बाली ट्रीप- तनाह लॉट मंदिर

कुटा बीचवरुन निघाल्यावर आम्ही दुपारनंतर तनाह लॉटला जायचे ठरवले. आता सगळे वातावरणच भारतासारखे म्हणल्यावर आम्हाला वाटले इथे शेअर्ड टॅक्सी किंवा प्रायवेट बसेस असतील तर तसे काहीच नाही दिसले. मग प्रायवेट गाडीच्या शोधात दिसलो. वाटले होते कि लगेच मिळेल पण कोणी यायला तयारच होइना. कारण संध्याकाळची वेळ होत आलेली होती आणि कुटामधे खुपच गर्दी होती. कुटा तसे नाईटलाईफ साठी फेमस आहे. जो गाडीवाला यायला तयार होत होता तो खुपच पैसे मागत होता. शेवटी चालुन चालुन वैतागलो त्यात डोक्यावर भयंकर उन. शेवटी एक गाडिवाला तयार झाला. तनाह लॉटला संध्याकाळी जायचा प्लॅन अशा साठी होता कि तिथे सुर्यास्त खुप छान दिसतो असे ऐकले होते. त्यामुळे तिथे सुर्यास्त बघुन तिथेच जेवण करुन मग निघण्याचा प्लॅन होता. त्यानुसार निघालो. ड्रायवर खुप बोलका होता. इंग्रजीही बर्‍यापैकी येत होते त्याला. आजुबाजुचे बरेच काही सांगत होता. बोलता बोलता त्यांच्याकडे लग्न कशी होतात ते पण सांगितले. शक्यतो प्रेमविवाहच होतात आणि मुलगी लग्नानंतर मुलाकडे राहायला येणार असते म्हणुन लग्नाचा खर्च मुलाने करायचा. आपल्यासारखे तिथेही लग्नात आहेर देतात.

अपेक्षेप्रमाणे भरपूर ट्रॅफिक होते. रस्त्यात जाताना त्याने कॉफी टेस्टींगसाठी थांबवले. तिथे लुवाक कॉफी कशी बनवली जाते हे थोडक्यात दाखवले.अगदी छोटीसी जागा होती ती. लुवाक कॉफीबद्दल इथे माहिती मिळेल. लुवाक कॉफि टेस्ट करायची असेल तर $५ होते. आम्हाला त्या कॉफित काही इंटरेस्ट नव्हता. मग त्याने १५ प्रकारच्या कॉफि/ चहा टेस्टींगचे कप दिले. त्यात वेगवेगळे फ्लेवर होते. जसे कि कोकोनट, लेमनग्रास, मॅंगोस्टीन, चोकोलेट. आम्हाला त्यातला एक आवडला तो विकत घ्यायला गेलो तर किंमत २००ग्रॅमसाठी जवळ्जवळ $१५.

तिथुन निघुन आम्ही मग तनाह लॉटच्या रस्त्याला लागलो. आता शहर सोडुन बर्‍यापैकी गावाकडचा भाग वाटत होता. रस्ते मात्र सुरेख होते. बरीचशी भाताची शेतीही दिसली. मंदिर बघायचे म्हणुन आम्ही खुप उत्साही होतो. (सकाळी नाश्त्याला केक होता तर त्यात अंडे होते म्हणुन मग तो पण खाल्ला नव्हता). तिथे गेल्यावर आपल्या महाबळेश्वर माथेरानच्या कुठल्याही सनसेट पॉईंटला असेल अशी गर्दी होती. मंदिराचा बाहेरच बरीचशी सिफुडची विकणारे कॅफे स्टाईल दुकाने होती. त्यातच बाहेर एक तरुणी बिन्टॅन्ग बिअर टेस्टींगला देत होती. थोडासा कल्चरल शॉकच होता आमच्यासाठी हा.

मंदिराचे लोकेशन मात्र खुप सुरेख आहे. मंदिर समुद्राला लागुनच आहे. समुद्राच्या लाटा सारख्या आदळत असतात मंदिरात तरीही मंदिर सुस्थितीत आहे. मंदिराच्या आजुबाजुला उंचवट्याचा परिसर असल्याने खुप सुंदर दिसते. त्यादिवशी नेमके ढगाळ वातावरण असल्याने सूर्यास्त काही नीट दिसला नाही.
ढगाळ वातावरणामुळे फोटो काही क्लियर आलेले नाहीत.

अजुन जमतील तसे फोटो मी फोटो टाकते. तिथे आम्ही केकक डान्सपण बघितला. सितेला रावण पळवुन नेतो, हनुमान लंका जाळतो आणि राम सीता परत येतात असे काही प्रसंग नृत्यातुन दाखवले. कार्यक्रम छान होता फक्त उघड्यावर होता. त्यांचा हनुमान मात्र आपल्याकडच्या हनुमानासारखा क्युट न दिसता राक्षसासारखा वाटत होता. मुलांना आवडण्याऐवजी घाबरत होती हनुमानाला.
जेवायला मात्र तिथे आम्हाला काही व्हेज मिळाले नाही. येताना २० किमीसाठी ३ तास लागले आणि उशीर झाला. त्यानंतर जेवणाचीही सोय बघावी लागली. मग मात्र बालीतल्या पहिल्याच दिवशी आम्ही भयंकर दमलो.

तनाह लॉटचा निसर्ग जरी छान वाटला तरी गर्दी आणि ट्रॅफिकमुळे गेलो नसतो तरी चालले असते असे मात्र वाटले.

Taxonomy upgrade extras: 

वर
0 users have voted.
हिंदी / मराठी
इंग्लीश
Use Ctrl+Space to toggle