जर्मनीतलं वास्तव्य - उन्हाळा

असा असून असून किती उन्हाळा असेल? आपल्या सारखा कडक उन्हाळा थोडीच असेल तिकडे, कारण मध्य युरोप म्हणजे मुख्य थंडी, हिवाळा, बर्फ हेच पहिले डोक्यात येतं. मध्यपुर्वेकडचे देश, आखाती देश इथल्या त्रासदायक उन्हाळ्याबद्दल आपण ऐकलेलं असतं, पण युरोपात येताना आवर्जून करायच्या खरेदीत नेहमीच हिवाळी कपडे, थर्मल्स हे आघाडीवर असतात. थोडे दिवस उन्हाळा असला तरी 'आपल्याला' एवढा काही वाटणार नाही, सवय असते तशी असं वाटू शकतं. भारतात चोवीस तास डोक्यावर फिरणारे पंखे इतके सवयीचे असतात, की त्यांना आपण गृहीत धरलेलं असतं. शिवाय कुलर, एसी सगळंच असतं आणि इथे त्यातलं काहीच नसतं. भौगोलिक स्थान बदललं की उन्हाचा फील पण बदलतो. त्यामुळे प्रत्यक्षात इथलाही उन्हाळा म्हणजे काय हे समजायला चार उन्हाळे पाहावे लागतात आणि मग त्याबद्दल ऐकवू (इथे लिहू) शकतो.

सुरुवातीला इथल्या थंडीचा नवीन म्हणून जसा आनंद घेता येतो आणि थोडा त्रासही होतो. पण तशी आपली मानसिक तयारी असते, त्यामुळे सुरुवातीचे काही महिने एवढं काही वाटत नाही. नवीन जॅकेट, टोप्या, बूट यांची खरेदी, ख्रिसमस, कॉफी, वाईन यांच्या साथीने हिवाळा छान वाटतो. पण मग मात्र हिवाळा कधी संपेल याचे दिवस मोजले जातात. हिवाळा संपला नाही तरी फेब्रुवारी-मार्च मध्ये पहिल्यांदा सूर्य दर्शन झालं की लोक अक्षरशः वेडेपिसे होऊन बाहेर पडतात, ते ऊन फसवं असतं कारण मोजून एक दिवस असा मिळतो. लवकर उजाडायला लागतं, अंधार उशीरा होतो पण थंडी असतेच, जॅकेट टोप्यांचा जामानिमा करून बाहेर पडणे नको वाटायला लागतं. मधूनच हे असे उन्हाचे दिवस येत जात राहतात, फक्त ते मॉक टेस्ट घेतल्या सारखे येऊन जाऊन सरप्राईज देत राहतात आणि मग तेवढ्याच अनपेक्षित पणे खरी परीक्षा येते, आपला भारतातला अनुभव इतका दांडगा आहे असं वाटत असतं, त्यामुळे ठीक आहे जमेल सहज असं वाटलं तरी हा पेपर अवघडच असतो. त्यातून आम्ही राहतो तो इथला उष्ण हवामानाचा प्रदेश आहे हे विकिपीडिया वर वाचून ते खरं काय असेल हे समजत नाही, प्रत्यक्ष अनुभवल्यावर मग हे इथलं जळगाव-भुसावळ किंवा अकोला-अमरावती (सगळीकडे आम्ही दोघं आपापल्या लहानपणच्या आठवणींचे संदर्भ जोडतो म्हणून गावं तशी आठवतात) आहे असं वाटत राहतं.

वसंतातला बहरणारा निसर्ग अनुभवत सुरुवात छान होते, पानं फुलं हिरवळ यांच्या कौतुकाला शब्द आणि फोनची मेमरी दोन्ही कमी पडते. हिवाळा संपला की उन्हाळा असं नसून, आधी वसंत येतो आणि मग तारखेनुसार जून मध्ये उन्हाळा सुरु होतो. पण त्या आधीच, हिवाळी कपडे न घालता बाहेर पडता आलं की आपल्या दृष्टीने तो उन्हाळाच असतो. हिवाळी कपडे कपाटात वर टाकणे आणि उन्हाळी कपडे बाहेर काढणे या कामाची सुरुवातीला खूप घाई असते नवीन आलेल्याना, मग काही वर्षात पहिल्या उन्हाच्या लाटेत हुरळून न जाता, नीट हिवाळा संपण्याची वाट बघून मग हे काम केलं जातं. हेच जाड पांघरूणांचं पण होतं. बाकी आईस्क्रीम खाणं, ग्रिल/बार्बेक्यू, पिकनिक, स्ट्रॉबेरी पिकिंग, मुलांना वेगेवेगळ्या खेळायच्या जागी घेऊन जाणे, मोकळ्या हवेत खेळणे, हायकिंग, सायकलिंग अशा ऍक्टिव्हिटीज खास उन्हाळ्यात करता येतात. या दिवसात सूर्यास्ताच्या वेळी आकाशातले रंग फार सुंदर दिसतात. भारतातले आवडते असे बरेच पदार्थ, जे इथे हिवाळ्यात तेवढे खाता येत नाहीत ते आता करण्याचा उत्साह वाढतो. कडधान्याना मोड येतात, इडलीचे पीठ फुगतं, ताक, सोलकढी ते पाणी पुरी असे विविध बेत या दरम्यान केले जातात. फळांची रेलचेल असते, कलिंगड, खरबूज, खूप प्रकारच्या बेरीज लोकल मार्केट मध्ये येतात. या चार महिन्यात गावोगावी अनेक फेस्टिव्हल्स आयोजित केले जातात. त्यात मग संगीताचे कार्यक्रम, लहान मुलांसाठीचे कार्यक्रम ते अगदी विविध देशांचे प्रतिनिधीत्व करणारे आंतर राष्ट्रीय मेळावे पण होतात. तिथे देशोदेशीचे खाद्यपदार्थ ते सांस्कृतिक कार्यक्रम सगळं अनुभवता येतं.

पण मग उन्हाचा पारा वाढत जातो आणि झळा जाणवायला लागतात. म्हणता म्हणता तापमान ३५ काय, अगदी ४० डिग्री वर पोचतं. एक तर पहाटे पाच ते रात्री दहा पर्यंत उजेड, त्यामुळे बरेचदा दुपारी दोन तीन नंतर उन्हाची तीव्रता खूप वाढते आणि त्याचा प्रचंड त्रास होतो. काही दिवसात आजूबाजूचं सगळं हिरवं गवत सुकून त्याच्याकडे बघवत नाही. बऱ्याच शेतात पण हेच चित्र दिसतं आणि आपण हळहळतो. गॉगल, सनस्क्रीन, टोप्या सगळं असून सुद्धा बाहेर थोडा वेळ पायी चालायला नकोसं होतं. शिवाय खूप उन्हातून एसी गाडीत किंवा याच्या उलट हेही थकवणारं ठरतं. खास उन्हाळ्यातले असे चिलटं, माश्या घरात घोंगावताना दिसतात. आमच्या घराजवळच्या ओढ्यातलं पाणी कमी होतं, मोठ्या नद्यांचं पण पाणी कमी झालेलं लक्षात येतं गार्डन मध्ये पाणी दिलं की थोड्या वेळात पक्षी त्या गारव्यात येऊन बसतात. पाण्याचा प्रचंड दुष्काळ पाहिलेला असल्याने, आता आपल्या कडे पाणी आहे तर झाडं टिकवायला हवी म्हणत आम्ही लॉन वर भरपूर पाणी टाकतो, पण कितीही दिलं तरी ते कमीच वाटतं. एकदा तरी पाऊस पडावा आता अशी मनोमन प्रार्थना करायला लागतो, मधले असे काही प्रचंड उन्हाचे दिवस गेल्या नंतर मग एकदम घन बरसुनी येतील म्हणत दाटून येतात. आम्ही आपले लगान सिनेमातल्यासारखे घनन घनन ऐकत त्या आनंदात भजी करायला हवीत असं म्हणे पर्यंत पाऊस घेऊन ढग पळून जातात. एखादी सर आली तर मधला जवळपास महिना असा पूर्ण पावसाशिवाय जातो तेव्हा जाणवणारा उन्हाळा वेगळाच असतो.

असं असलं तरी अनेक रानफुलं रस्त्यात जागोजागी दिसतात, गुलाब याच दिवसात बहरतात, डोंगरात भरपूर हिरवळ असते. सगळीकडे उत्तम पार्क, तळी, फॉरेस्ट असल्यामुळे तिथे जाऊन बऱ्याच गोष्टी करता येतात. अगदी खास जर्मन लोकांच्या दृष्टीने पाहिलं तर उन्हाळा म्हणून स्विमिंग पूल ओसंडून वाहतात. स्ट्रॉबेरी पिकिंगची शेतं पण अशीच दिसायला लागतात. आमच्या भागातले ऍस्परॅगस हे खास प्रसिद्ध आहेत, प्रत्येक रेस्टॉरंट स्टार्टर्स ते डेझर्ट सगळ्यात ऍस्परॅगस महोत्सव असतो. आज्या विविध फळांचे जॅम करून साठवण करतात. सायकल अगदी बाराही महिने चालवणारे काही लोक आहेत, पण उन्हाळ्याच्या सुरुवातीला सायकलची डागडुजी करून त्याही उन्हाळ्यात भटकायला तयार केल्या जातात. हिवाळ्यात घरात दडून बसलेले लोक आता जास्त वेळा भेटतात, भेटले की हवामानाबद्दल खुलून चर्चा करतात. बीअरचे उंच ग्लास घेऊन लोक उन्हाळ्याच्या सुट्ट्या एन्जॉय करतात. प्रत्येक राज्याच्या आपापल्या उन्हाळी सुट्ट्या असतात, त्याप्रमाणे सगळ्यांचे कुठेतरी बीच वर जाऊन टॅन होऊन येण्याचे बेत असतात.

इथे क्वचित एखाद्या ठिकाणी सिलिंग फॅन असतात, इथल्या इतर आठ-नऊ महिन्यात गरजच पडत नाही, त्यामुळे फॅन नसणे अगदीच स्वाभाविक वाटतं, पण एकूणच जर्मन लोकांना पंख्याच्या आवाजाशी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे ते लोक पंख्याशिवायच निभावून नेतात. हा सवयीचा भाग पण असेलच, कारण ऊन पण हल्ली जास्त वाढलं आहे. तरीही इतकं गरम असताना फॅन चा आवाज बिवाज त्रासदायक वाटूच कसा शकतो असा प्रश्न बाहेरच्यांना पडतो. सगळ्यांच्या खिडक्या दारं दिवसभर बंद असतात म्हणजे दुपारचं ऊन घरात येऊन गरम होणार नाही. पण गेल्या काही वर्षात वाढत्या तापमानासोबत टेबल फॅनची मागणी वाढली आहे. शिवाय आमच्या सारखे बाहेरून आलेले अनेक लोक आता इथे आहेत, ज्यांना उन्हाळ्यात पंख्याशिवाय जमत नाही. त्यामुळे बऱ्याच दुकानात टेबल फॅन आणि लहान कुलरचे पण अनेक प्रकार आता दिसतात आणि इथलेही लोक हळूहळू पंख्यासोबत जुळवून घेत आहेत. बरेच जण तर आता एसी सुद्धा लावून घेतात. पण भारतात कुणाशी याबद्दल बोलताना त्यांना 'इकडे एसी असतीलच की' असं वाटतं. मग इथे पंखे सुद्धा नाहीत नॉर्मली आणि एसी पण फार क्वचित दिसतात हे सांगितलं की वेगळं वाटतं.

मी कुणाही नवीन भारतीय व्यक्तीशी बोलताना बुलढाणा म्हटलं की लगेच समोरून 'खूप गरम असतं ना तिथे?' हा प्रश्न येतो, अगदी तसंच इथे इथल्या लोकांकडून 'भारतात तर खूप गरम असतं, मग तुम्हाला सवय असेल' असं ऐकायला मिळतं. थंडीची सवय झाली म्हणून हिवाळ्यात अनवाणी चालू शकत नाही तसंच उन्हाळ्यात सुद्धा सवय असली तरी सोपं नाही. अर्थात दुरून हे त्यांना वाटू शकतंच, ते होणारच. मग त्यांच्याशी बोलण्याच्या त्यानिमित्ताने आमच्या उन्हाळ्यातल्या आठवणी जागवल्या जातात. आपल्या उन्हाळ्याच्या सुट्ट्या म्हणजे आंबे, वाळ्याचे पडदे, कुलर, आजोळच्या भेटीगाठी, थंड हवेच्या ठिकाणी ट्रिप, उसाचा रस आणि रसवंत्या, दुपारची झोप, कुल्फी अश्या इथल्या पेक्षा वेगळ्या होत्या त्याबद्दल बोललं जातं. भारतातून जेव्हा इथे आंबे येतात तेव्हा इथे तेवढं तापमान नसतं, मग मी त्यातल्या काही आंब्याचा रस डीप फ्रीझ मध्ये ठेवून नंतर इथल्या कडक उन्हाच्या दिवसात एकदा आमरसाचा बेत करते.

आता सवयीने घराबाहेर पडताना आठवणीने पाण्याच्या बाटल्या सोबत ठेवल्या जातात. सायकल भटकंती वाढते, मित्र मंडळींसोबत बाहेर जाण्याचे बेत होतात. समर फेस्टिव्हल्सच्या तारखा आमच्याशी कॅलेंडर मध्ये आधीच नोंदवल्या जातात. मुलांच्या सुट्ट्यांप्रमाणे एखादी उन्हाळी ट्रिप प्लॅन केली जाते. गाडी पार्क करताना, बाहेर गेल्यावर कुठे थांबायला प्रत्येक वेळी सावलीतली जागा शोधण्याचा प्रयत्न केला जातो. आधी एक टेबल फॅन घेऊन तोच प्रत्येक खोलीत फिरवला जातो, माणसं वाढतात घरातली, मग दुसरा फॅन पण येतो, असं करत प्रत्येक खोलीत एकेक टेबल फॅन आपापली जागा पटकावतो. फार कमी दिवस असे मिळत असल्यामुळे त्याचं महत्व जास्त पटायला लागतं. काही दिवस अगदी नकोसे झाले तरी त्यावर आपापल्या परीने उपाय शोधले जातात आणि ते सुसह्य केले जातात. मधूनच येणारी पावसाची एखादी सर सुखावून जाते आणि म्हणता म्हणता हिवाळ्यासारखाच इथला उन्हाळा सुद्धा अंगवळणी पडतो.

1

2

3

4

5

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle