A page from a diary of Ginger Kulkarni - 21st October 2022

21st October 2022
आज दुपारी एक मजाच झाली. प्राची लॅपटॉप वर काम करत होती आणि मी नेहमीप्रमाणे दरवाज्यात लोळत पडलो होतो. तर एकदम गेटमधून कोणीतरी आत यायला लागलं. मी मान वर करून पाहिलं तर मिहिका....
मी उड्याच मारायला लागलो. जोरात भुंकून हाका मारल्या प्राचीला. मग ती बाहेर आली आणि नेहमीप्रमाणे तिनं नो एक्के नो नो दुणे नो सुरू केलं. पण मला काही सुचतच नव्हतं. मी घरभर धावत सुटलो. जोरजोरात गाणी म्हणू लागलो. ती गाणी ऐकून मिहिकाबरोबर तिचे दोन फ्रेंड्स आले होते ते 'आंटी बाद में आते है ' म्हणत पळूनच गेले.
प्राचीला जरा वाईट वाटलं. मला गच्चीवर सोडून ती त्यांना आत बोलावून खाऊ देणार होती..पण मी तिचा डाव हाणून पाडला. मग ती म्हणाली,"आता तू शांत बसलास तरच मी दार उघडणार." मला मिहिकाला भेटायचं होतं म्हणून मी एकदम गुड बॉय सारखा बसलो. पण तिनं दरवाजा उघडायचा अवकाश मी बाहेर धूम ठोकली. पोर्चमध्ये उड्या मारल्या. मिहिकाभोवती गोल गोल फिरलो. तिच्या अंगावर उड्या मारल्या. तिला चालतं अंगावर उड्या मारलेल्या.
ती माझ्याशी खेळायला लागली तर प्राची म्हणाली,"ठोंब्या, बस की आता. तिला आत येऊदे. दमली आहे ती. जेवायचं आहे तिला. तू आपला जेवून खाऊन ढू वर करून पडला होतास दिवसभर."
मग मी मिहिकाला आत घेऊन आलो. नंतर त्या दोघींची अखंड बडबड सुरु झाली. काय बोलतात एवढं कायकी.
संध्याकाळी बाबा आला मग परत बडबड सुरु. मी जेवलो आणि लोळत पडलो होतो. ते तिघं बोलतच होते काय काय. मग एकदम उठले आणि कपडे बदलून आले. बाबाने गाडीची चावी घेतली आणि प्राची म्हणाली,"चल जिंजर."
मला वाटलं - मला बाहेर अंधारात बसवून निघाले हिंडायला. मला अजिबात आवडत नाही ते..
पण बाहेर आल्यावर तिने लीश घेतली आणि मला बसायला सांगितलं. माझा विश्वासच बसेना...मी पण जाणार फिरायला!!! गाडीतून!!! मी इतका खुश झालो की पोर्चमध्येच बेली डान्स करत पळत सुटलो. ते तिघेही हसायला लागले. मीपण हसायला लागलो. जोरजोरात गाणी म्हणू लागलो. दोन मिनिटे मी असाच दंगा केला.. गोविंदा सारखं 'इत्ती खुशी...इत्ती खुशी' म्हणू लागलो. मग प्राचीने मला शांत बसायला सांगितलं आणि लीश लावली.
मग गाडीत बसून आम्ही भुर्र्रऽ फिरायला गेलो.
ती गंमत आता उद्या लिहितो. आज दमलो आहे. दिवसभरात दोनवेळा नाचलोय कंबर दुखतेय आता...

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle