चिमणे जग

डेकेअरविषयी चाललेली चर्चा वाचून हे ललित आठवले. खूप जुने आहे. १३ वर्षांपूर्वी लिहिलेले. पण मुलं अजूनही अशीच रडतात आणि अशीच रूळतात. Haahaa 2 Haahaa 2

"भ्यांssss मम्मीके पास जाना है.....भ्यां.."
"पापाsssssपापा कहां है?"
अरे बाप रे, कसे थांबवायचे ह्यांना?? कसे गप्प करायचे??? एकदम गोंधळुन गेले मी...
घरी नुसते बसण्यापेक्शा काहीतरी करावे म्हणुन धरलेली ही नोकरी.. तशी २-३ वर्षे झाली वेगवेगळ्या ठिकाणी नोकरी करुन पण सत्राच्या पहिल्या दिवसाचा हा पहिलाच अनुभव.
अर्थात आत्तापर्यंत तुमच्या लक्षात आलेच असेल की एका बालवाडी वर्गाचे वर्णन आहे हे...
१० एप्रिल २००८ हा शाळेचा १ला दिवस... आपापल्या आईबाबांचे बोट धरुन ही चिमणी पिल्ले शाळेत आली. काही अगदी टगी... आरामात बाsssssय करुन वर्गात रमलेली.... तर काही गोंधळलेली...काहीनी सुर काढलेला तर काही त्याच बेतात असलेली....
कसे समजावावे ह्यांना??? आणि सांगणार तरी काय आणि कसे? काही सुचेना मला...
एकदोघांना आंजारुन गोंजारुन चुप केले, काही जणांना खेळणी दाखवुन चुप केले.... पण काही महाहट्टी... ऐकायलाच तयार नाहीत.
जमिनीवर अंग टाकुन भोकांड पसरलेले...जवळ घ्यायला, उचलायला जावे तर काबूच येईनात... एकच हट्ट... 'मम्मी के पास..'
एका मुलीचा तर भाषेचा प्रोब्लेम.. तिला फक्त तेलगुच येते... आता ती काही तरी सांगायचा प्रयत्न करत होती तिच्या भाषेत... पण मला कुठे येते तेलगु..?:)
मी आपली बोलतेय हिंदीच तिच्याशी... सगळाच गोंधळ...:)
शेवटी डबे उघडुन दिले... म्हटले आता तरी गप्प होतील... पण छे... अजुनच सुर काढला सगळ्यांनी... काही जण जे सकाळी गप्प होते त्यानीही आपला आवाज ऐकवायला सुरुवात केली... डोके फिरायची वेळ आली.
नशीब १ला दिवस म्हणुन शाळा लवकर सुटली... नाहीतर आहेत नाहीत तेवढे केसही....:)
सगळी मंडळी घरी गेली आणि माझे डोके जर शांत झाले तसे विचारचक्र सुरु झाले...
नक्की काय वाटत असेल त्या चिमण्यांना??
माझा शाळेतला १ला दिवस आठवत नाही.... पण आई सांगते की मी अज्जिबात रडले नव्हते... उलट रडणार्‍या मुलांना (मुलींना नाही हो...:))रागावुन गप्प करत होते...
लेकीने तर असे रडे-बिडे अजिबात केले नाही... उलट स्कुलबसमध्ये बसुन मस्त टाटा केला....'आज तरी येते पोचवायला' या माझ्या हट्टाला 'तुला नाही बोलावले, तु नको येउस..' असे उत्तर देउन मलाच निरुत्तर केले..
त्यामुळे, मुले का रडतात किंबहुना मुले रडतात हेच मला माहित नव्हते..आज या पिल्लांमुळे मला विचार करायला भाग पाडले..
एकतर आपले आईबाबा असे लांब चालले आहेत आणि एका 'मॅम' नामक अनोळखी व्यक्तीकडे आता बर्राच वेळ आपल्याला राहायचे आहे ही भावनाच किती दु:खदायक असेल त्यांच्यासाठी....:( त्यातुन आजुबाजुलाही आपल्यासारखीच बाळे रडताना पाहुन या दु:खाची जाणीव अजुन तीव्र होत जाते...मग काय्...करा भ्यांssssssss Happy
'रोज या वेळेला आपण किती छान झोपलेलो/खेळत्/दुदु पीत/ टि.व्ही बघत असतो... ते सोडुन इथे कुठे घेउन आलेत आपल्याला... बर आलेत ते आलेत आता आपण चालले टाटा करुन... आत्ता किती छान कार्टुन चालु असेल... मी कधी बघणार ते???'
ओहो....रोजचे रुटिन बदलले तर आपणही नाही का चिडचिडे होत..?
महत्वाचे म्हणजे आपले घर, आपले घरचे यांबाहेरही काही जग आहे याची नव्यानेच होणारी जाणीव आणि या अनोळखी जगात आपण एकटेच आहोत अशी समजुत... यातुनच रडे फुटत असेल ना???
अजुनही असतील काही कारणे....वेगवेगळी.... काय माहित????
आज २० दिवस झाले .... आता मुले रमली आहेत बरीच... शाळेत आनंदात येतात्....पालक सोडुन निघाले की पाsssर ते दिसेनासे होईपर्यंत बघत राहतात त्यांच्या दिशेकडे... डोळ्यांत कडेला थोडे पाणी जमा झालेले असते, पण 'मॅम' कडे बघुन गोड हसत ते पाणी पुसले जाते...
'शाळेत कित्ती मज्जा येते ना... खेळणी आहेत्...ससे आहेत, बदकं आहेत... आणि मॅम पण कित्ती माया करतात...मांडीवर घेतात, भरवतात, खेळताना पडले तर 'गिलीगिली छूssss' करतात.खाऊ देतात्...गाणी-गोष्टी सांगतात आणि हे सगळे होईपर्यंत पापा येताच न्यायला...'
आता सगळे खुष आहेत्...'ती' तेलगु मुलगी अजुनही तेलगुच बोलते आणि मी हिंदीच, पण आता कळते आम्हांला एकमेकांची भाषा.. एक 'साहेब' आहेत जे माझ्या मागेमागे फिरत राहतात... जरा नजरेआड होऊ देत नाहीत... चुकवुन मी गेलेच तर रडुन गोंधळ.....'मैं चली जाऊंगी' या धमकीवर सगळे काही करायला तयार......:)
मॅमही खुष आहेत... डोके जागेवर शाबुत आहे आणि केसही.....:)
आणि गम्मत म्हणजे... शाळेतल्या आयांना 'बुआ','दादी' बनवुन या चिमण्यांनी आपले एक घरच बनवले आहे इथे....

आपले घर....आपली शाळा.....आपले एक जग.... चिमणे जग......

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle