गिल्ट

खरं तर हा लेख नाही. निव्वळ मन मोकळं करण्यासाठी केलेली बडबड आहे. पण कोणत्या हेडिंगखाली लिहावे हे कळाले नाही म्हणून लेख.

आधीच सुचना देते की ह्या केवळ माझ्या भावना, माझ्या मनातले विचारांची वादळं आहेत. माझा नास्तिकतेकडे (?) झालेला प्रवास आणि त्याबद्दलचा अनुभव आहे. त्यामुळे, जर तुम्ही कट्टर अस्तिक असाल तर हा लेख वाचू नका. तसा माझा टोन कधीही शार्प नसतो लिहिताना. पण हल्ली कोण कशातून काय अर्थ काढेल आणि मन दुखावून घेईल सांगता येत नाही म्हणून ही सुचना.
तर....
मी लहानपणापासूनच फार देवभोळी नाही. घरी तसे वातावरणही नव्हते. घरात देव्हारा वगैरे होता पण अगदी रोज पूजा वगैरे प्रकार नव्हते. सणासुदीला गोड्धोड खाणे आणि चांगले कपडे घालणे यापलीकडे काही केले जायचे नाही. अगदी गुढी उभारणे वगैरेपण नव्हते. पण मी देवाला खूप मानायचे. उपवास करायचे. संकटात देवाला हाक मारायचे आणि संकटातून बाहेर पडले की देवाचे आभार पण मानायचे. (लहानपणी देवाला दहा चुरमुर्‍यांचा नवस असायचा माझा. आणि देव्हार्‍यातल्या त्या वाहिलेल्या चुरमुर्‍यांसाठी उंदिर देव्हार्‍यात शिरायचे आणि देव खाली पाडायचे. लोल.)

लग्न झाले तर सासरी खूप देव देव आहे. सासरे रोज पूजा करणारे, चातुर्मास, दोन्ही नवरात्रं, गणपती, गुढीपाडवा, दिवाळीत लक्ष्मीपूजन अगदी साग्रसंगीत सगळे.
शंतनूच्या नोकरीमुळे आम्ही बाहेरच राहिलो आणि माझा कधीही या गोष्टींशी फार संबंध आला नाही. लक्ष्मीपूजन आणि मध्ये एक दोन वर्षे गुढी उभारणे सोडले तर फार काही केले नाही. घरात देव्हारा होता. नवरा फक्त सणादिवशी, तेपण त्याला सुट्टी असेल तर पूजा करायचा. मीपण अधून मधून पूजा करायचे. पण रोजचा नेम नव्हता. वर्षातून एकदा सासरी आलो की कुलदैवताचे दर्शन वगैरे घ्यायला जायचो तेवढेच.

साधारण २०२० मध्ये आयुष्यात एकदमच बर्‍याच गोष्टी दाटून आल्या, त्यातून मार्ग मिळेना आणि अश्याच एका frustrating and depressing moment ला मी चक्क देव उचलून गुंडाळून ठेवले. अचानक देवावरचा विश्वास उडाला. खुद्द माझ्यासाठी हे खूप धक्कादायक आहे की त्या दिवसापासून मला कोणत्याही परिस्थितीत देवाची आठवण येत नाही. अजिबात नाही. जे घडणार आहे ते घडेल हा विचार येतो मनात दरवेळी.
याबाबत घरात कोणतीही चर्चा घडली नाही. नवर्‍याने एका अक्षराने मला विचारले नाही की देव्हारा कुठे गेला. नंतर नव्या ठिकाणी शिफ्ट झालो तेव्हापण मी 'तुला हवे तर तू देव्हारा मांड. माझे काही म्हणणे नाही' असे सांगितले पण देव्हारा ट्रंकेतून बाहेर आला नाही आणि विषय संपला. याचा अर्थ असा नाही की परत विषयच निघाला नाही. मी मला आता काहीही पूजा वगैरे करायची इच्छा होत नाही हे स्पष्ट केले आणि त्याने ते मानले.

दोन वर्षांपूर्वी सासरे गेले आणि आता घरातील कुळाचार आणि देव वगैरे कोण बघणार असा विषय निघाला. मी अगदी नवी नवी नास्तिक असल्याने एकदम defensive मोडवर गेले. साबांना 'मी आता पूजा वगैरे करत नाही त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा ठेवू नका' असे सांगितले. त्यांनी कारण विचारले पण 'आता मला नाही करावेसे वाटत' यापेक्षा वेगळे मला काही सांगत आले नाही. त्या जरा चिडल्या आणि त्यामुळे मी पण जरा अडून बसले.
'माझ्या मनात कोणतीही श्रद्धा नसताना मी निव्वळ उपचार म्हणून केलेली पुजा देवापर्यंत केवळ मी स्त्री आहे म्हणून पोचेल का? त्यापेक्षा शंतनूने मनापासून पूजा केली तर ते चुकीचे कसे? मी हवं तर सगळी तयारी करून देते पण मला पूजा करायला सांगू नका. किंवा आता केवळ सासरे नाहीत म्हणून तुम्ही केलेली पूजा पोचणार नाही का?' असे मी विचारले. त्यावर कोणाकडेच उत्तर नव्हते. थोडी वादावादी झाली.
मग गणपतीच्या वेळी लेक युनिव्हर्सिटीत जाणार म्हणून आणि नवरात्रात इतर काही कारणाने हा विषय परत निघाला नाही. (नवरात्र तुम्ही करा म्हणून साबा मागे लागल्या होत्या नवर्‍याच्या, पण त्याने त्यांना कसे गप्प केले ते मला माहिती नाही.)

आता जवळ जवळ तीन वर्षे झाली मी देवळात जात नाही. वाईची असूनही घाटावर जाऊनही मी गणपती मंदिरात जात नाही. हेका म्हणून नाही पण खरंच मनातून इच्छा होत नाही. देवळात गेले तरीही मी हात जोडत नाही. जोडले जात नाहीत. वडिलधार्‍यांच्या पाया पडते. नमस्कार करते. पण देवासमोर हात जोडले जात नाहीत. असे का याचे मी उत्तर देऊ शकत नाही.

तर यावर्षी परत श्रावण सुरू झाल्यावर साबांनी मागे लागणे सुरू केले. नवर्‍याने 'आम्ही गणपतीत येतो, पण आत्ता काही करायला लावू नकोस' असे स्पष्ट सांगितले. गणपतीत घरी जायचा विषय निघाला तेव्हा मी जरा स्पष्टच बोलले. आता पुलाखालून बरेच पाणी गेले असल्याने मी थोडी शांत होते आणि साबा समोर नसल्याने मला उगाच चिडवणारंपण कोणी नव्हतं. मी विचार केला की जर माझ्यसाठी देव अस्तित्वातच नाहीत तर मग मी मनापासून पूजा केली काय आणि नाही काय काय फरक पडतो? एखादी वस्तू एका जागेवरून उचलून ठेवल्यासारखे जर मी तबकातले फूल उचलून देवावर ठेवले तर त्यामुळे मला काही फरक पडू नये. मी हे विचार नवर्‍यालाही सांगितले. आणि हेही स्पष्ट सांगितले की मी केवळ आणि केवळ याच भावनेने सगळे पार पाडेन. आणि जेव्हा मला हे सगळं function at() { [native code] }इ होतंय असं वाटेल, मी त्यात काही बदल करेन आणि तुम्हांला ते मान्य करावे लागतील. तुम्हांला जर याने काही फरक पडणार नसेल तर मी करायला तयार आहे. तो तयार झाला.
मग आम्ही गणपतीसाठी सातार्‍याला गेलो. मी ते वातावरण, गोडधोड, नटणे मुरडणे सगळे एंजॉय केले. साबांनी सांगितले तशी पूजा केली, तीन तीन तास उभं राहून नैवेद्याचा स्वयंपाक केला. नंतर कंबरेने कुरकुर केली तर औषधंपण घेतली. या सगळ्यांत माझी फ्री लान्सिंगची कामंपण केली. काही तक्रार न करता सगळे केले.
पण..... या सगळ्या काळात मला एकदाही मनापासून हात जोडावेसे वाटले नाहीत. डोळे मिटल्यावर डोळ्यांसमोर देवाची प्रतिमा आली नाही. मी साबांनी सांगितले तसे फूल वाहिले, कुंकू वाहिले, हात जोडले पण त्यात कोणत्याही भावना नव्हत्या. हे माझ्यासाठी फार धक्कादायक होते. कारण मला वाटत होते की त्या वातावरणात कदाचित माझ्या मनातली ही भिंत थोडीशी ढासळेल. पण तसे झाले नाही.
गणपती विसर्जनानंतर निवांत बसलो असताना साबा म्हणाल्या,"सगळं छान झालं. प्राचीनं अगदी मनापासून सगळं छान केलं' आणि मला अक्षरशः काय बोलावं हे कळेना. फार फार गिल्टी वाटलं. त्यांची फसवणूक केल्यासारखं वाटलं. माझे त्यांचे काही अगदी गूळपीठ नाही पण तरीही मला त्यांच्याबद्दल फार वाईट वाटलं.

मी तेव्हापासून थोडी अस्वस्थ आहे. की मी काही चूक केली का? कधी वाटतं की मी जे काही केले ते भले त्या असल्या नसल्या देवापर्यंत पोचले नसेल पण निदान माझ्यासभोवतालच्या, जवळच्या हाडामांसांच्या माणसांना त्यातून आनंद मिळाला. चार दिवस गोड्धोड् खाल्ले, सणाचे वातावरण अनुभवले. घरात हसणे खिदळणे झाले. नवर्‍याने माझ्या देव गुंडाळून ठेवण्याला कधी आ़क्षेप घेतला नाही. मला कोणतीही बळजबरी केली नाही. माझ्या विचारांचा आदरच केला. मग चार दिवस... तेही माझ्या मनाविरुद्ध असे नाही म्हणता येणार... जर मी थोडे त्यांच्या विचारांचा आदर केला तर काय बिघडले?

मला माहिती नाही की मी वागतेय ते चूक आहे की बरोबर... पण सध्या तरी मन जो कौल देईल तो उचलायचा असे ठरवले आहे. मला काही विशिष्ट स्तोत्रं ऐकायला आवडतात. ती मी आवर्जून ऐकते. पण अजूनही देवदर्शनाला जावे, हात जोडावे असे मनापासून वाटत नाही. अजूनही पुर्वीप्रमाणे 'देवा' अशी हाक मारली जात नाही. काही प्रश्नं सोडवण्यात देवाने मदत करावी असे मनात येत नाही. ज्यात त्यात देवाची आठ्वण निघत नाही.

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle