तृणखोलचा धडा क्रमांक ४ - परतीच्या वाटेवर..

गंगबल हून परत निघालो. छान रमतगमत कॅम्प वर परत आलो. मी आणि न दोघेच होतो. वाटाड्या आपल्याच नादात. यामुळे हा एक माझी मैत्रीण म्हणते तसा darling trail झाला. शिवाय माझा स्वतचाही विश्वास नव्हता, पण नवरा माझा उत्साह बघून मध्ये एकदा म्हणाला, am so proud of you.. तेंव्हा तर याचसाठी केला होता अट्टाहास हा फील आला.
मस्त गप्पा मारत त्या हिरव्या सुस्नात कुरणांमधून काश्मीर च्या वादियोमधून हसत गात आम्ही परतलो. येताना आर्मी वाल्यांना पुन्हा हॅलो केलं.
येता येता कालच्या त्या गुज्जरांच्या घरावरून आलो तर दोन मुली तिथं खिदळत बसल्या होत्या आणि एक छोटी बोबडं बोलणारी गोड मुलगी हॅलो हॅलो म्हणणं संपेनाच तिचं. सतरा वेळा तरी आम्ही एकमेकिना हॅलो म्हणालो.
या ट्रेक मध्ये लहान मुलांना द्यायला आणि आपल्याला पण इन्स्टंट एनर्जी म्हणून +१ ने टॉफिज आणि चॉकलेट्स ठेवले होते ते त्यांना पण दिले.
मग त्या दोन खिदळणाऱ्या मुली आमच्या मागोमाग कॅम्प वर पण आल्या. त्यातल्या एकीने दुसरीच्या हातावर मेंदी काढली होती आणि तिला माझ्या पण हातावर काढायची होती.
तुम्ही काल शागुफ्ताच्या घरी आला होतात ना. आज आमच्या घरी याल तिने विचारलं. मी सांगितलं मी खूप दमले आहे. जरा विश्रांती घेते आणि बरं वाटलं तर येते.
मग मैत्रिणीने त्यांना मुठीये आणि चिक्की दिली.
त्यांचे बाबा आणि अजून एक दोन माणसं किचन टेन्ट जवळ आमच्या कूक शी गप्पा मारत बसली होती.
त्यांच्या गप्पा ऐकत चहा घेतला.
आज कॅम्प फायर करायचं ठरवलं होतं. त्याची पण तयारी ते लोक करत होते.
जेवण लौकर केलं आणि कॅम्प fire सुरू केलं. सुचित गिटार वाजवतो पण इथं ती आणायची लक्झुरी नव्हती. तरी गाणी म्हटली दोन तीन.
मी एक स्वतः नवं गाणं compose केलंय ते म्हटलं. ( अचानक सुचलं होतं मग नेट लावून पूर्ण लिहिलं)
मग आम्ही गोजरी गाणी म्हणा असा आग्रह केल्यावर कूक ने लग्नातलं एक आणि एक ट्रेकिंग स्पेशल अशी दोन सुरेख गाणी म्हटली. आवाज पहाडी. आमच्या इथल्या मुली लग्नात काय नाचतात बघत राहावं अशा. माझ्या लग्नाला तुम्ही नक्की या मी आमंत्रण पाठवतो असं त्याने नवऱ्याला सांगितलं.
लग्नतलं गाणं इतकं क्यूट होतं. माझा छलला हरवला आहे मला चंद्र आणून दे अशी मागणी करणारं.
मग मित्र कपल ने पण गाणी म्हटली मग आम्ही एकत्र काही जुनी गाणी म्हणालो.
मग यथावकाश झोपलो.
सकाळी उतरणीचा रस्ता. बेसला परत निघायचं होतं.
ब्रेकफास्ट करून निघालो. दोन तासात मॅगी पॉइंट ला पोचून मॅगी आणि चहा असा प्रोग्रॅम केला. तिथं एक बिहार रेजिमेंट चा आर्मी man भेटला. खूप गप्पा मारल्या. पुण्याला आलो तर नक्की येईन म्हणून नंबर exchange केले +१ बरोबर.
पुढं निघालो. आता सगळे आमच्याबरोबर उतरणारे ट्रेकर्स. त्यामुळे गप्पा जास्त होत होत्या.
पुन्हा शिट्ट्यांचे इशारे आणि घोडे आये च्या आरोळ्या.
उतरताना वेगळाच प्रॉब्लेम होता. Elevation खूप असल्यामुळे सगळा जोर चवड्यांवर पडून सगळी पायाची बोटं खूप दुखायला लागली होती. सतत सांभाळून गुढग्यावर जोर येत होता. पहिल्या दिवशी आमच्या गाईड ला अडवणारे आर्मी लोक पुन्हा भेटले. आम्हाला ओळखलं. बसून गप्पा मारल्या. बरं झालं आलात, तिकडचे लोक इथं आले की बरं वाटतं म्हणाले.
मॅगी पॉइंट चा आर्मी man पुन्हा भेटला. पुन्हा बसून गप्पा. त्याची रायफल मला बघा कशी आहे म्हणून उचलायला लावली.
आमच्याबरोबर फोटो काढला. मग गेला भराभर पुढं. बायको मुलं गावी ठेवून कसं हे लोक इकडे manage करतात देव जाणे.
आता स्पीड पुन्हा कमी होत होता. एकेक पाऊल अवघड होत होतं. पायाची बोटं नको नको म्हणत होती.
नारनाग चे पुरातन मंदिर, खालची दरी, नद्या, वस्त्या एकेक गोष्ट पुन्हा दिसायला लागली.
जवळ येतंय असं वाटलं तरी एकेक क्षण निघणं कठीण वाटत होतं. एका पॉइंट ला तर आता कधीच पोचणार नाही असा फील आला.
तेवढ्यात वाटाड्या साहेबांचा मुलगा आला. त्यांनीही चॉकलेट ची मागणी केली आणि त्यांचे इतर मित्र पण पळत आले.
यानंतर आता आलंच असं म्हणत नवरा आणि त्याचा मित्र पुढं गेले थोडे. आम्ही दोघी एकेक पाऊल almost देवाचे नाव घेतच टाकत होतो. एकतर अडीच दिवसांची दमणूक आणि त्यात पायांच्या बोटांवर पडणारं वजन याने जीव मेटाकुटीला आला होता.
आता सुरुवातीला दिसणारी कमान दिसायला लागली. अगदी दोनशे मीटर्स असेल. पण तरीही त्याला बराच वेळ लागला.
शेवटी एकदाचे पोचलो खाली.
शागुफ्ताच्या भावाचे खाली restaurant आहे. जाताना तिथं थांबलो होतो पाच मिनिटं. तिथं च जेवायला गेलो. खूप भूक लागली होती आणि ट्रेक संपल्याचे समाधान पण. जाता क्षणी आधी हायकिंग शूज काढून ठेवले. Socks सकट.
अतिशय टेस्टी जेवण. दमल्याने पण आणि भुकेने पण जास्त टेस्टी लागत होतं बहुतेक. दाल मखनी मिक्स व्हेज राजमा आणि बटर रोटी. पुण्यात मिळणाऱ्या पंजाबी ची खिल्ली उडवणारे मस्त जेवण.
आता या ट्रीप मधला अवघड पार्ट संपला होता. आता फक्त फिरणे बघणे, खाणे पिणे, खरेदी इतकेच.
पण ते करताना लक्षात आले की सगळंच अतिशय सुरेख असलं, मन निववणारं असलं तरी वर जे मरत चढत जाऊन अनुभवलं त्याच्या तोडीचं काहीच नव्हतं. दुसऱ्याच दिवशी आम्ही पुढच्या वर्षी परत तृणखोलला जाऊ आणि त्यावेळी चार दिवसांचा प्लॅन करू हे ठरवलं आहे.

IMG-20220823-WA0046-01.jpeg

मित्र कपल परत जाण्या आधी गंगबल च्या रस्त्यावर काढलेला फोटो
IMG-20220823-WA0033-01.jpeg

Campfire मध्ये गुणदर्शन करताना अस्मादिक
IMG-20220824-WA0046-01.jpeg

Keywords: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle