लाल भोपळ्याची बाकर भाजी - ओव्हन व्हर्जन

लाल भोपळ्याची बाकर भाजी

विदर्भात केला जाणारा हा एक खास प्रकार. लग्नकार्यात, सणावाराला ही भाजी केली जाते. लग्नात आचारी करतात तेव्हा यात प्रचंड तेल असते, जे मी बरेच कमी घेतले आहे. पण तरीही नेहमीच्या भाज्यांपेक्षा तेल जास्तच हवं, तरच खरा फील येतो. या भाजीचेही बरेच व्हेरिएशन्स आहेत. आलं लसूण घालून काही ठिकाणी केली जाते, जर काही धार्मिक कार्याच्या दिवशी घरी केली, तर लसूण यातून वगळला जातो. लाल भोपळा अजिबात न आवडणाऱ्या व्यक्तींनाही ही भाजी हमखास आवडते असा अनुभव आहे. तेव्हा अवश्य करून बघा. मी एक कृती खूप पूर्वी लिहीली होती, पण आता ती वाचताना जाणवलं की आता मी थोडी वेगळी करते. त्यामुळे ती रेसिपी लवकरच देईन. पण यावेळी ही भाजी मी ओव्हन मध्ये केली. त्याची ही पाककृती -

साहित्यः
लाल भोपळा चिरून - २ वाट्या (शक्यतोवर सालासहित घेतात, मी मात्र साले काढली आहेत) भारताबाहेर असाल तर बटरनट स्क्वाश प्रकारचा भोपळा या भाजीसाठी चांगला लागतो.
सुके खोबरे - पाव वाटी (डेसिकेटेड कोकोनट असेल तर थोडं जास्त, पाऊण वाटी)
खसखस - पाव वाटी
तेल - अर्धी वाटी
हिंग - १ लहान चमचा
चिंचेचा कोळ - २-३ टेबलस्पून
गूळ - २-३ टेबलस्पून
हळद - १ छोटा चमचा
तिखट- २ छोटे चमचे
धणे - १ टेबलस्पून
जिरे - १ टेबलस्पून
गोडा मसाला - १ टेबलस्पून
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर
पाणी - अर्धी वाटी

कृती:
खोबरं आणि खसखस वेगवेगळं भाजून घ्या. जिरे, धणे हे पण कोरडेच भाजून घ्या. ह्यातच आता मीठ, बारीक चिरलेला/किसलेला गूळ, गोडा मसाला, तिखट, हळद, हिंग घालून मिक्सर वर हे कोरडं वाटून घ्या. हा कोरडा मसाला आदल्या दिवशीही करून ठेवता येतो.

या मसाल्यात चिंचेचा कोळ आणि तेल घाला.
एका ओव्हन सेफ भांड्यात चिरलेल्या लाल भोपळ्याच्या फोडींना हे मिश्रण चोळून घ्या. थोडे पाणीही घाला, त्याने भाजी खूप कोरडी होणार नाही. मीठ चवीप्रमाणे अ‍ॅडजस्ट करा आणि किमान तासभर तसंच ठेवा. दोन तासही चालेल.
ओव्हन प्रीहीट करायला ठेवा आणि २५-३० मिनीट ओव्हन मध्ये ठेवा. नंतर कोथिंबीर घालून सर्व्ह करा.

1

screenshot_2023-10-24_223553.png

याच पद्धतीने मी झुकिनीची पण भाजी केली ओव्हन मध्ये, तीही छान झाली होती.

पाककृती प्रकार: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle