तृणखोल चा धडा क्रमांक २

अजून अडीच तासांचा रस्ता आहे असा साधारण अंदाज तिथल्या बोलण्यावरून आला होता. वाटाड्या काहीच सांगत नव्हता. पटपट पाऊलं उचला, घोडे घ्या म्हणत होतो ते ऐकलं नाहीत वगैरे बडबड करत होता. एकतर त्याचा accent त्यातून वाटाड्या म्हणून करायच्या गोष्टींचा काहीच अंदाज नसणे, जवळ पाणी टॉर्च वगैरे साध्या गोष्टी पण न ठेवणे, ज्याला गरज असेल ( माझ्या मैत्रिणीला शुगर आहे बरीच तिला थोडा आधार लागत होता अधून मधून. ) त्याला सोडून दुसऱ्याच लोकांशी गप्पा, सगळ्यात पुढे चालत राहणे आणि मागे वळून न बघता झपाझप आमच्या बरंच पुढं जाऊन थांबणे वगैरे चालू होते. आम्ही अधून मधून त्याला दादा आमच्याबरोबर थांबा काही लागलं तर मदत होईल. आम्हाला दिसेल इतक्याच लांब जा वगैरे गोष्टी सांगत होतो. पण दादा त्यांच्या मर्जीप्रमाणे वागत होते.

आता रस्ता थोडा सपाटीचा किंवा कमी elevation चा होता. त्यामुळे जरा हुश्श झालं होतं. शिवाय पाऊस पण रिमझिम होता. सुरेख संधिप्रकाश पडलेला. आता आम्ही बऱ्यापैकी रिमोट जागी पोचलो होतो. मोबाईल रेंज गेली होती. आणि वेगळेच दृश्य आजूबाजूला. उंच झाडांच्या, झऱ्यांच्या भेटीला सुरुवात झाली होती. पाण्याची चिंता मिटली होती. नितळ आणि अतिशय चविष्ट पाणी. लांबलचक पसरलेली कुरणं दिसत होती. कुठं तरी चरणाऱ्या गाई आणि घोडे दिसत होते. फार छान वाटत होतं. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याची किंवा स्वर्गाची वाट अशीच असेल. इतकं हलकं वाटत होतं की एकदम तरंगत जाण्याचा फील होता. ( पाय नंब होऊन sensesation गेलं होतं हे मेन कारण, आणि माझी एकूण अवस्था बघून मी नको म्हणत असताना माझी सॅक नवऱ्याने त्याच्याकडे घेतली होती हे दुसरं. ) मग थोड्या वेळाने पाऊस जरा जोरात सुरू झाला. पोंचो घालून चालायला सुरुवात केली. अधून मधून असं वाटायचं की आलंच बहुतेक. आता आलं का जवळ हा प्रश्न विचारला की फैयाज (आमचा वाटाड्या) नाही इतकं उत्तर द्यायचा.

अंधार पडायला लागला होता. पाऊस होताच.
खाली चालताना आणि चढताना थोड्या वेळाने उकडायला लागलं होतं. आता मात्र हवा pleasant झाली होती. लाईट जॅकेट घालण्या इतकी. पण poncho घातले होते already. विचार न करता चालत रहा,म्हणजे कधीतरी पोचालच. हा मध्ये भेटलेल्या ट्रेकर्स नी दिलेला मूलमंत्र.
इलाज नसतोच, परतीचा ऑप्शन पण नसतो. एकच मार्ग, पुढं जात राहणे.
असेच किती काळ चालत राहिलो कुणास ठाऊक. एका पॉइंट नंतर पायांसरखं मन पण नंब झालं होतं. बाकी विचार बंद झाले होते. पाय दुखणे, एकमेकांना सांगणे, किती उरलं हे विचारणे सगळं बंद झालं होतं. आपण स्वतः, आपल्या समोरची आता दिसेनाशी झालेली वाट आणि दिसेल न दिसेलसा भवताल याची अंधुक जाणीव आणि त्यात होत राहणारी आपली forward movement इतकंच उरलं होतं. वाटाड्या समोर चालतो आहे हे जाणवत होतं. सगळे टॉर्च पोनिज वरून मुक्कामी पोचले होते. वाटाड्या साहेबांनी त्यांच्याकडे पण टॉर्च नसल्याची बातमी दिली होती. आम्हाला एक धडा शिकवण्यासाठी च ही नियंत्याची योजना असणार.

आता चांगलाच अंधार पडला होता. पाऊस जोरात होता आणि त्यामुळे मोबाईल चा लाईट वापरणं शक्य नव्हतं. ट्रेकिंग sticks हातात आहेत की नाहीत हे समजू नये इतकी हाताची बोटं गारठून गेली होती, चेहऱ्यावर पावसाचा मारा आणि थंड वाऱ्याचे झोत याने चेहरा पण बधीर झाला होता.

एका वळणानंतर आता आपण उतरणीला लागलोय इतकं कळलं. पायाखाली खूपच मोठे दगड यायला लागले. माझ्याही नकळत डोळे झरायला लागले. अति पायदुखी, हात, चेहरा यांना खूप पाणी आणि थंडी लागून आलेली बधिरता आणि सतत सात आठ तास चालण्याने मनाला झालेला हिप्नोसिस यापैकी काय होतं माहिती नाही. पण मी चालत चालत रडत राहिले. +१ ने माझा हात पकडला. त्याला वाटलं मी घाबरले आहे. तो आलंच आहे बहुतेक जवळ, मी आहे ना चल वगैरे म्हणून माझी समजूत काढत होता. वाटाड्याने स्वतःचा मोबाईल काढून मला रस्ता दाखवायला सुरू केलं. पायापूरत्या मिणमिणत्या प्रकाशात दगडांच्या ओघातून आपण चालत आहोत हे लक्षात आलं.

डोळे झरायचे बंद होईनात. खाली आणि चौबाजूनी पसरलेला किट्ट काळोख, आजूबाजूला अतिशय सुरेख दृश्य असलं तरी आपली अंधारामुळे ते न पाहता येण्याची हतबलता. सत्य इतकंच की आपल्याला दगडांवरून या अशा अवस्थेत चालत राहायचं आहे. आशा होतीच की थोड्या वेळात आराम , विश्रांती ऊब मिळणार आहे. पण तिथवर पोचणार का हेही माहिती नव्हतं अशी अवस्था.

असंख्य विचार मनात, आपली जवळची माणसं, त्यांची आयुष्यं. त्या अतिशय नवख्या टेरेन वर, थंडी आणि भरपूर पावसात मी अशी का चालते आहे? काय विचार करून इथं आले आहे मी? मनात विचारांची कॉन्फरन्स आणि बाहेरून येणारे इतरांचे क्षीण आवाज. वाटाड्या म्हणत होता, कॅम्प आलाच आहे जवळ पण आपण आधी एका घरी जाऊ आणि जरा गर्मी करू. मॅडम ना थंडी लागली आहे. मॅडम आलंच हां आता, आता पोचलं की गर्मी होईल. हे सगळं ऐकून काही बरं वाटलं असं पण नाही. मी वेगळ्याच विश्वात होते.

मग त्याने शिट्ट्या वाजवून अजून लोकांना बोलवलं समोरच्या दरीतून डोन तीन लोक आले. आमच्या मित्रांचे हात धरून घेऊन निघाले. त्यांच्याकडे टॉर्च होते. एक माणूस आम्हाला टॉर्च दाखवत पुढं चालत होता. आता समोर एक घर आलं. माती दगडांनी बांधलेलं. त्यात थोडा प्रकाश.

दारातून आत जाताच दोन्ही बाजूंना कमरेपर्यंत भिंती. एका बाजूला एक आणि दुसरीकडे एक अशा दोन चुली पेटलेल्या. दोन भाऊ आणि त्यांचे परिवार त्या घरात राहत होते. मला कुणीतरी एका चुलीपुढे बसवलं.घरात दिवे , वीज हा प्रकार नव्हता. उजेड काय तो चुलिंचाच. एक देखणी मुलगी डोक्यावर ओढणी गुंडाळलेली तिथं पाणी तापवत होती. शागुफ्ता नाव तिचं. एकदम confident आणि गोड.
तिच्याशी गप्पा मारत मी हळूहळू माणसात आले. इतकी माणसं त्या छोट्याशा घरात बसली होती. आम्ही चौघे त्यात भर. ते भाऊ ,त्यांच्या बायका, मुलं, अजून दोन दीर, एकीचा भाऊ असे अनेक लोक.सगळ्यांची त्या मंद चुलीच्या प्रकाशात बडबड.

हे गुज्जर म्हणजे shepherds किंवा गोपाळ. यांच्या गाई होत्या. गाई किंवा मेंढ्या पाळणारे हे लोक. उन्हाळ्यात वर येतात. सगळ्यांचे वर एक घर आणि खाली नारानाग किंवा जवळपास एक घर. खालचे घर नीट बांधलेले. मुलं तिथल्या शाळांत जाणारी. उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की सगळे वर. सुट्ट्या म्हणजे परमिशन घेऊन चांगले तीन महिने इथं राहणार ही मुलं पण. एकूण सगळ्यांचे अवतार गरीब पण बऱ्यापैकी कमावणारे लोक. हे घर गळतं आहे. इतक्या वर्षात कधी गळलं नव्हतं म्हणाले. दोन दिवसांपूर्वी इतका पाऊस झाला त्यामुळं.

शागुफ्ताला काय आवडतं फ्री टाईम मध्ये काय करतेस म्हटल्यावर ती म्हणाली ड्रामे देखती हू. म्हटलं कोणते तर म्हणाली युट्यूब पे. मग माझ्या लक्षात आलं. म्हटलं पाकिस्तानी? तर अगदी हो नाही म धला हुंकार. ( नंतर मला नवऱ्याने सांगितलं की तिच्या आईने तिला इशर्याने गप्प बस असं सांगितलं) मी म्हटलं मस्त असतात ना. मी जिंदगी गुलजार है पाहिलीय. खूप आवडली. मग ती एकदम खुलली.

पाऊस पाणी, पुढं कसं आहे. आता हिवाळा सुरू होईल तर लौकरच सगळे खाली जायला निघू वगैरे गप्पा चालू होत्या. वर येताना गायी मेंढ्या घेऊन खाली उतरणारे काही लोक आम्हाला भेटले होते.

मग tents आणि जेवण तयार आहे चला असं वाटाड्या आणि कूक म्हणाले. तेवड्यात खारा चहा आला. जरा विचित्र चवीचा पण ऊब देणारा.
तो घेऊन टेन्ट पर्यंत आलो पाच मिनिटात. आत घुसलो . चेंज करून thermals, gloves घालून जरा डोकं ताळ्यावर आलं. जेवायला किचन टेन्ट मध्ये चला असं कूक म्हणत होता पण बाहेर जायची हिंमत नव्हती. सो त्यानेच भात डाळ आणि भाजी एकाच ताटात अशी दोन तातं आणून दिली. भुकेची जाणीवच नव्हती. नवऱ्याने थोडं तरी खा आपण altitude sickness चे medicine घेतोय याची आठवण करून दिली म्हणून जबरदस्ती चार घास खाल्ले. अतिशय चविष्ट जेवण. रात्रभर झोप झाली नाही. सतत बाहेरची खुस्पुस ऐकून जाग येत होती. अधूनमधून अस्वलं येतात. बाकी सगळे प्राणी तिकडं दाट जंगलात. इथं कशाला येतील म्हणून ते लोक निवांत. पण आपल्या मनाला ते पटलं पाहिजे.

झोपेत पण एखादा प्राणी किंवा चोर टेन्ट मध्ये घुसला आहे असं स्वप्न वाटू नये इतकं रिअल पण स्वप्न की भास अशी परिस्थिती. नंतर कळलं की हा altitude sickness चाच प्रकार.
दुसऱ्या दिवशी सकाळी उठून बाहेर आलो तेंव्हा दिसलं कुठं आलो होतो ते. हेच ते तृणखोल. आमचा पहिला बेस.

पाँचो ऑन द वे
IMG-20220823-WA0016-01.jpeg

उजवीकडचे दृश्य
IMG_20220820_132737-01.jpeg

IMG_20220820_134801-01.jpeg

IMG_20220820_145803-01.jpeg

IMG_20220820_155438-01.jpeg

IMG_20220820_170927-01.jpeg

Tent समोरचे दृश्य
IMG_20220821_074037-01.jpeg

एक थकलेला आणि एक उत्साही जीव
IMG-20220823-WA0169-01.jpeg

तिथली ती दोन घरं झाडीत लपली आहेत.
IMG_20220821_073551-01.jpeg

टेन्टस.
IMG_20220821_070917-01.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle