एर्झाची गोष्ट

या वर्षी मी एर्झा भाषेचा छोटा कोर्स केला. त्यातून घडलेली ही एर्झाची तोंडओळख.
---

"šumbratado!" 'नमस्कार सगळ्यांना' (शुंब्रातादो)"
"एर्झा ही 'रिपब्लिक ऑफ मॉर्डोविया' या भागात प्रामुख्याने बोलली जाते. आज आपण एर्झा मूळाक्षरं गिरवूया."

मकाऊला स्पर्धा देतील अशा रंगात केस रंगवलेले मास्तर पहिल्या दिवशी एर्झाची तोंडओळख करुन देत होते.

"एर्झामधे ५ स्वर आहेत आणि २८ व्यंजनं."
"या अठ्ठावीस व्यंजनांमधे t, d, c, s, z, r, l, n या व्यंजनांची t́, d́, ć, ź, ŕ, ĺ, ń. आठ तालव्य रुपंही आहेत. ती दाखवायला या व्यंजनांवर खूण (diacritics) वापरतात."

मास्तर मन लावून तालव्य आवाज शिकवत होते. इथे माझ्या मराठी जीभेची गाडी 'त', 'थ', 'द', 'ध' पुढे जाईना.
"मी आजच्या पुरतं त, द, स, झ.. असं म्हणू का? माझ्या मातृभाषेत हे आवाज नाहीत."
"हो चालेल ना! पण सवय कर. तालव्यता (palatalization) हे एर्झाचं वैशिष्ठ्य आहे." मास्तरांनी आजच्या पुरती सूट दिली.

एर्झात तालव्य व्यंजनांची एकामागून एक रेलचेल असते. वाक्यात एकामागून एक नुसतीच व्यंजनं तरी येणार नाही तर तालव्य व्यंजनं सोबत घेऊन. बरं एर्झाच्या तोडीस तोड तालव्यांजवळ जाणारे असे माझ्या मराठी पोतडीतले फक्त 'च', 'ज' आणि 'झ'. बाकी सगळं भगवान भरोसे. खरं तर जीभेच्या भरवश्यावर. जीभेच्या त्यावेळच्या मर्जीवर. ती जिथे नेईल तो माझा त्या दिवशीचा उच्चार. त्यामुळे t́ejt́eŕeś मुलगी', śed́ej 'हृद्य' हे असे शब्द माझ्याच कानाला दर वेळी इतके वेगवेगळे ऐकू यायचे. दरवेळी हे तालव्य सोडूनही देता येतं नाहीत. काही शब्दांचा योग्य उच्चार न केल्यास अर्थ बदलू शकतो. जसं, pize ‘घरटं’ – piźe ‘पाऊस पडतोय’, soks ‘स्कींइंग’ – śokś ‘शरद ऋतू’.

व्यंजनांचं एक तर स्वरांचं दुसरंच. स्वरांबद्दल बोलायचं झालं तर, आपल्या ऐ, औ सारखे संयुक्त स्वर एर्झाला माहित नाहीत, र्‍हस्व, दीर्घ हा प्रकार एर्झात नाही. पाच स्वर असले तरी ते व्यंजनांच्यामधे नेहमीच कडमडतील असं नाही. एकामागून एक येणारी व्यंजनं आणि कमीत कमी स्वर ही नेहमीची स्थिती. मास्तर आपले लीलया, kstij (क्स्तीज) - स्ट्रॉबेरी, kši (क्क्षी) - ब्रेड, kšńi (क्क्ष्नी) - लोखंड, ksnav (क्स्नाव) - वटाणा, pškad́it́ (प्क्ष्कादित्) - संबोधन, असे उड्या मारत असतांना, यात नक्की तोंडाच्या कुठल्या भागातून आवाज काढायचा? 'š' येतो तेव्हा 'स','श','ष','क्ष' यातला नक्की कुठला? माझी गाडी यावर अडलेली.

एक दिवस मी कसानुसा चेहरा करुन हळूच विचारलं,
"pškad́it́ "या शब्दात आज जरा 'p' सोडून देऊ का? इंग्रजीतल्या सायकोलॉजीसारखा?"
"अजिबात नाही! शब्द अपूर्ण नाही का रहाणार. अश्शी एकामागून एक येणरी व्यंजन (consonant clusters) हेच तर एर्झाचं वैशिष्ठ्य आहे. म्हण बघू परत एकदा iśt́a pškad́it́ ńejeń..."

फोनेटिक्स तसाही आपला प्रांत नाही, आपण हिंदी, इंग्रजी काय आणि इस्टोनियन काय अस्सलखित मराठी उच्चारातच बोलतो. व्याकरण सुरु झालं की आयुष्य कसं सुखंच सुख. मी आपलं स्वतःला समजावलं.

---
आणि एकदाचं काय ते व्याकरण सुरु झालं.

"mon kortan (मी बोलते), ton kortat (तो बोलतो), son korti(तो/ती बोलतो/बोलते) ..."

"आता वाक्य बनव बघू, मी माणूस आहे, तू माणूस आहेस... "
मी लगेच वरचं वाक्यं संदर्भाला घेऊन "uĺan lomań, uĺat lomań ..."
"नाही नाही.. असं नाही, एखाद्या गोष्टीचं अस्तित्व दाखावायंच तर, शब्द आणि क्रियापदाची एकत्र मोट शिवायची.
"lomańan " (बोलतांना - माणूसेय असं - अर्थ : माणूस आहे - मी माणूस आहे)
"lomańat " (बोलतांना - तोमाणूसेय - अर्थ: तो माणूस आहे)

हे काहीतरी भलतंच त्रांगडं, असं कशाला? एर्झाचं वैशिष्ठ्य आहे नं, मग आपण असंच बोलायचं.
म्हणजे आता वाक्य बनवतांना अस्तित्वाचा विचार करावा लागणार होता.

गाडं अजून थोडं पुढे सरकलं. आता प्रश्न विचारायला शिकायची वेळ आली.

प्रश्न: "तू किलमाऊस्की आहेस का?"
उत्तरः "हो, मी किलमाऊस्की आहे." मी महत्प्रयासाने वाक्य बनवलं.
"नाही, नाही.. असं नाही."
"आता काय झालं?"

एर्झाला होकार देता येत नाही. एर्झात 'हो' म्हणायला शब्दच नाही. तसं म्हणायला रशियन मधून उसना घेतलेला 'दा' आहे पण मूळ एर्झा भाषेत प्रश्नाचं उत्तर हो असं न देता शब्दचं परत म्हटला जातो.

प्रश्नः "तुझं नाव किलमाऊस्की आहे का?"
उत्तर: "किलमाऊस्की"
प्रश्नः "तुला चहा आवडतो का?"
उत्तरः "चहा"

"हे असं का?"
"एर्झाचं वैशिठ्य आहे ना ते."

नकार द्यायला मात्र एर्झा तीन-तीन शब्द घेऊन उभी. भलतीच नकारत्मकता! a 'आ', avoĺ 'अवोल्', araś 'आरास्'. या तीनही शब्दांचा अर्थ नकारार्थी होतो.

प्रश्नः "Ton ruz?" (तु रशियन आहेस का?)
उत्तर: "Mon a ruz." (मी रशियन नाही)

प्रश्नः "Uĺi škat?" (तुझ्याकडे वेळ आहे का?)
उत्तर: "Araś." (नाही)

प्रश्नः "Ton finn?" (तू फिनीश आहे का?)
उत्तर: "Avoĺ." (नाही)

"मी एकच 'नाही' वापरु का?" तोच तो आधीचा कळवळलेला चेहरा करत मी विचारलं.
"Avoĺ, Avoĺ, तुला तीनही 'नाही' नियमानुसार वापरावे लागतील. एर्झाचं वैशिठ्य आहे ते."
हे असं एकच शब्द दोन वेळा बोलून एर्झात आपल्या म्हणण्यावर जोर देतात.
---

एर्झा आणि पर्यायाने सर्वच उरालीक भाषा भरभरुन विभक्ती प्रत्यय वापरतात. आपल्याला संवाद साधण्यासाठी आठ विभक्ती प्रत्यय पुरेसे आहेत. पण एर्झासाठी बारा विभक्ती हव्या. (इस्टोनियन, फिनिश आणि हंगेरीयनच्या तुलेनत बारा हा आकडा कमीच आहे.) या बारांपैकी काही विभक्ती मजेशीर आहेत. जसं की एखादी गोष्ट अदमासाने सांगायची असेल, 'आज अंदाजे पाच किलोमीटर चालणं झालं!' म्हणायला पाच या आकड्याला आठवणीने दहाव्या क्रमांकाच्या विभक्तीचा -ška (श्का) हा प्रत्यय लावावा लागतो. वाचतांना हा ška कुठे येतो ते नीट पहावं लागतं कारण ška म्हणजे 'अंदाजपंचे', ška म्हणजे 'वेळ' आणि ška म्हणजे 'ब्रेड'. umokoń ška 'प्राचीन काळ' या शब्दात फक्त आणि फक्त ška हा umokoń ला जोडून न आल्याने तो शब्द 'वेळ' या अर्थाने घ्यायचा.

जंगलाच्या 'आत' जायला पंचमीचा प्रत्यय , जंगलाच्या 'कडेने' जायचं तर नवमी. या सगळ्यात मला नेहमी धडकी चतुर्थीची. चतुर्थीचे प्रत्यय सहा. सहामधला योग्य पर्याय कुठला निवडावा यासाठी सगळ्यात आधी शब्दाच्या शेवटी स्वर आहे का व्यंजन हे तपासायचं. स्वर असेल तर जरा आयुष्य सोपं होतं. एक ठरलेला प्रत्यय जोडता येतो. पण व्यंजन आलं की माझ्या कानात हमखास पुलंचं 'बोंबला!' वाजणार. शेवटच्या व्यंजनाचा तालव्य जिथे असतो तो शोधायाचा आणि त्यावरुन गणित मांडून सहा प्रत्ययांपैकी एक अचून निवडायचा. म्हण्जे असं, चतुर्थीचे हे सहा प्रत्ययः -to/-t́e/-te/-do/-d́e/-de. kudo म्हणजे 'घर', मला 'घराबद्दल' असं म्हणायचं आहे तर मी या सहामधला -do पर्याय निवडणार कारण kudo हा स्वराने संपतो. पण तेच śed́ej 'हृद्य' हा 'j' या व्यंजनाने संपतो पण 'd́' हा त्याआधीचा तालव्य मग हृद्याबद्दल म्हणायला मी 'śed́ejd́e' असा पर्याय निवडणार.

असं का? विचरल्यावर नेहमीचच पालुपद.. एर्झा आणि वैशिठ्य.

चतुर्थीतून सुटका होते ना होते तोच नववी आणि अकरावी विभक्ती वेगळ्या प्रत्ययांसहीत तोच नियम घेऊन एर्झा पुन्हा समोर उभी. या बौद्धिक मारामारीला कंटाळून नंतर नंतर मी एक शक्कल काढली. जीभेला त्यावेळी रुचेल तो प्रत्यय ठोकून द्यायाचा. मास्तर आहेतच चुका सुधारायला. पण ही शक्कल फार काळ चालली नाही. मास्तरांच्या लक्षात येताच गृहपाठाला अधिकचे शब्द चालवायला यायला लागले आणि सोबतचे रशियन 'हे तुझ्यामुळे' कटाक्ष मला झेलावे लागले.

शब्दांची ही गत तर अंकाची वेगळीच. अंकानासुद्धा विभक्ती प्रत्यय लागतात त्यात पहिले १० अंक सोडल्यास पुढचे सगळेच सामासिक शब्द त्यामुळे मारुतीच्या न संपणर्‍या शेपटीसारखा वाढतच जातात. मराठीत 'एक हजार नऊशे तेहतीस ' (१९३३) एवढ्या चार शब्दात संपाणारा अंक एर्झात मात्र t́ožeń vejkse śadt kolmońgemeń kolmo असा वाढतच जातो. त्यात परत विभक्ती प्रत्ययाची जोड आहेच.

--

"आज आपण Definite Declension शिकणार आहोत." एक दिवस मास्तरांनी बॉम्ब टाकला.
"Definite Declension म्हणजे? " घ्या!, माझी सुरवात इथून होती.
"एखादी विशिष्ठ वस्तू दाखावायची असेल तर Definite Declension marker वापरतात."
"हा, म्हणजे इंग्रजीत The वापरतो तसं ना. पण उरालीक भाषांमधे तर आर्टिकल नसतात ना ?
"हे कुठे ऐकलंस? एर्झामधे वेगळ्या रुपात असतात." पुन्हा एर्झा आणि वैशिष्ठ्य.

म्हणजे आता विभक्तीसोबतच आर्टिकलशी दोन हात करावे लागणार. यावेळी मात्र मी पाणिनीचं स्मरण करुन सरळ सरळ सूत्रच बनवलं. मी बनवलेलं सूत्र Definite Declension पुढे सरकता सरकता साधारण असं दिसायला लागलं, 'मूळ शब्द + जे आर्टिकल जोडायचंय ते + विभक्ती प्रत्यय + अनेकवचनाचा प्रत्यय + सामासिक शब्द बनवतांना जोडायचा प्रत्यय++ एका विशिष्ठ व्यक्तीची वस्तू असेल तर त्यासाठी असणार्‍या सहा प्रत्ययांपैकी एक प्रत्यय.....' ते अष्टाध्यायी सूत्राच्या एकाही नियमात बसवता येईना आणि मी सूत्राचा नाद सोडला.
--

या सगळ्या जंजाळात कधी कधी मात्र एर्झा अगदीच ओळखीचा शब्द समोर घेऊन येते आणि कोड्यात टाकते. čokšńe 'संध्याकाळ' (च्योकक्षने) गुजराती चोकसच्या जवळ जाणारा, ćora (चोरा) मुलगा हिंदीला जवळ, at́a (आज्या) वयस्कर माणूस. śado 'शंभर' (शादो) संस्कृत 'शत'चं रुप तर med́ 'मध' (मेद्) संस्कृत 'मधु'चं बदललेलं स्वरुप.

हे असं हाकता-हाकता शिकण्यचा शेवटचा दिवस उगवला. आज जरा आराम म्हणावं तर मास्तर उत्साहात आले, "आज आपण एर्झा पारंपारिक कपडे आणि अलंकार शिकणार आहोत."
मी आपलं, "आत्ता? ही काय वेळ आहे अभ्यासाची. आज तर शेवटचा दिवस."
मास्तरांनी "Avoĺ, Avoĺ t́eči t́eči!" (नाही नाही, आजच) केलं.

हे असं दोन वेळा परत परत म्हणून एर्झात निर्धार व्यक्त करतात हे एव्हाना मला समजेलेलं होतं. मास्तरांनी एक एक अलंकार नाचून नाचून कुठे कुठे घालायचा ते शिकवलं. एर्झा पारंपारिक पोषख सुंदर असतो. लाल आणि पांढरा. त्यावर सुंदर नक्षीकाम आणि माफक दागिने. डोक्यावर कोन आणि मोज्यासारखे बूट.

पोशाखाची तोंडओळख झाली. एक छोटीशी परीक्षा झाली. सगळेच पास झालो. निघता निघता मास्तरांनी सहज "तुझी मातृभाषा कोणती?" विचारल. मी मराठी म्हटलं. हा प्रश्न माझे जगावेगळे उच्चार ऐकून आला आहे हे मी ओळखलंच. नेहमीप्रमाणे मराठीचा पाश्चात्य उच्चार 'मर्‍हाथी' असा त्यांच्या तोंडून आला. आता माझी पाळी होती उच्चार सुधारायची. "Avoĺ, Avoĺ 'ठ' 'ठ' .. 'थ' नाही. आमच्या भाषेचं वैशिष्ठ्य आहे ते." मग नेहमीप्रमाणे थोडा वेळ भारतीय भाषा, संस्कृतची महती यावर माफक चर्चा झाली. उरालीक भाषांमधे संस्कृतमधून काही शब्द आलेत असा कयास आहे त्यावर बोलणं झालं. मला एर्झा नक्की किती काय उजमलं, जमलं हा प्रश्नच आहे पण त्या निमित्ताने मराठी अशी जागाच्या एका कोपर्‍यात भाषा आहे हे जगाच्या दुसर्‍या कोपर्‍यात नक्की पोचलं असेल.

šumbrači! 'काळजी घ्या' (शुंब्राश्ची)
..

टीपा:

१. Republic of Mordovia या युरोपियन रशियाच्या मध्य भागात एर्झा (Erzya) ही भाषा बोलली जाते. साधारण ३ लाख लोकांत बोलली जाणरी एर्झा ही दोन मॉर्डविनिक भाषांपैकी एक आहे. दुसरी मोक्षा (Moksha).

२.वास्तविक 'मॉर्डविनिया' (Mordvinia) हे इथे बाहेरुन आलेल्या लोकांनी त्या ठिकाणाला दिलेले नाव आहे. जे स्थानिक भाषेत तसंच वापरलं जात असावं. कारण एर्झा किंवा मोक्षामधे असा कुठला शव्द आढळत नाही.

३. १९२०-३० च्या काळात एर्झा लिहिण्यासाठी सिरिलिक लिपी (Cyrillic script) तयार केली गेली.

४. सर्वच उरालिक भाषांमधे 'लिंग' वापरत नाहीत. जसं आपण, 'तो आला' आणि 'ती आली' असा लिंगाप्रमाणे क्रियापदात बदल करतो. तसं उरालिक भाषा करत नाहीत.

५. लेखात बर्‍याच ठिकाणी मी देवनागरीत उच्चार लिहीले आहेत पण ते सर्वच बरोबर नाहीत. देवनागरीत काही एर्झा उच्चार पकडणं शक्य नाही.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle