मधे कशासाठी ते लक्षात नाही पण उगीचच मसूर डाळ आणून ठेवली होती. बहुतेक डोशात घालायला का काय माहिती. आणि १/२ किलोशिवाय मिळतच नाही. त्यातून सध्या एकटीच असल्याने अजिबात गोष्टी संपत नाहीत. तर त्या मसूर डाळ कशी संपवावी या गरजेतून जन्मलेली ही पाककृती. मुद्दाम यासाठी प्लीज डाळ आणू नका, पण घरात असेल तर नक्की करून बघा. झटपट होते एकदम!
साहित्य (२ माणसांसाठी)
१/२ वाटी मसूराची डाळ (केशरी रंगाची असते)
१ मध्यम आकाराचा कांदा जरा जाडसर चिरून (शक्यतो चॉपरवर चिरू नका, फार गिच्च होते फायनल प्रॉडक्ट)
फोडणीचे साहित्य (तेल, मोहरी, हिंग, हळद, कढिलिंब, १ हिरवी मिरची उभी चिरून)
१ चमचा किंवा आवडीप्रमाणे लाल तिखट
१ छोटा चमचा गोडा/काळा मसाला
१ चमचा किंवा आवडीप्रमाणे कांदा-लसूण मसाला (नसल्यास टीपा पहा)
मीठ
कोथिंबीर किंवा बारीक चिरलेली हिरवी कांद्याची पात
लिंबाचा रस
कृती
१) आधी मसूराची डाळ २-३ वेळा धुवून कोमट पाण्यात १० मिनिटे भिजत घाला.
२) कढई/पॅन मधे थोडे तेल घालून मोहरी, हिंग, हळद, कढिलिंब, १ हिरवी मिरची घालून खमंग फोडणी करा. तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर या स्टेपला २-३ लसूण पाकळ्या नीट ठेचून थोड्या तांबूस होइपर्यंत परता.
३) मग चिरलेला कांदा घालून, वर अगदी थोडे मीठ घालून झाकण न ठेवता १-२ मिनिटे परता. कांदा अगदी शिजवायचा किंवा ब्राउन नाही करायचा. जरासा कच्चेपणा गेला पाहिजे फक्त.
४) मग भिजत ठेवलेली डाळ नीट निथळून घेऊन घाला. नीट फोडणीत परतून, वर झाकण ठेवा. १ वाफ आली की तिखट, गोडा मसाला, कांदा लसूण मसाला आणि चवीनुसार मीठ घालून, नीट हलवून परत १-२ वाफा येऊ द्या. अधून मधून हलक्या हाताने ढवळायचे आहे. खूप कोरडे वाटले तर थोडासा पाण्याचा हबका मारला तरी चालेल पण खूप नको पाणी. २-३ वाफात चटकन शिजते अगदी.
५) मग खाली उतरवून, कोथिंबीर आणि थोडा लिंबाचा रस घाला.
अधिक टीपा
१) ही डाळ अखंड पण शिजलेली हवी. त्यामुळे पाणी जपून घाला. मसूर डाळ कमी पाण्यात आणि चटकन शिजते हे लक्षात ठेवा.
२) कोथिंबीरीच्या ऐवजी यात बारीक चिरलेली कोवळी कांद्याची पात पण खूप मस्त लागते.
३) तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर फोडणीतला ठेचलेला लसूण आणि गरम मसाला किंवा गोडा मसाला पण चालेल. चव थोडी वेगळी येईल पण चालेल. कांदालसूण मसाल्याने एकदम चटपटीत होते.
४) मसाला थोडा कमी केला तर नुसती पण खाऊ शकतो. नाहीतर गरम पोळी, ही डाळ आणि एखादी दह्यातली कोशिंबीर हे छान पोटभरीचे जेवण होते.
माहितीचा स्त्रोतः
माता. आई मूगडाळीचा करते, तूरडाळीचा पण करते. मी मसूर डाळ वापरून पाहिली.
पाककृती प्रकार:
ImageUpload:

