द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग ३

पहिल्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
दुसऱ्या भागाची लिंक: द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २

आपली उत्तरं शोधायला लागतो तेव्हा असं लक्षात येतं की आपला अर्थव्यवस्थेचा मॉडेल सुधारलं तर बऱ्याच गोष्टी साध्य होतील. वाढीवर आधारित अर्थव्यवस्थेऐवजी विकासावर आधारित अर्थव्यवस्था अधिक शाश्वत असेल त्यासाठी अनेक जण काम करत आहेतच. पण एक उल्लेखनीय alternate विकासाचे प्रारूप जे मला पटले ते Kate Raworth यांनी मांडलेले Doughnut economics चे मॉडेल आहे.
Doughnut_(economic_model).jpg
यात चित्रात दाखवलेला डोनट बघा - याच्या आतल्या कडेला social foundation आहे. ज्यात बरेचसे UN ने ठरवलेले sustainable development goals आहेत - यात मग पाणी, अन्न, निवारा, आरोग्य या मूलभूत गरजांपासून ते सामाजिक समतेसाठी आवश्यक अशी ध्येयं उदाहरणार्थ राजकीय हक्क (political voice), लिंगाधारित समता, सामाजिक समता हे सर्व येते. ही या डोनटची आतली कड/boundary आहे. जगातील सर्वजण या कडेच्या आतल्या बाजूला असले पाहिजेत - मधल्या भोकातून कोणी खाली पडता कामा नये. डोनटची बाहेरची कड/boundary म्हणजे ecological ceiling किंवा planetary boundary अर्थात आपल्या पृथ्वीची सर्वांचा भार पोसण्याची क्षमता. ही प्लॅनेटरी बाउंड्रीजची संकल्पना Stockholm Resilience Centre च्या संशोधकांनी Johan Rockström यांच्या नेतृत्वाखाली नेचर मासिकात (https://www.nature.com/articles/461472a ) मांडली जी आपण या आधीच्या भागात पाहिलेली आहे. आपल्या लक्षात येईल की या मॉडेलमध्ये कुठेही GDP किंवा growth मोजली जात नाही. सर्व विकास हा या दोन मर्यादांचा विचार करून केला जातो. याविषयीचा Kate Hayworth यांचा साधारण १६ मिनिटांचा टेड टॉक जरूर ऐका असे म्हणेन.
या डोनट मॉडेलच्या जोडीला सध्या बऱ्यापैकी चर्चेत असलेली चक्रीय अर्थव्यवस्थेची (circular economy) संकल्पना ही तितकीच महत्त्वाची. सध्याची आपली नैसर्गिक स्रोत वापरण्याची क्रिया ही एकरेषीय आहे. आपण जी वस्तू वापरतो तिच्या वापराच्या शेवटी त्या वस्तूचा कचरा होतो आणि असा कचरा होतो ज्याचं अनेकदा विघटन किंवा रिसायकलिंग शक्य नसतं. म्हणजे आपण समजा लिथियम खाणीतून बाहेर काढतो आहोत पण ते आपण अशा स्वरूपात वापरतो आहोत की त्याचा पुनर्वापर जवळपास अशक्य आहे तर आपण लिथियमचा एकरेषीय वापर करतो आहोत. निसर्ग मात्र चक्राकार पद्धतीने चालतो - त्यात कचरा ही संकल्पनाच नाही. मग या पद्धतीने आपल्या व्यवस्था चालवता आल्या तर? एका उद्योगाचा कचरा हा दुसऱ्या उद्योगाचा कच्चा माल असला तर? यावर जगात अनेक प्रकारचे उत्तम संशोधन सुरु आहे. यालाच Cradle-to-cradle design असेही म्हटले जाते.
भांडवलवाद हा नैसर्गिक गोष्टींचे मूल्य हे कृत्रिम चलनात ठरवतो. पण ते ठरवताना केवळ त्या वेळेस त्या नैसर्गिक स्रोताची मानवी दृष्टिकोनातली किंमत आपण मोजतो. त्यामुळे मुंबईमधली १ गुंठा जमीन आणि बीडमधली एक गुंठा जमीन दोन्हीची किंमत वेगळी असते. जर यात आपण दीर्घकालीन, आंतरपिढी, इकॉलॉजिकली शाश्वत असा हिशोब केला तर आपल्या नैसर्गिक स्रोतांची “योग्य” चलनी किंमत काय असेल? या प्रश्नाचे उत्तर शोधणारी मॉडेल्स आता अर्थतज्ज्ञ मांडू लागले आहेत. याला natural resource accounting असे म्हणतात. म्हणजे एखादे जंगल तोडून होणारा तात्कालिक चलनी फायदा आणि ते पुढची १००/२०० वर्षे राखल्याने होणारा चलनी फायदा यांचा अंदाज तज्ज्ञ मांडत आहेत. त्यातून अर्थात फार डोळे उघडवणारे निष्कर्ष समोर येत आहेत.

आता हे अर्थव्यवस्थेचे मॉडेल वगैरे धोरणात्मक विचार झाले. हे जरी महत्त्वाचे असले तरी एक सामान्य माणूस म्हणून आपण काय वेगळा विचार करू शकतो? तुमच्या माझ्यासारखी सामान्य माणसं काय करू शकतात? जॉर्ज म्हणतो की केन्सने मांडलेली सरकार केंद्रित समाजवादी व्यवस्था आणि सध्याचे लोकप्रिय नवउदारमतवादावर आणि बाजारव्यवस्थेवर आधारित भांडवलशाहीचे मॉडेल या दोन्हींमध्ये आपण केवळ सरकार आणि बाजारव्यवस्था या अर्थव्यवस्थेच्या दोनच खांबांना महत्त्व दिले आहे पण शाश्वत अर्थव्यवस्था ही चार खांबांवर उभी असते. जॉर्जच्या मते जेव्हा अर्थव्यवस्थेच्या दोन दुर्लक्षित खांबांकडे आपण जाणीवपूर्वक लक्ष देऊन आणि त्यांची पुन्हा उभारणी करू तेव्हाच आपला विकास हा शाश्वत असेल. अर्थव्यवस्थेचे ते दोन दुर्लक्षित खांब म्हणजे गृहव्यवस्था (households) आणि सामुदायिक मालमत्ता (commons). हे दोन खांब मजबूत करण्यात आपण सामान्य माणसे नक्कीच योगदान देऊ शकतो. या दोन घटकांबद्दल जॉर्जेने मांडलेले विचार आपण थोडक्यात बघू.
गृहव्यवस्था (households): हा सध्याच्या अर्थव्यवस्थेचा अविभाज्य तरीही अत्यंत दुर्लक्षित राहिलेला भाग आहे. ॲडम स्मिथ, ज्याला आधुनिक अर्थशास्त्राचा जनक असे म्हटले जाते, जेव्हा आपले वेल्थ ऑफ नेशन्स हे पुस्तक लिहीत होता तेव्हा तो आपल्या वडिलोपार्जित घरात राहत होता आणि अविवाहित होता. तेव्हा त्याची आई त्याचे खाणेपिणे, कपडे, घरातील इतर कामे बघत असे. दुर्दैवाने ॲडम स्मिथला अर्थव्यवस्थेमधला “अदृश्य हात” दिसला पण आपले पोषण करणारा आपल्या आईचा हात काही दिसला नाही. त्याने मांडलेल्या आधुनिक अर्थशास्त्रात घरकामाचे मोल कुठेच दाखवलेले नाही. मग ते घरकाम करणाऱ्या स्त्रियांना अर्थात “आई कुठे काय करते?” या प्रकारचे प्रश्न वर्षानुवर्षे विचारले गेले. आजही विचारले जातात. आधुनिक भांडवलशाही अर्थव्यवस्था ही एका प्रकारे पुरुषप्रधान संस्कृतीचाच भाग आहे आणि त्यामुळेच तिने स्त्रियांचे योगदान हे कधीच लक्षात घेतले नाही यात काय नवल ते काय! याविषयी चर्चा करणारे “Who cooked Adam Smith’s dinner?” या नावाचे पुस्तक आहे त्याचे शीर्षक पुरेसे बोलके आहे.
भांडवलशाहीमध्ये केवळ पैसा अथवा पैसा निर्माण करू शकणारी स्थावर मालमत्ता हेच भांडवल आहे असे मानले जाते. ज्या कृतीतून पैसा मिळतो ते सगळे अर्थपूर्ण ज्यातून पैसा मिळत नाही त्याला काही उपयुक्तता नाही. उदाहरणार्थ, घरातल्या व्यक्तीने जर घरच्यांसाठी स्वयंपाक केला तर त्याने GDP वाढत नाही. पण जर तोच स्वयंपाक करून डबे विकले तर त्याने अर्थव्यवस्थेला चालना मिळते. याच कारणाने स्त्रियांना नोकरी किंवा करिअर करणे इतके अवघड जाते. कारण जिथे केवळ पैसा बोलतो अशा अर्थव्यवस्थेत कोणताही पुरुष आपले अर्थाजन सोडून संपूर्णपणे घरकाम करणाऱ्या गृहस्थाची भूमिका घ्यायला सहसा तयार होत नाही. त्यातल्या त्यात स्त्रिया शिकल्याने आणि अर्थार्जन करू लागल्याने घरकामाची जबाबदारी ही पुरुषांची देखील असते हे मुश्किलीने का होईना पण मान्य होऊ लागले आहे. जरी घरकामाचं, घरच्या स्वयंपाकाचे आणि त्या वास्तूत असलेल्या आपुलकीचे, सुरक्षेचे मोल चलनात मोजले जात नसले तरी एक चांगले स्थिरता देणारे घर हे प्रत्येकाला गरजेचे असते. ती आपली सगळ्यांची मूलभूत गरज आहे. इथे मला पारंपरिक कुटुंबसंस्था म्हणजे घर असं मुळीच अपेक्षित नाही कारण आपली पारंपरीक कुटुंबं आता एकाच वेळी विस्तारली आहेत आणि संकुचितही झाली आहेत. त्यामुळे आई-वडील आणि लहान मूल, नोकरी करणारं जोडपं, एकटी राहणारी प्रौढ व्यक्ती (स्त्री/पुरुष), एखादी आजी आणि तिची मांजरं, किंवा नोकरीसाठी किंवा शिक्षणासाठी घर शेअर करून राहणारी तरुण मुलं मुली ही सगळी एका प्रकारची कुटुंबच आहेत आणि ती ज्या घरात राहतात ती घरं कशी आहेत हे एका शाश्वत समाजात महत्त्वाचे आहे. एका घराचा पर्यावरण रक्षणात काय आणि किती महत्त्वाचा वाटा असू शकतो हे आपण आत्ता पाहणार नाहीयोत. कदाचित त्यासाठी एक वेगळा भाग/मालिका करता येईल.
जशी घराची, आपल्या कुटुंबियांची देखभाल करणे ही गोष्ट सध्याच्या भांडवलवादाच्या परिघाबाहेर असली तरी शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे तशीच या घरांची अजून एक जपली पाहिजे अशी संस्कृती म्हणजे शेजारधर्म (neighborhood) आणि त्यातून निर्माण होणारे समुदाय (community). आपली मैत्रीण ही एक आभासी कम्युनिटी आहे त्यामुळे इथे जोडले जाणे तुलनेने सोपे आहे. पण आपल्या सध्याच्या समाजव्यवस्थेत आपल्या आजूबाजूच्या कम्युनिटीशी जोडलेले राहणे कमी होत चालले आहे. करोना काळात मात्र या शेजारधर्माने आणि सामुदायिक भावनेनं अनेकांना जवळ आणलं, मदतीचा हात दिला. माझे बाबा म्हणायचे की आपले शेजारी हे आपले प्रथम नातेवाईक असतात. घर काय किंवा समुदाय काय या दोन्ही गोष्टी तेव्हाच मजबूत होतात जेव्हा त्यात सहभागी लोक थोडेबहुत नि:स्वार्थी असतात. शाश्वत विकासात या अशा निःस्वार्थी लोकांच्या समुदायांचे मोठे योगदान असेल. ते कसे? तर जॉर्ज म्हणतो आपल्या पृथ्वीवर प्रत्येकाला ऐश्वर्यसंपन्न आयुष्य जगता येईल इतके रिसोर्सेस नाहीत पण आपण जर का उत्तम स्थानिक कम्युनिटी तयार करू शकलो तर आपण सगळे मिळून ऐश्वर्यसंपन्न आयुष्य नक्की जगू शकतो. त्यासाठी जॉर्ज public luxury and private sufficiency ची संकल्पना मांडतो. म्हणजे आपल्यापैकी प्रत्येकाकडे मोठी गाडी असू शकणार नाही पण आपली सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सर्वोत्कृष्ट असू शकेल. आपली शासकीय रुग्णालये सर्वोत्तम सेवांनी उपयुक्त असू शकतील. प्रत्येकाच्या घराभोवती खाजगी बाग असू शकणार नाही पण आपल्या सार्वजनिक बागा, मैदाने, तरणतलाव हे सर्व उत्कृष्ट असू शकेल. भारतासारख्या लोकांची प्रचंड घनता असलेल्या देशात हे शाश्वत विकासाचे मॉडेल फारच उपयोगी पडेल. यात मोठा प्रश्‍न हा असतो या सार्‍या सोयीसुविधा सांभाळणार कोण? यांची मालकी सरकारची असेल की खाजगी? इथे जॉर्ज आपल्याला अर्थव्यवस्थेच्या चौथ्या स्तंभाची आठवण करून देतो जो जवळपास विस्मृती मध्ये गेला आहे. तो स्तंभ म्हणजे कॉमन्स अर्थात सामायिक किंवा गावकीची मालमत्ता!

सामायिक किंवा गावकीची मालमत्ता: भांडवलवाद किंवा साम्यवादात नैसर्गिक संसाधने अनुक्रमे खाजगी किंवा सरकारी मालकीची असतात. खरे पाहिले तर या नैसर्गिक संसाधनांची मालकी ही त्या त्या स्थानिक समाजाकडे असली पाहिजे आणि जगभरात या दोन्ही विचारसरणींचा उदयापूर्वी या प्रकारची मालकी अस्तित्वात होती. गावाच्या सामायिक मालकीच्या विहिरी, तळी, गुरांसाठी कुरणे, कोणत्यातरी स्थानिक देवाच्या नावे राखलेल्या देवराया हे सारं काही प्रमाणात आजही अस्तित्वात आहे. जे लोक त्या नैसर्गिक साधनांच्या जवळ राहतात त्यांना त्याचे महत्त्व अधिक चांगले ठाऊक असते आणि त्यामुळे ते त्याची काळजी घेत असतात. जर दृष्टीआड सृष्टी असेल तर मग तिच्याविषयी तितकेसे महत्त्व राहात नाही. अशा सामायिक जागा परत आणणे हा शाश्वत विकासाचा एक महत्त्वाचा मार्ग आहे. यात नैसर्गिक स्रोतांच्या जोडीला सार्वजनिक सभागृहे, मैदाने, आणि आधुनिक काळात तंत्रज्ञान देखील सामुदायिक मालकीचे असू शकेल. सामुदायिक मालकीच्या तंत्रज्ञानाची उदाहरणे आपल्याला माहिती आहेतच उदाहरणार्थ लिनक्स, विकीपेडिया . सामायिक हक्काच्या जागा या समुदायाच्या मालकीच्या असल्याने, अहस्तांतरणीय, तुकडे न करता येणाऱ्या अशा असतात आणि त्यातून होणार आर्थिक फायदा समुदायात वाटला जातो.
शहरांमधील बागा, मैदाने, तलाव हे अशा प्रकारे वॉर्डनिहाय पद्धतीने राखता येतील. यात स्थानिक लोकांचा सक्रिय सहभाग आवश्यक आहे म्हणून याआधीच्या परिच्छेदात कम्युनिटीचे महत्त्व मांडले आहे. याचाच एक भाग म्हणजे सहभागी लोकशाही (participatory democracy). अर्थात जसे सध्या खेड्यात ग्रामपंचायतीचे सर्व ठराव हे ग्रामसभेच्या मार्गाने जे सर्व गावकऱ्यांच्या सहभागाने मंजूर होतात तसेच शहरात वॉर्डनिहाय बजेट ही कसे खर्च करावे याविषयी वॉर्ड सभा घेता घेऊन चर्चा, मतदान घेता येईल आणि त्यातून आपला कराचा पैसा कसा खर्च करायचा याचा किमान स्थानिक पातळीवरचा निर्णय हा इथे राहणाऱ्या नागरिकांना घेता येईल. पाच वर्षातून एकदा बजावल्या जाणाऱ्या मतदानाच्या हक्काच्या जोडीने ही अशी हक्क आणि कर्तव्य दोन्ही निभावण्याची संधी ह्या सहभागी लोकशाहीत नागरिकांना मिळेल. जगभरात या प्रकारचे प्रयोग होत आहेत. ब्राझीलमधल्या काही शहरांनी हे सहभागी लोकशाहीचे मॉडेल यशस्वीपणे राबवले आहे. येणाऱ्या काळातल्या पर्यावरण संकटांना तोंड देण्यासाठी केवळ व्यक्तिगत पातळीवरचे बदल पुरेसे नाहीत तर त्याबरोबरीने स्थानिक पातळीवर समविचारी लोकांनी येऊन केलेली कृती देखील आवश्यक आहे. जॉर्जने त्याच्या भाषणात उल्लेख केलेले अर्थव्यवस्थेचे दोन दुर्लक्षित खांब अर्थात गृहव्यवस्था आणि सामुदायिक मालमत्ता या दोन्हीचे महत्त्व वाढवणे आणि टिकवणे हे शाश्वत विकासासाठी आवश्यक आहे आणि यात सामान्य माणूस पण बरंच काही करू शकतो.
भारतात सुदैवाने समाज म्हणून एकत्र येण्याच्या अनेक संधी येत असतात. त्यातील सामाजिक भेदभाव कमी करून या संधींचा स्थानिक पातळीवर अधिक समान आणि निसर्गकेंद्रित व्यवस्था उभारण्यासाठी नक्कीच उपयोग करता येईल.
जरी जॉर्जने सुचवलेल्या उपायांवर बरंच काही लिहिता येण्यासारखं असलं तरी ही लेखमालिका इथे संपवत आहे कारण या मालिकेचा मुख्य उद्देश जॉर्जच्या भाषणातील विचारांची ओळख करून देणे हा आहे. भाषणाचा थेट अनुवाद वाचायला संदर्भहीन आणि तितकासा रंजक वाटला नसता. म्हणून जिथे शक्य झाले तिथे अधिकचे संदर्भ आणि काही ठिकाणी माझे काही स्वतंत्र विचार मांडले आहेत. तेव्हा यात काही न्यून असेल तर ते माझे आहे आणि काही सकस असेल तर ते जॉर्जच्या विचारांची देन आहे असं म्हणेन. शिवाय मी सर्वांना वेळ काढून जॉर्जचे भाषण ऐकावे असे जरूर सुचवेन. कारण माझ्यामते तुम्हाला पटोत अथवा न पटोत जगात सध्या जी वैचारिक घुसळण चालू आहे तिच्यात जॉर्जने मांडलेले विचार स्वतःचा एक प्रवाह बनवू पाहत आहेत आणि म्हणून तुम्हाला त्यांची ओळख असली पाहिजे.

संदर्भ: मूळ भाषणाची लिंक
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग १
द इनव्हिझिबल आयडियॉलॉजी: जॉर्ज मॉनबियों - भाग २

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle