देवनागरीच्या पाऊलखुणा (२)

मागील भाग : देवनागरीच्या पाऊलखुणा (१)
--
भारतात लेखनकलेचा उगम कधी झाला हे पुरेशा पुराव्यांअभावी शोधून काढणं कठीण आहे. यावर बरीच मतमतांतर आहेत. तरीही, अशोकन शिलालेख म्हणून ओळखल्या जाणार्‍या दगडावरील शिलालेख हे भारतीय लेखनाचं उदाहरण मानलं जातं. हे शिलालेख दोन लिपींमध्ये लिहिलेले आहेत: एक खरोष्टी आणि दुसरी ब्राह्मी. खरोष्टी लिपी ही प्राचीन इंडो-इराणी लिपी. ख्रिस्तपूर्व तिसर्‍या शतकात सध्याच्या पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये याचा वापर करण्यात आला. ब्राह्मी लिपीत जे शिलालेख सापडले यात काही सध्या वापरात असलेल्या देवनागरीतली अक्षरं आहेत आणि त्यावरुन देवनागरी ही ब्राह्मीतून जन्माला आली असा सर्वसाधारणपणे निष्कर्ष काढण्यात आला आहे. ब्राह्मी लिपीत उत्तर सेमिटिक (North Semitic)१ लिपीशी काहीसं साम्य आहे. यावरुन असाही एक प्रवाद आहे की, इसवी सन पूर्व चौथ्या शतकात मेसापोटेमियन व्यापारी भारतात आले तेव्हा त्यांची लिपी सोबत घेऊन आले. याच लिपीचा पुढे विकास होऊन ब्राह्मी लिपी घडली. यावरुन लेखन कलेचा प्रारंभ भारतात इसवी सन पूर्व आठव्या ते नवव्या शतकात झाला आसावा, असं एक मत आहे. असं असलं तरी, ब्राह्मी लिपी ही उत्तर सेमिटिक लिपीतून निर्माण झाली होती हे खात्रीशीररीत्या सांगता येत नाही.

अर्थात, भारतात याअधीही लेखनकला अस्तित्वात असण्याची शक्यता नाकारता येत नाही. वेदांचं ज्ञान मौखिकरीत्या एका पिढीकडून दुसर्‍या पिढीकडे हस्तांतरीत केलं जात असे. परंतु वेदात कथन केलेली कठीण आणि किचकट माहीती फक्त आणि फक्त मौखिक स्वरुपात संग्रहीत करुन ठेवणं कठीणच. त्यामुळे अशोकपूर्व काळातही भारतात लेखनकला अस्तित्त्वात असावी असा कयास आहे. 'अक्षर' हा शब्द चांदोग्य उपनिषदात आढळतो तर 'वर्ण' आणि 'मात्रा' हे शब्द तैत्तिरीय उपनिषद आढळतात. ऐतरेय आरण्यकात शब्द आणि व्यंजनांच्या व्याख्या सापडतात. एक प्रवाद असाही आहे की, त्याकाळी काही प्रमाणात लेखनव्यवस्था अस्तित्वात असावी. ब्राह्मी फोनिशियन अक्षरांवरून आली असावी असाही एक सिद्धांत आहे. अजून एक मत अर्थातच ब्राह्मी , सिंधू खोर्‍यात वापरात असलेल्या चिन्हांवरुन तयार झाली असावी. पुराव्याअभावी यातल्या कुठल्याही एका निष्कर्षापर्यंत पोचणं कठीण आहे.

हे सर्व प्रवाद थोडावेळ बाजूला ठेऊन, अशोक काळात लिहिलेल्या गेलेल्या ब्राह्मी लिपीची ओळख कशी पटली याची गंमत बघू. फिरोझशहा तुघलकने तेराव्या शतकात दिल्ली जिंकली. त्याच्या काळात हिंदू धार्मिक ग्रंथांचं संस्कृतमधून फारसी आणि अरबीमध्ये भाषांतर करण्यात आलं. त्याने मेरठमधून दोन अशोकस्तंभ काळजीपूर्वक कापून रेशमात गुंडाळून बैलगाडीतून दिल्लीला आणलेले. त्यातला एक स्तंभ फिरोजशाह कोटला येथील त्याच्या राजवाड्याच्या छतावर त्याने उभारला. या स्तंभावर कोरलेले लेख समजून घेण्यासाठी त्याने अनेक संस्कृत पंडीतांना पाचारण केलं. पण एकाही संस्कृत पंडीताला स्तंभावार लिहीलेली लिपी वाचता येईना. पुढे दोनशे वर्षांनंतर अकबरानेही या लिपीचा शोध घ्यायचा निष्फळ प्रयत्न केला. सरतेशेवटी एकोणिसाव्या शतकात युरोपियन अभ्यासकांनी ही लिपी 'ब्राह्मी' असल्याचं सिद्ध केलं. जवळजवळ सहाशे वर्ष ब्राह्मी लिपीचं कोडं उकलायला खर्ची पडली.

ब्राह्मी लिपीचा उलगडा करण्याचा पहिला यशस्वी प्रयत्न १८३६ मध्ये 'क्रिस्तीयन लॅसेन' या नॉर्वेजियन इंडोलॉजिस्ट्ने केला. इंडो-ग्रीक राजा 'अ‍ॅगॅथोकल्स' याने आपल्या नाण्यांवर ग्रीक दंतकथा छापल्या होत्या. नाण्याच्या दुसर्‍या बाजूला या दंतकथांचा अनुवादही 'ब्राह्मी' लिपीत छापला होता. ही द्विभाषिक नाणी ब्राह्मी लिपी ओळखण्याच्या कामात बहुमुल्य ठरली. लॅसेनने नाण्यांवर छापलेली काही ब्राह्मी अक्षरं अचूक ओळखली. त्याच्यानंतर हे अपूर्ण राहीलेलं काम काम इंग्लिश ओरीयंटलिस्ट 'जेम्स प्रिन्सेप'ने पूर्ण केलं.

ब्राह्मी लिपी ही अ‍ॅबगिदा (abugida) लेखन पद्धत आहे. अ‍ॅबगिदा म्हणजे, प्रत्येक व्यंजनाला अक्षर नेमून दिलेलं असतं. स्वर लिहिण्यासाठी 'डायक्रिटिक' म्हणजेच 'मात्रा' वापरली जाते. जर का, शब्द स्वरांनी सुरू होणार असेल तर मात्र मात्रा न वापरता स्वरासाठी जे विशिष्ठ अक्षर असेल ते वापरलं जातं. अन्यथा स्वर वेगळे लिहिले जात नाहीत. व्यंजनांमधे 'अ' हा स्वर अद्यहृत असतो. 'अ' अद्यहृत असणं हे खरोष्ट्री आणि ब्राह्मी मधलं एक साम्य.

व्यंजनांचा समूह एकत्र लिहीण्यासाठी (उदा. प्र, र्व) संयुक्त व्यंजनांचा वापर केला जातो. आपण देवनागरीत अशी 'एकत्रित व्यंजनं' (consonants clusters) डावीकडून उजवीकडे एकामागे एक लिहीतो (उदा. वाङमय) तर ब्राह्मी लिपीत ती एका खाली एक लिहितात. (उदा. वाङ्मय) अगदी सुरवातीच्या काळात लिहिल्या गेलेल्या ब्राह्मी लिपीत विरामचिन्हांचा वापर दिसत नाही. अक्षरं अंतर ठेवून स्वतंत्रपणे लिहीली जात. त्यानंतरच्या काळात उभ्या, आडव्या रेषा, गोलकार चिन्ह आणि पूर्णविरामांचा वापर दिसून येतो. नंतर नंतर रचना पूर्ण झाल्यावर दोन तिरक्या रेषा पूर्णविरामासाठी दिलेल्या दिसतात. तरीही ब्राह्मीमधे कोरलेली चिन्हं किंवा अक्षरं अतिशय सोप्प्या पद्धतीची आहेत. कदाचित ही अक्षरं हाताने लिहीलेली नसून दगडावर किंवा स्तंभलेखावर छिन्नी हातोड्याने कोरलेली असल्याने फारशी किचकट अक्षरं कोरण्यास कठीण जात असावं. उभी रेष, आडवी रेष, बिंदू आणि वर्तुळ असे चार प्रकारची विरामचिन्हं संशोधनात सापडली आहेत.

देवनागरीप्रमाणेच ब्राह्मी डावीकडून उजवीकडे लिहीली जाई. ध्वन्यात्मक मांडणी (ध्वनीनुसार) आणि अनुनासिक चिन्हं ही ब्राह्मीची वैशिष्ठ्यं. खालच्या चित्रात नीट पाहीलं तर अक्षरांचा क्रम साधारणपणे आपण आज ज्या क्रमाने देवनागरी लिपी लिहितो त्याच क्रमाने दिसेल. सर्वात आधी स्वर, त्यानंतर कंठ्य, तालव्य, मूर्धन्य, दंत्य, ओष्ठ्य गट.

brahmi.png
(ब्राह्मी लिपी)

ब्राह्मी लिपीमधून पुढे प्रादेशिक लिपी विकसित झाल्या. कालांतराने या प्रादेशिक लिपी तिथल्या स्थानिक भाषांशी संलग्न झाल्या. गुप्त साम्राज्याच्या काळात उत्तरी ब्राह्मीने 'गुप्त लिपी'ला जन्म दिला, मध्ययुगात ब्राह्मी लिपी कर्सिव्ह स्वरुपात विकसित झाली. तिला 'सिध्दम् लिपी' म्हटलं जातं. याचच पुढे नवव्या शताकत 'शारदा लिपी' मधे रुपांतर झालं. दक्षिणेकडे पसरलेली ब्राह्मी लिपी 'ग्रंथ', 'वाटेलुट्टू' लिपीत विकसित झाली. तामिळ भाषा या लिपीमधे लिहीली जात असे. सहाव्या शतकाच्या उत्तरार्धात, उत्तर भारतातील 'गुप्त लिपी' एका वेगळ्या नवीन स्वरूपात विकसित झाली. त्या लिपीचं नाव 'सिद्धमातृका'. उत्तरेकडील लिपींवर या लिपीचा बराच प्रभाव आहे.ब्राह्मी लिपी काही भागात 'नागरी लिपी'मधे विकसित झाली आणि नगरी पुढे 'देवनागरी' आणि 'नंदीनगरी'मधे. या दोन्ही लिपी संस्कृत लिहिण्यासाठी वापरल्या जात.

ब्राह्मी लिपी खरंतर एका लेखात न संपणारा विषय आहे. या लेखातून फक्त एक छोटीशी झलक लिहीण्याचा प्रयत्न केला आहे. पुढच्या भागात देवनागरीविषयी...

---

या काही लिपी ब्राह्मी मधून विकसित झालेल्या:

grantha.png

telugu.png

bengali.png

अधिक टीपा:
(१) उत्तर सेमिटीक लिपी: ही सर्वात जुनी आणि पूर्णपणे विकास झालेली वर्णमाला आहे. अकराव्या शतकाच्या पूर्वार्धात सीरियामध्ये या लिपीचा वापर केला गेला. असं मानलं जातं की, नंतर विकसित झालेल्या सर्व वर्णमाला लिपी प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे, उत्तर सेमिटीक लिपीच्या वंशज आहे. याला अपवाद, दक्षिण सेमिटिक लिपी.

संदर्भः
१. The History and Development of Mauryan Brahnii Script, Qhandrika Singh Upasak
२. I: STAGES OF EVOLUTION OF BRAHMI , Dr. A. RAVISANKAR, Ph.D.
३. THE ORIGIN OF THE BRAHMI AND TAMI SCRIPTS, EGBERT RIGHTER
४. देवनागरी लिपी : स्वरुप, विकास और समस्याए

Keywords: 

लेख: 

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle