उडदाचं वरण - आलं-बडिशेप लावून

साहित्य -
उडदाची डाळ - अर्धी वाटी
आलं - तीन ते चार इंच
कच्ची बडिशेप - पाव वाटीपेक्षा किंचित कमी
सुकी मिरची - १ किंवा २
तूप - २ चमचे
मीठ - चवीनुसार
साखर - अगदी थोडी, चवीपुरती, नाही घातली तरी चालेल.

कृती -
वाटपः
बडिशेप आणि आलं मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी घालून अर्धा तास भिजवा आणि मग वाटून घ्या (नाही भिजवलं तरी चालेल पण मग बडिशेप किंचित जास्त लागेल बहुदा. भिजलेली व्यवस्थित वाटली जाते). कितीही घुर्र केलं तरी ती पेस्ट भरड होते. मग एका गाळण्यातून ती पेस्ट लागेल तसं वरून थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित दाबून दाबून सगळा रस काढून घ्या.

वरणः
डाळ शिजली की मीठसाखर घालून नीट हाटून घ्या. कढईत/ जाड बुडाच्या पातेल्यात दोन चमचे तूप गरम करून त्यात अर्धा चमचा कच्ची बडिशेप आणि सुक्या मिरच्यांची फोडणी करा. त्यावर डाळ ओता. चांगली ढवळून घ्या. आता त्यात वाटपाचा सगळा रस ओता. आपण जीव खाऊन चेवून रस काढलेला असतोच शेवटच्या थेंबापर्यंत त्यामुळे आधी तो घालून मग ठरवा जास्तीचं पाणी घालायला हवंय का ते. असल्यास घाला. सगळं ढवळून घेऊन उकळी आल्यावर पाचेक मिनिटं खळाखळा उकळू देत.

आता पहिल्या वाफेचा भात वाढून घ्या, वरण ओता आणि ओरपा.

विशेष टीपा:
१. बडिशेप आणि आल्याची व्यवस्थित चव आली पाहिजे तेव्हा तुम्ही त्यानुसार प्रमाण कमीजास्त करू शकता. माझं सगळं अंदाजपंचे असतं त्यामुळे वरील प्रमाण गडबड असण्याची शक्यता आहे.
२. लिहिता लिहिता सुचलं - वरण उकळल्यावर वरून पाउणेक चमचा तुपात परत बडिशेप आणि आल्याचे लांबलांब काप करून फोडणी करून तर ओतून गॅस बंद करून पाच मिनिटे घट्ट झाकण ठेवले तर अगदी खमंग चव येईल. पुढच्या वेळेस मी हे करून बघेन.

माहितीचा स्रोत - साबा.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle