उंच माझा झोका! Breaking Through : Isher Judge Ahluwalia

इशर! भारतीय अर्थशास्त्राच्या क्षेत्रातली एक चमकती चांदणी! काहीजण बुद्धीमत्तेसोबत उत्तम नशिबाचंही वरदान घेऊन येतात खरे. त्याला मेहनतीची/ चिकाटीची जोड  दिली की  घडत जातो एक विस्मित करणारा प्रेरणादायी प्रवास!

अतिशय व्यस्त आणि क्रियाशील आयुष्य जगल्यावर कॅन्सर जेव्हा ते  कुरतडू लागला तेव्हा लिहिलेलं हे आत्मकथन!  कितीतरी दृष्टींनी ते भावतं..  एका बुद्धिमान जिद्दी प्रभावशाली अर्थशास्त्रज्ञाचा, तिच्या योगदानाचा प्रवास तर आहेच, पण त्यापलीकडे स्वातंत्र्यपूर्व काळात कनिष्ठ मध्यमवर्गीय घरात जन्मलेल्या  ११ पैकी एका मुलीची ही यशोगाथा आहे! त्याबरोबरच हुशार, संवेदनशील, भोवतालच्या परिस्थिती बद्दल उत्सुक पण बुजऱ्या अशा मुलीचं प्रखर आत्मभान आणि आत्मविश्वास मिळवलेल्या तरुणीत रूपांतर,  पुरुषी वर्चस्व असलेल्या क्षेत्रात उच्चविद्याविभूषित होऊन तडफेने स्वतःच्या बळावर परदेशी शिक्षण, तिथल्या सर्वोत्कृष्ट संस्थेत नोकरी, जोडीदारासोबत परत आपल्या देशाच्या सेवेलाच वाहून घेण्याचा निर्णय, स्वतःच्याच क्षेत्रात खूप पुढे चाललेल्या जोडीदारामुळे स्वतःचे अस्तित्व झाकोळू न देण्याची धडपड, तरी प्रसंगी त्याच्या प्रगतीसाठी तडजोड, माघार ही सगळीच कहाणी मनोरम आहे! आकाशाला गवसणी घालतांना स्वतःची मुळं स्वदेशी मातीतच घट्ट रुजवणं, गुरुग्रंथसाहेबाचा आधार आणि डोळस श्रद्धा, उत्तम सहचारिणी, सजग आई म्हणूनही भूमिका इशरनी तितक्याच आत्मीयतेने निभावलेल्या दिसतात.  

सुरवातीलाच खुशवंत सिंगसोबतचा लोणच्यासारखाच खमंग किस्सा त्यांच्या खुसखुशीत नर्मविनोदी शैलीची झलक देतो. आणि उत्सुकतेने आपण त्या गोष्टीत गुंगून जाऊ लागतो. लाहोरहून परंपरागत लोणच्याचा व्यवसाय सोडून इशरचे कुटुंब पहिले इंदोर आणि मग थेट कलकत्त्याला पोहोचले. शिक्षणाचा फारसा गंध नसतांना, मुलींनी निदान शाळा पूर्ण करावी ही त्यांच्या वडिलांची धडपड. कलकत्त्यातही आपला शीखसमूह धरून ठेवलेल्या कट्टर पारंपरिक वर्तुळात हिंदी माध्यमात शिकणारी ही बुजरी मुलगी. योग्य शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मेहनतीने 12वीला राज्यात आठवी येते! तिथून मग प्रतिष्ठित अशा प्रेसिडेन्सी कॉलेज, दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स ते थेट मॅसॅच्युसेट्सचं एमआयटी अशी उत्तुंग झेप! त्यात वेळोवेळी मिळालेलं पी.सी. महालनोबीस, सुखमय चक्रवर्ती, अमर्त्य सेन, बिमल जलान, जगदीश भगवती, पद्मा देसाई, सुरेश तेंडुलकर, के. सुंदरम अशा प्रख्यात अर्थशास्त्रज्ञांचं मार्गदर्शन.. 

हा सगळा काळ दिल्लीत राजकीय दृष्टीने पण उलथापालथीचा. नेहरूंचे निधन, भारत-पाक युद्ध, शस्त्रीजींचा अचानक गूढ मृत्यू, इंदिरा पर्वाचा प्रारंभ, सुरवातीलाच रुपयाचं अवमूल्यन.. त्याचा थोडक्यात परामर्श इशर घेतातच पण विद्यार्थी म्हणून त्यावेळी असलेली त्यांची अलिप्तता प्रांजळपणे मान्यही करतात. 'विद्यार्थ्यांचे मुख्य कर्तव्य विद्यार्जन' हे मानणारी 'Nehruvian consensus' असलेली त्यांची शेवटचीच पिढी असावी असं नमूद करतात. 70च्या दशकातल्या आणीबाणीपासून विद्यार्थ्यांचे राजकीय-सामाजिक भान आणि त्यातला सहभाग वाढत गेलेला दिसतो हे त्यांचे निरीक्षण.. अगदी त्यांचे भगवती, चक्रवर्ती, अमर्त्य सेन आदि जानेमाने प्रोफेसर्स जागतिक चर्चासत्रांमध्ये आणि भारताच्या आर्थिक धोरणात सक्रिय असले तरी त्यांचे विद्यार्थी ह्या सगळ्यांपासून दूरच होते.  ना शिकलेली theory policy issues साठी apply करण्याचं, policy implications चं शिक्षण, ना आर्थिक योजना/ अंमलबजावणी संदर्भात चाललेल्या academic debates/ criticisms मध्ये सहभागी होण्यासाठी प्रोत्साहन.. या त्यांच्या परंपरागत भारतीय विद्यापीठे आणि शिक्षण पद्धतीबद्दलच्या टिप्पण्या महत्वाच्या आहेत. 

या पार्श्वभूमीवर 1968 पासून पुढे एमआयटी मध्ये विद्यार्थ्यांना वेगळा विचार करण्यासाठी मिळणारे स्वातंत्र्य, वादविवादांसाठी प्रोत्साहन, International Monetary Fund मध्ये केलेल्या Summer internships, आव्हानात्मक Projects, Paper Presentations यासगळ्यात त्यांचा शैक्षणिक आलेख झळाळून उठलेला दिसतो! प्रेसिडेन्सीतला पक्का गणिताचा पाया, दिल्ली स्कूलमध्ये सामाजिक शास्त्रांच्या अंगाने अभ्यास आणि पुढे अमेरिकेत एमआयटीमध्ये स्वतंत्र विचारास मिळालेले प्रोत्साहन या त्रिसूत्रीचा त्यांनी पुरेपूर वापर करून घेतला.  इंटर्नशीप चालू असताना मॉन्टेकसिंग अहलुवालिया यांच्याशी भेट, पुढे IMF मधेच जॉब, लग्न, त्या दरम्यान भारतभेटी, भारतीय अर्थव्यवस्था आणि चलन फुगवट्या संदर्भात पूर्ण केलेली PhD, IMF मधले आव्हानात्मक आणि जबाबदारीचे काम यासगळ्यात अतिशय व्यग्र तरी उत्कंठापूर्ण आणि बौद्धिक दृष्टीने समाधानाचे आयुष्य सुरू असतांनाही लागलेली भारताची ओढ त्यांना मधूनच जाणवत होती. मुलांना आपल्या मातीतच वाढवण्याची इच्छा जोर धरत होती. कसलाही बडेजाव न दाखवता त्यांनी त्यांच्या परतण्याच्या निर्णयाचे विश्लेषण केलेले दिसते. 

भारतातल्या त्यांच्या कारकिर्दीतले टप्पे, चढ-उतार, मिळालेले मानसन्मान, भारताची आर्थिक बाजू  सक्रियपणे हाताळत असलेला पती, त्यांच्यामुळे राजकीय/ प्रशासकीय जगाचे जवळून दर्शन, पुढे 'स्टिअरिंग कमिटी फॉर रिसर्च ऑन इंटरनॅशनल इकॉनॉमिक्स रिलेशन'कडून मिळालेला संशोधन निधी, Centre for Policy Research मधली प्राध्यापकी, Indian  Council for Research on International Economic Relations (ICRIER) चे संचालकपद, वेगळ्या प्रकारे प्रयत्न करून संस्थेला देशातली 'top Economic think tank' करणं, त्यासाठी creamy layer मधली अनेक माणसं जोडणं, वेळोवेळी लिहिलेली पुस्तके, अनेक मानाच्या राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सहभाग, नकार/ पायखेचीचे राजकारण पचवून, प्रसंगी टीकाही झेलून केलेली भाषणे, संशोधन..  २००९ मधे मिळालेले पद्मभूषण!  याचबरोबरीने उत्तम शिक्षण आणि संस्कारांवर भर देऊन सजगपणे मुलांना वाढवणे, सून म्हणून कौटुंबिक जबाबदाऱ्या पार पाडणे.. हा सगळा प्रवास केवढा प्रेरणादायी आहे! 

अभ्यासू डोळसपणे जगतांना इशर भारतातल्या एका मोठ्या महत्वाच्या कालखंडाचे चित्र रेखाटतात.. आर्थिक धोरणांवर सुरवातीला असलेला डाव्या विचारसरणीचा पगडा, त्याला हळूहळू होऊ लागलेला विरोध, 1991 मधले अर्थमंत्री मनमोहन सिंगांचे ऐतिहासिक budget speech, आर्थिक सुधारणांची सुरवात, लायसन्स राजचा शेवट, मुक्त अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करीत असताना संशोधन धोरणांमध्ये केलेले कालानुरूप बदल, व्यापार धोरणांमधले बदल, व्यापार संघटनेशी केलेल्या वाटाघाटी.. 1992 मध्ये बाबरी मशीद घटनेचे पडसाद, त्यामुळे नकळतपणे दुसऱ्या टप्प्यातल्या सुधारणांना बसलेला set back, यात मध्ये पंतप्रधान म्हणून इंद्रकुमार गुजराल इत्यादींची टर्म, यात अगदी 1998-2000 पर्यंत मनमोहन सिंगच्या कामावर विश्वास ठेवून आर्थिक सुधारणा आणि आर्थिक धोरण यांत सातत्य राखण्याची दाखवली गेलेली राजकीय परिपक्वता विशेष उल्लेखनीय ठरते! विशेषतः सध्या रंगलेली विविध राजकीय नाट्ये पाहतांना अगदी हळहळ वाटते.. तो एक  'matured political mindset' आपण नक्की कधी आणि कसा गमावला???  

2001 मध्ये परत देशाबाहेर IMF मध्ये मानाची उत्तम संधी मिळून आवडतं काम करत असतांनाही 2004 मध्ये पंतप्रधान झालेल्या मनमोहन सिंगांच्या हाकेसरशी परतलेल्या या जोडप्याने देशाच्या आर्थिक बाबींमध्ये आपापल्या परीने भरीव योगदान दिलेच आहे! विशेषतः संशोधन संस्था ह्या स्वायत्त आणि स्वतंत्रच असायला हव्यात. त्यांचे funding सरकारकडून नको. तरच स्वतंत्र आणि जमिनीशी नाते सांगणारे खरेखुरे, निष्पक्ष संशोधन होईल याची इशरना असलेली तळमळ, त्यासाठीची त्यांची धडपड किती महत्वाची होती! शेतीसंदर्भात हरितक्रान्तीची फळे दिसत असतांना त्यांनी भारतातले उद्योगधंदे, उत्पादकता, आयात-निर्यात या संदर्भातल्या संशोधन, योजना/ सुधारणा यावर लक्ष केंद्रित केलं. काळाची पावले ओळखून वाढते शहरीकरण, त्यातल्या संधी / आव्हाने, समस्या, शहरांवर पडणारा लोकसंख्येचा ताण हे सगळे मुद्दे सतत अभ्यासत राहिल्या.  शहरांचे प्रश्न घेऊन स्थानिक संस्था, राज्य सरकारे, केंद्र सरकार यातील समन्वयासाठी झटत राहिल्या.  शाश्वत विकास आणि शहरीकरण, स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा व्यवस्थापन अशा अनेक पैलूंना त्या भिडल्या. सातत्याने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर संशोधन / अभ्यासातून घेतलेली भूमिका / विचार मांडत होत्या. 

अर्थशास्त्राची अभ्यासक म्हणून पुस्तकाचा हा पैलू मला जास्ती भिडला असला तरी एक व्यक्ती म्हणूनही इशरचे अनेक गुण लोभावतात! झोका उंच उंच जातांना वाढत्या वयातले प्रसंग, आर्थिक चटके, कधी 'स्त्री' म्हणून त्यांना मिळालेली दुय्यम वागणूक, नाकारलेल्या संधी, परदेशातील एकटेपणा, स्पर्धेचा ताण, कौटुंबिक धक्के वगैरे काटेही बाऊ न करता त्यांनी सोसलेच आहेत. मिळालेल्या जीवनाप्रती कृतज्ञता, कुटुंबवत्सलता, राजकीय व्यक्तींशी असलेल्या ओळखीव्यतिरिक्त नारायण मूर्ती, किरण शॉ मुजुमदार, खुशवंतसिंग वगैरे विविध क्षेत्रातल्या लोकांशी असणारा स्नेह, त्यांच्या खास वैयक्तिक आठवणी, किस्से, कामानिमित्त भटकंतीतही रसिकपणे घेतलेले  विविध अनुभव, देश-विदेशात केलेल्या सहली, भरभरून कृतिशील  आयुष्य जगल्यावर मुलां-सुनांच्या  यश-कर्तृत्वामुळे सुखावलेला कृतार्थ टप्पा, नातवंडांमध्ये रमलेलं त्यांचं घरगुती रूप, पुढे धीरोदात्तपणे  स्वीकारलेले  मोठे आजारपण आणि कोविड लॉकडाऊन मधेच दिसू लागलेले पैलतीर.. यासगळ्यामुळेही हे पुस्तक अतिशय समृद्ध करणारा अनुभव देते.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle