नैसर्गिक विषमुक्त शेती @ आंबोली - एक प्रवास : भाग २

आधीचा भाग : https://www.maitrin.com/node/5603

ऊस लावायच्या आधी जमिनीची मशागत करुन घेणे गरजेचे होते. जमिन दोन वर्षे पड होती, त्यामुळे सर्वत्र गवत व छोटी झुडपे माजली होती. शेतात फिरताना पायाला जमिन दगडासारखी घट्ट लागत होती. ऊसाच्या ऊभ्या सऱ्या पायाला लागत होत्या म्हणजे इतक्या भयंकर पावसातदेखील माती विरघळली नव्हती, दगडासारखी घट्ट झाली होती. वर्षानुवर्षे रासायनिक शेती केली कि जमीन अशीच दगड होते.

आम्ही जुनमधे आंबोलीत आलो तेव्हा शेताला कुंपण घालायचे काम पुर्ण झाले होते. एका शेजाऱ्याकडे जास्तीची भात व नाचणीची रोपे होती ती त्याने माझी परवानगी घेऊन शेतात लावली होती. तो तेवढा भाग सोडला तर बाकी शेत तणाने भरले होते. भात व नाचणी मध्येच उभी असल्यामुळे मला त्याची काढणी होईपर्यंत वाट बघत बसावे लागले. भात पिकून कापणी झाली तरी नाचणीची बोंडे पिकतच होती. ती कधीतरी नोव्हेम्बराच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत काढली गेली आणि त्यानंतर मी नांगरटीच्या मागे लागले. माजलेल्या घन गवतामुळे कोणी नांगरटीला तयार होईना. आधी गवत काढुन घ्या मग नांगरुया असेच सगळ्यांचे मत पडले. तीन एकर शेतातले गवत काढायचा खर्च जबरी झाला असता म्हणुन गवत जाळण्याचा ऊपाय सुचवला गेला ज्याला शेत जाळणे म्हणतात. मला हा ऊपाय नको होता पण नाईलाजाने हो म्हणावे लागले.

शेतात आग घालताना शक्यतो भल्या सकाळी किंवा संध्याकाळी उशिरा घालतात कारण या वेळेस वारा कमी असतो व गवत थंड असते. दुपारी उन्हात गवत गरम होते व कापरासारखे जळते. आग घालताना हिरव्या पानांच्या झुपकेदार डहाळ्या हातात तयार ठेवायच्या म्हणजे नको तिथे जाणारी आग डहाळ्यानी विझवून मर्यादेत ठेवता येते. डिसेंबरात सगळीकडेच गवत बऱ्यापैकी वाळलेले असते त्यामुळे अतिशय काळजी घेऊन शेतात आग घालावी लागते. नाहीतर शेजारच्या शेतात आग पसरण्याचा धोका असतो. ( हा ही अनुभव घेऊन झालाय, पुढे येईलच.)

आग घालायची तर ती कंट्रोल करायला लोक हवेत, त्यासाठी शेजारच्या बायका बोलावल्या आणि एका संध्याकाळी हिरव्या डहाळ्या हातात घेतलेल्या बायकांची फौज घेऊन मी शेतात ऊतरले. १०-१२ गुंठे गवत जळले पण वरवर जरी वाळल्यासारखे दिसले तरी आत गवत ओले होते. ते जळेना. आग घालून काहीही फायदा झाला नाही, गवताचा प्रश्न होता तिथेच राहिला. त्यात शेतात मला बैलाची नांगरट हवी होती, शेतात ट्रॅक्टर नको कारण त्याच्या वजनाने जमिन दबली जाते आणि तिची पाणी जिरवायची क्षमता कमी होते हा संस्कार माझ्या डोक्यावर झालेला होता. या गवताने भरलेल्या आणि दगडासारख्या घट्ट जमिनीत बैलाने नांगरट झालीच नसती. आता काय करायचे??? ट्रॅक्टरला पर्याय नव्हता. शेवटी गावातला एक ट्रॅक्टरवाला बोलावला पण त्याने शेत बघून नांगरट नीट होणार नाही म्हणायला सुरवात केली.

आंबोलीत मी राहते बाजारवाडीत आणि माझे शेत आहे नांगरतास वाडीत. म्हणजे माझ्या घरापासून बरोब्बर आठ किमी दूर. रोज जा ये करून करून तिथले बरेच लोक माझ्या ओळखीचे झालेत. शेत जरी आमच्या मालकीचे असले तरी माझ्या गावच्या घराच्या मंडळीनी कधीच शेतात व शेतीत रस घेतला नव्हता. जमीन आहे म्हणून शेती कशीबशी रेटत होते. त्यामुळे शहरातून येऊन मी शेतात इतका रस घेतेय याचे गावच्या मंडळींना थोडे कौतुक, थोडे आश्चर्य, थोडी असूया असे काहीसे वाटे. शक्य ती मदत मात्र हे लोक आनंदाने करत होते आणि आजही करतात.

त्यापैकी काहींनी बाजूच्या गावातल्या चांगले काम करणारा म्हणुन लौकिक असलेल्या एका ट्रॅक्टरवाल्याचा रेफरन्स दिला. मी त्याच्या घरीच जाऊन धडकले. हो ना करता तो तयार झाला एकदाचा. हा खरेच चांगला माणुस मिळाला. त्याची पुढे खुप मदत झाली.

शेत नांगरण्याची सोय केल्यावर पाणी शेतापर्यंत कसे आणायचे हा प्रश्न उपस्थित झाला. महाराष्ट्र वीजमंडळाचा मीटर व पाण्याची मोटर काकाची म्हणजे आता माझी असली तरी हिरण्यकेशी नदीतील पाणी व माझे शेत यांच्यामध्ये अजुन एक शेत होते. त्या शेताखाली पाईपलाईन घालुन शेजारच्या शेताच्या कडेपर्यंत पाणी आणले होते पण तिथुन माझ्या शेतापर्यंत आजपावेतो जमिनीवरच्या उथळ पाटातुन पाणी धावत येत होते. ऊसाला पाणी सोडले की पहिल्या दिवशी ते २०० मीटर अंतर पार करून माझ्या शेतात पोचायला त्याला तासभर तरी लागायचा असे मावशीकडून ऐकले होते. पहिल्या दिवशी पाटात भरपूर पाणी मुरले की दुसऱ्या दिवशी तितका वेळ लागायचा नाही. यात भरमसाठ पाणी वाया जात होते. पाणी देणाऱ्याचा वेळही फुकट जात होता. आंबोलीत पाणी भरपुर, त्यामुळे लक्षात कोण घेतो? दोन वर्षे वापरात नसल्यामुळे तो गवतात अदृश्य झाला होता. शेवटी मोजमापे घेऊन शेजाऱ्याचे शेत ते माझे शेत यात किती पाईप लागतील ते काढले, पाईप व इतर सामग्री आणुन एक जेसीबी मागवला, लांब चर खोदला आणि त्यातुन पाईपलाईन घालुन पाणी शेताच्या दारात पोचवले.

मी शेती करायला पाळेकर गुरुजी पद्धती वापरतेय, त्यात शेतात देशी गाय असणे अनिवार्य आहे. कोणे एके काळी घरात गायी म्हशी होत्या, आता सगळे इतिहासजमा झाले. त्यामुळे गावी गेल्यावर मी देशी गायीच्या शोधात होते. गाय मिळेपर्यंत काय तरी व्यवस्था करणे भाग होते. गावाच्या ओगले कुटुंबाशी आमच्या पूर्ण कुटुंबाचे पूर्वापार संबंध. ह्यांचा शेतीचा व दुधाचा धंदा आहे आणि एक देशी गाय ते बाळगून आहेत. जून ते डिसेंबर 2020 मी अधून मधून त्यांच्याकडून शेण आणत होते पण त्यांच्याकडे गोमूत्र पकडायची सोय नव्हती. त्यामुळे मला कुठेतरी माझी सोय करायलाच हवी होती. मी गावात कोणाकडे देशी गाय मिळते का शोधत होते. आणि गावात लोकांना देशी गाय म्हणजे काय ते कळत नव्हते. ते देशीला गावठी गाय म्हणतात. गावात देशी गायी दिसणे आता दुरापास्त झालेय. सगळ्यांकडे संकरित गायी. शेवटी एकाकडे देशी गाय आहे असे कळल्यावर मी बघायला गेले. माझ्या मते तीही संकरित होती पण बाकीच्यांच्या मते ती देशी होती. शेवटी मी म्हटले जाऊ दे, मला हवी तशी गाय मिळेपर्यंत चालवून घेऊ. गाय किंवा कुठलेही प्राणी पाळणे किती कटकटीने असते हे मला माहित नसल्यामुळे मुर्खासारखे मी स्वतः गाय पाळायचे ठरवले होते. आजवर गोठे केवळ बाहेरुन पाहिल्याचा परिणाम, अजुन काय… Happy

हि जी गाय मिळालेली तिचे शेण मला सहा महिने मिळाले. पावसाळ्यात त्याने गाय दुसरीकडे पाठवून दिल्यावर माझ्यासमोर परत प्रश्नाचिन्ह उभे राहिले. मी परत ओगल्यांना शरण गेले. त्यांच्याकडे रोज जाऊ लागले तसे गोठ्यातले कष्ट मला दिसायला लागले. त्यांच्याकडे जरी गोठ्यात काम करायला कायमचा माणूस असला तरी इतर सर्वत्र आहेत तसे ह्याचेही नखरे असायचे. न सांगता अचानक गायब व्हायचे, पगार मिळाला कि चार दिवस गडप. पगार देतानाच समजून जायचे कि आता हा पुढचे चार दिवस येणार नाही, त्याला बाटलीशिवाय काम झेपायचे नाही. तो स्वतःच बाटलीची व्यवस्था करायला गेला तर अजून दोन तास लेट येणार, त्यापेक्षा आपणच बाटली आणून ठेवायची.... इत्यादी इत्यादी... तो नसला कि घरमालकिणीला गोठ्यात उतरावे लागायचे. बहुतेक वेळा ओगले बाई मला गोठ्यातच भेटायच्या. हे बघून गाय सांभाळणे आपल्या कुवतीबाहेरचे आहे हे माझ्या लक्षात आले. आजवर गाय न मिळाल्याबद्दल मी देवाचे शतशः आभार मानले आणि विन विन सोलुशन शोधले. ओगल्याना सांगितले कि तुम्ही गोमूत्र पकडायची कायतरी सोय करा आणि मला रोज शेण व गोमूत्र द्या. मी गाय पाळली तर मला खर्च आहेच. तो मी तुम्हाला देते. त्यांचे त्याचवेळी गोठ्याचे रिनोवेशन सुरु होते. त्यांनी गोमुत्राची व्यवस्था केली आणि माझा एक प्रश्न मिटला.

नांगरट होईपर्यंत मी आजुबाजुला होणाऱ्या नव्या ऊस लावणीचे निरिक्षण करत होते. आधी जमिनीची मशागत करतात म्हणजे ऊभी आडवी नांगरट करुन जमिन सपाट करुन सऱ्या पाडतात आणि सऱ्यात पाणी सोडुन देतात. लावणी करणारी एक टीम असते. त्यात बाया जास्त आणि बाबे कमी. एकरी आठ -नऊ हजार ऊसलावणीची रक्कम ठरते. लावणीसाठी साधारण १०-११ महिने वय असलेला ऊस विकत घेऊन मालकाने शेतावर आणुन द्यायचा, सरी बिरी पाडून शेत तयार ठेवायचे. बाया उसावरचे पाचट सोलून काढतात. बाप्ये मंडळी सरीत पाणी सोडतात. उसाचे धडाधड तुकडे करुन पाणी भरलेल्या सरीत एकेक तुकडा ठेऊन वर दणादण पाय ठेऊन त्याला खाली दाबत बाया पुढे जात राहतात. यात अजून एक गम्मत असते. बाया ऊस धडाधड लावत जात असतात आणि वानरांची टोळी दूर झाडांवर बसून हे पाहात असते. लावणी करणारे लोक थोडे पुढे गेले कि वानरे खाली उतरून पुरलेल्या उसाच्या कांड्या काढून घेतात आणि लहान बाळाला छातीशी धरावे तश्या त्या कांड्या छातीशी धरुन
वर झाडावर जाऊन बसून मस्त सोलुन ऊस खातात. शेतमालक लावणीच्या वेळी फटाके घेऊन फिरत असतो, वानरे खाली उतरली कि तो फटाके फोडतो. सुरवातीला फटाक्यांच्या आवाजाने वानरे पळायची. आता नाही घाबरत. (अनियंत्रित वाढलेली व जंगले सोडुन गावात व शहरात घुसलेली वानरे व माकडे ही कोकणातली मोठी डोकेदुखी आहे.)

ही अशास्त्रीय पद्धत पाहुन मी हादरले. एकतर बीयाणे म्हणुन निवडलेला ऊस निरोगी, दर्जेदार असतोच असे नाही. दुसरे म्हणजे ऊस तोडताना बाया हातात ऊस घेऊन धडाधड घाव घालतात. शास्त्रियदृष्ट्या डोळ्याच्या वर एक तृतियांश व डोळ्याच्या खाली दोन तृतियांश असा एकेक तुकडा पडायला हवा. पण असे धडाधड घाव घालताना हे पथ्य सांभाळले जात नाही. तिसरे म्हणजे सरीत पाण्याखाली ऊस ठेऊन तो खाली जाण्यासाठी पाय दिल्यावर ऊसाच्या डोळ्याचे काय झाले हे अजिबात कळत नाही. डोळ्याची प्लेसमेंट व्यवस्थित नसेल, डोळा जमिनीत खालच्या दिशेने गेला असेल तर तो रुजुन येणार नाही. पण ऊस लावणी करणारी टिम घाईत असते. अल्पावधीत भरपुर लावणी करुन पैसे कमवायचे असल्यामुळे एका शेतात ऊस सोलुन, तोडुन, धडाधड लावणी करुन लवकरात लवकर त्याना दुसऱ्या शेतात पळायचे असते. ही टिम लावणी करुन जाते त्यानंतर ऊस ऊगवुन यायला एकविस दिवस लागतात. तो जरा वर आला की गॅप्स दिसायला लागतात. जिथे डोळा खालच्या दिशेला गेला किंवा जिथे नेमका डोळ्यावर घाव बसला तिथे रोप उगवून येत नाही. शेतकरी अशा मोकळ्या जागी ऊस रोपे विकत आणुन लावतो. ती रोपे एक - दिड महिना वयाची असतात. त्यामुळे फारसा फरक दिसून येत नाही.

ह्या पद्धतीने मला ऊस लावायचा नव्हता. म्हणुन चर्चा करुन ऊसरोपे लावायचे ठरवले. कुठली जात निवडायची हा प्रश्न होताच. आंबोलीत सगळे काळुबाळू लावतात. नेटवर खुप शोधुनही ही जात मला सापडली नाही. गावातले शेतकरी जिथुन रोपे आणतात तिथे विचारले तेव्हा ही ८६०३१ असल्याचे कळले. बराच विचार करुन मी शेवटी ८६०३२ जातीची रोपे घ्यायचे ठरवले. ही सध्याची सर्वात चांगली जात आहे. हा ऊस कमकुवत असल्याने वाढला की पडतो व जास्त गोड असल्याने प्राणीहल्ले जास्त होतात असे म्हणत आंबोलकर याच्या वाटेला जात नाहीत . (प्राणीहल्ले तर तसेही होतातच पण हा ऊस लोळत नाही हा माझा तिन वर्षाचा अनुभव आहे. )

नांगरट झाल्यावर मी सऱ्या पाडुन घेतल्या. सऱ्या किती अंतरावर व कशा हव्यात हे मी आधी ठरवले होते पण पाडताना मी ते विसरले आणि चुकीच्या पद्धतीने सऱ्या पाडल्या गेल्या. मला उसाच्या दोन ओळीत ६ फूट अंतर हवे होते. एवढे अंतर ठेवायला कोणीही तयार होत नाही. जिथे एकरी १०० टन ऊस उत्पादन घेतात त्या कोल्हापूर, सांगली, सातारा भागातही इतके अंतर ठेवायला लोक कचरतात तर आंबोलीत कोण कसे तयार होणार? म्हणून मी सेफ साईड साडेचार फूट अंतर ठेवायचे ठरवले. हे अंतर ठेवायचे तर अडीच अडीच फूट अंतरावर सऱ्या पाडायच्या आणि दोन ओळीतली एक सर मोकळी ठेवायची असे करायला हवे होते. पण तसे न करता मी थेट साडेचार फूट अंतरावर सर पाडायला लावली. तसे करणे फारसे चूक नाही. ट्रॅक्टरवाल्याने त्याच्या शेतात साडेचार फूट सरीच पाडल्या होत्या पण या मोठ्या सरींमुळे माझे पुढचे गणित चुकले. कसे ते पूढे येईल. चुक झाली हे खुप ऊशिरा लक्षात आले त्यामुळे चुक सुधारता आली नाही आणि तीन वर्षे ती सहन करावी लागली.

तर मी शेत पुर्ण नांगरुन पुर्व पश्चिम सऱ्या पाडुन घेतल्या. आडव्या सऱ्यांमधे पाणी फिरवायला ऊभे पाट मारुन घेतले. मग दोन पाटांतील चार चार सऱ्यांचा गृप करुन घेतला, ह्या गृपला मडया म्हणतात. शेतात पाणी खेळवण्यासाठी या सगळ्यांची गरज आहे. बागेला हातात पाईप धरुन पाणी देतात तसे शेताला देता येत नाही. सऱ्या ट्रॅक्टरने, पाट बैलांनी व मडया माणसांनी मारल्या. प्रत्येकाचा खर्च वेगळा.

शेतात मेजर काम करायला गावातल्या बायका सहकार्य करत होत्या पण शेतात सतत पडणारे काम करायला एखादा गडी हवा होता. आमच्या घरी घरकाम करायला गावातली रजनी येत होती, तिचा नवरा घरीच बसून होता. माझ्या मावशीचे (तीच माझी काकीसुद्धा, माझ्या सगळ्यात धाकट्या काकाची बायको. माझी काकी व्हायच्या आधी ती माझी मावशी होती त्यामुळे काकी झाल्यावरही मी तिला मावशीच म्हणते. Happy मी शेत करायला घ्यायच्या आधी काका शेत करत होता, काका गेल्यावर शेत पडिक राहिले. मी करायला लागल्यावर मावशी माझ्या सोबत शेतात येत असे.) असे म्हणणे पडले कि त्याला जड काम फारसे जमत नाही त्यामुळे त्याला कोणी कामाला बोलावत नाही. तुझ्या शेतात तसे फारसे जड काम नाही त्यामुळे त्याला गडी म्हणून ठेव, तो छोटी मोठी कामे करेल. आता या गड्याला एकट्याला काहीही काम सुचत नसे, त्याला हाताखाली बायको रजनी लागत असे. त्यामुळे तीही शेतावर काम करायला यायला लागली आणि आमचे घरकाम तिने सोडले. थोडे दिवस दोन्ही करून पाहिले पण जमेना. या दोघाना महिन्यावर पगार नको होता, दिवसावर हवा होता. आंबोलीत तेव्हा गड्याला ३५०-४०० व बाईला २०० दरदिवशी असा दर होता. मी दोघाना मिळून ५०० रु सांगितले कारण दर दिवशीच्या कामाची गॅरंटी होती. अशा तर्‍हेने गड्याची पण सोय झाली.

मी शेताचे मोजमाप घेतले, किती सर्‍या आहेत ते लिहून काढले, किती अंतरावर रोपे लावणार तेही लिहिले व हिशोब केला. साधारण १२,००० रोपे लागतील असा हिशोब निघाला, जो थोडासा चुकला. लावणीनंतर साधारण १००० रोपे शिल्लक राहिली. २रु ला एक रोप मिळते. आंबोलकर जिथून रोपे मागवायचे मी तिथून रोपे मागवली. नंतर लक्षात आले कि अजून थोडा अभ्यास करायला हवा होता, अजून चांगली रोपे मिळाली असती. हि रोपे मोठी झाल्यावर लक्षात आले कि रोपे मिक्स होती. दुसर्या जातीची २-३ टक्का रोपे यात होती. पण असो. सुरवातीला अशा चुका व्हायच्या.

ऊस रोपे आल्यावर शेताची पुजा करून १५ जानेवारी २०२१ ला रोप लावणीचा कार्यक्रम सुरू केला. त्यासाठी गावातल्या बायका बोलावल्या. शेताची पुजा करायला गावातल्या गावकर्‍याला बोलावले, हा त्यांचा मान असतो. त्या दिवशी ग्रामपंचायतीची कसलीशी निवडणुक होती तरी वेळात वेळ काढुन तो सकाळी ९ ला हजर झाला व त्याने शेताची पुजा करुन आमचा शेती करण्याचा मार्ग मोकळा करुन दिला.

खाली माझे शेत. खालचा फोटो फेब २०२४ मधला आहे, माझ्या शेतात उसतोडणी झाली होती आणि मी पुढच्या कामासाठी शेत तयार करुन ठेवले होते. बाजुच्या शेतांमध्ये तोडणी सुरू होती/झाली होती. शेताच्या दोन्ही बाजुने नदी दिसतेय. डावीकडे वर्तुळ काढलेय तिथे माझी पाण्याची मोटर आहे. तिथुन मधल्या शेताखालुन पाइपलाईन घालुन पाणी शेतात आणलेय.

after.png

Attachmentमाप
Image icon shet1.jpg25.89 KB
वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle