रोडट्रिप - ३

दिवस दुसरा: आजचा प्लान म्हणजे ओहायमधून सॅन्टा बार्बरामार्गे साॅल्व्हॅंगला मुक्कामी पोचणे.

प्रत्येक गावात साधारण काय करायचं हे आमच्या डोक्यात असलं तरी दर आदल्या रात्री थोडा वेळ इंटरनेटवर घालवून दुसऱ्या दिवशीचा प्लॅन, कुठे काय जेवायचं, कोणत्या ठिकाणी जायचं हे फायनल करत होतो. सॅन्टा बार्बाराचं नॅचरल हिस्टरी म्युझियम गुंडाबाईसाठी इंटरेस्टिंग वाटत होतं पण ते नेमकं बंद होतं. मग असंच किड फ्रेंडली ऑप्शन्स शोधताना ऋ ला लिल' टूट्स नावाची बोट राईड दिसली. ती करायची ठरवलं.

ओहाय ते सॅन्टा बार्बरा म्हणजे एक प्रकारचा खंबाटकी घाट होता. त्यातून गुंडाबाई एकटी मागं बसून बोर होते म्हणून मी आज तिच्याशेजारी (मागं) बसलेले. त्यामुळे रस्ता सिनिक असला तरी घाटामुळे डोकं चढलं आणि फोटो, व्हिडीओ घेतले नाहीत. ऋ बिचारा गाडी चालवताना काहीतरी पी जे मारून, वाटेत दरीत दिसणारं पाणी हे नदी असेल की तलाव अशा चर्चा करून, मध्येच 'पर्जन्यछायेचा प्रदेश' वगैरे हायफंडू भौगोलिक टर्म्स वापरून माझं लक्ष डायव्हर्ट करायचा प्रयत्न करत होता. एकदाचा घाट संपला आणि सॅन्टा बार्बरा हद्द सुरु झाली तेव्हा रस्त्यांची क्वालिटी चांगलीच सुधारली. मी घाटाला माझ्या सवयीच्या खंबाटकी घाटाची उपमा दिल्याने फिट्मफाट करायला ऋ ने लगेच 'माळशेज घाट संपून ठाणे जिल्हा सुरु झाल्यावर रस्ता कसा सुधारतो' त्याच्याशी ह्या रस्त्याची तुलना केली. अशा प्रकारे आपापल्या माहेरच्या घाटांची, रस्त्यांची आठवण काढत आम्ही एकदाचे १०१ ला लागलो.

आम्ही गेली दहा वर्षं सॅन डियागोत, बीचेसपासून एका उडीच्या अंतरावर राहत असल्याने तसं समुद्रासाठी हपापपलेपणा नाहीये पण तरीही हायवे वनोवन वरून दिसणारी निळाई बघून जीव सुखावलाच. रस्त्याच्या एका बाजूला डोंगर, डोंगरउतारावरची घरं आणि दुसऱ्या बाजूला निळा पॅसिफिक असा व्ह्यू बघत एकदाचे सॅन्टा बार्बरा डाऊनटाऊनमध्ये जेवणासाठी शिरलो.

तिथं सगळ्या पांढऱ्या, (बहुधा) स्पॅनिश अर्चिटेक्चरच्या इमारती बघून मला माझ्या युनिव्हर्सिटीची आठवण झाली. ( प्च!) आम्ही जिथे जेवणार होतो (अपना इंडियन किचन) त्या भागात बरीच रेस्टॉरंट्स आणि दुकानं, ठेले वगैरे असल्याने तो रस्ता गाड्यांसाठी बंद करून फक्त चालणाऱ्यांसाठी आणि रेस्टॉरंट्सच्या आउटडोर डायनींगसाठी राखीव ठेवला होता.

वर्किंग डे असला तरी बरीच चेहेलपेहेल होती. एखादं दुसरं मिक्स रेसचं कपल, फिट आणि स्टायलिश आजी- आजोबा, सूट-बूट घालून वर्किंग लंच करायला बाहेर पडणारं बिझी पब्लिक, आयुष्य म्हणजेच एक सुट्टी असल्यासारखं दिवसा वाईन पीत एकंदर वातावरण एन्जॉय करत निवांत बसलेलं पब्लिक, मुलाबाळांचं लटांबर सांभाळत शॉपिंग करणारे आई-बाबा, सायकलवर स्टण्ट करणारी टिनेजर मुलं आणि रस्त्यावर लोळत पडलेले किंवा एका कार्टवर सगळं सामान भरून इकडून तिकडे फिरणारे होमलेस असा माणसांचा मोठा स्पेक्ट्रम इथे होता.

आम्हीपण मग भुकेजून दुपारच्या उन्हात एका मांडवात छत्रीखालच्या टेबलवर बसलो. रेस्टॉरंटच्या दारात रेखाच्या सिनेमाची पोस्टर्स, 'डालडा इज बॅक' अशा अगम्य जाहिरातींची पोस्टर्स लावून जरा भारतीय डेकॉर करायचा प्रयत्न केला होता. सुरुवातीला हळूबाई वाटणारा सर्व्हर मनुष्य नंतर एकदम प्रॉम्प्ट निघाला. सुट्टीवर आहे ह्या एक्सक्युजखाली सामोसे, पंजाबी भाज्या, नान आणि भात अशी भरघोस ऑर्डर केली. हे रेस्टॉरंट पर्यावरणवादी असावं. तिथे स्टीलच्या ताटल्या-पेले, एका माणसाला एकच चमचा एकच ताटली, कापडी नॅपकिन वगैरे होते. शिवाय वेटर्स ग्लासमध्ये उरलेलं पाणी तिथल्या तिथे रस्त्याकडेच्या झाडांना देत होते.
जेवण झकास होतं. किंवा आमचा मूड झकास असल्यामुळे ते तसं वाटलं. पण नाही, नान नक्कीच खासच होते.

निवांत जेवून जरा शतपावलीच्या निमित्ताने परत तिथल्या रस्त्यांवर फिरून आम्ही गेलो समुद्रकिनारी.
इथेसुद्धा टिपिकल कॅलिफोर्नियन पामची झाडं होतीच. गाडी पार्क करून पियरकडे चालत निघालो. पियरवर जिथून आमची बोट (वॉटर टॅक्सी) निघणार होती ते ठिकाण बऱ्यापैकी आत होतं. पोचेपर्यंत चांगलीच पायपीट झाली. पण मस्त समुद्री गार हवा आणि वारा ह्यामुळे एवढी जाणवली नाही.

बोटीची वाट बघत असताना फिअरलेस पेलिकनस आणि कबुतरांनी आमची करमणूक केली.
बोट अतिगोंडस होती. फक्त लहान मुलं आणि त्यांच्या पालकांसाठी १५ मिनिटांची राईड. आम्ही टू वे ट्रिप केल्यामुळं आमची राईड अर्धा तास झाली. गुंडाबाईला रॅपुन्झेलच्या खालोखाल मोआना आवडत असल्यामुळे तिने मोआना होऊन 'ओवे ओवे' गाणं म्हटलं. राईड संपता संपता गुंडाबाईला स्टिकर मिळालं. त्यामुळं ती हरखली. पुढे दोन दिवस तिने ते स्टिकर प्रत्येक कपड्यांवर मिरवलं.

बोट राईड करून, गाडीत चिप्स वगैरे जंक पदार्थांचं सेवन करत संध्याकाळी ६ च्या सुमारास साॅल्व्हॅंगमध्ये पोचलो. आजचा मुक्काम हॉटेल कॉर्क. पॉश आणि टीप-टॉप हॉटेल. ते बघुन आता मी हरखले. हॉटेलात राहायची सवय अगदीच मोडलीये की काय ?
प्रवासाचा, उन्हाचा शीण घालवायला आणि समुद्री वाऱ्यात वेड्या बाईसारखे झालेले केस परत नीट सेट करायला एक अंघोळ करून मी फ्रेश झाले. तोवर गुंडाबाईने तिच्या बाबासोबत नवीन रूम, बाल्कनी वगैरे एक्सप्लोर केली. तिला एक नोट्स लिहायला छोटी वही मिळाली, शिवाय एक मजेशीर छोटी गोल खुर्ची मिळाली. मग बराच वेळ ती त्या खुर्चीत चढून वहीत लिहीत बसली. शिवाय हॉटेलवाल्यांनी तिच्यासाठी लहान मुलांचा स्पेशल साबण, शाम्पूच्या बाटल्या झालंच तर रबर डकी वगैरे ठेवल्यामुळे मॅडम प्रचंड खुश होत्या.

हॉटेल रूम इतकी लॅव्हिश होती की बाहेर पडायची इच्छाच होत नव्हती. बाहेर केवळ आणि केवळ साॅल्व्हॅंग असल्यामुळे त्या दुकानांच्या, फेअरी लाईट्सच्या आणि एकंदर वातावरणाच्या ओढीने आम्ही बाहेर पडलो. साॅल्व्हॅंगचा प्रत्येक कॉर्नर फोटोजेनिक. त्यात आमच्या हॉटेलशेजारी गावातली सगळ्यात मोठी विंडमिल. त्यामुळे पहिला चौक पार करून पुढे जायलाच वीस पंचवीस मिनिटं लागली.

आम्ही जवळ जवळ तीन- चार वर्षांनी इथे परत आलो असल्याने साॅल्व्हॅंगमध्ये संध्याकाळी ६-७लाच दुकानं बंद होतात हे बारीकसं डिटेल विसरलो होतो. त्यामुळं मैलभर चालूनसुद्धा खाण्याजोगं रेस्टॉरंट काही उघडं सापडलं नाही. रात्री उशीरा (म्हणजे साडेआठ वाजता) फक्त बार उघडे होते. मग परत गाडी काढून एका गावाबाहेरच्या मेक्सिकन रेस्तराँतातून काहीतरी आणून जेवलो आणि ह्या बोरिंग जेवणाचं उट्टं उद्या काढायचं असं ठरवून झोपलो.

हां, लगेच नाही झोपलो. झोपायच्या आधी हॉटेलच्या पूलशेजारी सुरु असलेल्या शेकोटीजवळ जरा हात शेकून घेतले. हवेत मस्त गारवा होता आणि पूलमध्ये निळ्या दिव्यांमुळे अँबियन्सपण भारी होता. आत्ता कुठे सुट्टी आणि ट्रिपचा मूड आमच्यात सेटल झाला होता.
हे दुसऱ्या दिवसाचं डूडल :

8AC93DB8-2934-46D9-BF48-E352EC7AA5C9.jpeg

साॅल्व्हॅंग हे वेगवेगळ्या कारणांमुळे माझं अत्यंत आवडीचं ठिकाण. त्यामुळे साॅल्व्हॅंगबद्दल काय सांगू आणि काय नको झालंय. जसा वेळ मिळेल तसं जरा निवांत लिहीन.

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle