मधमाशी हा किटक अखिल मानवजातीला लाभकारी आहे असे गेले कित्येक वर्षे ऐकत आहे. मधमाशी संपली तर चार वर्षात मानवही पृथ्वीवरुन संपेल असे एक वाक्य अल्बर्ट आईनस्टाईनच्या नावावर खपवले जाते. मला शेतीत रस असल्याने मधमाशीबद्दल आकर्षण होते पण ते सोडता बाकी काही माहिती नव्हती.
आंबोलीत व्यवस्थित जम बसल्यावर कोंबड्या पाळायच्या आणि मधपेट्या ठेवायच्या ही दोन स्वप्ने गेली पाच वर्षे पाहतेय (कसली स्वप्ने पडतात मला ). त्यापैकी मधपेट्या मिळायची संधी अचानक दारी चालुन आली. झाले असे की आंबोलीला ‘मधाचे गाव’ करण्याची कल्पना खादी ग्रामोद्योगच्या कुण्या अधिकार्याच्या सुपिक डोक्यातुन निघाली. ही जबाबदारी गावातल्या बचत गटातल्या महिलांच्या गळ्यात घालायचे ठरले. पण बचतगट ही जबाबदारी घ्यायला पुढे येईनात. म्हणुन मागेल त्याला मधपेटी अशी योजना मांडली गेली. योजना आकर्षक होती आणि मला मधपेटी हवी होती म्हणुन मी भाग घेतला. बाहेर एक भरलेली पेटी पाच हजार ते सहा हजारला मिळते. आम्हाला तीच पेटी आठशे रुपयांना मिळणार होती. मी हावरटासारख्या पाच पेट्या घ्यायचे ठरवले. डिसेंबर २०२४ ला सगळे ठरुन जानेवारी २०२५ ला आम्ही पैसे भरले. पैसे दिल्यावर दोन आठवड्यात मधपेट्या मिळणार असे ठरले होते. पण मे जवळ आला तरी मधपेट्या आल्या नाहीत. आंबोलीतील फुलांचा मोसम एप्रिलमधे संपतो. त्यामुळे एप्रिलपासुन आम्ही ‘मधपेट्या आता नकोत, ऑक्टोबरात द्या‘ अशी ओरड सुरु केली होती. त्याला न जुमानता मधपेट्या मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमच्या गळ्यात घातल्या गेल्या आणि दुसर्या आठवड्यापासुन धोधो पाऊस सुरू झाला. त्यामुळे जे व्हायचे ते झाले. पावसाळ्यात सगळ्या माशा मरुन गेल्या किंवा पळुन गेल्या. गावात दिल्या गेलेल्या एकुण पेट्यांतल्या १५-२० टक्के पेट्यांत माश्या शिल्लक राहिल्या. माझ्या तर पाचही पेट्या रिकाम्या झाल्या.
मधपेट्या मिळाल्यापासुन मधमाशीपालनाचे व्यवस्थित प्रशिक्षण घ्यावे हा विचार मनात घोळत होता. ज्यांनी मधपेट्या दिल्या त्यांनी आम्हाला प्रशिक्षण देणेही गरजेचे होते. पण आमच्या बायकांकडे प्रशिक्षणासाठीचा वेळ नव्हता. त्यामुळे अर्ध्या दिवसाचे प्रशिक्षण घेऊन प्रमाणपत्र मिळवले पण मला काहीही ज्ञानप्राप्ती झाली नाही.
पाचही पेट्या रिकाम्या झाल्यावर मी खुप निराश झाले. नीट शिकले असते तर माश्या वाचल्या असत्या असे वाटुन शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घ्यायचे हे मी निश्चित केले आणि ओळखीच्या एका मास्टर ट्रेनरकडे रजिस्टर केले. (श्री हेमंतकुमार डुंबरे, पुणे). तारखा निश्चित केल्यावर अडथळे येऊन मी माझ्या तारखा पुढे ढकलणे वगैरे सगळे नेहमीचे गोंधळ पार पडुन मी एकदाचे प्रशिक्षण मिळवले.
प्रशिक्षणादरम्यान मधमाश्यांची जी माहिती मिळाली ती अक्षरक्षः अवाक करुन गेली. मधमाश्यात एक राणी माशी असते आणि बाकी कामकर्या माश्या असतात इतकेच माहित होते. ह्या कामकर्यांना कामे करायला कोण सुचवते, अमुक एक काम अमुक माशीने करायचे हे कसे ठरते वगैरे विचार कधीतरी डोक्यात यायचे पण कसे कळणार. तर डोक्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे या प्रशिक्षणादरम्यान मिळाली. सुसंघटीत, शिस्तबद्ध आयुष्य जगणारे सजीव आपल्याभोवती वावरतात आणि आपल्याला त्यांची शुन्य माहिती आहे ही मजेशीर जाणिव झाली. जे आपल्याशी ठावे ते सकळ जनांस सांगुन सोडल्याशिवाय चैन पडत नाही म्हणुन हा लेखप्रपंच. आता लेख पाडतेयच तर गोड मानुन घ्या अजुन काय…
@@@@@@@@@@@@@@@@
आजुबाजुला जे पाहतोय त्याचा फोटो किंवा सेल्फी काढायची सवय माणसाला पुरातन काळापासुन आहे. तेव्हा गुहेत किंवा दगडांवर फोटो उर्फ भित्तीचित्रे रेखाटत, आता मोबाईल वापरतात इतकीच काय ती प्रगती. दोरीची शिडी करुन डोंगरकड्याच्या पोळ्यातुन मध काढणार्या माणसाचे चित्र स्पेनमधल्या साधारण ८,००० ते १०,००० वर्षे जुन्या मेसोलिथिक रॉक पेंटिंगमध्ये आढळले आहे. माणसाने मधमाशीपालनाला सुरवात केल्याचा सगळ्यात जुना पुरावा ६,००० वर्षांपुर्वीचा आहे. मध कधीच खराब होत नाही म्हणतात. नो एक्स्पायरी डेट. आजपावेतो उत्खननात सापडलेले सगळ्यात जुने मध साधारण ५,५०० वर्षांपुर्वीचे आहे. तुतानखामेनच्या ३,००० वर्षे जुन्या थडग्यात सापडलेले मध आजही खाण्यायोग्य आहे.
माणसाला मधमाशीपालनाचा ७- ८,००० वर्षे जुना अनुभव असला तरी मधमाशी व पोळ्याच्या शास्त्रशुद्ध अभ्यासाला सुरवात व्हायला अठरावे शतक उजाडावे लागले. युरोपातल्या Swammerdam, René Antoine Ferchault de Réaumur, Charles Bonnet and François Huber ह्या लोकांचे मधमाश्यांचा व पोळ्यांचा अभ्यासात अग्रक्रमाने नाव येते. स्वामरडॅम व रिमुरने सर्वप्रथम मधमाशीचे सुक्ष्मदर्शित्राखाली विच्छेदन करुन अंतर्गत रचनेचा अभ्यास सुरु केला. रिमुरने काचेच्या भांड्यात पोळे बांधायला भाग पाडुन पोळ्यात काय काम सुरु असते ह्याचे निरिक्षण सुरु केले. राणी माशी दिवसभर पोळ्यात अंडी घालत बसते हे त्याने शोधुन काढले. पण राणीमाशी फलित कशी होते हे त्याला समजु शकले नाही. बर्याच जणांनी या विषयावर वेगवेगळ्या थियर्या मांडल्या. पण पोळ्याबाहेर हे काम होत असणार हे तेव्हा लक्षात आले नाही. शेवटी ह्युबरने हे कोडे सोडवले. राणीमाशी पोळ्याबाहेर लांबवर उडुन जाते व वेगवेगळ्या पोळ्यातल्या नरमाश्यांसोबत तिचे मिलन होते हा शोध ह्युबरने लावला.
ह्युबर हा खरेच हाडाचा संशोधक. एका गर्भश्रीमंत घराण्यात जन्मलेला ह्युबर वयाची विशी गाठेतो दुर्दैवाने पुर्णपणे अंध झाला. पण त्याच्या अंधत्वाकडे दुर्लक्ष करुन त्याच्याशी लग्न करू इच्छिणारी मारी ही दुसरी गर्भश्रीमंत तरुणी त्याला आधीच भेटली होती. घरच्यांचा विरोध डावलुन तिने सज्ञान होताच ह्युबरशी लग्न केले व त्याच्या मृत्युपर्यंत त्याचे डोळे बनुन त्याला साथ दिली.
ह्युबरने रिमुर व बोनेच्या कामाबद्दल वाचले होते. बोनेला तो एकदा भेटलाही होता. त्याला फ्रँक बर्नेन्स हा सेवाभावी नोकर लाभला. फ्रँक बर्नेन्सला ह्युबरने मधमाश्यांचे निरिक्षण कसे करायचे, टिपणे कशी काढायची यात पारंगत केले. पुर्णतः अंध असुनही मारी व फ्रँकच्या मदतीने त्याने मधमाश्यांमध्ये इतके सखोल संशोधन केले की त्याला आधुनिक मधमाशी संशोधनाचा जनक मानले जाते.
तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्या ह्युबर व मारीला अर्थातच चरितार्थ कसा चालवावा ही चिंता नसल्याने त्या दोघांनी मधमाशी अभ्यासाला स्वतःला वाहुन घेतले. असे सोन्याचे चमचे घेऊन जन्मणारे लाखो असतात पण एका लहानश्या किटकामागे आयुष्य घालवणारा ह्युबर एकटाच . आणि त्यात तो पुर्ण आंधळा. अशा अलौकिक माणसाला जन्मभर साथ देणारे त्याचे चार डोळे मारी व फ्रँकही तितकेच अलौकिक. ह्या तिघा आणि त्याच्यासारख्या कित्येक मधमाशीप्रेमींना मानाचा मुजरा!!!!
तर असे अनंत कष्ट घेऊन आजवर जे संशोधन झालेय ते मी खाली मांडत आहे. या विषयावर अजुनही संशोधन सुरू आहे.
@@@@@@@@@@@@@
बी म्हणजे माशी ही प्राणीजगतात किटकवर्गीय प्राणी मानली जाते. माशांपैकी मधमाशी, डंखविरहीत मधमाशी आणि बंबलबी हे मोजकेच प्रकार वसाहती करुन राहतात.
अंडे, अळी, कोष ह्या तिन स्थित्यंतरातुन शेवटी आपल्याला दिसते ती मधमाशी जन्माला येते. मधमाशी सामाजिक किटक आहे (वसाहतवादी ) व तो प्रत्येक पायरीवर अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगतो.
आधी आपण पोळ्याची माहिती घेऊ. मधाचे पोळे मेणाचे बनलेले असते. हे मेण कामकरी माशीच्या पोटातुन स्त्रवते.
पोळ्यात षटकोनी आकाराची छोटीछोटी घरे असतात ज्याला सेल्स (cells) म्हणतात. ही षटकोनीच का यावरही बरेच संशोधन झालेले आहे. षटकोनी आकारामुळे सेल कमीत कमी कच्च्या मालात म्हणजे मेणात तयार होते आणि कमीत कमी जागेत जास्तीत जास्त सेल्स मावतात. पोळ्याबद्दल अजुन बरेच काही शोधुन काढले आहे पण तो आपला विषय नाही.
वरच्या बाजुने घन आणि खाली निमुळती अशा दोन रचना एकमेकांना पाठीला पाठ लाऊन चिकटलेल्या असतात. ह्या दोन्ही बाजु एकत्र म्हणजे एक पोळे . त्याचा वापर मध व पराग साठवण्यासाठी व ब्रुडला राहण्यासाठी म्हणुन होतो. अंडी (eggs), अळ्या (larvae) व कोष (pupa) यांच्या समुहाला ब्रुड असे संबोधले जाते. मधमाश्या पोळ्यावर सतत घोंघावत असतात, चिकटुन बसलेल्या असतात. आपल्याला सहसा मधमाश्याच दिसतात. त्या उडुन गेल्या की आतले पोळे दिसते.
वरच्या भागात म्हणजे जिथे पोळे आधाराला चिकटलेले असते तिथे मध व पराग साठवलेला असतो. पराग भरलेल्या सेल्स उघड्या असतात, इन प्रोसेस मधाच्या सेल्स उघड्या असतात. पुर्ण तयार मधाने भरलेल्या सेल्स बंद केलेल्या असतात. खालच्या भागात अंडी, अळी व कोष असतात.
प्रत्येक सेलमध्ये अंडे, अळी, कोष, पराग किंवा मध यापैकी काहीतरी असते किंवा सेल रिकामे असते. चुकुन एका सेलमध्ये दोन चार अंडी, कुठेतरी दोन तिन कोष असा बेशिस्त कारभार अज्जाब्बात नसतो. Happy
वरच्या रिकाम्या सेल्स सतत मध व परागाने भरल्या जातात. खालच्या रिकाम्या सेल्समध्ये राणी अंडी घालत फिरत राहते. यादरम्यान ब्रुड आपला जीवनक्रम पुरा करत असतो. अळी कोषावस्थेत जाताना सेल बंद करुन आत राहते. आत कोष असलेल्या सेलचे झाकण गुलबट रंगाचे असते व तयार मध साठवलेल्या सेलचे झाकण पिवळसर रंगाचे असते. सर्वत्र हे असेच असेल असे नाही.
कामकरी माश्यांच्या एका समुहावर पोळ्याचे आरोग्य सांभाळायची जबाबदारी असते. तो समुह कसा ठरतो ते आपण नंतर पाहू. काही कारणाने पोळे फाटले तर ते लगेच दुरुस्त केले जाते. गरज पडेल तसे ते दोन्ही बाजुने वाढवले जाते. मृत माशा, रिकामे कोष वगैरे पोळ्यातुन बाहेर टाकले जाऊन पोळ्याची सतत साफसफाई होत राहते. पोळ्याचे तापमान साधारण ३५ डिग्रीच्या आसपास असते. ह्या तापमानाला मेणाला योग्य आकार देणे माशीला शक्य होते. ४० डिग्रीला मेण वितळते. माश्यांचा एक समुह पोळ्याचे तापमान योग्य राखण्यासाठी झटत असतो.
पोळ्यातले सेल्स साधारणपणे षटकोनी असले तरी राणी व नरमाशीचे सेल्स दिसायला व आकाराने वेगळे असतात. राणी ज्यात तयार होते ती सेल षटकोनी नसते. आकाराने मोठी असते आणि त्यामुळे सहसा पोळ्याच्या खालच्या बाजुला किंवा दोन्ही बाजुला कडांवर असते. नर ज्यात तयार होणार त्या सेल्स जरा मोठ्या, वरच्या बाजुने गोलाकार व पन्चकोनी असु शकतात. कुठल्या सेल्स कधी व कोठे बांधायच्या हे राणीच्या हुकमावरुन ठरते. त्यामुळे नरासाठी सेल बांधा असा हुकुम आला की नेहमीच्या षटकोनी सेलचे रुपांतर चटकन पंचकोनी सेलमध्ये केले जाते. पोळ्यातले प्रत्येक काम राणीच्या आज्ञेनेच चालते. Queen Bee ह्या शब्दाला जे वजन आहे ते राणीमाशीने तसा दरारा निर्माण करुन कमावले आहे. कुठलीही माशी माशी झाली की सेलमध्ये राहात नाही. अंडी, अळी, कोष ह्या अवस्था पुर्ण करताना मुक्काम करण्यासाठी सेलची गरज भासते. एकदा माशी झाली की ती पोळ्यावर बसते.
(क्रमश:)
