जर्मनीतलं वास्तव्य - भाग २ - पहिली ओळख

"आजवर कितीतरी वेळा विमानाचा प्रवास झाला, अनेक देशातली विमानतळं पाहिली, पण फ्रँकफर्ट एअरपोर्ट म्हणजे नुसता सावळा गोंधळ, इतका बिझी एयरपोर्ट म्हणवला जातो पण बाकी अजिबात काही धड व्यवस्था नाही" अशा अर्थाचं काहीतरी माझा एक जुना सहकर्मचारी एकदा बोलला होता. तेव्हा माझ्यासाठी फ्रँकफर्ट (आता मी फ्रांकफुर्ट म्हणते, या सहज घडणार्‍या बदलांबाबत लिहीन एखाद्या भागात नंतर) म्हणजे माझ्या मनातल्या जर्मनीच्या इमेजला तेव्हा धक्का होता. होणारा नवरा जर्मनीत या एकाच गोष्टीमुळे मला फ्रँकफर्ट बद्दल सॉफ्ट कॉर्नर होता. अर्थातच तेव्हा मला हे फ्रँकफर्ट बद्द्लचं मत तेवढं पटलं नव्हतं. शिवाय अमेरिकेला जाणारे ओळखीचे अनेक जण फ्रँकफर्टहून जायचे, ते काही बोलले नव्हते. पण नियतीने तेव्हाच "हिला धडा शिकवला जाईल" असं ठरवलं असणार. फ्रँकफर्टला मी पोचले तेच जरा उशीरा, मग त्या विमानाला गेट मिळेना, मग त्यात पाऊण तास गेल्यावर आम्ही बसने निघालो तिथून आणि बरंच फिरून शेवटी आलो एकदाचे टर्मिनलवर, तिथेही गर्दी आणि नेमका माझा नंबर शेवटचा. मग इमिग्रेशनला तो माणूस म्हणे "इन्व्हिटेशन लेटर" दाखवा. व्हिजा मिळालाच होता मुळात अडीच महिन्यांनी...(त्याबद्दल इथे लिहीलं आहे पूर्वी) तेव्हाच पेशन्सचा अंत पाहिला होता. आता इथे मुळात इन्व्हिटेशन लेटर नसतं तर व्हिजा मिळेल का? तुम्हीच एवढी सखोल शहानिषा केली, स्टँप दिला आणि आता पुन्हा पहिल्या पानावर जायचं म्हणताय? इतर सगळी कागदपत्र होती, हे एक सोडून, मग हेच कशाला पाहिजे? असे प्रश्न डोक्यात आले तरी त्याचा राग चेहर्‍यावर दिसू न देता पुन्हा शोधलं, पण तोवर इतर काही जुजबी प्रश्नोत्तरं चालू होती तर ते ऐकून म्हणे, "जा. झालं." शेवटी बॅग घ्यायला आले तर तिथे २ च बॅग होत्या शेवटच्या, माझ्याच. एक भारतीय, मराठी मुलगी जी पहिल्यांदाच ऑनसाइट आली होती, तिच्या बॅग घेऊन तिथली ट्रॉली काढायला ती थांबली होती आणि ते तिला जमत नव्हतं. मी पण ट्रॉली काढण्याचा प्रयत्न केला. सगळीकडे आजवर ट्रॉली फुकटात मिळते हेच पाहिलं होतं. इथे त्यासाठी पैसे लागतात हेच नवीन होतं. त्यात ते पैसे गेले, पण ट्रॉली काही मिळाली नाही. तिथेच एक माणूस बसला होता, त्याला मी मदत मागितली. तर तुसड्यासारखं उत्तर मिळालं की "हे माझं काम नाही. तुमचं तुम्ही बघा" उपकार केल्यासारखं त्याने थिअरी सांगितली, आम्ही दोघींनी मिळून एक ट्रॉली काढण्यात यशस्वी झालो, दुसरी नाहीच निघाली. शेवटी ती मुलगी मला म्हणाली की तुझ्याही बॅग माझ्याच ट्रॉली वर ठेव. तशा आम्ही निघालो. या विमानतळाची, गावाची, देशाची पहिली भेट काही फार बरी झाली नव्हती. बाहेर नवरा भेटला तो वाट बघून काळजीत, म्हणे मला वाटलं की तुला झोप लागली दुबईला, आणि विमान मिस झालं की काय वगैरे शंका.

मग त्याला थोडक्यात ट्रॉली आणि इतरही प्रॉब्लेम्स सांगितले, मी सुखरूप पोचले हा फोन केला. त्या मुलीलाही फोन देऊन तुझ्या घरी कळव असं सांगितलं. मग तिच्यासोबत जाऊन ट्रेनचं तिकीट काढलं आणि आम्ही निघालो ट्रेन स्टेशनकडे. अगदी विमानतळाच्याच परिसरात ट्रेन स्टेशन ही गोष्ट अजूनही खूप भारी वाटते. हे जर्मनीत इतरही आहे, पण इथे अगदी हाय स्पीड, लांब पल्ल्याच्या ट्रेन्स सुद्धा विमानतळावरच. पण या ट्रेन स्टेशन कडे जाताना आम्हाला एवढ्या अडचणी आल्या की बास. आपण अशिक्षित आहोत असा काहीसं वाटायला लागलं, कारण पाट्या नीट वाचून फॉलो केल्या तरी काहीतरी गडबड होतच होती. मग कुठे एखादा जिना बंद, कुठे लिफ्ट बंद, तर कुठे लिफ्ट मधून ट्रॉली चालत नाही, कुठे अजून काही. शेवटी पोचलो.

त्यानंतर प्रत्येक फ्रांकफुर्ट विमानतळ भेटीत हे सगळं आणि तो कलीग काय बोलला होता हे नेहमीच आठवतं आणि हसू येतं. आता भाषा येते, अनेक वेळा जाऊन-येऊन तो परिसर ओळखीचा आहे, पण तरी हे विमानतळ म्हणजे अजूनही मला जंतरमंतरच वाटतं. अगदी मागच्याच वेळी पुन्हा ट्रॉलीसाठी प्रचंड खटपट करावी लागली, तेव्हा अशीच अजून एक बाई आणि मी, दोघींनी समान वैताग व्यक्त केला ट्रॉली सिस्टीम बाबत. Its been years that I am coming here, and every time there are problems...Horrible..असं म्हणताना तिचा त्रागा दिसत होता अगदी.

तर ट्रेनने आम्ही निघालो मानहाईमला (Mannheim), अगदी अर्ध्या तासात, ICE म्हणजेच इथल्या हाय स्पीड ट्रेनचा पहिला अनुभव. मानहाईमला पोचून मग ट्रामने दहा मिनीटात घरी. ट्राम स्टॉपपासून दोनच मिनीटांवर घर. हे अगदी टिपीकल युरोपियन चित्र होतं ट्राम वगैरे असल्यामुळे. सगळीकडे हिरवळ होती. मला गारवा वाटत होता थोडा, पण इथला उन्हाळा तसा. पण पुढच्या पंधराच दिवसात उन्हाळा जाणवला आणि आता इतक्या वर्षांनी काहीही झालं तरी मी जुलैत थंडी आहे असं म्हणू शकत नाही. उलट किती उकडतंय असेच उद्गार असतात.

आता हे जे घर होतं, ते शोधणं ही पण एक मोठी गोष्ट होती. मी व्हिजा अप्लाय करतानाच सुमेधने त्याच्याकडे राहण्यासाठी किमान जागा आहे हे दाखवणं आवश्यक होतं. त्यामुळे त्यासाठी घर लवकर शोधणं आवश्यक होतं. भारतात घर शोधताना त्यात लाइट्स, ओटा, पंखे अशा काही बेसिक गोष्टी असतातच. आता इथे पंख्याचा प्रश्नच नाही, सिलींग फॅन फार क्वचित, तशी गरजही नसते. हीटर आवश्यक असतात ते सगळीकडे असतात. पण अनेक ठिकाणी स्वयंपाकघरात काही म्हणजे काहीही नसतं, इतर खोल्यांमधल्या फर्निचरचा प्रश्नच नाही. म्हणजे तिथे फ्रीज, सिंक, ओटा, हॉट प्लेट्स यातलं काहीही नाही. हे सगळं तुम्ही विकत घेऊन लावा, त्यात नुसती खरेदी नाही, त्याचं माउंटिंग पण करायचं हेही एक अवघड काम. त्यासाठी इतर बरीच उपकरणं लागतात, म्हणजे त्यापासून सुरूवात. शिवाय सगळ्यासाठी कामगार हवे असतील तर त्याची किंंमत भरपूर. मग ज्या घरांमध्ये हे बेसिक स्वयंपाकघर असतं अशी घरं कमी, अगदी फुल फर्निश्ड घरं तर अजूनच कमी. (मोठ्या शहरांत थोडा फरक पडू शकतो या सगळ्यात) म्हणजे आम्हाला पर्याय आधीच कमी होते. त्यात इतर फर्निचर घ्यायचं म्हटलं तरी फर्निचर पेक्षा ते घरी पोचण्याची किंमत जास्त आणि ते लावायचंही आपणच. (पुण्यातल्या घरात जे काही नव्हतं, ते मी एकटीच घराशेजारच्या दुकानात गेले आणि चार तासात सगळं घरी आलं इतक्या सहज झाल्या होत्या गोष्टी) अशा सगळ्या परिस्थितीत अगदी सुदैवाने आम्हाला पूर्ण फर्निचर असलेलं एक घर मिळालं, त्यावरही दहा लोकांचा डोळा होता पण आमचा नंबर लागला तिथे. त्यामुळे वॉशिंग मशीन, पूर्ण स्वयंपाकघर आणि सोफा वगैरे सगळं होतं. शिवाय काही भांडी पण होती, म्हणजे सोन्याहून पिवळं. मग ऐकलं की कित्येक ठिकाणी लाइट्स सुद्धा नसतात. त्यामानाने आमचा सुरूवातीचा प्रश्न अगदी सहज सुटला होता. नंतर वर्षभराने दुसरं घर शोधताना अजून बरेच नवीन अनुभव आले, त्याबद्दल नंतर.

ही सगळ्याची अगदी नावापुरती ओळख, ज्यात विमानतळावरची न आवडलेली व्यवस्था, लोकांकडून मिळालेली उर्मट उत्तरं यामुळे काही बरी नव्हती, तरी ट्रेन, ट्राम अशा आता सवयीच्या पण तेव्हा अप्रुपाच्या गोष्टी पण तराजूचं दुसरं पारडं जड करणाऱ्या होत्या. आता या घराशी आणि गावाशी, इथल्या लोकांशी ओळख होण्याची खरी सुरूवात होणार होती...या रुटीनला सरावण्याबद्दल पुढच्या भागात...

क्रमशः

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle