आज्जी आजोबांची डायरी: भाग ३३

२६.०६.२०२० रोजी लिहिलेली डायरी नीट लिहून प्रकाशित करायचे काही ना काही कारणाने राहून गेले. हे लिहून झाल्यानंतर आता बरेच काही घडलेले आहे, पण हे वाचल्याशिवाय पुढचा संदर्भ लागणार नाही, म्हणून आधी हे २ भागात प्रकाशित करते आहे.
(भाग:२)

जगभरात काही देशांमध्ये करोना परिस्थिती सुधारते आहे, तर काही देशांमध्ये ती चिघळत चाललेली आहे, मात्र सगळीकडेच आता करोनासोबत जगायला सुरुवात करण्याविषयी एकवाक्यता व्हायला लागलेली असल्याने लॉकडाऊन शिथिल करत अनलॉकच्या फेजेस सुरू होतांना दिसत आहेत.

जर्मनीमध्येही आता रेस्टॉरंटस आणि तिथे सुरू झालेली वर्दळही दिसायला लागलेली आहे. हॅनोवर शहरात गेले काही महिने ट्रॅमचा प्रवास सुरु असतांना तिकीट चेकर दिसला नव्हता, त्याची मागच्या आठवड्यात एक चक्कर माझ्या ट्रॅममध्ये होऊन गेली.

मी जॉब करत असलेल्या सिनिअर केअर होममध्ये मार्चच्या उत्तरार्धात सुरुवातीला व्हिजिटर्सना पूर्णपणे बंदी, मग फक्त मरणासन्न अवस्थेतील आज्जी आजोबांना भेटायला परवानगी, तीही एकावेळी फक्त एकाला, अशी, मग गार्डनमध्ये एका फॅमिलीतील फक्त एक किंवा दोन जण पार्टीशन असलेल्या तंबूत सुरक्षित अंतरावरून भेटणे आणि मग तंबूबाहेरही भेटू देणे करता करता आता रूम व्हिजिट्सनाही परवानगी देण्यात आलेली आहे.

माझ्यासाठी सगळ्यात मोठा बदल ह्या आठवड्यात घडणार आहे, तो म्हणजे हा क्वारंटाईन फ्लोअर १ जुलैपासून नॉर्मल फ्लोअरमध्ये रूपांतरीत होणार आहे. दुसऱ्या फ्लोअर्सवर हलवले गेलेल्या आज्जी आजोबांना आता पुन्हा आपापल्या मूळ रूम्समध्ये परतता येणार आहे. पुढच्या आठवड्यापासून सुरक्षिततेसाठी घालत असलेला सगळा लवाजमाही बंद होणार असल्याने आम्ही सर्वजण एक्सायटेड आहोत. आता उन्हाळाही जास्त कडाक्याचा सुरू झालेला असल्याने रोज तापमान वाढत आहे आणि ह्या पूर्णपणे झाकलेल्या कपड्यांमध्ये फार उकडतेय. योग्य वेळेला हे सगळे संपणार, याचा आनंद आहेच, पण एकाच फ्लोअरवर दिवसभर थांबता येणे, निवडकच आज्जी आजोबा आणि नर्सेससोबत राहिल्याने निर्माण झालेले एक वेगळे इमोशनल कनेक्शन आता जोडणे अवघड असेल आणि रोज वेगवेगळ्या फ्लोअर्सवर अनेक जणांना भेटणे सुरू होईल याचा आनंद, त्याचवेळी कम्फर्टझोन झालेल्या ड्युटीचे स्वरूप बदलेल याचेही वाईट वाटते आहे.

गेल्या दीड महिन्यापासून हा फ्लोअर माझ्यासाठी अगदी सेकंड होमसारखाच झालेला होता. क्वारंटाईन मध्ये असलेल्या आज्जी आजोबांनासुद्धा इकडे आयसोलेटेड फील होऊ नये, यासाठी प्रयत्न करण्याची जबाबदारी मनापासून आणि जमेल तशी निभावण्याचा मी प्रयत्न केला. काहीवेळा त्यात यश आले आणि काहीवेळा त्यातून भलतेच उदभवले, असेही झाले आहे. त्यातील जमेल तितके आणि आठवतील तितके अनुभव आजच्या भागात आणि उरलेले नंतरच्या भागात लिहिण्याचा माझा प्रयत्न असणार आहे.

ह्या फ्लोअरवर बाहेरून येऊन नव्याने दाखल झालेल्या एक आज्जी, ज्या फ्लोअरवर आल्या, तेंव्हा त्यांना मीच अटेंड केले होते, त्यांचे बॅगेतले सामान काढून रूममध्ये लावण्यात मी नर्सला मदत केलेली होती. त्यांच्या तोंडात एकच दात होता आणि त्यामुळे त्या फक्त प्युरी असलेले अन्न खात असत. मात्र बुद्धीने अजूनही शार्प, डोळे आणि कानही व्यवस्थित चालू स्थितीत होते. त्या बेडवरच पडून होत्या पूर्णवेळ. त्यांना बाहेर नेऊ का विचारले असता, त्यांनी नकार दिलेला होता. त्यांची आंघोळ घालायला कदाचित नर्स त्यांना उचलत असावी पण मी ड्युटीवर असतांना मात्र त्या पूर्णवेळ बेडवरच पडून असत. त्यांच्याजवळ त्यांच्या मुलामुलींचे फॅमिलीसकटचे फोटो नर्सने ठेवले. बाकी काही फोटोज समोर टेबलवर ठेवले. सर्व फोटोंवर मोठया अक्षरात कोणाकोणाचे फोटोज आहेत, ते नावासकट लिहिलेले होते. आज्जींना हा कोणाचा फोटो, विचारले असता व्यवस्थित नाव वगैरे सांगितले.

मग टेबलकडे पॉईंटआऊट करत तो फोटो देतेस का म्हणाल्या. माझ्या मिस्टरांचा फोटो आहे तो, इकडे ठेवतेस का, विचारले. तो फोटो त्यांच्याजवळ ठेवून मिस्टरांना तुम्ही कधी आणि कुठे भेटलात असे विचारले असता त्यांनी मजेशीर गोष्ट सांगितली. पोलीस असलेले त्यांचे मिस्टर त्यांना म्हणे ट्रॅममध्ये पहिल्यांदा भेटले. लग्न करून किती वर्षे झाली, वगैरे डिटेल्स त्यांना आठवत नव्हते. मी ही मिस्टर कधी वारले, त्यांना काय झाले होते वगैरे काही प्रश्न न विचारता त्यांचे बोलणे ऐकत बसले.

ह्या आज्जी मोस्टली झोपूनच असत. पण बोलत, तेंव्हा हसून बोलत. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपून त्या खालच्या फ्लोअरवर त्यांच्यासाठी तयार केलेल्या रूममध्ये गेल्या, त्याच दिवशी रात्री त्यांचे निधन झाल्याची माहिती दुसऱ्या दिवशी इमेलमध्ये वाचली..

दुसरे एक आजोबा हॉस्पिटलमधून ह्या फ्लोअरवर येणार असल्याचे कळले आणि त्यांच्यासाठी रूम रिझर्व्ह करण्यात आली होती, तर ईमेल मधून समजले की त्यांना इकडे आणण्याचे कॅन्सल झालेले असून त्यांना हॉस्पिसमध्ये दाखल करण्यात आलेले आहे. हॉस्पिस म्हणजे मरणासन्न अवस्थेत असलेल्या लोकांसाठीचे हॉस्पिटल. असे हॉस्पिटल लहान मुलांसाठीही असल्याने नर्सकडून समजले. अगदी सुन्न झाले मी ही नवीन माहिती कळल्यावर...

क्वारंटाईन फ्लोअरवरच्या आज्जी आजोबांना माझ्या आई बाबांसोबत, बहिणीसोबत व्हिडीओकॉलवर बोलायला लावून त्यांचे मन वेगळ्या गोष्टीत रमवायचा प्रयत्न करत असायचे. बहुतेक सर्व आज्जी आजोबांना इतक्या लांब कॉल करता येतो आणि माणसाला प्रत्यक्ष पाहून बोलता येऊ शकते, या अनुभवांनी हरखून जायला होत असायचे, हे मागे लिहिलेले आहेच. एकदा मात्र त्यातून भलतेच निष्पन्न झाले...

एका आज्जींना अचानक आपलेच आई वडील आणि भावंडं आठवायला लागली. आधी त्यांनी त्यांच्याविषयी सगळे कौतुकाने सांगितले. दुसऱ्या दिवशी मात्र त्या जुन्याच जगात हरवून गेलेल्या दिसल्या. त्यांना गच्चीत घेऊन जायला मी त्यांच्या रूममध्ये गेले, तर त्या म्हणाल्या, माझे मिस्टर आता मला भेटायला येणार आहेत. मी बाहेर आले, तर त्यांना मी सापडणार नाही. मग त्यांना बरं म्हणून मी दुपारी त्यांच्याकडे गेले, तर त्या लहानपणीच्या जगात गेलेल्या होत्या. मला घरी जायचं आहे, म्हणाल्या. घर कुठे आहे, घरी कोण आहे, विचारले असता माझी आई आणि बहिणी आहेत घरी, असे म्हणाल्या. वडील युद्धात वारलेले असल्याने आईच घर सांभाळते, बहिणी आणि मी शाळेत जाते. मला इकडे कुठे आणलं, घरी सोडा, म्हणायला लागल्या.

आता ट्रॅम्स नाहीत, उद्या सकाळी सोडू, सांगितलं तर चिडल्या. आरडाओरडा करायला लागल्या. मग नर्सने कसंबसं त्यांना उद्या डिस्चार्ज मिळणार आहार, सांगून खोलीत परत नेलं आणि झोपवलं. मग दुसऱ्या दिवशी मात्र त्या गप्प गप्पच झाल्या. त्यांची मूळ स्मृती परत आली असावी. नंतर मग मी कधीही त्यांच्यासमोर आणि एकूणच व्हिडीओ कॉल करणेच बंद करून टाकले.

मग गच्चीत बसलो असतांना आज्जी आजोबांना कोणती जर्मन गाणी आवडतात, ते विचारून फोनवर युट्युब वर लावणे सुरू केले. अधूनमधून भारतीय संगीत ऐकवणे, छान व्हिडीओज दाखवणे, हे ही करायला लागले.

गच्चीत बसलेलो असतांना एक चर्च दिसते. त्याच्याकडे बोट दाखवून एक ९३ वर्षांचे आजोबा ते चर्च म्हणजे जिथे माझा बाप्तिस्मा झाला, ती जागा, असे म्हणाले. हॅनोवर शहरातच जन्म आणि अख्खं आयुष्य घालवलेले ते आजोबा एकेकाळी ऑलिम्पियार्ड होते. वॉटर पोलो हया खेळाच्या मॅचेससाठी ते १९५६ साली ऑस्ट्रेलियाला गेलेले होते. त्यांनी सांगितले, त्या काळी फ्लाईट्स आत्तासारख्या फास्ट आणि मोठ्या नसत. इंधनाचा टॅन्कही लहान असल्याने ते भरण्यासाठी जागोजागी थांबत ९६ तासांनी ते ऑस्ट्रेलियाला पोहोचले होते. ह्या आजोबांची उंची सहा फुटाच्या वर असल्याने ते बेडवर मावत नव्हते. त्यांना पाय फोल्ड करून झोपावे लागे. हे तेच आजोबा, पूर्वी जे खालच्या फ्लोअरवर आयसोलेटेड फ्लोअरवर होते आणि त्यांनी मला मास्क बाजूला करून चेहरा दाखवायला लावलेला होता आणि चेहरा दाखवल्यावर मी घाबरून गेले होते, मला काही होईल का आता, म्हणून.. आजोबांना मी त्या प्रसंगाची आठवण करून दिली आणि मग आम्ही दोघंही खूप हसलो.

तशाच त्या रुममध्ये बाहुल्या असणाऱ्या आज्जी हॉस्पिटल वारी नंतर ह्या फ्लोअरवर आल्या. त्यांना क्वारंटाईन केले जाणार, हे त्यांच्यासाठी अनपेक्षित होतं. त्या एकदम रडायलाच लागल्या. आज्जींना भेटून त्यांना मी सांगितलं, नका त्रास करून घेऊ. चौदा दिवसांचा तर प्रश्न आहे. तुम्हाला तुमच्या काही वस्तू, बाहुल्या हव्या असल्यास त्या वरच्या फ्लोअरवर आणण्याची व्यवस्था करता येईल. त्या नको म्हणाल्या. मग त्यांना हव्या असलेल्या बाकी काही वस्तू आणून देऊन, त्यांना टीव्ही देऊन, फोन ऍक्टिवेट करून देऊन त्यांना फ्लोअरवर फिरू शकता, फक्त बाकी लोकांपासून सुरक्षित अंतरावर थांबा, हे सांगितलं. त्यांना टेरेसमध्ये नेल्यावर त्या खुश झाल्या. इकडे त्या पहिल्यांदाच आलेल्या होत्या. मग त्या रोजच टेरेसमध्ये बसू लागल्या.

गेम खेळण्याचे त्यांनी स्वतः च इनिशिएट केले आणि आधी माझ्या सोबत आणि मग बाकीच्या सर्वांसोबत स्वतःहून खेळू लागल्या आणि माझे काम त्यांनी एकदम सोपे करून टाकले. ह्या आज्जी फ्लोअरवर असतांना अतिशय जिवंतपणा होता इकडे. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपल्यावर त्या खूषच होत्या पण आम्हीच दुःखी झालेलो होतो.

दुसऱ्या एक आज्जी फ्लोअरवर दाखल झाल्यापासून अतिशय डिप्रेशनमध्ये होत्या. खालच्या मजल्यावर त्यांचे मिस्टर आणि ह्या वर, असे असल्याने दुःखी होत्या. कधी एकदाचा डिस्चार्ज मिळतो आणि आपल्या मूळ रूममध्ये परत जाते आणि मिस्टरांना भेटते, असे त्यांना झालेले होते. नुसत्याच झोपून रहात होत्या त्या.. रूमबाहेर जाण्याचा पर्याय उपलब्ध असूनही साध्या बेडवरूनही उठायला तयार नव्हत्या. रोज जाऊन मी त्यांना सांगायचे, चला आज्जी बाहेर जाऊया, तर त्या आपल्या नकोच म्हणत होत्या. मिस्टरांना कॉल केला होता, विचारले असता, त्या हो म्हणाल्या.

एक दिवस अशीच मी त्यांना भेटायला गेले, तेंव्हा त्यांनी सांगितले, काल रात्रीपासून माझे पोट फार बिघडलेले आहे. लुज मोशन्स होत आहेत. खाण्याची इच्छा मेलेली आहे, जगण्याचीच इच्छा उरली नाहीये. हे काही जीवन आहे का? त्यावर त्यांना मी म्हणाले, आज्जी, तुम्ही हालचाल करत नाही, नुसत्याच पडून असता, मग त्यामुळे तुम्हाला भूक लागत नाही, मग तुम्ही खात नाही, वरून रोज ह्या कसल्या कसल्या स्ट्रॉंग गोळ्या औषधं खाता, मग तुमचं पोट बिघडणार नाही, तर काय होईल? बाकी काही जात नसेल, तर केळं खा, इतर फळं खा, रिकाम्यापोटी सफरचंद खाऊ नका पण बिटविन मिल्स तेही खा, थोडे चाला, फिरा, मग तुम्हाला नक्की बरं वाटेल. तुम्हाला मिस्टरांना भेटायला लवकर परत जायचे आहे की आजारी पडून पुन्हा हॉस्पिटलमध्ये जाऊन पुन्हा क्वारंटाईन फ्लोअरवर यायचे आहे? असे विचारले असता हसायला लागल्या.

आज्जींसोबतचे बोलणे सुरू असतांनाच त्यांना आजोबांचा खालच्या मजल्यावरून फोन आला. त्यांना मोकळेपणाने बोलू द्यावं म्हणून ती तिकडून निघणार, तेवढ्यात त्यांनी फोन ठेवला पण. आजोबा म्हणे खाली क्रिएटिव्ह रूममध्ये बिंगो नावाचा खेळ खेळायला इतर रेसिडेंट्ससोबत निघालेले होते, आज्जींचा तेवढ्यात फोन आला आणि ते रूममध्ये सापडले नाहीत, तर त्यांना काळजी नको, म्हणून कळवायला त्यांनी कॉल केलेला होता.

मी आज्जींना म्हणाले, बघा आज्जी, आजोबा कसे सोशलाईझ करत आहेत, आनंदी आहेत, तसेच तुम्हीही करा ना. चला बरं माझ्यासोबत बाहेर. आज्जी कशाबशा उठल्या, पण त्यांच्यात काहीच शक्ती नव्हती. त्यांचा ब्रेकफास्ट तसाच बाजूला पडलेला होता. मग मी ब्रेडच्या एका पीसवर चीज, दुसऱ्यावर टोमॅटो, असे वेगवेगळे कॉम्बिनेशन्स तयार करून त्यांना खायला लावले. मग तिथले किवी,ग्रेप्स वगैरे फळंही त्यांना भरवली. आज्जी पटापट खात होत्या. त्यांनी बघता बघता सगळा ब्रेकफास्ट संपवला आणि त्या तरतरीत दिसायला लागल्या. त्यांना मग पाणी प्यायला देऊन मी म्हणाले, आता जाऊया का बाहेर? त्या हो म्हणाल्या.

त्यांच्या कॅथेटरची पिशवी बेडला लावलेली होती, ती तिकडून काढून मी वॉकरला जोडली आणि आज्जींना आधार देत सावकाश उठायला लावून मी त्यांना बाहेर घेऊन गेले. गच्चीत वातावरण माझ्या दृष्टीने गरमच होते, शिवाय अंगावर ते एप्रन वगैरे सर्व असल्याने वारा जाणवत नव्हता. पन आज्जींना थंडी वाजायला लागली. मग त्यांच्या रूममधून त्यांना एक शाल आणून दिली आणि मग त्या बराच वेळ गच्चीत बसल्या. दुसऱ्या दिवशी आज्जी एकदम फ्रेश दिसल्या. आज पोट कसं आहे, विचारलं असतं, एकदम बरं झालेलं आहे, असं त्या म्हणाल्या. मला थँक्यू म्हणत, चल, बाहेर जाऊया म्हणत बेडवरून उठल्या. त्यांचा क्वारंटाईन पिरियड संपून परत जाण्याचा दिवस आला, त्याच्या आदल्या दिवशी मला एका कलीगचा फोन आला आणि तिने सांगितलं की ह्या आज्जीच्या मिस्टरांनी आत्महत्येचा प्रयत्न केलेला आहे. ते बरे आहेत, पण तू त्यांना आत्ताच्या आत्ता भेटायला जा आणि आज्जींना मात्र यातले काही सांगू नकोस.

मी म्हणाले, ह्या आज्जी लवकर बऱ्या होऊन आजोबांकडे जाव्यात म्हणून मी जीवाचा आटापिटा करते आहे. त्यांना कशी बरं मी हे सांगेन? मग पटकन कपडे बदलून मी आजोबांना भेटायला गेले. आजोबा बेडवर पडलेले होते. दोन्ही मनगटांवर बँडेड्स लावलेले होते. आजोबांना भेटल्यावर मी विचारले, काय हे आजोबा, हे काय केलेत तुम्ही? तिकडे वर फ्लोअरवर मी तुमच्या आज्जींना बरं करून तुमच्याकडे पाठवायला जीव काढते आहे आणि तुम्ही इकडे हे उद्योग करत आहात? तुम्ही आत्महत्या करण्यात यशस्वी झाला असतात, तर आज्जींनी काय केलं असतं? त्यांचं काय झालं असतं असा थोडासुद्धा विचार तुमच्या मनात नाही आला का? तर ते हसायलाच लागले, पार ओशाळलेले होते. ते म्हणाले, मला फार कंटाळा आला होता एकटं राहण्याचा. म्हणून मी वैतागून जीव द्यायला निघालो होतो. आज्जींनी मला तुमच्या बद्दल सांगितलं आहे, रोज सांगत असतात, तुम्ही चांगले काम करताय, तुम्ही आज्जींना प्लिज मी जे केलं, त्याबद्दल सांगू नका.

मी म्हणाले, अर्थातच मी सांगणार नाहीये, पण असला वेडेपणा पुन्हा करू नका. आमचे बोलणे सुरू असतांनाच एक डॉक्टर आणि एक नर्स तिकडे आले. डॉक्टरनी येताच त्यांचे बँडेड्स उघडून जखम कितपत खोल आहे, ते चेक केले. आजोबांनी प्रत्येक मनगटावर किमान पाच सहा कट केलेले होते. नर्स त्यांच्या रूममध्ये काय काय शार्प गोष्टी आहेत, ते चेक करत होती. त्यांची फळं कापायची नाईफ, नेलकटर, अगदी पाकीट उघडण्यासाठी वापरतो, ती बोथट नाईफसुद्धा तिने ताब्यात घेतली. पुन्हा मी असं करणार नाहीये, तुम्हाला हे सगळं करण्याची गरज नाही, असे आजोबा सांगत होते, तरी तिने काही ऐकलं नाही. आज्जी परत येईपर्यंत आम्ही तुम्हाला हे सगळं हँडल करू देणार नाही. फळं कापून हवी असतील, तर आम्हाला कॉल करा, असे सांगून ती निघून गेली.

डॉक्टरही मग मी आजोबांना बोलले, तेच फक्त वेगळ्या शब्दात समजवायला लागली. चला, तुम्हाला मी ऍडमिट करायला आलेले आहे, म्हणाली. काय? ऍडमिट? म्हणजे मग नंतर मलाही क्वारंटाईन करावे लागेल ना? नको ना प्लिज. मी पुन्हा असे करणार नाही, असे आजोबा गयावया करायला लागले. मग त्यांना थोडे समजावून डॉक्टर गेली. मी ही परत गेले. दुसऱ्या दिवशी आज्जी आपल्या मूळ रुममध्ये परत गेल्या. मागच्या आठवड्यात आज्जी एक्सरसाईज च्या 'फिट इन एज' सेशनसाठी क्रिएटिव्ह रूममध्ये दिसल्या. आजोबा नाही आले का, विचारले असता, त्यांना नाही आवडत ह्या व्यायामाच्या ऍक्टिव्हिटीज. ते रूममध्ये टीव्ही बघत बसलेले आहेत, असे म्हणाल्या. छान फ्रेश आणि मजेत दिसत होत्या त्या आज्जी.

हा भागही खूप मोठा झाल्याने इथेच थांबते. सांगण्यासारखे बरेच काही आहे, पण ते पुढच्या भागात लिहिते.

~सकीना (कुमुद-प्रमोद) जयचंदर
०३.०७.२०२०

आत्तापर्यंतचे सर्व भाग एकत्रितपणे वाचण्यासाठी ब्लॉग लिंक:
https://sakhi-sajani.blogspot.com

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle