आठवणीतल्या पाऊलखुणा

'पाऊलखुणा' ही मराठी दुरदर्शन वर १९९३ साली दाखवलेली धारावाहिक मालिका. ही आता युट्यूबवर उपलब्ध नाही. विकिपीडिया वर ही मालिका अमोल पालेकरांची निर्मिती आहे इतकाच त्रोटक उल्लेख आहे.‌ दिग्दर्शन अमोल पालेकरांच होते. मालिकेच‌ कथाबीज अगदी एका ओळीत बसणारे, साधेसे होते. काॅलेज मध्ये जाणारा किंवा फार तर नुकताच पदवीधर झालेला एक तरुण (यतीन कार्येकर) आणि त्याची प्रेयसी (नाव माहिती नाही) ह्या दोघांची फुटकळ कारणांवरून उठसूठ भांडण होतं असतात. ह्यांना आपण सोईसाठी 'तो' व 'ती' म्हणुयात. भांडणांच्या तक्रारी दोघेही 'त्याच्या' नात्याने आत्या/मावशी असलेल्या आणि विदुषी म्हणून समाजात ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ स्त्री (शांता गोखले) कडे करत असतात. एक दिवस अशीच तक्रार घेऊन आलेली 'ती' आवेशात स्त्री मुक्ती संदर्भात काही तरी उल्लेख करते. तेव्हा शांता गोखलेंच्या लक्षात येत की ती वापरत असलेल्या शब्दांचे तिला स्वतःला नीटसे आकलन झालेले नाही. म्हणून शांता गोखले तिला हरि नारायण आपटेंची कादंबरी 'पण लक्षात कोण घेतो?' वाचायला देतात. ह्या कादंबरीचा तिच्या वर खूप प्रभाव पडतो. पुस्तकावरच्या त्या दोघींच्या चर्चेत 'तो' आणि त्याची लहान बहीण (शर्वरी पाटणकर) पण सहभागी होतात. मग ह्या तिन्ही मुलांना शांता गोखले वेगवेगळ्या कादंबर्या वाचायला देऊन नंतरच्या चर्चेतुन महाराष्ट्रातील स्त्री मुक्ती चा प्रवास उलगडुन दाखवतात. माझ्या आठवणी प्रमाणे ह्या मालिकेत वेगवेगळ्या काळात आणि स्त्री मुक्ती च्या संदर्भातील वेगवेगळ्या विषयांच्या अनुषंगाने लिहिल्या गेलेल्या ५/६ कादंबर्यांची चर्चा होती. त्यातील 'पण लक्षात कोण घेतो?' (हरि नारायण आपटे), विधवा कुमारी (मामा वरेरकर), ब्राह्मण कन्या (श्रीधर व्यंकटेश केतकर) आणि शबरी (विभावरी शिरुरकर) ह्या चार कादंबर्या माझ्या लक्षात राहिल्या.

ही मालिका माझ्या साठी 'डोळस वाचन' कार्यशाळा ठरली. मला खूप लहानपणापासून वाचायला आवडायचं पण वाचनातून काय मिळवायचं? मराठीत 'क्लासिक' म्हणून ओळखली गेलेली आणि काळाच्या अनुषंगाने संदर्भहिन झालेली पुस्तके का वाचायची आणि कशी वाचायची हे मी ह्या मालिकेतुन शिकले. पण त्या पलिकडे जाऊनही ह्या मालिकेतुन मला खुप काही मिळालं. ही मालिका बघितली तेव्हा मी सातवी-आठवीत होते. वयाच्या अशा टप्प्यावर होते तिथे लहानपण संपलं होतं पण 'विचार करण्याची' समज अजुन आली नव्हती. सावित्रीबाई, लक्ष्मी बाई टिळक, रमाबाई रानडे इ. स्त्रीयांच्या कार्याची तोंड ओळख झाली होती पण स्त्री मुक्ती म्हणजे नक्की काय आणि त्याची वर्तमान काळात गरज आहे का ह्या बद्दल मनात गोंधळ होता. आजुबाजूला वावरणाऱ्या आजी आई च्या पिढीतल्या बायका त्यांच्या काळाच्या मापदंडानुसार शिकलेल्या होत्या, काही नोकरी ही करत होत्या पण त्या सगळ्याझणिंच 'करियर' संसार होत. महत्वाचे सगळे निर्णय 'ह्यांना विचारुन घ्यायची पद्धत त्यांच्यात सर्वमान्य होती. तरीही एकंदर विचार करता त्या सगळ्याच सुखी वाटायच्या त्यामुळे शिक्षण घेतलं की बाकी वेगळी अशी काही 'मुक्ती' वगैरे ची गरज खरच आहे का सध्याच्या काळात हा प्रश्न होता माझ्या मनात. हा गैरसमज व्हायचं अजुन एक कारण म्हणजे 'सुडो स्त्री मुक्ती वादी आक्रमक स्त्रीयांची फजिती', हा शाळेच्या स्नेहसंमेलनातल्या नाटकापासून ते हिंदी चित्रपटांपर्यंत सगळ्यातला हमखास विनोदाचा विषय होता. त्यामुळे 'स्त्रीमुक्तीवादी' म्हणजे आक्रस्ताळेपणा असं एक चित्र आपोआपच डोळ्यासमोर तयार झालं होतं आणि स्त्री मुक्ती संबंधि आग्रह धरणं हे सध्याच्या काळात चांगले की वाईट?, आर्थिक दृष्ट्या सुस्थितीत असणार्या स्त्रीयांना त्याची गरज आहे का? हे लक्षात येत नव्हते. मनातील ह्या गोंधळबद्दल नक्की कुणाला विचारावं आणि मुळात आपण स्वतः ह्या सगळ्या बद्दल नक्की काय विचार करतो तेच मला कळत नव्हते. ह्या मालिकेने स्त्री मुक्तीतुन नेमके काय अभिप्रेत आहे ह्या बद्दल माझे प्रबोधन केले. शालेय पुस्तकात समाविष्ट केलेल्या विद्या बाळ, रजिया पटेल ह्यांच्या लेखातुन त्यांना नक्की काय मांडायचे आहे ते लक्षात यायला लागले. पुढे ह्या वर वाचत-विचार करत ह्या संदर्भातील माझी मते मी बनवली, त्यांना मनात वेळोवेळी तपासून बघत गेले. हळूहळू स्त्री वादी पासून व्यक्ती वादी पर्यंत चा मानसिक प्रवास पुर्ण केला. पण ह्या सगळ्याची सुरुवात माझ्या साठी पाऊलखुणांमधुन झाली. 'कसे वाचायचे आणि कसा विचार करायचा' ह्या दोन गोष्टी शिकवल्या बद्दल मी शांता गोखले, चित्रा पालेकर आणि अमोल पालेकरांची ऋणी आहे. वर उल्लेख केलेल्या चारही कांदबर्या 'मस्ट रीड' सदरात मोडतात ज्या मैत्रिणींना त्यांच्या बद्दल आधी माहिती नव्हती त्यांनी त्या आवर्जून वाचाव्यात असं मी सुचवीन. त्यातील पण लक्षात कोण घेतो?' ह्या कादंबरिचा परिचय करून देण्याचा मी मझ्या परीने केलेला हा प्रयत्न.

कादंबरी बद्दल सांगण्यापूर्वी त्या काळाबद्दल थोडं सांगु इच्छिते. १८१८ साली पेशवाई बुडाली, त्यामुळे सत्तेत हितसंबंध गुंतलेला महाराष्ट्रातील एक मोठा गट दुखावला गेला. प्रामुख्याने मराठी उच्चवर्णीय (ब्राह्मण) असा हा गट पेशवाई मध्ये पाळल्या जाणाऱ्या रुढिंबाबत फार आग्रही होता त्या रुढिंशी स्वतः ची सांस्कृतिक अस्मिता ह्या लोकांनी जोडली होती. ज्याला आपण महाराष्ट्राच्या इतिहासात जहाल गट म्हणून ओळखतो, ज्यांचे राजकीय नेतृत्व लोकमान्य टिळकांकडे होते ते हेच लोक. १८२९ साली आलेल्या सतिप्रथा बंदी आणि १८५६ साली आलेल्या विधवा पुनर्विवाह मान्यता कायद्याने देशभरातील सनातनी मंडळींत असंतोष होता त्यात ही वरती उल्लेख केलाय ती लोक पण होतीच. त्या असंतोषाचा कडेलोट संमती वयाच्या कायद्याच्या वेळी झाला.

काय होता हा संमती वयाचा प्रश्न? १८९० साली हरीमोहन ह्या बंगाली माणसाने फुलमणी ह्या त्याच्या १० वर्ष वयाच्या पत्नी वर बलात्कार केला ज्यात तिचा मृत्यू झाला. ह्या दु:खद घटनेनंतर भारतीय दंड संहितेत बदल करून शारीरिक संबंधांना संमती देण्यासाठी कायद्याने ग्राह्य धरलेले पत्नीचे किमान वय जे तोवर १० वर्ष होते त्यात वाढ करण्यात यावी अशी भुमिका सुधारकांतर्फे मांडण्यात आली. देशभरातील सनातन्यांचा ह्याला विरोध होता. ह्या प्रश्नाचे निमित्त साधून गोरे सरकार ऐतद्देशियांच्या धार्मिक बाबीत हस्तक्षेप करु इच्छिते ह्या भावनेने जहाल गट अस्वस्थ झाला होता आणि सहाजिकच त्यांचा विरोधि पवित्रा अतिशय आक्रमक होता. सुधारक हे धर्मबुडवायला निघालेले भामटे आणि सरकारचे एजंट आहेत असा ह्या गटाचा प्रचार होता. सुधारक गट जो मुळातच मवाळ गट म्हणून ओळखला जातो तो ह्या हल्ल्याने काहीसा बॅकफूटवर गेला. आगरकरांचा अपवाद वगळता सामान्य पणे सुधारकांची भुमिका सामोपचाराने जहालांचे मन वळवून ह्या सुधारणेसाठी जनमत तयार करण्याची होती. ह्या सामोपचारासाठी प्रयत्न करणार्या व्यक्तिंमधील एक नाव होते हरि नारायण आपटे! १८९१ साली संमती वय १० वर्षांऐवजी १२ वर्ष मानले जावे असा कायदा सरकारने केला. जहाल गटाचे सरकार पुढे काही चालले नाही पण त्यांचा सुधारकांवरचा असंतोष मात्र कायम राहिला. त्या काळच्या साहित्यात ह्याचे प्रतिबिंब दिसते. ज्यांना आज आपण स्त्रीलंपट म्हणू अशी काहीशी सुधारकांची प्रतिमा जहाल गटातील लेखकांच्या त्यावेळच्या आणि त्यानंतरच्या लिखाणातुन दिसते. वर उल्लेख केलेल्या सामोपचारवादी सुधारकांनी ह्याला आपल्या लिखाणातून, 'आम्ही धर्म आणि सामाजाला मान्य असलेल्या चाकोरीत राहुनच सुधारणा सुचवु इच्छितो' असं उत्तर देण्याचा प्रयत्न केला.

साधारण ह्याच काळात हरिभाऊ आपटेंच्या वैयक्तिक आयुष्यातही हा तंटा शिगेला पोहोचला होता. त्यांच्या प्रथम पत्नी च्या मृत्यूनंतर पुन्हा विवाह करायचा झालाच तर तो विधवेशी करावा अशी स्वतः हरिभाऊ आणि त्यांच्या सुधारक सुर्हृदांची इच्छा होती ज्याला त्यांच्या कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तींचा विरोध होता. त्याच वेळी 'पंचहौद मिशन' सभेत 'बाटलेल्या' चहा बिस्किटांच सेवन हरिभाऊंनी करण्याच्या नुसत्या संशयावरून त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर सनातनी मंडळींनी बहिष्कार घातला होता. ज्याचा धसका घेऊन हरिभाऊंची आजी आजारी पडली आणि त्यातच तिच निधन झाले. ह्या सगळ्या विलक्षण मानसिक कोंडी करणार्या घटनांच्या पार्श्वभूमीवर 'पण लक्षात कोण घेतो?' ही कादंबरी हरिभाऊंनी १८९० साली क्रमशः प्रसिद्ध केली. जी १८९३ साली एकत्रित स्वरूपात कादंबरी म्हणून छापली गेली. वरील इतिहास इतका तपशिलात इथे देण्याचे कारण म्हणजे ज्या काळात हा इतिहास घडत होता त्या काळातील सामान्य स्त्री पुरुषांचे आयुष्य कसे होते हे हरिभाऊंनी ह्या कादंबरीत नोंदवून ठेवले आहे. त्यांच्या लिखाणाची शैली इतकी चित्रदर्शी आहे की वाचायला सुरुवात केल्यानंतर थोड्याच वेळात ह्या कांदबरी ची नायिका यमु हिच घर, घरातील माणसे आणि इतर तपशील अक्षरशः डोळ्यासमोर उभे रहातात. थोडक्यात त्या काळाचा एक तुकडा ह्या कादंबरीत जतन झाला आहे. पण फक्त तेवढंच ह्या कादंबरीच महत्व नाही. माझ्या दृष्टीने ही कादंबरी त्या काळातील स्त्री पुरुषांच्या समस्यांची नोंद (documentation) आहे. ज्याला संशोधन क्षेत्रात observational study अशी संज्ञा आहे , ज्यात संशोधक स्वतःची निरिक्षणे नोंदवुन ठेवतात आणि त्यांचं पृथःकरण करुन मानव समुहाच्या समस्यांच नेमकं आकलन होते, नेमकं तसेच ह्या कांदबरीतुन झाले आहे.

यमुना नावाच्या एका तरुण मुलीचे आत्मवृत्त असं ह्या कादंबरीचे स्वरुप आहे. सुरवात अर्थातच यमुच्या बालपणीच्या आठवणींनी होते. यमुना आणि तिचा मोठा भाऊ ही आईविना पोरकी मुले त्यांच्या संतापी वडिलांच्या आणि ह्या दोघांपेक्षा वयाने फार मोठी नसलेल्या, स्वभावाने अत्यंत कजाग अशा सावत्र आई च्या दहशतीत वाढतात. ह्यांच्या व्यतिरिक्त यमुच्या भावविश्वातिल एक महत्त्वाच पात्र म्हणजे शेजारच्या बिर्हाडात रहाणारी तिची अल्लड मैत्रीण दुर्गी. वयाच्या १२ व्या वर्षी यमुचा विवाह रघुनाथ शी होतो आणि ती सासरी म्हणजे रघुनाथच्या आजोळी जाते. पुढे रघुनाथ च शिक्षण पुर्ण होऊन तो नोकरी करायला लागल्यावर ती मुंबईत त्याच्यासोबत राहु लागते. रघुनाथ च्या अकाली मृत्यू नंतर तिची आजेसासु आणि मामेसासरा तिचं जबरदस्तीने केशवपन करतात ज्यामुळे तिची जीवनेच्छा संपते आणि लवकरच आजारपणाच निमित्त होऊन तिची इहलोकीची यात्रा संपते. थोडक्यात यमुच्या आयुष्यातल्या महत्वाच्या घटनांच चित्रण ह्या कादंबरित आहे.

ह्यातील केशवपनाचे वर्णन हा यमुनेच्या शोकांतिकेचा परमोच्च बिंदू आहे. यमु ही खाऊन पिऊन सुखी असलेल्या कुटुंबातिल दुर्लक्षित मुलगी. तिच्या आजवरच्या आयुष्यात तिच्या वाट्याला सुखाच्या तुलनेत दुःख फार जास्त प्रमाणात आले आहे. तिच्याच नाही तर तिच्या अवतीभवती असणार्या सगळ्या स्त्रीयांची दु:ख ती बघत आली आहे. त्यामुळे दु:ख हे आयुष्याचा एक भाग म्हणून स्विकारण्याचि तिची मानसिक तयारी आहे. ज्याने तिला खर्या अर्थाने जगायला शिकवलं आणि ज्याच्यावर तिचं मनापासून प्रेम होतं त्या नवर्याच्या आकस्मिक मृत्यूच दु:ख पचवुन त्याच्या अपुर्या इच्छा पूर्ण करण्यासाठी का होईना ती तिच्या उर्वरित आयुष्यात काही तरी करण्यासाठी उभे रहाण्याचा प्रयत्न करत असताना पध्दतशीर पणे तिला बेसावध गाठुन, एखाद्या जनावाराची शिकार करावी तसं तिचं केशवपन केले जाते. ज्याने ती पूर्णपणे मोडुन पडते. हरिभाऊंच्या चित्रदर्शी शैलीमुळे हा प्रसंग अक्षरशः अंगावर येतो.

विधवा स्त्रियांचे केस काढून टाकणे अशी केशवपनाची ढोबळ व्याख्या आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे पण तेवढ्यापुरतीच ह्या हिडीस प्रथेची व्याप्ती मर्यादित नाही. केशवपन आणि त्यानंतर च्या पोषाखाच्या मर्यादा यांचा एकत्रित परिणाम त्या बाईच्या स्वप्रतिमेवर इतका पराकोटीचा घाव घालायचा की त्याची तुलना फक्त धिंड काढणे ह्या शिक्षेशीच करता येईल. त्या काळात देखील केशवपन नाकारणार्या स्त्रीयांची उदाहरण लोकांसमोर होती. त्यातील दोन ठळक उदाहरणे म्हणजे झाशीची राणी लक्ष्मीबाई आणि पंडिता रमाबाई. झाशीच्या राणीने पती गंगाधर पंतांच्या निधनानंतर केशवपन करण्याचे नाकारले, त्यासाठी तिच्या राज्यातील पुरोहितांनी जुजबी प्रायश्चित्त तिला घ्यायला लावले आणि ह्या जाचक रुढितुन पळवाट काढून दिली. दुसरे उदाहरण पंडिता रमाबाईंचे ज्यांनी पती बिपीन चंद्र मेधावी ह्यांच्या मृत्यू नंतर केशवपन करणे नाकारले. रमाबाईंच्या पांडित्याबद्दल तर त्यांच्या विरोधकांना देखिल शंका नव्हती. तरीही केशवपनाची आवश्यकता खरच आहे का? धर्मात त्याच इतक महत्व आहे का? हे प्रश्न बहुतांश सनातन्यांच्या मनात येत नव्हते आणि कुणी तसा विचार करण्याचा किंवा मांडण्याचा प्रयत्न जरी केला तरी त्याला ही मंडळी कडाडून विरोध करीत होती. अश्राप स्त्रियांना ह्या रुढिद्वारे चिरडून टाकुन वर पुन्हा "कुणाला कशाचे तर बोडकिला केसाचे' सारख्या असंवेदनशील म्हणींना जन्म देऊन त्यांची खिल्ली उडवण्याचे पराकोटीचे मानसिक क्रौर्य त्या काळच्या पुरुषप्रधान व्यवस्थेत निर्माण झाले होते हे ह्यातुन लक्षात येते.

रुढार्थाने यमु, दुर्गी, यमुची आई, सासु, मामेसासु ह्या वेगवेगळ्या वयोगटातील स्त्रीयांच्या दुर्दैवाच्या दशावतरांचे चित्रण करणारी ही कादंबरी असली तरी, विचाराअंती सह्रृदय पुरुष देखील ह्या व्यवस्थेच्या मुळाशी असलेल्या अतिरेकी समुहवादाच्या (collectivism) बडग्यापुढे हतबल होते हे लक्षात येईल. दुर्गी वर प्रेम असुनही यमुचा दादा ते व्यक्त करु शकत नाही, यमुचा दादा आणि गोपाळ मामांजी आपापल्या विषारी (toxic) लग्नाचे जोखड झुगारून देऊ शकत नाही. खुद्द रघुनाथ देखील घरातील मानाने मोठ्या माणसांची स्वतः च्या आयुष्यातील ढवळाढवळ थांबवु शकत नाही ही काही बोलकी उदाहरणे. ज्या तालिबानी प्रवृत्तीला आज आपण त्याज्य मानतो तिच्या किती जवळ जाणारी ही आपली परंपरा होती हे पुस्तक वाचुन मला प्रकर्षाने जाणवले. ह्या व्यवस्थेचा वापर करून इतरांच्या इच्छांचा बळी देण्याइतक निर्ढावलेपण अंगी बाळगुन असणारी आणि त्याला कर्तव्याचा मुलामा देऊ शकणारी फार थोडी लोकच ह्या व्यवस्थेत सुखी होती. बाकी सगळ्यांच्याच नशिबात फक्त कायमस्वरूपी घुसमट आणि कुचंबणा!

यमुच्या आयुष्यातला सुखाचा काळ म्हणजे रघुनाथ बरोबर तिने मुंबईत घालवलेली दीड-दोन वर्षे ह्यांच वर्णन ही मुळातून वाचण्यासारखं आहे. परिचित स्त्री पुरुषांनी एकमेकांशी मनमोकळा संवाद साधणे, सभेत स्त्रियांनी स्वतः चे विचार मांडणे , स्त्रीयांना लिहायवाचायला शिकण्याची आणि नंतर स्वतः च्या इच्छेनुसार एखाद्या क्षेत्रात ज्ञान मिळवण्याची मुभा असणे अशा किती जुजबी गोष्टी हरिभाऊ स्त्री स्वातंत्र्याच्या नावाखाली मागत होते ते बघून गलबलून येते. पण इतक्या साध्या मागण्यांवर तत्कालीन सनातन्यांची प्रतिक्रिया काय होती ते देखील हरिभाऊंनीच नोंदवुन ठेवले आहे. यमूने भर सभेत (पुरुष प्रेक्षकांच्या समोर) भाषण दिले आणि एका तिर्हाईत पुरुषाने तिचा गळ्यात हार घालून सत्कार केला हे कळल्यावर रघुनाथ आणि यमूची निर्भर्त्सना करणारे पत्र रघुनाथ चे थोरले मामा रघुनाथ ला लिहितात ते वाचून इतक्या साध्या इच्छा देखील चिरडून टाकायला तेव्हा चा समाज किती तत्पर होता ह्याच आकलन होते.

आज आपण जिथे आहोत तिथे असण्यासाठी किती यमु आणि किती दुर्गी ह्या व्यस्थेच्या चिरेबंदी भिंतीत चिणल्या गेल्या हा विचार मनात आला की विलक्षण खिन्नता येते. तसंच ह्या विषारी वातावरणात देखील ज्योतिबा, सावित्रीबाई, न्यायमूर्ती आणि रमाबाई रानडे, कानिटकर दांपत्य, विष्णू शास्त्री पंडित, ह्यांसारखी काळाच्या कितीतरी पुढे असणारी सहृदय माणसं कशी घडली आणि त्यांनी ह्या चिरेबंदी व्यवस्थेला धक्के देण्याचं सामर्थ्य कसं आणि कुठून मिळवलं? हे प्रश्न देखील पडतात. उण्यापुर्या१३३ वर्षात आपल्या मराठी समाजाच वास्तव हे कल्पना येऊ शकणार नाही इतकं बदललं. त्यामुळे आपण कुठुन सुरुवात केली हे आवर्जून समजून घेणे गरजेचे आहे. कारण त्याची जाणीव नसल्यामुळे काही ठिकाणी काही बाबतीत वाटचाल उलट दिशेने सुरू झाल्याच हल्ली आढळून येते. हे प्रयत्न वेळीच थांबवु शकलो नाही तर ही वाट आपल्याला नक्की कुठे घेऊन जाईल हे कळण्यासाठी तरी आजच्या मुला-मुलींनी ही कादंबरी वाचायला हवी.

हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle