विधवा पुनर्विवाह: काळाची गरज

*विधवा पुनर्विवाह, काळाची गरज*

पती-पत्नींचे वैवाहिक जीवन दोघांपैकी एकाच्या मृत्यूमुळे संपुष्टात येते,आणि यामध्ये ज्या स्त्रीचा पती निधन पावतो, तिला 'विधवा' असे संबोधले जाते.
पारंपरिक हिंदू, ख्रिस्ती, इस्लाम धर्मीयांमध्ये तसेच प्राचीन इजिप्त सारख्या देशातही वैधव्य ही एक आपत्ती समजली जाई. लग्नानंतर स्त्रीला कौटुंबिक स्थैर्य सामाजिक प्रतिष्ठान प्राप्त होते, पण पतिनिधनानंतर मात्र कुटुंबात तिला दुय्यम स्थान प्राप्त होते. समाजामध्ये आर्थिक ,सामाजिक भावनिक दृष्ट्या ती एकाकी पडते. प्राचीन समाजामध्ये (उदाहरणार्थ जर्मनी /इजिप्त) या देशात विधवेला तिच्या पतीच्या थडग्यात जिवंत पुरले जात असे.
प्रारंभीच्या ख्रिस्ती समाजातही पुनर्विवाहाला फारसे प्रोत्साहन नव्हते. पुनर्विवाह हा विवाहपूर्व शरीरसंबंध अगर व्यभिचार यांच्या इतकाच निंद्य व त्याज्य मानला जाई. पतीच्या मृत्यूनंतर ही परलोकात तिने पतीची सेवा करावी म्हणून तिने देहत्याग करावा. अशीही भावना होती.अशाचप्रकारची भावना भारतीय समाजातही तीव्र होती. त्यातूनच सतीच्या चालीचा प्रसार झाला आणि विधवेला सक्ती करून जबरदस्तीने पतीच्या चित्तेवर जाळले जाऊ लागले. जरी त्याला धार्मिक अधिष्ठान आहे असे वाटत असले तरी कोणत्याही धर्मग्रंथात या प्रथेचा स्पष्ट पुरस्कार केलेला नाहीच. भारतातच नव्हे तर युरोपीय संस्कृती मध्येही तसेच चीनमध्येही ही प्रथा चौदाव्या शतकापर्यंत रूढ होती.
विधवा स्त्रीला एकाकीपणा ,असुरक्षितता याबरोबरच मानसिक ताण, शारीरिक कुचंबना, पुरुषाकडून मानहानी हे सहन करावे लागते. विधवा स्त्रीने काय खावे? कोणते वस्त्र परिधान करावे? कोणाशी बोलावे? कसे राहावे? मंगल प्रसंगी तिने उपस्थित राहू नये. अशी अनेक बंधने तिच्यावर लादली गेली. हिंदू सनातन धर्मसुत्रे, मनुस्मृती यानुसार विधवेच्या दैनंदिन व्यवहारावर कडक बंधने घातलेली आढळतात. बालविवाह, जरठ विवाह, विधवांना पुनर्विवाह बंदी, मुलगा होत नसेल तर त्याचा दोष लावून त्या बायकोला सोडून दुसरे लग्न करणे, केशवपण, सतीची जबरदस्ती, बालविधवांच्यावर लैंगिक अत्याचार करणे व ती गर्भवती राहिली तर तिला मारून टाकणे, मासिक पाळी साठी हजारो बंधने म्हणजे शब्दांनाही मर्यादा पडतील पण या अत्याचारांना मर्यादा नाहीत. अशा अनेक कुप्रथा व कुपरंपरा यांनी महिलांना अगदी जखडून टाकले होते. खरेतर ब्राह्मण समाजाशिवाय इतर जातीमध्ये मुळात पुनर्विवाहाला विरोध नव्हता.कनिष्ठ जातीतील पुनर्विवाहाला मेहत्तर वा पाट लावणे असे म्हणत. त्यात फारशी प्रतिष्ठा नव्हती पण सामाजिक प्रतिष्ठेच्या खोट्या दुराभिमानाने पुढे जाऊन कनिष्ठ जाती मध्येही पुनर्विवाह गौण लेखले जाऊ लागले. अनेक समाजसुधारकांच्या अथक प्रयत्नांनी, चळवळीने विधवा पुनर्विवाह यास चालना मिळाली.

विवाहानंतर जर पत्नीचा मृत्यू झाला व संतती असेल तर संततीच्या देखभालीसाठी समाज पुरुषाला पुनर्विवाहाची अनुमती देतो. एवढेच नव्हे तर असंही म्हटलं जातं की मुलांना सांभाळून पुरुष एकट्याने जीवन कसे व्यतीत करू शकतील ? समाज नुसते बोलत नाही तर लगेच अशा विधुरांसाठी वधुसंशोधनाची सुरवातही केली जाते. यात पुन्हा गंमत अशी की प्रथम प्राधान्य कुमारिकेला, त्यातून नाही जमले तर विधवा, घटस्फोटिता यांना चालते पण ती निसंतान हवी, अशी यांची अट असते,जेणेकरून ती यांच्या मुलांना आईचे प्रेम देऊ शकेल व तिच्या मुलांची जबाबदारीही घ्यायला लागू नये.पण या उलट जर पतीचा मृत्यू झाला तर मात्र स्त्रीयाकडेही समाज असा पाहतो का ? तर नक्कीच नाही. उलट अशुभ पायगुणाची वगैरे मानून तिला दुषणे दिली जातात, तिचा अपमान केला जातो. स्त्री पतिनिधनानंतर मुलांची, कुटुंबाची जबाबदारी तर उचलतेच पण मिळेल ते काम करून उदरनिर्वाह ही करते. यामध्येही समाजाकडून प्रोत्साहन, आदर कमी आणि अवहेलना, कमी लेखने, पाय खेचणे किंवा मग गैरफायदा घेणे हेच प्रकार जास्त असतात.तरीही या विधवा स्त्रिया नेटाने संसार रेटत असतात. मग नेमके यामध्ये अबला कोण, "विधवा" की " विधुर"? काही विधवांना तर संतती नसेल तर सासरच्या घरातून तिला निघून जाण्यास सांगितले जाते.तिचा मालमत्तेतील वाटा नाकारला जातो. काहीवेळा जरी संतती असली तरीही वारसा हक्क नाकारण्याचा प्रयत्न केला जातो. एखादी विधवा स्त्री राहते कशी? करते काय? जाते कुठे? भेटते कुणाकुणाला? याकडे समाजाचे अत्यंत बारीक लक्ष असते. विधवा स्त्री शिक्षित असो, हुशार,नम्र, विनयशील असो, चारित्र्यसंपन्न असो,पण तरीही समाज त्या नजरेने तिला पहिलच असे नाही. आज हुंडा प्रथा, बाल विवाह प्रथा बंद होत आहेत, पण नवलाची गोष्ट म्हणजे विधवा विवाह ही समस्या मात्र अजूनही तशीच आहे. 'कमला फाऊंडेशनच्या' सर्वेनुसार आजही आपल्या देशात जवळपास चार कोटी महिला विधवा आहेत. जे महिलांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात दहा टक्के आहे. यावरूनच कळते की विधवा पुनर्विवाहाचा कायदा होऊन देखील आजपर्यंत विधवांना सन्मानाच्या नजरेने पाहिले जात नाही. पतिनिधनानंतर जी विधवा स्त्री आपल्या मुलांना या सर्व शारीरिक, मानसिक, आर्थिक, सामाजिक संकटांना तोंड देत वाढवते, त्यांना समाजात स्वतःच्या पायावर उभे राहण्याच्या काबिल बनवते, त्याच स्त्रीला तिच्याच मुलांच्या विवाहात अशुभ म्हणून सर्व धार्मिक कार्यक्रमातून वगळले जाते. खरोखर एखादी आई ती केवळ विधवा आहे म्हणून स्वतःच्याच मुलांसाठी अशुभ असू शकते काय?
वृंदावन, बनारस अशा ठिकाणी तर विधवांची मुले किंवा कुटुंबीय त्यांना कृष्ण दर्शनाच्या नावाखाली तिथे सोडून जातात व पुन्हा कधीही परतून येत नाहीत.अतिशय विदारक सत्य आहे हे.
खरेतर भारतीय कृषी जीवनात साधारण बारा-पंधरा हजार वर्षापूर्वी स्त्री स्थान सर्वोच्च होते. स्त्रीप्रधान कुटुंब व समाज व्यवस्था होती. वैदिक काळात विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती परंतु मध्ययुगात ते पूर्ण निषिद्ध मानले गेले. आजही भारतातील ईशान्य , नैऋत्य भागात स्त्री प्रधान समाज आजहीआहे. मात्र भारतीय स्त्री सन्मान जपणारी कृषी संस्कृती वैदिक संस्कृतीचे आक्रमण रोखू शकली नाही. त्यामुळेच आर्यांनी स्त्रियावर व समाजावर वैदिक धर्म कायदे लादले. तीन हजार वर्ष भारतीय स्त्रिया हे अत्याचार सहन करत गुलामीचे जीवन जगत आहेत. परंपरेच्या नावाखाली अति क्रूर कायदे महिलांच्या माथी मारले गेले. या कायद्यांना परमेश्वराशी संलग्न भासवून धर्म ग्रंथाच्या आधारे ब्राह्मणांनी टिकवून ठेवले. अतिप्राचीनतम वैदिक धर्मानंतरही अनेक धर्म उद्यास आले. तरी महिलांना दुय्यम स्थान प्रत्येक धर्मात दिले गेले. कारण बहुतेक धर्मसंस्थापक हे 'पुरुषच' होते. वैदिक धर्म आणि संस्कृती स्त्रियांना माणूस मानत नाही म्हणून त्यास झुगारणाऱ्या कित्येक स्त्रिया क्रांतिकारक ठरले आहेत. उदा. मैत्रयी, गार्गी,घोषा इत्यादी. आपल्या भारतातील विधवा भगिनींचे योगदान खूप मोठे आहे. जिजाऊ, सावित्रीबाई फुले, अहिल्यादेवी होळकर , डॉक्टर रखमाबाई राऊत, ताराबाई शिंदे, रमाबाई ,इंदिरा गांधी, रजिया सुलतान या व इतर अशा सर्व सामाजिक व राजकीय क्षेत्रातील महिलांनी प्रचंड संघर्ष केला आहे. तेव्हा कुठे थोडेफार सन्मानाचे जीवन आपल्या महिलांच्या वाट्याला आले आहे. 1882 साली ताराबाई शिंदे यांनी 'स्त्री पुरुष तुलना' हा शोधनिबंध प्रसिद्ध करून महिलांच्या शोषणाविरुद्ध प्रथम भूमिका घेतली होती. त्या आपल्या पुस्तकात म्हणतात की, स्त्रीने नवरा कसाही वागला तरी त्याची निरंतर आज्ञा पाळणे, त्याची हसतमुखाने पूजा करणे हा कोणता स्त्रीधर्म? आणि जर हा स्त्री धर्मा असेल आणि पत्नीने पती हाच परमेश्वर असे मानले तर नवऱ्याची वागणूक पण देवाप्रमाणे हवी. याकडे मात्र समाज सोयीस्कर रित्या डोळेझाक करतो.
या सर्व विधवांच्या वेदनादायक प्रवासात काही घटना मात्र वाऱ्याच्या झुळकी सारख्या सुखावतात. सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील आवळाई गावात लता बोराडे या विधवा महिलेने विधवा आणि सवाष्ण महिलांसाठी हळदी कुंकू कार्यक्रम घेतला. अशा प्रकारचे कार्यक्रम समाजामध्ये होऊ लागले तर विधवा महिलांकडे पाहण्याच्या दृष्टिकोनात बदल होईल.

"कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना" अशी परिस्थिती सर्वत्रच आढळते.खास करून ग्रामीण भागात हे अजूनही आहे .मात्र स्वतः महिलांनी आता पुनर्विवाहासाठी स्पष्टपणे आपल्या इच्छा कुटुंबासमोर मांडायला हवेत. स्त्रियांनीही आपल्यासाठी असलेल्या कायद्यांची माहिती घेतली पाहिजे. यामुळे कित्येक कुटुंबे स्थिरस्थावर होतील.
इस्लाम धर्मात मात्र विधवा तसेच घटस्फोटिता यांच्याशी विवाह करण्यास मान्यताच नव्हे तर प्रोत्साहनच देण्यात आले आहे. स्वतः प्रेषित मुहम्मद यांनी स्वतःपेक्षा 15 वर्षांनी मोठ्या असलेल्या घटस्फोटिता तसेच विधवा असणाऱ्या स्त्रीशी विवाह करून समाजापुढे आदर्श निर्माण करून दाखविला.त्यामुळे घटस्फोटिता किंवा विधवांशी विवाह करण्याची आजच्या काळाला गरजेची आदर्श रीत मुस्लिम समाजात आढळते.
शासनही काळाप्रमाणे कायद्यात बदल करत आहे. ही एक जमेची बाब म्हटली पाहिजे. शासकीय सेवेतील कर्मचाऱ्याचे निधन झाल्यानंतर दिवंगत कर्मचाऱ्याच्या विधवा पत्नीला शासनाकडून निवृत्ती भत्ता दिला जातो. मात्र कर्मचार्‍याच्या पत्नीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर दुसरे लग्न केल्यास तिला मिळणारा लाभ काढून घेण्यात येत होता. मात्र राज्य शासनाच्या अर्थ विभागाने सात फेब्रुवारी 2019 रोजी जारी केलेल्या अधिसूचनेनुसार 11 जून 2015 पूर्वी पुनर्विवाह केला असेल तर त्यांनाही या अध्यादेशानुसार लाभ मिळणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम 1982 मधील नियम 116 (5)( एक) मध्ये सुधारणा करण्यात आल्यानंतर शासनाने नवा अध्यादेश जारी केला आहे.
क्रांती किंवा बदलाव ही तरुण पिढीच करू शकते. आपल्या तरुण मुलाचा विवाह एका विधावेशी लावल्यानंतरच विधवा पुनर्विवाहाचा लढा ईश्वरचंद्र विद्यासागर यांनी खंबीरपणे दिला होता.महर्षी धोंडो केशव कर्वे यांनी तर स्वतः बालविधवेशी 1893 मध्ये विवाह केला होता.
विधवा स्त्रीला लग्नावेळी मिळालेली रक्कम, दागिने मिळत. तेच त्याचे धन असे. त्यांच्या पतीच्या मिळकतीवर हक्क नसे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 'हिंदू कोड बिल' आणले. या हिंदू कोड बिल यामुळे हा भेदाभेद नष्ट होऊन स्त्रीला पतीच्या मिळकतीत समान वाटा मिळाला. मुलाप्रमाणे मुलींनाही वडिलांच्या मिळकतीत समान हक्क देण्यात आला. डॉक्टर आंबेडकरांनी भारतातील सर्व जाती धर्मातील स्त्रियांना जाचक रूढी आणि परंपरा पासून सुटका मिळावी यासाठी हा मसुदा लिहिला. यामध्ये आठ अधिनियम आहेत. महत्त्वाचे म्हणजे हिंदू विवाह अधिनियम, दत्तक ग्रहण अधिनियम, वारसदार अधिनियम तसेच हिंदू विधवा पुनर्विवाह अधिकार अधिनियम यामध्य देण्यात आले होते, परंतु या बिलाला सनातन्यांनी आपले वर्चस्व जिवंत ठेवण्यासाठी जोरदार विरोध केला. भारतीय महिलांना सन्मानाची व समानतेचा अधिकार मिळवून देणाऱ्या या बिलाला संविधान सभेत मंजुरी मिळू शकली नाही यामुळे व्यथित होऊन डॉक्टर आंबेडकरांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सत्तेपेक्षा महिलांना हक्क मिळणे त्यांना महत्त्वाचे वाटत होते. त्यांनी सत्तेसाठी तत्व सोडले नाही तर तत्वासाठी सत्तात्याग केला. पहिल्या लोकसभा निवडणुकीनंतर टप्प्याटप्प्याने हे हिंदू कोड बिल संसदेत मंजूर करण्यात आले. 1856 मध्ये हिंदू विधवा पुनर्विवाह कायदा झाला. हा भारतातील विधवा स्त्रियांना एक नवा आरंभ देणारा कायदा होय. यानुसार विधवेने केलेल्या पुनर्विवाहामुळे तिच्या नव्या कुटुंबातील सर्व मालमत्तेवर तिला एक समान वारस म्हणून हक्क प्राप्त होतो. 1937 मध्ये हिंदू स्त्रियांच्या संपत्तीविषयक अधिकाराचा अधिनियम मंजूर झाला.त्यानुसार विधवा स्त्रीला तिच्या मुलांच्या बरोबरीने पतीच्या मालमत्तेत वारसाहक्क दिला गेला. स्वातंत्र्योत्तर काळात 1956 मध्ये हिंदू उत्तराधिकारी अधिनियम मंजूर झाला. त्यायोगे दत्तकविधान अधिनियमानुसार विधवा स्त्रीला मूल दत्तक घेण्याची कायदेशीर मंजुरी दिली गेली.
देशाचा सामाजिक व आर्थिक विकास पुरुष व स्त्रिया या दोघांच्या वरही बरोबरीनेच अवलंबून आहे. जेव्हा स्त्री-पुरुष दोघेही देशाच्या विविध क्षेत्रात कार्यरत होतील, अग्रेसर होतील तेव्हाच देशाचा विकास होईल. निव्वळ पुरुषांचा विकास झाल्याने आणि महिलांचे दमन झाल्याने कोणतेही सामाजिक स्वास्थ्य निर्माण होत नाही. खरेतर असे पाऊल साऱ्यांनीच उचलले पाहिजे जेणेकरून स्त्रियांना बरोबरीचा हक्क मिळेल. मग ते शिक्षण असो, नोकरी असो वा मुख्यत्वेकरून घर.
विधवा पुनर्विवाह अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येकाला आपले सुख दुःख वाटून घेण्यासाठी एका सोबतीची गरज असते, आणि ती सोबत पती वा पत्नीचीच असते. म्हातारपणात तर व्यक्ती अधिक एकाकी होत असते. जर वृद्धावस्थेत सोबत मिळण्याच्या दृष्टीने विधवा स्त्रीशी विवाह करणे हे स्त्री-पुरुष दोघांसाठीही अत्यंत योग्य आहे.
माझ्या पाहण्यात जशा दैनंदिन समस्यांशी दोन हात करणाऱ्या विधवा आहेत, तसेच विधवा, घटस्फोटिता यांच्याशी सन्मानाने विवाह करून त्यांच्या मुलांनाही स्वतःचे पाल्य म्हणून स्वीकारणारे प्रथम वरही पाहिले आहेत.अर्थातच हे प्रमाण अत्यंत कमी आहे.तरीही बदलणाऱ्या समाजाचे आशादायक चित्र नक्कीच आहे.
पुनर्विवाह म्हणजे स्वैराचार नव्हे तर माणुसकीचे दर्शन आहे. या साऱ्यासाठी केवळ सरकार नव्हे तर समाजाचे विचार बदलण्याची गरज आहे, आणि आपण सारे या समाजाचाच एक भाग आहोत. हे विसरून चालणार नाही.

सौ.संपदा कानिप बागी-देशमुख

९४०४९६८१३२

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle