तृणखोलचा धडा क्रमांक ३ - गंगबल च्या वाटेवर..

रात्रभर प्रचंड अस्वस्थ झोप. भास आणि जागेपणा यांच्या सीमेवर कुठं तरी. त्यातून ams ( acute mountain sickness) साठीची गोळी घेत असल्यामुळे पोटाची वाट लागली होती. अस्वलं येतात हे रात्री माहिती नसल्यामुळे आणि टॉयलेट टेन्ट सेटअप केला नसल्यामुळे "पलीकडच्या झाडीत" रात्री दोन तीन वेळा तरी जावं लागलं डोक्याला टॉर्च बांधून. त्यातून शूज चिक्क भिजलेले. Socks तर फेकून द्यावे इतके खराबझाले होते. waterproof shoe covers नेलं होतं. तेच socks वर चढवून जायचं बाहेर. ही सगळी कसरत इतकी वैतागवणी होती. पण टेन्ट खराब होऊ नये आणि बाहेर आपली कुल्फी होऊ नये यासाठी हेच ऑप्शन होते.
त्यातून शूज हा तिथला फार wanted माल आहे हे लक्षात आलं होतं. त्यामुळं ते टेन्ट मध्ये आतच एका कोपऱ्यात प्लास्टिक बॅग मध्ये घालून ठेवले होते.

दुसऱ्या दिवशी अस्वलांची माहिती या लोकांनी दिली. तरी लाईट दिसला की शक्यतो प्राणी फिरकत नाहीत म्हणे.
अशी रात्र चालल्यामुळे दुसऱ्या दिवशी मी इथंच थांबते तुम्ही जाऊन या असं सांगायचं मनात ठरवलं होतं. पण अगदी वेळ आल्यावर बोलायचं म्हणून आधी काही बोलले नाही.

एकदा त्या उबदार कोरड्या कपड्या आणि टेन्ट मध्ये घुसल्यावर हात पाय हलवण्याची पण इच्छा नवहती.
तरीही हाच कॅम्प अजून दोन किलोमीटर पुढं असता तरी चाललो असतोच रडत का होईना. वेळ आली की आपण शक्य तितकं स्त्रेच करतो हे लक्षात आलं. पण आता मन, प्राण, शरिर समस्त जनता आता बास म्हणत होती.
सकाळी साडेसहाला उठून बाहेर आलो.

समोर अतिशय नितळ कूरणं, उंच झाडांच्या रांगा, pleasant हवा आणि चहाचा दरवळ. पण.. फक्त इतकंच नव्हतं. दूर एक टोक दिसत होतं. पांढरी शुभ्र बिनी घातलेला हँडसम हरमुख. पुन्हा पुन्हा नजर तिकडं जात होती. केवळ तिथंच बर्फ होतं. भर उन्हाळ्यात पण न वितळणारं.
थोड्या वेळात सूर्य उगवला, त्याची किरणं हरमुख वर पडली आणि या सगळ्या यातायातीचं सार्थक व्हावं असं दृश्य दिसलं. शुभ्र बींनी आता पूर्ण सोनेरी झाली होती.

हे फक्त दहा पंधरा मिनिटं च बरका. एखाद्या scholar पोरानी आवडती मुलगी दिसली की थोडा वेळ सगळा गंभीरपण सोडून मस्ती करावी, हात सोडून सायकल चालवणे, केसातून हात फिरवणे, दाराच्या चौकटीवर हात ठेवून स्टाईल मारणे. आणि मग क्लास सुरू झाला की पुन्हा अभ्यासचा दिवस. तसं होतं हे.
पुढं सांगेनच याबद्दल थोडं अजून.
चहा आणि bread butter, cereals वगैरे होते नाश्त्याला.
आता मला थकवा जाणवत नव्हता, झोप न होऊन पण जागरण झाल्यासारखं वाटतच नव्हतं.

आज प्लॅन होता Gangabal lake चा. हे आमच्या छोट्याश्या ट्रेक चे समिट होतं. Gangabal lake and रिटर्न असाच प्लॅन होता. खरं म्हणजे दुसरा बेस gangabal चा होता. पण आमची हालत आणि स्पीड बघून गाईड ने सजेस्ट केलं होतं की तुम्ही gangabal ला जाऊन इथंच तृणखोल ला परत या.
कालच्या प्रॅक्टिस ने भरपूर वॉर्म अप झाला होता बहुतेक. आज त्रास कमी होता. सवय झाली होती कदाचित. छान ऊन आणि फार दगड धोंडे नाहीत
कुरणांच्या मधून बरेच रस्ते जात होते.

जवळ एक फॉरेस्ट डिपार्टमेंट चा कॅम्प दिसत होता. मस्त बांधलेला. त्याच्या मागे काराकोरम वाटावीत अशी शिखरं दिसत होती.
नंतर हरमुखबद्दल वाचलं तेंव्हा पहिल्यांदा काराकोरम रेंज मधूनच हरमुख पीक दिसलं आणि त्याची नोंद झाली ही माहिती वाचली आणि गंमत वाटली.

थोडं पुढं गेल्यावर एक आर्मी कॅम्प लागला. तिथं खूप चहलपहल होती. आर्मी चे लोक होतेच , बरेच ट्रेकर्स तिथं विश्रांती घेत होते.
गंगबल ट्रेक ला परमिट लागतं. ते आमचं होतं. ते दाखवूनच पुढं जायचं असतं.
आमच्या हुशार वाटाड्याने ते विसरलं होतं. आमच्याकडे फोन मध्ये त्याचा फोटो होता. तो दाखवतो म्हटलं तर आर्मी वाले गप्पा मारायला लागले. आम्ही त्यांचं कौतुक केलं इथं राहत असल्याबद्दल.
इथं यायचा एकच मार्ग म्हणजे चढत. किंवा घोडे. मोबाईल ला रेंज नाही. . घरच्यांशी बोलायचं तर दीड तास चालत खाली उतरून मॅगी पॉइंट ला जायचं.
काही अर्जन्सी आली तर हेलिकॉप्टर नाही येऊ शकत. Blades घासले जातात. स्त्रेचर करून लोकांनी उचलून न्यावं लागतं. फक्त अर्मीच नाही तर ट्रेकर्स ना पण इमरजन्सी मध्ये आर्मी वाले मदत करतात. त्याच आठवड्यातल्या दोन तीन घटना आम्हाला लोकांनी सांगितल्या होत्या.
तिथं त्यांनी चहा आणि snacks ठेवले होते लोकांसाठी.

त्यातला ऑफिसर नवऱ्याशी फिटनेस वर गप्पा मारायला लागला आणि +१ कडून त्याने इंच लॉस साठी प्रोटीन इंटेक वाढवण्याच्या च्या टिप्स घेतल्या. ते बघून मी थक्क झाले. Tongue
तिथं फ्लॅग फडकत होता. आम्हाला फार मस्त वाटलं ते. सुचित ने त्या ऑफिसर ला एक फोटो काढता का आमचा फ्लॅग सोबत असं विचारलं. तर त्याने हाक मारून एका सबोर्डिनेट ला बोलावून नीट फ्लॅग आणि हे लोक येतील असा फोटो काढ असं सांगितलं.

थोडं पुढं गेल्यावर आमच्याबरोबर चे सिनियर कपल म्हणाले की आम्ही परत जातो. थोडं अवघड आहे आम्हाला आता. मैत्रिणीला थोडा breathlessness होत होता.
+१ म्हणाला तुला पण जायचं असेल तर जा परत. पण मला छान वाटत होतं म्हणून मी म्हटलं नको मी पण येते.
वाताड्याला विचारलं अजून किती आहे. ये ऊस पहाडी के पार म्हणाला.
म्हटलं वा लौकर होणार आज.
तर त्या पहाडी पलीकडे अरेबियन नाईटस सारख्या अजून तीन पहाड्या चढून उतरून, मध्ये एकादं फळकुट टाकलेले किंवा सरळ रामसेतू सारखे दगडांनी तयार केलेले पूल ओलांडत आम्ही छोटा गंगबल अर्थात नंदखोल लेकला पोचलो.
या सगळ्या प्रवासात हरमुख सतत आपलं मुख आपल्याला दाखवत राहतो.

याच प्रवासात एका पहाडी वरून जाताना अशी तिरपी slanting वाट होती. खाली खोल दरी. रस्ता जेमतेम दीड फूट. कसेबसे चालत होतो. एकदा खाली लक्ष गेलं की सतत पडलो तर काय चे विचार येतात.
त्यातून मध्ये एका ठिकाणी रस्ताच नव्हता. पावसाने चिखल झालेला. फैयाज दादा नेहमी प्रमाणे पंधरा फूट पुढं होते. तेवढ्यात मला त्याचा बरीच खालून जाणारी पण एक वाट दिसली आणि तिथून बरेच लोक ये जा करत होते. केवळ वेळ वाचवायला दादांनी आम्हाला या वाटेवरून आणलं हे कळलं आणि मी फार चिडले. त्यांना म्हटलं जीवाशी खेळ करण्यापेक्षा अर्धा तास जास्त लागू दे. तर त्यांचा कॉन्फिडन्स जोरदार. काही झालं तर मी तुम्हाला पळत येऊन पकडेन ना पडू नाही देणार. पंधरा फुटावरून हा पळत येणार मागे. हां.

तर असो. पोचलो. नंदखोल म्हणजे भरपूर सपाटी. टेबल land टाईप. तिथं अनेक टेन्ट लागलेले. आणि इतकं क्यूट रंगाचं तळं होतं. ही दोन्ही तळी हर्मुख कडून सतत येणाऱ्या पाण्याने भरलेली असतात. आणि तिथून पुढं त्यांच्यातूनच छोट्या नद्या झरे वाहत असतात. Amazing होतं सगळं. अनेक ट्रेकर्स भेटले. टिप्स ची देवघेव झाली. ( घेवच जास्त. देणार काय आम्ही?)
दोन तीन दिवसांपूर्वी इतका पाऊस झाला की अनेक ट्रेकर्स अडकले, tents मध्ये पाणी घुसलं. गुज्जरंच्या घरात राहावं लागलं वगैरे सुरस चमत्कारिक कथा ऐकल्या. आणि आपण बरोबर पाऊस झाल्यानंतर झऱ्यांचं पाणी प्यायला आलो हे कळलं. कालचा तो मला रडवणारा पाऊस त्या आधीच्या पावसासमोर लिंबूटिंबू होता. त्यातही माणसं चालली होती. आसरा मिळत होता. आणि त्यानंतर पण सुरेख उन्हं पडत होती. म्हणजे that wasn't the limit. I could have done more, better.
पाणी लपिस लझुली रंगाचं. नितळ.

नंदखोलवरच थांबावं असं वाटत होतं. पण ज्यासाठी केला होता अट्टाहास ते गाठायचं होतं. आमची लंच डेट गंगबल शी होती. अजून अर्धा तास आणि दोन पहाड्या उतरून चढून गंगबलला पोचलो. हे त्याहून मोठं तळं पण इथं गर्दी नाही. लोकच नव्हते. आम्हाला सांगण्यात आलं होतं की बरीच गर्दी असेल. आदल्या दिवशी साडेसातशे ट्रेकर्स ची नोंद झाली होती. पण आम्ही गेलो त्यावेळी शांत होतं सगळं. एकतर ते लोक सकाळी निघाले असणार किंवा अजून यायचे असणार.
गंगाबल मधूनच निघालेल्या एका छोट्या नदीला दगडांच्या पुलावरून ओलांडून पुन्हा शूज आणि socks त्या थंडगार पाण्यात चिक्क भिजवून पोचलो पलीकडे. तिथं एक ट्रेकर कपडे काढून ठेवून त्या नदीकडे बघत उभा होता. त्याला म्हटलं काय विचार आहे तर म्हणाला तीन दिवस प्रयत्न करतोय आज यात अंघोळ करणारच आहे.
मस्तपैकी डबा उघडून जेवण, ज्यूस , सगळं खाऊन तासभर घालवून निघालो परत. इथलं पाणी पण निलंच. कुणीतरी आम्हाला सांगितलं होतं की ही म्हणजे इथली गंगाच. ज्यांना बनारस ला जायला होत नाही ते इथं येतात. वर्षात एकदा यात्रा असते इथं.
वाटाड्या साहेबाना विचारलं तर त्यांनी असलं काही माहिती नाही ब्वा अशा अर्थाचं काहीतरी म्हटलं.
आम्ही परत निघालो तेंव्हा तो मगाचा ट्रेकर कुडकुडत बाहेर येत होता पाण्यातून.

हरमुख च्या लोक कथा आहेत बऱ्याच. शिव पार्वती दिसतात त्याच्या शिखरावर असं म्हणतात.
हे ऐकून फार पूर्वी एका माणसाने बऱ्याचदा हे चढायचा प्रयत्न केला.
बारा वेळा. पण प्रत्येक वेळी अपयश आलं. मग एकदा तो परत जात असताना त्याला एक गुज्जर दिसला वरून खाली येताना. त्याने गुज्जराला विचारलं की वर काय पाहिलंस. तर म्हणाला काही नाही. एक कपल दिसलं मला वर. माणसाचे डोळे विस्फारले. तो म्हणाला काय करत होतं. तर तो म्हणाला गायीचं दूध काढत होते. त्यांनी मला पण कवटीतून दूध प्यायचा आग्रह केला पण मी नाही म्हणालो तर त्यांनी माझ्या कपाळावर दुधाचा थेंब टेकवला. त्या माणसाने गुज्जराचे पाय धरले.
गुज्जर कुठं ही जाऊ शकतात इतकं खरं.
बाकी हे शिखर अजून कुणीही सर केलेलं नाही.

हा साळसूद स्कोलर
IMG-20220927-WA0040-02.jpeg

ही पंधरा मिनिटांची चमको गिरी
IMG-20220824-WA0050-01.jpeg

निघालो
IMG_20220821_091231-01.jpeg

रामसेतू
IMG-20220823-WA0006-02.jpeg

छोटा पूल
IMG-20220823-WA0039-01.jpeg

समिट..
IMG_20220821_135844-01.jpeg

With the flag
IMG-20220825-WA0042-01-01.jpeg

हा एक तिथं काढलेला पॅनोरामा. उजवीकडे गंगबल आणि डावीकडे जमिनीला वळसा घालून त्याच तळ्यातून वाहणारी नदी.
IMG_20220821_132441-01.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle