वास्त्लापाएव

आज इस्टोनियात वास्त्लापाएव (Vastlapäev) आहे. ख्रिसमसइतकीच उत्सुकता इथे असते ती फेब्रुवारीतल्या 'वास्त्लापाएव' ची. सण निमित्तमात्र, वर्षभर या दिवसाची वाट बघितली जाते ती लुशलुशीत, मुरांब्याने भरलेले 'वास्त्लाकुक्केल' (Vastlakukkel) खाण्यासाठी. आमच्या घरात या क्रिम भरलेल्या पावांना 'कुक्केल' असं प्रेमाचं नाव आहे. खरंतर फेब्रुवारी महिना म्हणजे हिमवृष्टी, बर्फाचा जोर. कधी कधी हिमवादळंसुद्धा. पण निसरडे बर्फाळ रस्ते तुडवत गल्लीतल्या बेकर्‍यांमधले कुक्केल चाखण्याची मजा काही औरच.

kukkel-2024_0.jpg

इस्टोनियाचा 'वास्त्लापाएव' म्हणजेच Shrove Tuesday - इस्टरच्या आधी ४७ दिवस. मला वाटतं इंग्लड, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडामध्ये हा दिवस 'पॅनकेक मंगळवार' म्हणून ओळखला जातो. 'श्रोव्ह' शब्दाचा उगम 'श्राईव्ह' या शब्दामधे. श्राईव्ह म्हणजे 'दोषमुक्त करणे'. अँग्लो-सॅक्सन ख्रिश्चनांसाठी हा आत्मपरीक्षेचा, चुकांचा पश्चात्ताप करुन पापांपासून मुक्तता मिळवण्याचा दिवस. पण इस्टोनिया काही फारसा धार्मिक देश नाही. आजही अर्ध्याहून अधिक इस्टोनियन जनता स्वत:ला नास्तिक मानते. युरोपात 'लास्ट पेगन' म्हणून ओळखला जाणारा भाग अगदी मध्ययुगात ख्रिश्चन बनला. त्यामुळे निदान इस्टोनियात तरी 'वास्त्लापाएव' या दिवसाचं प्रयोजन कंटाळवाण्या थंडीत मनोरंजनाचा दिवस इतकंच.

पेगन काळात वसंत ऋतूच्या आगमनाचा उत्सव म्हणून हा सण साजरा केला जात असे. त्या काळची साजरा करण्याची पद्धत अशी की या दिवशी बर्फावरुन घसरायचा खेळ खेळणं आणि पारंपारिक नाच करणं. बर्फाच्या कड्यावरुन, किंवा बर्फाळ उतारावरून घसरत खाली येणं हा आजही लहान-थोरांचा आवडता खेळ. जरा बर्फ पडायला लागला की स्थानिक चालले ढकलगाड्या घेऊन बर्फावर घसरायला. जुन्या समजुतींनुसार, वास्तलापाएवच्या दिवशी जितकं लांबवर घसराल तितकं येणार्‍या उन्हाळ्यात शेतात पीक जास्त. पूर्वीच्या काळी बर्फावरुन घसरण्यासाठी तागाच्या पिशव्या वापरल्या जात. हल्ली प्लॅस्टीकच्या ढकलगाड्या वापरल्या जातात.

जुन्या काळी आजच्या दिवशी आग पेटवयला मनाई होती. सूतकताई निषिद्ध होती. बायकांसाठी मात्र सुट्टीचा, भरपूर दारु पिण्याचा दिवस. वर्षातला अर्धा काळ बर्फाखाली. त्यामुळे इथे फारसं काही उगवत नसे. इस्टोनियाच्या खाद्यसंस्कृतीत हातावर मोजण्यासारखे पदार्थ सोडले तर फारसं दखल घेण्यासारखं असं काही नाही. आहारात जर्मन आणि रशियन पदार्थांचा प्रभाव जास्त करुन दिसून येतो. वास्त्लापाएवच्या दिवशी इस्टोनियन पारंपारिक खाद्य म्हणजे वटाणे, शेंगदाणे आणि डुक्कराचं मांस उकडून केलेलं सूप. याच्या जोडीला 'कानामागून येऊन तिखट' (खरंतर गोड) झालेला पदार्थ म्हणजे 'वास्त्लाकुक्केल'.

इस्टोनियात ख्रिश्चन धर्म आणि त्यासोबत वास्त्लाकुक्केलचा शिरकाव झाला तो मध्ययुगीन काळात. त्याकाळी पीठ, साखर आणि अंडी असे अगदी साधे घटक वापरून पाव बनवला जाई. हिवाळा आता लवकरच संपणार, शिशिरात लपून बसलेला सूर्य वसंतासोबत परतणार. त्याच्या स्वागतासाठी काहीतरी विशेष करायला हवं म्हणून पाव गोल आकारात वळले जातात. इतकीच काय ती कलाकुसर. पूर्वी हे पाव चहा, कॉफी किंवा दालचिनी, गुलाब घातलेल्या दुधासोबत खाल्ले जात असत अशी नोंद आढळते.

जर्मनी (heisswecke), नॉर्वे, डेन्मार्क (fastelavnsbolle), आईसलंड (bolla)आणि स्वीडनमधे (hetvägg) , लातविया (vēja kūka) हे असेच पाव बनवतात. साधारण तेराव्या शतकाच्या सुरवातीला जर्मन्स इस्टोनियात व्यापारासाठी आले आणि राज्यकर्ते झाले. इथे स्थायिक झालेल्या जर्मन लोकांना 'बाल्टीक जर्मन्स' म्हणून ओळखलं जातं. बाल्टीक जर्मन्समुळे जर्मन भाषा, खाद्यसंस्कृती, रितीभाती यांची स्थानिक इस्टोनियन लोकांत बेमालूम सरमिसळ झाली आहे. बाल्टीक जर्मन स्वयंपाकघरात, यीस्टच्या पीठापासून बनवलेल्या पावात संत्र्याची साल किंवा बदामाचं क्रिम भरत. आजकाल मात्र मैदा, साखर, अंडी, क्रिम आणि वेलची, दालचिनी वापरुन बनवलेले पाव बाजारात दिसतात. पावाच्या आत भोक पाडून फळ, मुरांबा किंवा सुकामेवा भरतात.

पारंपारिक इस्टोनियन कुक्केलच्या आत रासबेरी किंवा लिंगनबेरीचा (lingonberry) मुरांबा असतो. पाव कापून त्यावर क्रिम घातलं जातं. पावाच्या आत सहसा,बेरीचा मुरांबा योग्य प्रमाणात भरला गेला पाहिजे. ना कमी ना जास्त. कमी मुरांबा घातलेला पाव सुका लागतो. मुरांबा जास्त झाला तर आतून पाव ओलसर होऊ शकतो. तसंच क्रिमचं. अस्सल इस्टोनियन माणूस वाढत्या महगाईला कुरकुरणार नाही पण पावावर जSSSSरा क्रिम कमी पडूदेत लागलीच कुरबुर सुरु.

या दिवसात हे पाव केक, पेस्ट्रीच्या दुकानात कोपर्‍या कोपर्‍यावर मिळतात पण उत्तम दर्जाचा कुक्केल चव न घेतात नजरेनं टिपणं कला आहे. ती अथक परिश्रमानेच साध्य होते. नुस्त्या डोळ्यांनी समजायला हवं कुठल्या कुक्केलवरची क्रिम तजेलदार, कुठली निस्तेज. कुक्केल निगडीत इस्टोनियन शब्दसंग्रह आत्मसात करणं त्याचाच एक भाग. नाहीतर कुठला कुक्केल 'मोसिगा' (मुरांबा भरलेला) आणि 'इल्मा मोसिता' (नुसताच पाव, आत मुरांबा नाही) कसा समजणार? चुकून 'इल्मा मोसिता' घेतला म्हणाजे झाली ना पंचाईत.

kukkel-2023.jpg

आपल्याकडे वडीलेपार्जित संपत्ती, पिढ्यांन् पिढ्या हस्तांतरीत होणार्‍या साड्या, दागिने, भांडी, पाककृती असतात. तसंच इस्टोनियन लोकांची, वसंत ऋतूत बेरी हुडकायची, शरद ऋतूत मश्रूम खूडायची , शिशिराल्या रात्रीत चांदणं टिपायची परंपरागत गुप्त ठिकाणं असतात. कुक्केलचंही तेच. त्यांना बरोब्बर चांगला पाव मिळणारी दुकान ठाऊक असतात. बाहेरुन येऊन आपल्याला माहीत असण्याचा संबंधच नाही. नव्याच्या नवलाईत आपण कुठलाही ऐरागैरा कुक्केल वा! वा! करुन खादडतो. पण कालांतराने भाषेत जरा जरा जम बसायला लागला की इतके दिवस ऑफिसात आपल्याला नुसताच लांबून निरखणारा इस्टोनियन माणूस, स्वतःहून बोलायला लागतो. यात आपली अत्युच्च कामगिरी अशी की, परक्या देशातून येऊन त्याची फारशी माहीती नसलेली भाषा शिकायचे घेतलेले कष्ट. मग हळूच सल्ला मिळतो. "वत्सा, मिटक्या मारत खातोयस तो काही 'क्लासिकालने एस्ती कुक्केल' (Classic Estonian Bun) नोहे! एक काम कर या लाऊपाएवला (शनिवारी) अमुक ढमुक मागीच्या (डोंगराच्या) तमुक तमुक ईशान्येकडच्या रस्त्याला, पन्नास पावलं सरळ जा. तिथे जुनी ENSV  तेहास (फॅक्टरी) लागेल. तिथेच तळमजल्याला आता बेकरी आहे. तिथला कुक्केल खा आणि मग आपण बोलू." आता यात पहिलं काम म्हणजे, आपल्या यथातथा इस्टोनियनच्या जोरावर नैऋत्य-ईशान्य, डावं-उजवं या दिशा इस्टोनियन-इंग्रजी-मराठी अशा उड्या मारत समजून घ्यायच्या. मग त्या नकाशावर शोधायच्या. बरं, हे आपल्याला 'मागी' (magi) सांगणार पण सगळा इस्टोनिया सपाट. नावाला फक्त मागी. इस्टोनियातला सगळ्यात उंच डोंगर म्हणजे 'सूर मुनामागी' (Suur Munamägi) , ३१८ मीटर इतक्याच अबब उंचीचा. त्यामुळे नावातल्या 'मागी'च्या मागे जाण्यात काय हशील? त्यात वेळ म्हणजे वेळ. एक मिनीट इकडे तिकडे नाही. आपण हक्काचा शनिवार मजल दरमजल करत, वैतागत त्या बेकरीपर्यंत पोचणार. "एवढं काय्ये, साधा पाव तर आहे. मोदक, पुरणपोळ्या बनवा मग मानलं" असं चडफडत कुक्केलचा पहिला घास घेणार. तो जिभेवरुन पोटात जाताच आपण थेट 'तेईने माईलमास' - दुसर्‍या जगात पोचणार. एकाच वेळी जीभेवर विरघळणारी क्रिम, मुरांबा आणि वेलची घातलेला पाव. अहाहा!

आपली पुढची एक-दोन वर्ष अशी याच्या त्याच्या सांगण्यावरुन कुक्केल खाण्यात जातात. सरते शेवटी आपली हक्काची अशी नजर आणि चव तयार होते. आवडत्या बेकरींची निमेकिरी (यादी) बनते. कानाकोपरा फिरुन टिपलेल्या जागा आपलं स्वत:चं असं 'सालादुस' (गुपित) असतं. पुल्लींग-स्त्रीलिंग फरक न करणार्‍या इस्टोनियन भाषेतल्या 'वास्त्लाकुक्केल' शब्दाला आम्ही मराठी व्याकरणाचे नियम नकळत लावतो. कुक्केल मराठीत 'तो' होतो. कुक्केलचं अनेकवचन 'कुक्लिद', पण आमच्या मराठी मेंदूत ते 'कुक्केल'च असतं. सवयीने गुढीपाडवा, गणपती, दिवाळीसोबत यावर्षी "वास्त्लापाएव कधी आहे बरं?" शोधून कालनिर्णयवर खूण केली जाते. कुठे, कधी, किती कुक्केल खायचे ठरवलं जातं. "यावर्षी खूप महागला नै.. मागच्या वर्षी कित्ती स्वस्त होता" या चर्चेवर कॅलरीचा जराही विचार न करता एकामागून एक कुक्केल फस्त होतात. वास्त्लापाएव संपतो. आमचं मराठी मन गुढीपाडव्याच्या श्रीखंड-पुरीचे बेत आखायला लागतं.

उद्या व्हॅलेंटाईन्स डे. इस्टोनियात मैत्रीदिवस म्हणून साजरा केला जातो.
माझ्याकडून सर्व मैत्रीणींना Head sõbrapäeva! (Happy friendship day)

टीपा:
१. Vastlapäev मधला päev म्हणजे 'दिवस' (day).
२. कुक्केल - Bun
३. ENSV - सोव्हिएत काळातलं इस्टोनियाचं नाव. (Eesti Nõukogude Sotsialistlik Vabariik)
४.Suur Munamägi - The Great Egg Mountain

लेख: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle