भारतवारी मे-जून २०२२ - भाग ३

एक तारीख आली की लगेच आई बाबा सगळ्या कामवाल्या बायकांचे पैसे काढून ठेवतात, कुणालाही पगारासाठी वाट बघावी लागू नये, वेळच्या वेळी दिलेच गेले पाहिजेत ही शिस्त. मी आले म्हणून एक कामवाली खास दोन वेळा येते, त्याचे जास्तीचे पैसे पण देतात. या सगळ्या जणी आमच्या कुटुंबाचाच भाग आहेत. पोळ्यावाली रीता म्हणजे आईची मानसकन्याच. एक दिवस तिनी आम्हाला आग्रहाने जेवायला बोलावलं होतं. मी सृजन आणि आई गेलो. तिनी अत्यंत चविष्ट अश्या कचोर्‍या, चाट आणि शिवाय सृजनला आवडतात म्हणून रंगीत पापड कुरड्या असा बेत केला होता. आग्रह करून ती वाढत होती. सृजनला तिच्या घराच्या गच्चीत फार आवडलं. म्हणून तो मला घेऊन गेला. मी वर सृजन सोबत बोलत असताना खाली पाहिलं आणि मला वाटलं की ही तर माझी शाळेतली मैत्रीण. मी विचारच करतेय तोवर तिनेच आनंदाने मला हाक मारली अनेक वर्षात आमचा संपर्क फेसबुक पुरताच, ती दुसर्‍या एका गावात होती हे माहीत होतं, ती पुन्हा बुलढाण्यात शिफ्ट झाली. खूप वर्षांनी अशी अचानक भेट झाल्यामुळे दोघीही खुश झालो, थोडा वेळ गप्पा झाल्या, थोरात मामाच्या आठवणी निघाल्या. रीताने सृजनला रंगवायचं पुस्तक दिलं. वंदना आहे ती तर आता आमच्याकडे काम पण नाही करत, पण मी आली की येतेच प्रेमाने भेटायला. बाई कस वं करमत का तुला तिकडं? असं विचारत माझ्या आता कापलेल्या केसांवरून हात फिरवला आणि किती मोठाले केस व्हते अशी आठवण काढली. किती पैसे मिळतात तुले तिकडे असं विचारलं तेव्हा तिच्या निरागसपणाचं हसू आलं आणि मी पण लई भेटत्यात असं सांगून मोकळी झाले. हा विषय मग आमच्या सख्ह्या जुन्या शेजार्‍यांशी बोलताना पुन्हा आम्ही हसलो. आमच्या फार जुन्या सरूबाई एक दिवस आल्या, त्यांनी अनेक वर्ष काम केलं पूर्वी, म्हणून आई बाबा त्यांना दर महिन्याला अजूनही थोडे पैसे देतात. एक दिवस आमची बाबी आली आणि चकल्या करून दिल्या. गरमागरम चकल्या खाल्ल्या. अशीच एक भाजीवाली बाई, कधी भाजी आणते कधी आंबे. ती मोठं टोपलीत डोक्यावर आंबे घेऊन यायची, सृजन तिला बघून oh my god, बघ ती कशी ते डोक्यावर घेऊन येते आहे, कसं जमतं तिला असं अगदी अवाक झाला होता. का ती एवढं उचलते असाही प्रश्न पडला होता. आईने त्या बाईला थोडी अक्षरओळख शिकवली होती, तिला मला भेटायचं होतं. मग तिच्याकडून आंबे घेतले, ती मग प्रत्येक वेळी दिसली की सृजन कुतूहलाने तिचं ते जड टोपलं बघायला यायचा. समोरची लताबाई सृजनसाठी म्हणून दोन अंडी तशीच देते, पैसे नको म्हणते. कष्टाचे पैसे असतात सगळ्यांच्या, त्यातून घास काढून कुणी देतं ते मौल्यवान असतं.

माझ्या जन्मदाखल्याचं एक काम होतं, म्हणून नगरपालिकेत गेलो. पहिल्यांदाच गेले मी सुद्धा तिथे. बाबांच्या ओळखीचे एक जण होते म्हणून त्यांनी येऊन सगळं ओफिस दाखवलं, जिथे काम होतं तिथे स्वतः घेऊन गेले. त्या ऑफिस मध्ये अर्ज दिला, तेव्हा एक जण दुरून बाबांकडे बघत होते आणि मग हळूच तुम्ही बल्लू देशपांडे का, क्रिकेटवाले असं विचारलं. त्यांनी बाबांना क्रिकेट खेळताना पाहिलं होतं त्याला तीस एक वर्ष झाली असतील, त्यानंतर आता इथे भेटले, मला फार छान वाटलं. अर्ज देऊन मी तीन प्रति हव्यात असं सांगितलं आणि बाहेर आलो. ऊन असलं तरी ते जुनं ब्रिटिशकालीन ऑफिस, तिथे आत छान वाटत होतं. आणि बाहेर अशोकाची झाडं, एक मोठा पिंपळ त्यामुळे छान वारा होता, आम्ही दोघं बाहेरच बसलो. मी आधी चेक करते मी कंप्युटरवरच, मगच प्रिंट करा म्हणजे कागद वाया जाणार नाहीत असं म्हणाले होते पण तरी प्रिंटच हातात आल्या, एक चूक होती म्हणून मग पुन्हा नव्याने प्रिंट घ्यावी लागली. मी काही एकही कागद वाया घालवतच नाही असंही नाही, मात्र काळजीपूर्वक प्रिंट काढण्याचा प्रयत्न असतो, आधी तपासून मगच प्रिंट करायला हवं ही सवय आता झाली आहे. पण काम अगदी पटकन झालं.

एरवी रोजच्या गडबडीत मैत्रिणींशी गप्पा होत नाहीत. घरी आल्यावर वेळ असतो आणि वेळा पण जुळतात. मग रोज एकेका मैत्रिणीशी गप्पा, सगळ्यांचे अपडेट घेणं, कोण काय करतं, कुणाची मुलं कुठे अश्या गप्पा झाल्या. गावातल्या अनेक स्नेह्यांकडे गेलो, कुणी मला भेटायला आले. सृजनच्या नवीन ओळखी झाल्या. आमचं जुनं घर आता बंद असलं, तरी तिथल्या शेजार्‍यांकडे नेहमी जाणं होतंच. तिथे गेलो तेव्हा मी सृजन एवढी होते तेव्हा या घरात राहायचे हे त्याला सांगितलं. काही अगदी जवळचे जे लोक मधल्या काळात गेले, त्यांच्या घरी जाणं अवघड होतं, पण त्याही भेटी झाल्या. मामा मामी, मामेभाऊ मामेबहीण असे सगळे सहकुटुंब आले, तेव्हा भरपूर हसणं खिदळणं झालं. मामीने खास माझ्यासाठी आणलेले अनारसे खाल्ले. पत्ते खेळलो. सृजनला तर मावशीसोबत पुण्यालाच जायचं होतं, बॅग पण भरली होती त्याने. पण प्रवास नको वाटत होता, म्हणून त्यालाही थांबवलं. पुढच्या वेळी तो पुण्यातच येणार असं त्याने नंतर तिथल्या सगळ्याच गोतावळ्याला सांगितलं.

जेवायला बाहेर गेलो तेव्हा काही भाज्या जहाल तिखट होत्या, अगदी वैदर्भीय पद्धतीच्या. एरवीही खात नाही खूप तिखट, आता तर अजून कमी झालं आहे. पण मसाला पापड आणि जरा वेगळ्या चवी, ज्या इथल्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये अजिबात मिळत नाहीत ते खाऊन बरंही वाटलं. केशर पिस्ता आइसक्रीम, कुल्फी हे सगळे प्रकार खाल्ले. शेगाव कचोरी खाल्ली. मुख्य म्हणजे घरचे आंबे खाल्ले. हे काही ठरवून लावलेलं झाड नाही, आपोआप आलं, मग आई बाबांनी नीट काळजीपूर्वक वाढवलं. यावर्षीच कैर्‍या आल्या आणि योगायोगाने आम्ही त्याच वर्षी जाणार, म्हणून आईला समाधान वाटत होतं. एका माणसाला बोलावून मग ते आंबे काढून घेतले, ते पिकवायला ठेवले आणि मग पिकल्यावर खाल्ले. ही सगळी प्रोसेस सृजनने काय, मी पण पहिल्यांदाच बघितली. झाडाला बेलफळ आलं म्हणून आनंददादाने ते आणून दिलं, कुणी जिलब्या, कुणी अजून काही, चवीने आणि प्रेमाने खास आणून देणार्‍या लोकांमुळे पोट जास्तच भरलं.

गावाबाहेर एक मंदिर झालं आहे बालाजीचं, तिथे जाताना सुमेधने गाडी चालवली. पूर्ण रस्त्यात त्याने एकदाही हॉर्न वाजवला नाही, एक दोन वेळा अगदी प्रयत्नपूर्वक कंट्रोल केला, पण तरीही आजूबाजूला अनेक जण गरज नसताना सुद्धा सतत हॉर्न देतात, तेवढं अजिबात गरजेचं नाही हे स्वतः चालवून अजूनच लक्षात आलं. त्या मंदिराजवळच एक डायनो पार्क झाला आहे. एक दिवस तिथे गेलो सृजन आणि आर्यला घेऊन. तिथे काही खेळ होते, त्यात अनेक मोठे लोकही जात होते, आम्ही दोघं नाही म्हणालो तर तिथल्या माणसाने 'ताई घाबरायचं काय नाय त्यात' असं सांगितलं. आम्ही काही घाबरत नव्हतो पण त्यात बसण्यात आम्हाला अजिबात रस नव्ह्ता. असे प्रसंग काहीसे मजेशीर असतात, एकाच वेळी मनात बरेच विचार असतात. यापेक्षा बर्‍याच मोठ्या राइड्स आम्ही केलेल्या आहेत, यात कुणाला कमी लेखण्याचा उद्देश नव्हता, जे लोक आनंदाने तिथे जात होते, ते आम्ही समजून घेऊ शकतो, सृजनलाही ते सगळं खूप आवडलं, ते आम्हाला बाहेरून बघायला आवडलं. तिथे एक ३डी शो होता तो आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. या पार्कची जागा छान आहे, इथून पुढे घाट आहे त्यामुळे तो वळणावळणाचा रस्ता दिसतो, खालच्या गाड्या दिसतात, मारुतीचं मंदिर दिसतं. स्वच्छता पण चांगली आहे, तरी शेजारी कचरापेटी असून लोक बाहेरच आइसक्रीमचं रॅपर टाकतात हेही नजरेतून सुटत नाही. तिथलं मंदिर सुरेख आहे. असे पार्क्स झाल्यामुळे गावातल्या अनेकांना जर थोडा विरंगुळा होणार असेल, तर ते चांगलं आहे.

सुमेध नाशिकला जाणार म्हणून आम्ही मलकापूर रेल्वे स्टेशन वर त्याला सोडायला गेलो. घाटावर बुलढाणा आणि घाट उतरून खाली मलकापूर, तिथे इतकं उकडत होतं की सृजनने तिथे उतरता क्षणीच, घरी परत चला असा धोषा लावला. प्लॅटफॉर्म वर गेलो तेव्हा तर त्याचा पेशन्स संप्लाच, एकाच ठिकाणी उंच सिलींग फॅन, भयंकर गर्दी, बोचके घेऊन प्रवासाला निघालेले लोक, स्टेशनवर भटकणारी रोगट कुत्री हेही बघायला मिळालं. आम्हीही मग लगेच निघालोच. बुलढाणा हे थंड हवेचं ठिकाण होतं म्हणून म्हणे इंग्रजांच्या काळात ते उन्हाळ्यात राहायचे. आता तिथेही तापमान वाढतंच आहे दर वर्षी, पण तेही कमी आहे हे घाट उतरलो की जाणवतं. परत येताना घाटावर आलो की मग गार वारा लागतो आणि एकदम बरं वाटतं.

जूनचा पहिला आठवडा आणि पाऊस हे पूर्वी अगदी हमखास असायचं. आता सध्याचे हवामान बदल बघता पाऊस वेळेत हजेरी लावेल याची खात्री नव्हती. पण मान्सून यायचा होताच, विजांचा कडकडाट, भरून आलेलं आभाळ, पावसाचे टपोरे थेंब, टिनावर पावसाचा पडणारा आवाज आणि गंधाळलेली जमीन याचा आनंद अवर्णनीय होता. गच्ची धुतली गेली, मुसळधार या शब्दाला जागणारा पाऊस इथे जर्मनीत क्वचित होतो. तो यावेळी बुलढाण्यात पुन्हा पाहिला. गच्चीत जाऊन भिजलो, सृजनने तर उन्हाळ्यात रोज गच्चीवरच आंघोळ केली आणि मग पावसात पण भिजला. पुढच्या आठवडाभरात चार पाच वेळा पाऊस झाला, त्यासोबत तरारणारी झाडं दिसली. रस्त्यावरचा चिखल पाहून आम्ही शाळेत असताना सायकल मध्ये कसा चिखल अडकायचा, काय काय उद्योग करून ते रेनकोट घालून शाळेत जायचो या आठवणी पण सृजनला सांगितल्या. अजूनही तो रस्ता झालेला नाहीच म्हणून वाइट वाटलं. (जो आता या सप्टेंबर मध्ये फायनली झाला) पाऊस आला की लाइट जायला हवेतच, तसं झालंही. सुरूवातीला काही वेळा झालं तेव्हा सृजनला त्यात काही वाटलं नाही, उलट गंमत वाटली आणि ठीक आहे, वाट बघायची आता एवढंच म्हणाला. पण नेमकं इन्व्हर्टर नाही घरी सध्या आणि पंख्याशिवाय झोप अशक्य होती. सलग काही वेळा हे विजेचे खेळ चालले, तेव्हा एकदा वैतागून मी जातो परत म्हणाला. नशीबाने प्रत्येक वेळी थोड्या वेळात लाइट आले आणि खूप पंचाइत झाली नाही. त्यातही एकदा तर बाबांच्या फोन वर या या कारणाने गेलेली वीज साधारण या वेळेपर्यंत परत येईल असा मेसेज आला, त्याप्रमाणे खरंच झालं सुद्धा. हे बघून मी फारच प्रभावित झाले होते. पाऊस आला की किडे आणि सरपटणार्‍या प्राण्यांची भीती असतेच. रोज गाद्या खाली टाकून झोपायचो. एक दिवस सकाळी गादी आवरतानाच सापाचं पिल्लू दिसलं. त्यामुळे घाबरून मग माळ्यावर कुठे काही ना, कुठे कोपर्यात नाही ना अजून हे सगळं बघून झालंच, शिवाय मी खाली झोपण्याची हिम्मत केलीच नाही.

घरातल्या सगळ्या दरवाज्यांच्या कड्या हेही सृजन साठी नवलाचं होतं. त्याच्या नजरेनी बरोबर वेगळेपण हेरलं म्हणून मग मी तेही फोटो काढून ठेवले. सृजनचे केस कापायला शेजारीच दुकान आहे, ते काका घरीच आले आणि केस कापून दिले. आई कपडे शिवते हे सृजन ऐकून आहे आणि त्याला त्याचं प्रचंड अप्रूप आहे, मग आईने त्याला यावेळी शिलाई मशीन उघडून त्यावर कशी शिलाई मारली जाते ते दाखवलं, ते बघताना मग त्याने उत्सुकतेने बरेच प्रश्न पण विचारले. तिने रांगोळी काढायला पण शिकवली.

हळूहळू आता परतीचे वेध लागले होते. मध्ये नाशिक मुक्काम आणि मग जर्मनीत परत, त्याबद्दल आता पुढच्या शेवटच्या भागात.

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle