रोडट्रिप - ४

सॉल्वँग -

तर सुट्टीचा मूड सुरु झाला. रोज सकाळी साडेसहाच्या ठोक्याला जाग न येता आरामात साखरझोप घ्यायला सुरुवात झाली. सकाळी उठून, आवरून आम्ही ब्रेकफास्टसाठी निघालो. सॉल्वँग हे गाव तिथल्या बेकरीज आणि बेकरीमधल्या डॅनिश कूकीज आणि पेस्ट्रीजसाठी प्रसिद्ध आहे.

ब्रेकफास्टसाठी नेहमीप्रमाणे ऋला वेगळ्या आणि मला वेगळ्या ठिकाणी जायचं होतं. मी मोठ्या मनानं ‘आधी त्याच्या बेकरीत जायचं आणि मग माझ्या’ असा त्याग करायला तयार झाले होते पण माझ्या सुदैवानं त्याला ज्या पॅनकेक हाऊसमध्ये जायचं होतं ते नेमकं बंद होतं. मग अर्थातच आम्ही गेलो मला जायचं होतं त्या मोर्टेनसेन्स नावाच्या बेकरीमध्ये. ह्या मोठ्या पण टुमदार बेकरीत एकावेळी फक्त ८ माणसं अलाऊड होती. ऑर्डर देऊन,आपापलं खाणं घेऊन बाहेर छोट्या छोट्या गोल टेबलांवर बसायची सोय होती. आम्ही गुंडाबाईसाठी रासबेरी डॅनिश, ऋ साठी क्रीम डॅनिश आणि माझ्यासाठी अल्मन्ड क्रोसाँ शिवाय कॉफी आणि रस्त्यात/ घरी जाऊन खायला एक बटर कूकीजची बॅग घेऊन बाहेरच्या एका टेबलवर बसलो. आमच्यासारखेच बाकीचेपण टुरिस्ट आपापले स्टायलिश, फॅशनेबल कपडे घालून खात आणि खाण्याचे, जागेचे फोटो काढत बसले होते.
पहिल्या सर्विंगमध्ये मन भरलं नाही म्हणून आणि मी घेतलेली डिश नेहमीच त्याला जास्त आवडते म्हणून ऋ परत जाऊन अजून एक अल्मन्ड क्रोसाँ आणि एक अँपल पेस्ट्री घेऊन आला. मी तोवर आर्टिस्टपणाचा आव आणून, बसल्या बसल्या थोडं डूडलिंग केलं.
इथली कॉफी जगात भारी होती. आय शुड नो.

मग खाऊन, पिऊन, तृप्त होऊन आम्ही 'सॉल्वँग की गलियोंमें' भटकायला सुरुवात केली.
ह्यापूर्वी आधी येऊन गेलो असलो तरी ह्यावेळेस पहिल्यांदा गुंडाबाईसोबत आलो होतो, त्यामुळे पूर्वी न केलेल्या बऱ्याच नव्या टूरिस्टी गोष्टी आत्ता आवर्जून केल्या. सुरुवात केली सुवेनियर शॉप्समधून रेफ्रिजरेटर मॅग्नेटस आणि इतर काही किरकोळ गोष्टी घेऊन.
मग फिरता फिरता सॉल्वँग ट्रॉली टूर दिसली तर तिच्यात बसलो. डॅनियल टायगरसारख्याच लाल ट्रॉलीत बसायला मिळाल्यामुळे आमचा छोटा डॅनियल आनंदी होता. शिवाय कालच्याप्रमाणे आता ट्रॉलीमधल्या ताईनेपण राईड संपताना स्टिकर द्यावं अशी एक छोटीशी अपेक्षा व्यक्त करून झाली होती.

ट्रॉली राईडमध्ये सॉल्वँगबद्दल आतापर्यंत माहिती नसणाऱ्या बऱ्याच गोष्टी समजल्या. त्या आता मी सांगते:

तीन डॅनिश इमिग्रण्टसनी साधारण १९११ साली ही जागा विकत घेऊन इथे वसाहत निर्माण केली. त्यांचे पुतळे आहेत एका रस्त्यावर. आधी ते आयोवामध्ये गेले होते पण तिथल्या थंडीपेक्षा इथला सूर्यप्रकाश आणि एकंदर हवामान त्यांना जास्त आवडलं. सॉल्वँगचा अर्थ 'द सनी फील्ड'. डॅनिश कॅपिटल म्हणून डेव्हलोप करायचं ठरवल्यावर इथल्या सगळ्या इमारती त्यांच्या विशिष्ठ पद्धतीने - (बाहेरून दिसणारे लाकडी फ्रेमवर्क असणाऱ्या, कौलारू) बांधल्या. तरीसुद्धा इथे काही पूर्वीच्या स्पॅनिश आर्किटेक्चरच्या पांढऱ्या कमानी असणाऱ्या इमारतीसुद्धा आहेत. सॉल्वँगचा सिम्बॉल - द लिट्ल मरमेड- हान्स अँडरसन ह्या डॅनिश लेखकाच्या गोष्टीला ट्रिब्युट आहे. गावात एक लिट्ल मरमेडचं स्कल्पचर आहे. आणि हान्स अँडरसन म्युझियमसुद्धा.
ह्याशिवाय गावातल्या बेकऱ्यांबद्दल मी सांगितलं आहेच.

सॉल्वँग युरोपियन गावांसारखं डेव्हलप केल्यामुळे युरोपियन पद्धतीने दुकानं लवकर बंद होतात.
गावाचं हेरिटेज जपण्यासाठी केलेल्या एका नवीन कायद्यानुसार कोणतीही चेन रेस्टॉरंट्स आणि दुकानं ह्यांना सॉल्वँगमध्ये परवानगी नाहीये. (पण हा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीच एका सबवे आणि एका डॉमिनोजने इथे आपलं बस्तान बसवलंय.)

सॉल्वँगमध्ये एकूण ५ विंड मिल्स आहेत. माझ्या डोक्यात तर सॉल्वँग=विंडमिल्स हे समीकरण पारच पक्कं बसलंय. त्यापैकी एकीच्या आत सुवेनियर शॉप, एकीच्या आत लहान मुलांच्या खेळण्या-पुस्तकांचं दुकान आणि एकीच्या आत बार - ह्या तीन ठिकाणी आम्ही गेलोय. बाकीच्या दोनबद्दल नक्की माहिती नाही.

इथल्या बऱ्याच घरांच्यावर छोटी, बर्डहाऊस सारखी दिसणारी घरं असतात. ही एल्फहाउसेस असतात. डॅनिश लोकांच्यात जेव्हा एखादी गोष्ट हरवते तेव्हा ती एल्फने चोरली/घेतली अशी समजूत आहे. म्हणून मग एल्फने काही घेऊ नये म्हणून आधीच त्याच्यासाठी छोटं घर बांधून त्याला खुश ठेवण्यासाठी हे घर असतं.

अजून एक म्हणजे बऱ्याच घरांवर/ दुकानांवर (खोटा) बगळा लावलेला दिसतो - त्यांच्यातल्या समजुतीप्रमाणे गुडलक चार्म म्हणून किंवा भरभराट होण्यासाठी.

डेन्मार्कमधल्या राजाला म्हणे एका ऊंच टॉवरच्या सगळ्यात वरच्या मजल्यावर जाऊन चांदणं बघायची सवय होती. त्या टॉवरची एक रेप्लिका सॉल्वँगमध्ये आहे - मूळ टॉवर ह्या रेप्लिकाच्या तिप्पट उंच आहे.

आमच्या टूर गाईड मुलीने बाकी अजून ओपन एयर थिएटर, गावातल्या नव्या जुन्या बेकऱ्या, दुकानं दाखवली आणि त्यांचा इतिहास वगैरे पण सांगितला. इतर काही बघायच्या, फोटो घेण्याच्या नादात माझ्याकडून काही गोष्टी मिस झाल्या.

सॉल्वँगमधली मला आवडलेली अजून एक गोष्ट म्हणजे गावात हायस्कुलच नाही. हे म्हणजे अगदीच "स्वप्नी आले काही, एक मी गाव पहिला बाई" झालं की!

सॉल्वँग तसंही आधीपासूनच आवडतं गाव आहे. गुंडाबाईपूर्व, कोविडपूर्व, कधीही उठून कुठेही भटकायला निघायच्या काळात आम्ही इथे यायचो. ह्या गावात घालवलेल्या निवांत दुपारी, स्वप्नील संध्याकाळी आमच्या आठवणीत जपून ठेवल्या आहेत.

असो. तर ट्रॉलीराईड नंतर अजून काही दुकानं फिरून, वेगवेगळ्या इमारतींचे, रस्त्यांचे, त्यांच्या पार्श्वभूमीवर एकमेकांचे फोटो काढून आणि ह्या सगळ्यात गुंडबाईचा पेशन्स टेस्ट करून आम्ही जेवणासाठी जागा शोधायला लागलो. सकाळच्या दमदार ब्रेकफास्टनंतर खरंतर अजिबात भूक नव्हती पण पुढचा प्रवास सुरु होण्याआधी इथेच काहीतरी खाऊया का असा विचार करत होतो.
पण तो फक्त विचारच झाला कारण सगळी रेस्टॉरंट्स एकतर भरलेली किंवा रिकामं झालेलं टेबल स्वच्छ करायला १५-२० मिनिटं लावणारी संथ अशी होती. शिवाय बुधवारमुळे बरीचशी बंदसुद्धा होती. (इथले रेस्टॉरंट्सवाले आळीपाळीने सुट्टी घेत असावेत.) मग फक्त आईस्क्रीम खाऊन साधारण दुपारी तीनच्या सुमारास आम्ही गुंडाबाईला जवळच असणारं ऑस्ट्रीच फार्म दाखवायला पुढे निघालो.

निघताना माझं नेहमीचं पालुपद - 'एकदा आपण इथं किमान आठवडाभर नुसतंच निवांत राहायला आलं पाहिजे' सुरु होतंच. बघू. वन डे. सम डे.

हे साॅल्वॅंगचं डुडल:
2FA495B2-7058-4A8C-86F0-DD8417A09036.jpeg

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle