जर्मनीतलं वास्तव्य - वासंतिक मिरवणूक - झॉमरटाग्सउमत्सुग (Sommertagsumzug)

दर वर्षी मार्च महिन्यातल्या शेवटच्या रविवारी इथे घड्याळ बदलते ही आता दहा वर्षात सवयीची बाब झालेली आहे. घड्याळ एक तास पुढे केलं जातं, पहिले दोन तीन दिवस जरा भुकेच्या वेळा, झोपेच्या वेळा सेट होण्यात जातो, पण सगळं पुन्हा नेहमीसारखं चालू होतं. वसंत ऋतू सगळीकडे आपलं अस्तित्व दाखवून देत असतो. एकदाची थंडी कमी होइल, जास्त वेळ सूर्यदर्शन व्हायला लागेल आणि एकदाचे हिवाळी कपड्यांचे जोखड उतरेल या आशा पल्लवित होतात. खरंतर अजूनही थंडी आहेच, रात्री तापमान एक दोन पर्यंत जातं आहे, पण तरी हवेतला बदलही जाणवायला लागतो. पक्षांची किलबिल वाढते, झाडांना हिरवी पालवी फुटते, पांढर्‍या गुलाबी नाजूक फुलांनी झाडं बहरतात, दुकानांत इस्टर आणि वसंत म्हणून सश्यांची, फुलापानांच्या डिझाइनची मांदियाळी असते आणि हिवाळ्यातल्या थंडीने हळूहळू येऊ घातलेला आळस दूर जाऊन उत्साही वातावरण होत जातं. लहान मुलांच्या शाळेत वसंत, इस्टर या संदर्भातल्या अनेक गोष्टी सांगितल्या जातात, गाणी शिकवली जातात. त्यातच एक विशेष दिवस काही ठिकाणी साजरा केला जातो - ज्याचं नाव Sommertagsumzug किंवा Sommertagszug- म्हणजे summer day parade असा त्याचा अर्थ. म्हणजे काय तेच आता या लेखात -

याबद्दल आम्ही ऐकलं होतं, पण यावर्षी पहिल्यांदा अनुभवलं. झॉमर म्हणजे उन्हाळा, टाग म्हणजे दिवस आणि त्याची मिरवणूक. उन्हाळी मिरवणूक असं म्हटलं तर भर उन्हाळ्यात कोण काढतंय मिरवणूका असं वाटेल, इथे उन्हाळ्याची सुरूवात नंतर होइल, पण त्याआधी वसंतागमन साजरं केलं जातं, त्याचीच ही मिरवणूक. यावर्षी सव्वीस मार्चला घड्याळ एक तास पुढे गेलं, त्या दिवशी आमच्या गावातल्या मुख्य सरकारी कार्यालयाकडून हा दिवस साजरा केला गेल आणि त्यासाठी विविध किंडरगार्टन, शाळा यांना बोलावण्यात आलं होतं. शाळेकडून तसं पत्र आधीच मिळालं होतं.

शाळेतच मुलांकडून एक बेडकाचा मास्क आणि एक कागदी बेडूक एका काठीवर अशी तयारी करवून घेतली होती. प्रत्येक शाळेने असं एकेक काहीतरी केलं होतं, सूर्यफुलं, अजून वेगवेगळी फुलं असं एकेक, थोडक्यात वसंताचं प्रतीक म्हणून काहीतरी. दुपारी पावणेदोनला सृजनला आम्ही त्याच्या वर्गशिक्षिकेकडे सुपूर्द केलं, त्याचे सगळे मित्र मैत्रिणी पण होते. पोलीसांची गाडी, अ‍ॅम्ब्युलन्स, अग्निशामक दलाच्या गाड्या होत्या. एका पटांगणात चारही बाजूंनी लहान मुलं आणि त्यांच्या हातातल्या विविधरंगी कागदी गोष्टींनी सगळं गजबजलं होतं. दोन पर्यंत सगळे जमले आणि घड्याळाच्या दोनच्या ठोक्याला मिरवणूकीला सुरूवात झाली.

आधी एक पोलीसांची गाडी, मग किंडरगार्टन मधली अगदी लहान मुलं, अधून मधून काही बॅन्डचे ग्रुप्स जे आपापली इन्स्ट्रुमेंट्स घेऊन वाजवत होते, अधून मधून काही ट्रॅक्टर, त्यात काही लहान मुलं बसलेली आणि काही ट्रक्स, ज्यावर वसंताचं प्रतीक म्हणून फुलं, फुलपाखरं अशी सजावट केली आहे, मग शाळांमधली मुलं आणि शेवटी एक ट्रक ज्यात एक कापडी मोठ्ठा स्नोमॅन आहे अशी सगळी वरात निघाली. आपापल्या वर्गातली मुलं आणि वर्गशिक्षिका यांच्यासोबत मग मुलं पायी चालत आमच्या इथल्या मुख्य पार्क मध्ये आली. रस्त्यावर आजूबाजूला उभ्या असलेल्या लहान मुलांना ट्रक मधून चॉकलेट्स पण मिळाले. अनेक पालकही इकडून तिकडून तिथे पोचले. तिथे एक लहान स्टेज उभा केला होता, एक रिंगण घालून त्याबाहेर सगळी मुलं उभी राहिली. तिथे स्टेज वर एका ग्रुपच्या मुलांनी गाणं म्हटलं, बाकीची मुलं बाहेरून म्हणत होती. वाजतगाजत स्नोमॅन आला, एकीकडे मुलांना खाऊ देण्यात आला. आमच्या गावाचा मेयर आणि अजून एक जण हे दोन दोन वाक्य बोलले (हो तेवढेच) प्रत्येक किंडरगार्टन आणि शाळेचं नाव घेऊन त्यांच्या तिथे येण्याची दखल घेतली गेली, त्यामुळे आपापल्या शाळेसाठी मुलांनी जोरदार आवाजात हजेरी लावली. तिथे स्पीकरवर सुद्धा सगळी लहान मुलांची इस्टर आणि या नवीन ऋतूबद्दलची गाणी वाजत होती. अग्निशामक दलातले लोक होते, त्यातही युवा अग्निशामक दलातली मुलं भरपूर होती. त्यांनी मग जाऊन स्नोमॅनला आग लावली आणि मुला मुलींनी अगदीच आ वासला. लहान मुलांना हे सगळं बघायला, अनुभवायला मिळालं तेव्हाचा आनंद प्रत्येकाच्या चेहर्‍यावर दिसत होता. स्नोमॅन हळूहळू पूर्ण जळून खाली पडला, उरलेली आग विझवताना या सगळ्या युवा अग्निशामक दलातल्या मुलांना पण प्रशिक्षण देणं सुरू होतं. पालक, आप्तेष्ट, जवळ राहणारे लोक अशी भरपूर गर्दी होती, ती हळूहळू मग पूर्ण पांगली आणि सगळं करून दोन अडीच तासांत आम्ही पुन्हा घरी आलो होतो.

या दोन तासांसाठी काही रस्ते बंद केले होते. सगळीकडे पोलीस, अग्निशामक दल, वैद्यकीय सुविधा असा सगळा जामानिमा होता. खरं सांगायचं तर फेब्रुवारी मध्ये एक कार्निव्हल असतो, त्यातही मिरवणुका असतात, नंतर हॅलोवीनच्या वेळी सुद्धा असतात, पण त्यात मला बीभत्स पणा सुद्धा बराच दिसतो, विशेष करून तरुणाईचा. हिवाळ्यातही एक असते ती सहसा पूर्ण गावातली एक न होता, आपापल्या शाळांमधून होते आणि थोडी कंटाळवाणी पण होते. त्यामानाने ही मिरवणूक खूप गोड होती.

बुधवारी आपलं नववर्ष आणि गुढीपाडवा घरी साजरा केला, तर शनिवारी आम्ही महाराष्ट्र मंडळाचा गुढीपाडव्याचा कार्यक्रम केला आणि रविवारी इथल्या पद्धतीने उन्हाळ्याची, वसंताची सुरूवात साजरी केली. दोन इतक्या दूरच्या देशातले हे दोन सण, वेगळ्या परंपरा, दोन्ही थोडे वेगळ्या पद्धतीचे . तरीही आनंद वाटून घेणे, निसर्गाच्या फुलणार्‍या रुपाचं स्वागत करणे या भावनाच दोन्हीकडे होत्या, उत्साह तेवढाच होता. हे विश्वची माझे घर म्हणत जगभर पसरलेली आमची पिढी, याहून वेगळा असा विविधतेत एकतेचा सोहळा तो काय?

इथे व्हिडीओ सहज देता येत नाहीत, सो माझ्या फेसबुक प्रोफाइल वरून बघू शकता. कारण नेमके फोटो कमी आहेत.

pxl_20230329_115611140.jpg

screenshot_2023-03-29_145124.jpg

screenshot_2023-03-29_145156.jpg

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle