दिनांक 1नोव्हेंबर 2015रोजी पुन्हा ब्लँकेट जोडणीसाठी एकत्र येत आहेत. त्यांना भेटण्यासाठी सुबश्री नटराजनही चेन्नई वरून येत आहेत.

हा संपूर्ण उपक्रम प्रचंड मोठा आहे. अनेक विणणाऱ्या महिला स्वत: यातील आर्थिक भार पेलत आहेत. तसेच अनेक स्पॉन्सररही पुढे येत आहेत.

नवरात्रीच्या उत्सवामधे स्त्री शक्तीचे हे आगळे वेगळे रुप !

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle