फूड स्टायलिंग - कोथिंबीर

कोथिंबीर - शिर्षक वाचून जरा विनोदी वाटत असेल पण कोथिंबीरीत इतकं पोटेन्शियल आहे की त्यावर एक अख्खा लेख लिहिता येईल. आम्हाला कुकिंग सकट एक डिश करायला कमीत कमी १ तास लागतो. कुकिंग, डिश क्लिन करून त्यात खाली कणिक भरून, ग्रेव्ही, पिसेस सेट करून प्लेसमेंट ठरवायची, पदार्थाचं फिनिशिंग करायचं, आजूबाजूचे प्रॉप्स ठेवायचे आणि फायनल क्लिक घेण्याच्या आधी कोथिंबीर किंवा पुदिना किंवा अजुन काही, जे गार्निश शोभतय ते ठेवायचं, टेकच्या लास्ट मिनिट ला हीरोइन एकदा आरशात बघून तीट पावडर ठीक करते तसंच! शूट सुरू होण्याच्या आधीच्या तयारीतच गार्निशिंग साठी लागणारी चांगली, नाजुक, सुबक आणि हिरवीगार पानं थंड पाण्यात ठेवली जातात.
पहिला लॉकडाऊन जस्ट संपत आला तेव्हा मोठ्या नावाजलेल्या ब्रँडचा शुट होता लॉकडाऊन पूर्ण उठला नव्हता त्यामुळे सेटवर आम्ही दोन स्टायलिस्ट, फोटोग्राफर आणि त्याचा असिस्टंट असे चारच लोक होतो पण पडद्यामागे बरेच कलाकार होते. एजन्सीची तीन जण, क्लाएंट कडून एक शेफ आणि अप्रूवल ला अजुन दोन जण अशी सगळी जनता होती आणि हा प्रत्येक जण आपापल्या घरी वर्क फ्रॉम होम मोडमध्ये!
तर सकाळच्या वेळात दोन प्रॉडक्ट्स पूर्ण करून तिसरा ग्रेव्ही चा पदार्थ घेतला डार्क ग्रेव्ही होती. बॉल मध्ये कणिक भरून पदार्थ भरला, पिसेस लावले, प्रॉप्स लावले, प्लेसमेंट ठरली. गार्निशिंगसाठी चार-पाच कोथिंबीरीची पाने रँडम वरून ठेवायची होती आणि इथे कोथिंबीरीचा खेळ सुरू झाला. पहिला फोटो व्हॉट्सअप ग्रुप वर टाकला आणि इतकी नाजूक पानं दिसतच नाहीयेत अशी कमेंट आली. थोडी मोठी पानं खोचली दहा मिनिटांनी मेसेज आला अशी उभी खोचलेली पान शेती केल्यासारखी दिसतायत. आडवी ठेवल्यावर एक जण म्हणाला झोपल्या सारखी दिसतायत आणि थोडी खोचून बाहेर थोडी आडवी ठेवल्यावर फीडबॅक मिळाला त्यांचा रंग डल आहे. फ्रेश कोथिंबीर लावा. ३ तास होऊन गेले होते. एव्हाना आम्ही सावध झालो होतो. उरलेल्या जुडीतून अजुन चांगली पान काढून थंड पाण्यात घातली. फोटोग्राफरच्या स्टुडिओला फ्रिज नाही आणि उन्हाळा यामुळे कापडात गुंडाळलेली कोथिंबीर सुकायला लागली होती. दुकाने बंद होण्याच्या आधी अजून कोथिंबीर आणि थंड पाणी आणलं आपली हिरोईन म्हणजे प्रॉडक्टच्या मेकअप ची नव्याने तयारी केली. एकीकडे होत्या त्या पानांचा खेळ चालुच होता. अप्रूवल साठी काम करत असलेला प्रत्येक जण व्हाट्सअप सतत उघडून बसलेला नसल्याने प्रत्येक शॉट पाठवला की नंतरची दहा पंधरा मिनिटे फीडबॅकची वाट बघण्यात जायची आणि एका कमेंट वर काम करून शॉट पाठवेपर्यंत कुणीतरी दुसरेच चेंजेस सांगे. असे करत सगळ्यांना खुश करत रात्री नऊ वाजता हा शॉट ओके करून घरी गेलो. पण थांबा, हा खेळ अजुन संपला नव्हता. खरंतर एक अप्रूवल बाकी होते पण लॉकडाउन मुळे अजुन थांबता येत नव्हते.
घरी येऊन जरा बुड टेकेपर्यंत फोटोग्राफरचा फोन आला, शूट परत करायला लागेल. कारण काय तर क्लायंटला कोथिंबीर आवडलेली नाही आणि ती पोस्ट एडिट मध्ये करता येत नाही.
दुसऱ्या दिवशी सकाळी जाताना दोन वेगवेगळ्या रंगाच्या (पोपटी आणि जरा डार्क हिरवी) फ्रेश कोथिंबीर जुड्या घेऊन गेलो. कुकिंग बोल भरणे, प्लेसमेंट सगळा तामझाम झाला. आता कोथिंबीर प्रकरण उरकुन दुपारी घरी जेवून पडी टाकायची असं स्वप्न मी बघत होते पण man proposes God म्हणजे अर्थात client disposes या म्हणीप्रमाणे साडेतीन चार ला नाईलाजाने जेवायला बसलो तरी क्लायंट ला मुलगी म्हणजे आपली कोथिंबीर हो.. पसंतच पडेना. बोल मधे खाली भरलेल्या कणकेचं पण अंग दिवसभर एका जागी बसून एव्हाना आंबलं होतं, इतकं की चिडून ती फुगली पण होती, पण तिचे रुसवे-फुगवे कोण काढणार!
क्लायंट पैकी एकाने अजून फिकट रंगाची कोथिंबीर आणायला सांगितली. खरं तर पोपटी कोथिंबीर म्हणजे जून होत आलेली पण क्लायंटला सांगणार कोण? इतर वेळेस फोटोग्राफर, आम्ही स्टायलिस्ट यांना थोडा से असतो पण अशा क्लिष्ट क्लायंट समोर बोलायला कोणी धजेना. एकदा तर फोटोग्राफर मला म्हणाला, साक्षी, सगळ्यात वाईट कोथिंबीर तुला कोणती वाटतेय, तीच लाव, कदचित क्लायंट ला तीच आवडेल. कशीबशी पोपटी कोथिंबीर उपलब्ध केली. त्यातली हव्या त्या साइज ची, आकाराची हवी ती कोथिंबीर हव्या त्या पोझिशनला लावली आणि शेवटी शॉट फायनल झाला. अशाप्रकारे पूर्ण दिवसात एकच शॉट ओके करून चार-पाच जोड्यांचा बलिदान देऊन आम्ही रात्री घरी गेलो.
आता दुसरा लॉक डाउन संपतानाही एकदा कोथिंबिरीने असाच इंगा दाखवला. सुक्या भेळेचा शूट होतं. यावेळेस आमच्या स्टुडिओला होते. फ्रीज आहे. चेक. कोथिंबीर थंड पाण्यात ठेवली आहे. चेक. वेगवेगळ्या रंगाची कोथिंबीर आहे. चेक. Ready to go.. सोप्पं तर आहे आज सगळं असं म्हणत बोलमधे भेळ भरली. त्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची ठेवली. जागा ठरली. इथे नाजुक कोथिंबिरीची पानं हवी होती. पान लावून बोल सेट वर ठेवला तोपर्यंत एजन्सीच्या मुलीने शेव हलवायला सांगितली . शेव हलवल्यावर एक शेंगदाणा ऍड करायला सांगितला. असं करत करत कोथिंबीर सुकली फोटोग्राफरचे भगभगीत लाईट आणि प्रचंड उन्हाळा यामुळे चेंजेस करता करता दोन मिनिटात कोथिंबीर सुकत होती. शेवटी एकदा त्या आधीच्याच शूटची आठवण झाली आणि मी थंड पाण्यातल्या कोथिंबीरकडे बघितले. ती माझ्याकडे पाहून खदाखदा हसते असा भास मला झाला. एक मिनिटात भानावर येऊन मी परत कोथिंबीर लावण्याच्या कामाला जुंपले. तिला आमची कधीतरी दया आली असावी आमचा शॉट एकदाचा ओके झाला. दोन ऐवजी सहा तास काम झालं पण पूर्ण झालं आणि क्लायंट खूष होता. आम्हाला अजून काय हवे होते?
कोण किती नौटंकी करू शकतो ते अशावेळेस कळते. सेटवर मीच एक असते जी अजिबात नाटकं न करता माझं काम निमूट करते.
kothimbeer.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle