बेर्था बेंझ - पहिल्या ऑटोमोबाईल प्रवासाची कहाणी

अगदी सुरुवातीलाच इथे आल्यावर Stuttgart ला मर्सिडीज म्युझियम बघायला गेलो होतो, तेव्हा पहिल्यांदा बेर्था बेंझ हे नाव ऐकलं. ते म्युझियम खूप आवडलं होतं, केवळ भारी भारी गाड्या बघायला मिळाल्या म्हणून नाही, तर चाकाच्या शोधापासून ते आताच्या अत्याधुनिक गाड्यांच्या तंत्रज्ञानाचा प्रवास तिथे अतिशय उत्तम पणे दाखवला आहे म्हणून ते खूप आवडलं. त्या आधी मानहाइम या गावाबद्दल माहिती शोधत असताना, कार्ल बेंझ हे नाव वाचून थोडी त्याचीही माहिती वाचली होती. पण ही ओळख इथवरच मर्यादित होती.

त्यानंतर आम्ही जिथे राहायला गेलो, तिथे रोजच "बेर्था बेंझ मेमोरियल रुट" ही पाटी दिसायची. त्याच दरम्यान मिसळपाव या मराठी संस्थळावर वर एक लेख वाचला ज्यात Bertha बद्दल उल्लेख होता. ते वाचून मग नेट वर याबद्दल अजून शोधलं. Wikipedia वर माहिती वाचलीच, बरेच व्हिडिओ पण पाहिले. तोवर जर्मन भाषेला पण सरावलो असल्यामुळे काही जर्मन व्हिडीओ, लेख हेही पाहिले. त्या सगळ्या जागांपासून अगदी जवळ राहत असल्याने काही जागांना भेट पण दिली, तेव्हा पासून याबद्दल लिहायचं ठरवलं होतं.

बेर्था रिंगर - बेंझ आणि तिचा नवरा कार्ल बेंझ आणि जगातल्या पहिल्या ऑटोमोबाईचा शोध याबद्दलची ही कहाणी -

प्राण्यांच्या मदतीने चालणाऱ्या गाडयांना पर्याय म्हणून इंधनावर चालणाऱ्या गाड्या, इंजिन बनवण्याचे संशोधन १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात वेगेवगेळ्या लोकांकडून जगभर चालू होते. जर्मनी मधल्या मानहाइम शहरात कार्ल बेंझ हा एक इंजिनियर पण याच वेडाने झपाटला होता.

मुलींना तेव्हा जर्मनीतही शिक्षणाच्या सहज संधी नव्हत्या. फोर्त्झहाइम (Pforzheim) या गावात राहणार्‍या बेर्थाचे वडील त्यांच्या गावातलं तसं मोठं प्रस्थ आणि सधन आयुष्य जगणारं कुटुंब. बेर्थाला नवव्या वर्षी जेव्हा शिकण्याची संधी मिळाली, तेव्हाही तिचा मुख्य कल हा नवीन तंत्रज्ञान आणि विज्ञान अश्या विषयांकडे होता. त्याआधी सुद्धा, तिच्या वडिलांच्या कारखान्यात दिसणाऱ्या नवनवीन बाबी समजून घेण्याची तिला आवड होतीच. पण 'ही मुलगी झाली याची खंत आहे' अश्या अर्थाचे तिच्या वडिलांनीच लिहिलेले जेव्हा बेर्थाला समजले, तेव्हा त्यातूनच तिची ही काहीशी बंडखोर, आणि मुलींना कुणी कमी लेखू नये अशी वृत्ती होत गेली असावी.

योगायोगाने कार्ल बेंझशी झालेल्या भेटीत आणि त्याच्या या गाडी शोधाच्या स्वप्नाबद्दल ऐकून, बेर्थाने त्याच्याशीच लग्न करायचे ठरवले. कार्ल हुशार असला तरी गरीब होता, शिवाय काहीसा विक्षिप्तच दिसायचा. बेर्थाच्या घरी मात्र अगदी श्रीमंती होती. त्यामुळेच तिच्या वडिलांनी "तुला हे असं गरिबीतलं आयुष्य जमणार नाही" असं सांगून या लग्नाला विरोध केला. पण बेर्था मात्र ठाम होती. तिने लग्नातला हुंडा सुद्धा पूर्णपणे कार्लच्या कामासाठी दिला. हा हुंडा तिने लग्नाआधी त्याच्या कामाची गुंतवणूक म्हणून दिला, कारण नियमाप्रमाणे लग्न झाल्यावर तिने गुंतवणूक म्हणून पैसे देणं हे त्यावेळच्या सामाजिक नियमांमध्ये बसणारं नव्हतं.

पहिली अनेक वर्ष गरिबी होतीच, आणि पाच मुलांसोबतचा हा संसार बेर्था साठी अवघड होता. पण ऑटोमोबाइल बनवण्याचा ध्यास घेतलेल्या कार्ल सोबत, बेर्था सुद्धा बरोबरीने त्याच्या कामात मदत करत होती. त्याच्या गाडीचे फिल्ड टेस्टिंग करणे, त्यातून येणाऱ्या अडचणी सांगणे, त्यात सुधारणा सुचवणे आणि कार्ल सोबत स्वतः पण त्यावर काम करणे हे सगळं ती करत होती. अखेरीस अनेक वर्षांच्या प्रयत्नातून कार्ल बेंझला पहिले, ऑटोमोबाईलचे पेटंट मिळाले आणि तो ऑटोमोबाईलचा जनक ठरला. (याच काळात इतरही काही संशोधकांचे काम देखील चालू होते, आणि आता नामवंत मोटार कंपनीज म्हणून ओळख असणाऱ्या अनेक ब्रँडचे जनक हे या काळात गाड्यांचा आजचा इतिहास घडवत होते)

विवाहित महिला म्हणून तिचा या पेटंट मधला वाटा मात्र तिला नाकारण्यात आला. आता पेटंट झाले, तरी कार्ल मात्र अधिकाधिक उत्तमोत्तम सगळं करण्याच्या मागे होता, याचे मार्केटिंग व्हायला हवे हे त्याच्या पचनी पडत नव्हते. त्याची ही गाडी अजूनही त्याच्या वर्कशॉप मध्येच होती, जवळच्याच अंतरात फिरून आली तरी म्हणावी तशी जगासमोर आली नव्हती. नुसतं ऐकून, पेटंट मिळूनही लोक काही विकत घ्यायला उत्सुक नव्हते. अश्या प्रकारच्या उद्योगांना, याचे मास प्रोडक्शन करण्यासाठी गुंतवणूक म्हणून पैसे द्यायलाही कुणी पुढे येत नव्हतं. आणि हे सगळ्यांसमोर यायला हवं, त्याची उपयुक्तता कळायला हवी, हा बेर्थाचा आधी पासूनचा आग्रह होता. याबद्दल अनेक प्रयत्न करूनही, अखेर कार्ल ऐकत नाही हे बघून एक दिवस अत्यंत ठाम निश्चय करून, आपल्या दोन मुलांना घेऊन बेर्था पहाटेच ही गाडी घेऊन निघाली. याबद्दल कार्ल किंवा कोणत्याही संबंधित अधिकाऱ्यांच्याशी परवानगी तिने घेतली नव्हती, टी नाकारण्यात येईल याची तिला नक्कीच कल्पना असेल. सुरुवातीला आवाज होऊ नये म्हणून तिने ढकलत गाडी बाहेर आणली आणि नंतर दूरवर येऊन गाडीचे इंजिन चालू केले.

नेहमी ज्या रस्त्यानी फक्त घोडागाड्या जात, तिथून एक तीनचाकी गाडी चालते आहे, त्यातून तिची सारथी एक महिला आहे, तिच्यासोबत दोन लहान मुलं पण आहेत यामुळे साहजिक लोक आश्चर्याने बघत राहिले. काहींना भीती वाटली, तर काहींनी तिला भुताटकी पण ठरवले. पण तरी अनेकांना हे सगळं स्वप्नवत सुद्धा दिसत होतं. बेर्थाला हेच हवं होतं. वाटेत येणाऱ्या अडचणींना बेर्थाने समजून घेऊन योग्य ते उपाय शोधले. वूडन ब्रेक्स नीट चालेनासे झाले म्हणून तिने लेदर वापरून काही बदल केले, ज्यातून ब्रेक लायनिंगचा शोध लागला. इंजिन गरम होऊन जेव्हा गाडी बंद पडली तेव्हा पाण्याचा कुलिंग एजंट म्हणून वापर केला गेला. विझलॉख (Wiesloch) या गावाजवळ आधी गाडीत असलेले इंधन संपल्यामुळे गाडी बंद पडली. गाडी तशीच ढकलत नेऊन बेर्थाने औषधांचे दुकान शोधले. तिथे जाऊन तिने ligroin नावाचे केमिकल मागितले. तिच्या ड्रेस वर पडलेले काळे डाग स्वच्छ करायला ते हवं आहे असं वाटून त्या दुकानदाराने देखील तिची चेष्टा केली. पण दहा लिटर ligroin विकत घेऊन बेर्थाने त्याचा योग्य वापर केला, आणि खरोखरीच गाडी पुढे निघाली. जगातला पहिला पेट्रोल पंप (गॅस स्टेशन) अशी ओळख मिरवणारं हे औषधांचं दुकान. मूळ डिझाईन आणि इंजिनियरिंग उत्तम असेल, तरी या प्रॅक्टिकल अडचणी काय येऊ शकतात हे या प्रवासातून लक्षात आले, आणि त्या सगळ्यावर बेर्थाने वेळच्या वेळी योग्य उपाय देखील स्वतःच शोधले. मानहाइम (Mannheim) हून निघून तब्बल १०६ किलोमीटर प्रवास करून ती फोर्त्झहाइम (Pforzheim) मधल्या माहेरच्या घरासमोर थांबली आणि कार्ल ला याबद्दल तार करून कळवले.

येतानाच्या रस्त्यात आलेल्या अडचणी लक्षात घेऊन बेर्थाने हुशारीने परतीचा मार्ग वेगळा, कमी चढ उतार असलेला निवडला. आणि पुन्हा असाच मोठा प्रवास करून यशस्वी रीत्या पुन्हा घरी पोचली. ही तिची सफर जगातली कोणत्याही ऑटोमोबाईलची पहिली इतकी मोठी अशी सफर ठरली. ज्या गाडी कडे लोक तुच्छतेने बघत होते तीच गाडी पुढे मास प्रोडक्शन मध्ये येणारी पहिली गाडी ठरली.

हा मानहाइम मधला कार्ल बेंझच्या स्मरणार्थ एक शिळा आणि त्याची पहिली ऐतिहासिक पेटंटेड ऑटोमोबाईल असा फोटो -

1

2

3

4

गंमत अशी की यातल्या एका फोटोत उजव्या बाजूला उभी दिसते आहे ती इलेकट्रीक रोलर, हिरव्या रंगातली. हे अगदी योगायोगाने झालं, पण त्याच वेळी विचार आला की त्या कंपन्यांचे ऍप आहेत, रजिस्टर करा, ऍप वर जवळपास शोधून स्कॅन करा, कुठूनही कुठेही नेऊन ही पार्क करा, लॉक करा, वेळ किती झाला त्याप्रमाणे पैसे द्या अशा तत्वावर या चालतात. जवळच्या अंतरासाठी पायी चालत जाण्या ऐवजी हा पर्याय अनेक जण आता वापरतात. काही तर केवळ गंमत म्हणूनही वापरतात. हे सगळं आधुनिक तंत्रज्ञान आपण सहज स्वीकारलं आहे. इलेक्ट्रिक गाड्या, संपूर्ण स्वयंचलित गाड्या असा प्रवास होतो आहे. गाडी हा एक स्टेटस सिम्बॉल झाला आहे. तेव्हा नवीन तंत्रज्ञान स्वीकारायला सुद्धा लोक सहज तयार नव्हते, आणि आता मात्र दर दिवशी नवीन तंत्रज्ञान विकसित होतं आणि आपणही सहजपणे ते अंगिकारतो.

हा तिच्या पहिल्या मानहाइम - फोर्त्झहाइम - मानहाइम (Mannheim - Pforzheim - Mannheim) अश्या प्रवासाचा रस्ता आता "बेर्था बेंझ मेमोरियल रूट" म्हणून ओळखला जातो. आम्हाला अगदी रोज हा रस्ता दिसतोच, जवळपास फिरताना नेहमीच इकडून तिकडून बेर्था भेटत राहते. प्रत्येक वेळी ही पाटी बघून बेर्था बद्दल कौतुक, आदर वाटतो. कोणतेही व्यावसायिक तर नाहीच, प्राथमिक शिक्षण सुद्धा पूर्ण न करता आलेल्या बेर्थाने आपल्या विश्वास आणि मेहनतीने, अनेक अडचणींना तोंड देऊन ऑटोमोबाईल क्षेत्रात पाया रचला. कार्ल बेंझ आणि त्याची ऑटोमोबाईल यांना खरी ओळख मिळवून देण्यात तिचे सगळ्यात महत्वाचे योगदान होते.

GPS शिवाय जिथे आता प्रवास होत नाही, तेव्हा तिने मात्र परतीचा रस्ता निवडताना योग्य अभ्यास आणि नियोजन करून वेगळा मार्ग घेतला. अत्यंत निष्ठेने कार्ल सोबत त्याचे हे स्वप्न ती पण जगली. एका अर्थाने पहिली ऑटोमोबाईल ही एका महिलेनेच चालवली असं म्हणू शकतो. अश्या या जगातल्या पहिल्या ऑटोमोबाईलचा प्रवास करणाऱ्या बेर्थाची ही कहाणी.

हे विझलॉख मधले औषधांचे दुकान आणि बेर्थाच्या स्मरणार्थ असलेले शिल्प -

5

6

7

आणि ही या रूट ची पाटी -

8

या काही इंग्रजीतून बेर्था बद्दल माहिती देणाऱ्या लिंक्स -

https://www.mercedes-benz.com/en/classic/bertha-benz/

https://en.wikipedia.org/wiki/Bertha_Benz

https://en.wikipedia.org/wiki/Benz_Patent-Motorwagen

https://youtu.be/JBL_G-C51Dk

https://youtu.be/3lJQSxpnKTE

आणि हे दोन मराठीतून याच संदर्भात वाचलेले लेख -

https://www.misalpav.com/node/30673

https://www.misalpav.com/node/28984

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle