चिऊ-काऊ ते डायनासोर

आमच्या लहानपणी बाळाच्या प्राणी जगताची सफर ही चिऊ काऊच्या गोष्टीने सुरू व्हायची. घरात किंवा आजूबाजूला मोती कुत्रा, मांजर, हम्मा गाय हे सगळे प्रत्यक्षात दिसायचे म्हणून किंवा मग पुस्तकं, टीव्ही या माध्यमातून आमच्या आयुष्यात शिरायचे. पुढे वाघोबा, सिंह, मगर, लांडगे अशांचीही एन्ट्री व्हायची. याशिवाय पाली, झुरळं असे नावडते प्राणी पण कितीही नकोसे असले तरी घरात असायचेच. गाढव पण असायचे, प्रत्येकाचा स्वभाव आणि त्यांच्या गोष्टी या बरोबर डोक्यात असायच्या. लबाड कोल्हा, करकोचा, ससुला, कासव, मासोळ्या या सगळ्यांच्या आपापल्या कहाण्या हा आमच्या लहानपणाचा अविभाज्य भाग होता.
म्हणींमध्ये पण प्राणी-पक्षी होतेच, गाढवासारखा लोळू नको वगैरे शाब्दिक प्रयोग पण त्या त्या प्राण्यांच्या वैशिष्ट्यांनुसार असायचे.
मी आणि माझा प्राणीजीवन या निबंधात गाय, मोती कुत्रा ((ज्याची जागा हम आपके है कौन नंतर टफीने घेतली) हे जास्त आवडीचे होते . घरात पाळीव प्राणी असो-नसो, हा निबंध मात्र सगळेच जण ठरलेली वाक्य घालून लिहू शकायचे. यातल्या कित्येक गोष्टी आता काहीच्या काही वाटतात, असं कसं शक्य आहे असे अनेक प्रश्न आता पडतात, पण तेव्हा हे प्रश्न सुचले नाहीत, विचारले जाऊन उत्तरं मिळाली असतीच असंही नाही.

मग मोगलीच्या साथीने जंगल बुक मधले शेरखान, बगीरा असे सगळे प्राणी कार्टून स्वरूपात आणि प्रत्येकाच्या नावासकट आपलेसे झाले. मग टॉम अ‍ॅन्ड जेरी च्या निमित्ताने उंदीर मांजराची जोडगोळी भेटली. मिकी माऊस ने उंदीर मामा ला फारच क्यूट बनवून समोर आणलं. खर्‍या आवडी-निवडी, प्राण्यांची भीती, या सगळ्या गोष्टी होत होत आम्ही या सगळ्यांसोबत मोठे झालो. पण हे सगळं गोष्टीरुपात, कार्टुन रुपात होतं. आमचे कपडे, म्हणजे मुलींचे फक्त नाही, मुलांचेही कपडे नॉर्मल असायचे. भरतकाम-विणकाम यात बदकं, चिऊताई, हत्ती, बगळे हे लाडके होते, किंबहुना अजूनही आहेत.

पण या असंख्य प्राण्यांच्या यादीत कुठेही डायनासोर नव्हते. मी पाचवीत होते बहुतेक, टॉकीज मध्ये 'जुरासिक पार्क' चां पाहिला भाग आला होता. आम्ही थिएटर नाही, टॉकीजच म्हणायचो. तेव्हा पहिल्यांदाच डायनासोर या प्राण्याशी ओळख झाली. ती तेवढीच राहिली. पण आता मात्र यांनी सगळीकडे आक्रमण केलं आहे. बुलढाण्यात सगळे सिनेमे उशीरा यायचे. तसाच हा ही असेल. पण मला सिनेमा बघायला पाठवताना, या टॉकीज मधली ढेकणं हा आई च्या काळजीचा विषय होता. मी ते अफाट डायनासोर्स बघायला गेले होते आणि घरी आल्या आल्या आधी कपडे बदलणे, आंघोळ, कपडे धुणे या सगळ्या पायर्‍या पार पाडून मग सिनेमा कसा वगैरे प्रश्न आले. त्या डायनासोरच्या भीती पेक्षा मलाही ढेकणांची भीती जास्त होती. ढेकूण ते डायनासोर ही त्या दिवशीच्या प्राणी जगताची दोन टोकं होती. हे डायनासोर म्हणे पूर्वी इतके बलाढ्य होते आणि काळाच्या ओघात नामशेष झाले, त्यांचीच एक ही गोष्ट सिनेमा रुपात पहिल्यांदाच कळली होती. या सिनेमाचे इतरही अनेक भाग आले, तरी मी फार उत्साहाने त्या वाटेला गेले नाही. आणि ओळखीतही कुणी (प्राणीजगताशी संबंधित अभ्यास असलेले अपवाद) त्याला सिनेमापेक्षा फार जास्त जागा दिली नाही.

मागे कधीतरी फ्रान्स मध्ये फिरताना एका ठिकाणी डायनासोर चा उल्लेख आला ऐकला होता. तिथे डायनासोरचे अवशेष सापडलेत म्हणून ती जागा बरीच प्रसिद्ध होती. तरी तेव्हाही आम्ही पालक नसल्यामुळे याची इतरत्र असलेली व्याप्ती आम्हाला माहीत नव्हती. अजून एकदा असंच सुट्टीच्या दिवशी जवळपास कुठेतरी जाऊ म्हणून आम्ही एका गार्डन मध्ये गेलो. तिथे आत गेल्यावर पुन्हा अनेक खोटे डायनासोर होते, डायनो थीम पार्कच होता तो. तरी हे डायनो प्रकरण किती खोल आहे याचा अंदाज यायचा होता.

सृजनच्या निमित्ताने चिऊ-काऊ, हम्मा, खारुताई, मोर हे सगळे पुन्हा एकदा रोजच्या आयुष्यात आले. यासोबतच पेपा पिग पण कळले. बुलढाण्यात सृजनला प्रत्यक्षात अनेक डुकरं बघायला मिळाली. पेपा पिग वाली डुकरं इतकी गोड आहेत, की ही आणि आपली लाडकी पेपा म्हणजे एकाच प्राण्याची रुपं आहेत हे त्याला पटेना. पॉ पेट्रोल मधले चेस आणि इतर कुत्री पण आवडीची झाली. कबुतरं, कावळे, ससे असे अनेक जण गोष्टींमधून आणि युट्यूबवरचे व्हिडीओ बघून त्यातले कॅरेक्टर्स ओळखीचे व्हायला लागले. कोकोमेलन मधले सगळे प्राणी, वुल्फू हा लांडगा, बेबी बस मधला पांडा असेही सगळे आले. आणि सगळेच आवडीचे असले तरी डायनो ला स्पेशल स्थान मिळालं.

यांची सृजनच्या आयुष्यात नेमकी एन्ट्री कधी झाली हे आठवत नाही, पण ती इतकी ग्रँड ठरली आहे की आता डायनासोर फारच आवडीचा झाला आहे. युट्युब आणि पुस्तकं यातून बहुधा हा ही एक प्राणी असतो ही माहिती मिळाली. पेपा पिग मधूनच बहुतेक कधीतरी डायनो कळला, मग कोकोमेलन च्या व्हिडीओंमध्येही डायनोची गाणी आवडीची झाली. वाढदिवसाला एक पुस्तक मिळालं त्यात डायनासोरचे विविध प्रकार आणि त्यांचे आवाज ऐकता येतील असा प्रकार होता. ते वाचून मग त्यांची अतिमहाप्रचंड अवघड नावं कळली. त्यातल्या त्यात टी-रेक्स हा एक शॉर्ट फॉर्म असल्यामुळे सोपा वाटायचा. पण ते पुस्तक सृजनला फारच आवडलं. हळूहळू डायनो बद्दल माहिती किंवा कुतूहल वाढत गेलं. मग रात्री झोपताना डायनोची गोष्ट सांग अशी मागणी व्हायला लागली. मी तर "जय देवा जय देवा, डायनोपासून वाचवा" अशी आरती मनातल्या मनात म्हणत काहीतरी स्वरचित गोष्टी सांगायचे. मग आम्हीही सुरूवातीला कपडे खरेदी करताना आवर्जून डायनोचा टी-शर्ट, पॅन्ट, टोपी, डायनोची पुस्तकं, रंगवायला चित्र पण डायनोची असं समोर दिसलं की आम्ही पण ते घ्यायला लागलो. तरी हे प्रेम इतकं उतू जाईल असं वाटायचं नाही. पण मग स्वतःचे कपडे स्वतः आवडीने घेणे चालू झालं. आता मात्र मग मला हा टी-शर्ट हवा, मला ही बॅग हवी यात गाड्या, ट्रक्स, पॉ पेट्रोल, पेपा यासोबतच डायनो अग्रेसर व्हायला लागले. आता तर लहान मुलांच्या कोणत्याही दुकानात शिरताक्षणी त्यांचं आक्रमण दिसून येतं. प्रत्येक प्रकारचे कपडे, खेळणी यात हे असतातच. आता घरात सृजनची चादर, पांघरुण, उशीचा अभ्रा आणि वरून एक कव्हर असा मॅचिंग डायनो थीम सेट आहे. एका व्हिडीओ मध्ये डी फॉर डायनासोर ऐकलं तेव्हाही आश्चर्य वाटलं. मित्र-मैत्रिणी एकत्र जमले की माझ्या टी-शर्ट वर मोठा डायनो, माझ्या कडे डायनोची कार्ड्स अशा या लहानग्यांच्या गप्पा रंगतात. आता तर नुसतं डायनो नाही, हा Stegosaurus असं सुद्धा सांगू शकेल. वैतागाच्या क्षणी मग मी टिपीकल "डायनोचे पाच प्रकार माहीत आहेत याला पण स्वतःची चड्डी धुवायची अक्कल नाही" असे डायलॉग मारतेच.

यावर्षी मार्च मध्ये सृजनच्या नवीन किंडरगार्टन मध्ये सुरुवातीला त्याला सवय व्हावी म्हणून मी पण आत जायचे अशी पद्धत असते. तर हजेरीच्या राउंडला रोज काहीतरी नवीन प्रकार असायचा. एक दिवस प्रत्येकाने नाव घेतलं की कोणत्यातरी प्राण्याचा आवाज काढायचा आणि बाकीच्यांनी तो ओळखायचा असा गेम होता. वीस पैकी पाच ते सात मुलांनी टी-रेक्स चा आवाज काढला तेव्हा मी पण त्या डायनो सारखाच आ वासला. हा तीन ते सहाचा वयोगट. सृजनच्या पुस्तकात वाचून मला माहीती होती टी-रेक्स बद्दल म्हणून बरं, नाहीतर अगदीच अज्ञानी वाटलं असतं. शिवाय फक्त आमच्या घरात हे फॅड नाही, सगळीकडे आहे हे बघून जरा दिलासा ही मिळाला.

इतर अनेक कार्टुन्स पण मुलांच्या आवडीची आहेतच, सगळे प्राणी पण माहिती आहेत, चिऊ-काऊ, ससोबा हे ही लाडकेच आहेत. पण तरी सगळीकडेच असलेलं डायनोंचं साम्राज्य बघून सिंहाला कॉम्लेक्स येत असेल असं वाटतं. नवीन कपडे घेताना डायनो नको हा आग्रह एक वेळ सृजन ऐकेल, पण कपडे बनवणारे ऐकणार नाहीत, चार पैकी दोन वर ते डायनो येतीलच. नवीन डायनो थीम पार्क आजूबाजूला असतीलच, तिथल्या भेटी होतीलच. नामशेष झालेले हे डायनासोर्स हे पुन्हा लहान मुलांच्या प्राणीजगतात इतके अग्रेसर झालेले असतील ही भविष्यवाणी तेव्हा कुणी केली असेल असे वाटत नाही. किंबहुना हे घडणार होतं, आणि यत्र तत्र सर्वत्र त्यांचा मुक्त संचार असणार म्हणूनच ते पृथ्वीवरून नामशेष झालेत अशी खात्री वाटते आता.

.

आता या एका लेखात इतक्या वेळा डायनो लिहीलंय की आज स्वप्नात ते नक्कीच येतील. शिवाय त्यांचा सगळीकडे आभासी वावर इतका आहेच, त्यात एका लेखाची भर घालून मी पण कदाचित त्यांच्या प्रसिद्धीला हातभार लावते आहेच. आता हे डायनो आहेत, अजून वीस वर्षांनी नवीन प्राणी असतील किंवा हेच अजूनही राज्य गाजवत असतील. बघूयात..वक्त वक्त की बात म्हणायचं आणि त्यांच्यासोबत पुढे जायचं.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle