माती, चिखल आणि कलाकृती

मला आता जवळपास १२ वर्षे होत आली कुंभारकाम करायला लागून पण त्यातली एकुण ६-७ वर्षेच सलग काम केले. याकाळात बरेच वेगवेगळे प्रयोग केले. निरनिराळ्या प्रकारची माती, वेगवेगळे रंग वापारून पाहिले, वेगळ्या प्रकारचे फायरिंग टेक्निक पण वापरून पाहिले. आता नवीन काय करते असे विचारले तर निरनिराळे सेट्स करते आहे. म्हणजे एकसारखे ४ कप, एक सारखे राईस बाऊल्स, एकातले एक असे मिक्सिंग बाऊल्स, झाकणाचे केसेरोल बाऊल्स असे करते.
Pottery तीन प्रकारे मुख्यत्वे केली जाते -
१. व्हील थ्रोन
२. Slab Work
३. Coil Work

मी करते ती pottery चाकावरती केलेली असते. पण काही लोकांना चाकावरचे काम फार आवडत नाही, खूप टेक्निकल काम असते असे वाटते. मग चाकाऐवजी handbuilding प्रकारातली भांडी करणे त्यांना आवडते म्हणजे प्रकार २ आणि ३.

चाकावरची अर्थात व्हील थ्रोन Pottery बद्दल मी आधीच्या लेखात बरेच बेसिक टेक्निक लिहिले आहे. आता एक कप बनवायचा तर किती काम असू शकते ते पाहू. मोठा अमेरिकन कॉफी मग करायचा तर साधारण १.५ पौड (पाऊण किलो) माती (ओली असते) मोजून घेतली जाते. मग त्याचा एक सिलेंडर शेप केला जातो. मग आवडीचा आकार देऊन थोडी लीप ठेवली जाते जेणेकरुन कॉफी पिताना मग नीट तोंडात धरला जाईल. भांडे लेदर हार्ड झाले की ट्रीम करून जास्तीची माती काढून टाकली जाते. यानंतर कप सुबक दिसू लागतो. आता त्याला कान लावायचा आहे. त्यासाठी कान आधी बनवावा लागतो. यासाठी चकलीच्या साच्यासारखा मोठा साचा मिळतो त्यात मातीचा गोळा घालून त्याची चकली पाडायची. पण आमचे सगळे शिक्षक या प्रकाराच्या अगदी विरोधात आहेत. म्हणुन मग त्यांनी शिकवलेली थोडी वेळकाढू पद्धत आम्ही वापरतो. त्यात एक मातीचा गोळा डाव्या हातात घेऊन छान पाणी लावत लावत ओढायचा आणि हवा तितका लांब करायचा. एकसारखा निट ओढलेला handle खूप देखणा दिसतो. मग तो लेदर हार्ड होऊ द्यायचा दांडा आणि कप हे एकदम सारखेच वाळलेले असले पाहिजेत. मातीची पेस्ट, सुईच्या टोकाने कपला scratches करून कान कपाला जोडला जातो. हे पर्फ़ेक्ट होण्यासाठी फार मेहेनत आणि फार practice लागते. बाकीची ग्लेझिंग वगैरे पद्धत सगळी सारखीच!

असा बनवलेला एक लेटेस्ट कप, पूर्वी बनवलेले काही कप आणि ह्याच प्रकारे बनवलेला एक जग (पिचर) यांचे फोटो खाली आहेत.

झाकणाची भांडी करणे पण एकदम टेक्निकल काम आहे! आधी भांडे बनवून घ्यायचे. त्याला वरती झाकण कोणत्या प्रकारे बनवायाचेय ते ठरवायचे, त्यानुसार भांड्याचा top करावा लागतो. आत बसणारे झाकण असेल तर भांड्याच्या तोंडाचे माप अगदी काटेकोरपणे घ्यावे लागते. त्यासाठी कॅलीपर्स वापरली जातात. झाकण उचलण्यासाठीचा नॉब शेवटी बनवला जातो. भांडे हातात धरण्यासाठी जर handle हवे असतील तर ते पण शेवटीच लावले जातात.

मी केली ही काही झाकणाची भांडी खाली आहेत.

पुढच्या भागात slab work चे काही नमुने पेश करेन!

Keywords: 

लेख: 

ImageUpload: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle