जर्मनीतलं वास्तव्य - अनुभव, माणसं इत्यादी - भाजीवाला आणि जॅम

आमच्या घरामागच्याच रस्त्यावर एक भाजीचं दुकान आहे. आम्ही नेहमी जातो त्यामुळे तो मालक ओळखीचा झाला आहे. त्याच्याकडे उत्तम क्वालिटीची भाजी मिळते, शिवाय ड्राय फ्रुट्स, घरगुती काही पदार्थ, काही रेडिमेड सलाड हेही असतात. मूळचा तुर्कीये मधला पण इथेच वाढलेला, प्रचंड उत्साही चेहऱ्याच्या त्याच्याशी भाजी घेण्यापलीकडे पण गप्पा मारल्या जातात. पहाटे तीन पासून तो कामाला लागतो. आता नेहमीचे ग्राहक म्हणून असेल, शेजारी म्हणून असेल तो बरेचदा भाजी सोबत अजून काहीतरी असंच जास्तीचं देतो. त्यातून शनिवारी गेलो तर हमखास, कारण रविवारी दुकान बंद असतं. सृजन साठी म्हणून देतो तसा इतरही आमच्या जवळपास राहणाऱ्या लहान मुलांना अधून मधून चेरी, संत्री असं देत असतो. लहान मुलं ते म्हातारी माणसं सगळ्यांशी प्रेमाने गप्पा मारत असतो. व्यवसायाचा भाग म्हणून असेल, पण ते खोटं वाटत नाही, त्याच्यात ते मुळातूनच आहे हे जाणवतं. त्याच्या कडे क्वचित कधीतरी भेंडी दिसते, भेंडी ही इथल्या स्थानिक दुकानात मिळत नाही, त्यामुळे दिसली तशी मी लगेच घेऊन आले. आता त्याला भेंडी मिळाली की मला तो आवर्जून निरोप देतो आणि मी मग घेऊन येते. अक्ख्या गावात फक्त तीन लोकांना भेंडी आवडते, एक मी, एक तुम्ही आणि एक अजून असं त्याचं म्हणणं असतं. एकदा आपली भारतीय भाजी करून त्याला नेऊन द्यायची हे मी ठरवलं आहे, पण ते अजून झालेलं नाही.

मागचे दोन महिने आई बाबा इथे होते. आईला आयुष्यभर पहाटे पाच वाजता उठण्याची सवय आहे, इथे ती कशी बशी वेळ काढत सहा नंतर उठायची आणि मग पायी फिरून यायची. बाबा फिरायला जातात तेव्हा वेगवेगळे रस्ते शोधतात, जातात, मग आईला ते सगळे रस्ते दाखवायला पुन्हा घेऊन जातात, पण सकाळच्या वेळात आई मात्र ठरलेल्या रस्त्याने रोज येते जाते.

आई जायची तेव्हा तो रोज सकाळी दुकान उघडून गाडीतून भाजी काढणे, ती लावणे या कामात आईला दिसायचा. रोज तो जर्मन मधून गुड मॉर्निंग म्हणायचा, आई इंग्रजीतून प्रतिसाद द्यायची. आईलाही हे इतकं सवयीचं झालं होतं की रविवारी दुकान बंद असतं तेव्हा तिला वेगळं वाटायचं. शुक्रवारी आई बाबा परत गेले. त्यामुळे गुरुवारी सकाळीच आई त्याच्या दुकानात जाऊन त्याला इंग्रजीतून "आम्ही आता परत जातो आहोत भारतात, पुन्हा भेटू" असं म्हणाली. त्याने आणि आईने एक दोन इंग्रजी शब्द आणि बाकी विमान उडताना दाखवण्याचे हातवारे, हात जोडून नमस्कार आणि थँक्यू अश्या पद्धतीने संवाद साधला आणि निरोप घेतला. आई पुढे फिरायला गेली, ती परत येत असताना तो आईसाठी एक गिफ्ट घेऊन तयार होता आणि तिला दिलं. त्याच्या कडे बरेच जॅम वगैरे मिळतात, त्यातल्या दोन बाटल्या खास भारतात घेऊन जा म्हणून त्याने दिल्या. आई त्याला थँक्यू म्हणाली आणि मग घरी येऊन सांगितलं. हे सगळं अनपेक्षित आणि तेवढंच आनंददायी होतं.

आज मी भाजी आणायला गेले तेव्हा पुन्हा त्याला धन्यवाद दिले. त्यानेही आई बाबा नीट पोचलेत का ही चौकशी केली. शिवाय आई स्वतःहून त्याला सांगायला आली हे त्यालाही भावलं असं म्हणाला. मग त्याच्या दुकानातल्या सगळ्यांसमोर अभिमानाने आणि गमतीने हसून कॉलर टाईट करत, त्यांना भारतात हे सांगता येईल बरं का, खास मला भेटायला आल्या त्या असं सांगितलं.

भारतातून इथे येताना अश्याच प्रेमाने भेटवस्तू, पदार्थ मिळतात आणि त्यानेही खूप वेळा भारावून जायला होतं. आम्ही इथे राहतो त्या गावात मला बुलढाण्याची, तिथल्या लोकांची आठवण येते, एक साम्य जाणवत राहतं असं मी नेहमी म्हणते. अश्या अनुभवांनी त्या वाटण्याला बळकटीच मिळते. पुन्हा दोन्ही गावांबद्दल असलेलं प्रेम अजून घट्ट होतं. या गावातल्या अश्या अनेक गमती जमती आई बाबांनी अनुभवल्या, पण ही एक विशेष लक्षात राहील. भाजीवाला, ते जॅम आणि प्रेमाने दिलेली भेट ही भावना हे सगळं कायमस्वरूपी आठवणीत राहील.

screenshot_2023-09-11_215304.jpg

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle