(एआय बरोबर जगण्याचा मंत्र) शंका आणि सबुरी

सत्याचा शोध हा मनुष्याच्या डोक्याला लागलेला कायमचा भुंगा आहे. सापडलेलं फळ खाण्याजोगं आहे की नाही, पाऊस पडेल की ऊन अश्या प्रश्नांपासून कदाचित सुरुवात झाली असेल; पुढे समोरचा माणूस मित्र असेल का शत्रू, दिवस रात्र का होतात, प्रत्येक जिवाच्या जगण्याचं काय प्रयोजन इथपर्यंत. माणसाला प्रश्नच प्रश्न पडत गेले. एक उत्तर मिळून ही प्रश्नशृंखला थांबत नाही ते एक, दुसरं म्हणजे मिळालेली उत्तरंही वेळोवेळी तपासून बघावी लागतात. कधी कधी जुने सिद्धांत पुढे चुकीचे ठरतात, नवे पुरावे हाती लागतात. याला आपण साधारणपणे प्रगती असं म्हणतो.

मनुष्यजातीचा गेल्या सत्तरेक हजार वर्षांचा ज्ञानपिपासेचा इतिहास म्हणजे हा सत्यशोधनाचा प्रवास आहे. आणि या प्रवासात आता आपण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या टप्प्यावर पोचलो आहोत.

पुरण वाटायला पुरणयंत्र किंवा गणितं करायला कॅल्क्युलेटर अशी यंत्र आपण वापरत आलो आहोत. तसंच आता काय हवी ती माहिती पटकन शोधायला चॅटजीपीटी हाताशी आला आहे. इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या टनावारी माहितीतून बरोबर कामाची गोष्ट शोधून नेमक्या शब्दात सांगणारं हे यंत्र एकूण समाजाचा चेहरा मोहरा बदलून टाकायला सज्ज झालं आहे. बरं, चॅटबॉट हे काही एआयचं एकमेव स्वरूप नाही, ते वापरायला सोपं नि प्रत्येकापर्यंत पोचणारं आहे म्हणून सगळ्यांच्या माहितीचं आहे. पण कोविड काळातलं लस शोधायचं संशोधन, किंवा डीपमाइंड कंपनीचं अल्फाफोल्ड सॉफ्टवेयर (२०२४ नोबेल) पहाता आता जीवशास्त्रज्ञ, रसायनशास्त्रज्ञ, औषध संशोधन अश्या आपल्या दैनंदिन जगण्यावर परिणाम करणार्‍या विद्याशाखाही एआयवर अवलंबून आहेत आणि एआयच्या वापरामुळे संशोधनाचा वेग कितीतरी पटीनं वाढला आहे. शेतीकामापासून ते शेयरट्रेडिंग सॉफ्टवेअर लिहिण्यापर्यंत सगळीकडे एआय असिस्टेड पर्याय आता उपलब्ध होऊ लागले आहे.

शास्त्राच्या प्रत्येक शाखेत, किंबहुना जगण्याच्या सगळ्या परिघांमध्ये एआयचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे. हे वाक्य खरं असलं तरी तसं पाहता दिशाभूल करणारं आहे. म्हणजे, तीनेकशे वर्षांपूर्वी हे वाक्य 'जगण्याच्या प्रत्येक परिघात पुस्तकांचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला आहे' असं असलं असतं आणि कदाचित तीनेक हजार वर्षांपूर्वी, भाषिक संज्ञा, दस्तऐवजीकरण, अश्या गोष्टींना नाविन्यपूर्ण आणि आयुष्य बदलून टाकणाऱ्या तंत्राचा दर्जा मिळाला असता.

माणूसजात जीवसाखळीच्या सगळ्यात वरच्या पायरीवर कशी पोचली या प्रश्नाचं उत्तर एका शब्दात "ज्ञानसंवर्धन" असं देता येईल. मोठे मेंदू तर निअँडरथाल जातीलाही होते. खरं तर मनुष्यजातीहून जास्त क्षमतेचे मेंदू त्यांना लाभले होते. पण मानववंशशास्त्रज्ञांचा असा कयास आहे की प्रगत भाषेचा आणि माहिती घोकून लक्षात ठेवून पुढच्या पिढीला देण्याचा मंत्र केवळ आपल्या मनुष्यजातीला अवगत झाला. आणि मग अनेक पिढ्याच्या एकत्रित ज्ञानापुढे बाकी प्रकारच्या वानरजाती स्पर्धेत टिकल्या नाहीत. सुरुवातीला भाषेमुळे ज्ञान एकत्र करता येऊ लागलं, मग पिढ्यानुपिढ्यांचं ज्ञान गोष्टीत आणि गाण्यात गुंफून एका पिढीकडून दुसरीकडे येत एकत्र होत राहिलं. मग हस्तलिखिते आणि पुस्तके आल्यावर ज्ञान मुखोद्गत ठेवायची गरज उरली नाही, आपली ज्ञान साठवणुकीची क्षमता वाढली. आणि आता गेल्या शतकात सिलिकन स्टोरेज म्हणजे वाळूच्या कणांमधे ज्ञान साठवून ठेवायची सोय झाल्यावर ज्ञानसंग्रहणाच्या क्षमतेने कल्पनातीत पातळी गाठली आहे. ह्या ज्ञानाच्या साठ्याच्या जोरावर एआयचे दैनंदिन आयुष्यात आगमन झाले आहे. एकुणात एआय म्हणजे (थेयरिटिकली) सगळ्या मानवजातीचं एकत्रित ज्ञान.

एआयला आपण मराठीत कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणू तर त्यातली 'बुद्धिमत्ता' म्हणजे नक्की काय हा प्रश्न आहे. आपली बुद्धिमत्ता, निर्णयक्षमता म्हणजे आपण कसा विचार करतो त्याचं परिमाण. काही लोक जास्त बुद्धिमान असतात, द्रष्टे असतात. त्यांच्या मेंदूची क्षमता सहसा सरासरीइतकीच असते, पण त्यांनी घेतलेले विविध अनुभव आणि त्या अनुभवांना जोडण्याची त्यांची हातोटी त्यांना असामान्य बनवते. सहसा वाढत्या वयोमानानुसार आपले अनुभव वाढत जातात आणि योग्य निर्णय घेण्याची शक्यताही वाढत जाते. उत्तम खेळाडू, वकील किंवा शल्यचिकित्सक होण्यासाठी भरपूर सराव आवश्यक असतो - कारण सरावातून अनुभव मिळतो. अनुभव म्हणजे काय काय पद्धतीच्या चुका होऊ शकतात याचा अंदाज मिळण्यासाठीचा कच्चा माल. आयुष्याचे सगळेच बरे वाईट निर्णय घेण्यासाठी आपल्याला 'अनुभव' आवश्यक असतो.

एआय म्हणजे 'दिलेल्या' अनुभवातून शिकू शकेल असा अल्गोरिदम किंवा काँप्युटर प्रोग्रॅम. माणसाला आपल्या मेंदूच्या क्षमतेची मर्यादा आहे. तांत्रिकदृष्ट्या यंत्राला अशी काही मर्यादा नाही. म्हणजे जगातलं एकुणेक सगळं ज्ञान एकाच अवाढव्य प्रोग्रॅममधे एकत्र करणं अशक्य नाही. सध्याचे जीपीटी हे अश्या प्रयोगाचं बाळरूप आहेत असं म्हणता येईल. या अल्गोरिदमला त्याच्या कर्त्यांनी इंटरनेटवर उपलब्ध असलेली सगळी माहिती वापरून अनुभव दिला आहे. की काय प्रश्न विचारल्यावर काय बरोबर उत्तर असू शकेल. काय काय अर्धवट बरोबर उत्तरं असतील. प्रतिप्रश्न काय येऊ शकतील. वगैरे.

सध्याचे चॅटबॉट किंवा लार्ज लँग्वेज मॉडेल सहसा विकी वाचून शिकतात. या विकीची स्थापना इस २००१ मध्ये झाली. म्हणजे हे केवळ गेल्या पंचवीसेक वर्षात एकत्र केलेलं ज्ञान आहे. विकीवरची सगळी माहिती कोणा ना कोणा खऱ्या व्यक्तीने लिहिलेली आहे. खऱ्याखुऱ्या लोकांनी पदरचा वेळ मोडून तपासून ठेवली आहे. विकीचा माहिती संकलनाचा प्रकल्प सुरु झाला तेव्हा मूळ उद्देश होता इंटरनेटवर सहज उपलब्ध होईल अश्या एन्साय्क्लोपीडियाची, म्हणजे विश्वकोशाची जोडणी करणे. त्या प्रकल्पात लिहिलेली माहिती पाच सात समीक्षकांकडून तपासली जात असे आणि मगच प्रकाशित होत असे. त्यांनी विकी हा एक आपला तात्पुरता प्रयोग म्हणून चालू केला होता, हा सगळ्यांना खुला होता आणि समीक्षा किंवा चाळण्या ना लावता माहिती प्रकाशित करता येईल अशी व्यवस्था होती. दोनेक वर्षात विकीवर हजारो लेख आणि भरपूर चांगली माहिती जमा झाली आणि मूळच्या प्रकल्पात डझनभर लेख कसेबसे तयार झाले. ज्ञान खुलं केल्यानं भराभर वाढतं हे पुन्हा अधोरेखित झालं. मग तो पडताळणी करून एकेक लेख प्रकाशित करायचा प्रकल्प मागेच पडला.

समीक्षा, पडताळणी वगैरे नसली तरी विकीवरची बरीचशी माहिती तरीही विश्वासार्ह असते. कारण आपण लिहिलेल्या लेखाबद्दल आणि आपल्या आवडत्या विषयाबद्दल लोक जागरूक असतात. आणि पटापट चुकीची माहिती दुरुस्त करतात. नवीन माहिती, नवीन पानं विकीवर भरताना संदर्भ द्यावे लागतात, आणि वाचकांना ते पटले नाहीत किंवा कुठे परस्परविरोधी संदर्भ मिळाले तर तसं त्या त्या पानाच्या चर्चेत लिहिता येतं. आणि सहसा एखादं चुकीचं गृहीतक किंवा बिनबुडाचं विधान विकीवर प्रसिद्ध झालं तरी 'शेवटी' भरपूर संदर्भ आणि माहिती एकत्र होता होता चुका व्यवस्थित गाळल्या जातात.

सगळीच माहिती कायम अगदी बरोबर असेलच असा कोणाचाच दावा नाही, तरी सामान्य वाचकाला विकीचा विश्वास वाटतो. आणि आताच्या आपल्या एआय प्रणाल्या तयार करणाऱ्या शास्त्रज्ञांनाही हा विश्वास वाटल्याने जीपीटी कुटुंबीय विकीच्या दुधावर पोसले गेले आहेत. उदा शेक्सपिअरच्या यशाचं रहस्य काय असा प्रश्न विचारता तेव्हाच युरोपात ज्ञानप्रसाराची चळवळ सुरू झाली, तेव्हाच केप्लर वगैरे मंडळी आपले सिद्धांत मांडत होती, छापील पुस्तकं परवडू शकत असल्यानं साक्षरता वाढली वगैरे माहिती विकी वाचून, समजून घेऊन, जीपीटी आपल्याला सांगू शकतो. त्याही पुढे जाऊन शेक्सपिअरच्या यशस्वितेबद्दल अतिशय 'नॉर्मल' आणि विश्वासार्ह दिसणारं विकी पान एआय बॉट बनवू शकतो.

एआय प्रणालीचा मुख्य फायदा हा की सामान्य माणसाला सहज ना दिसणारे आकृतीबंध (पॅटर्न) तिला सहज दिसतात. एआय आपण एकत्र केलेलं ज्ञान पडताळून, संदर्भ जुळताहेत का पाहून, स्फोटक किंवा वादग्रस्त माहिती गाळून नेमकी गोष्ट आपल्या पुढ्यात नक्कीच आणून ठेवू शकेल. अश्या प्रणाल्या सध्या नव्या आहेत - पण दोन पाच वर्षात हाच आपला जगाची ओळख करून घेण्याचा मार्ग असेल. आणि मग अश्या प्रणालीच्या नाड्या कोणाच्या हातात आहेत त्यावर काय माहिती मिळेल किंवा मिळणार नाही ते ठरेल.

खरं पाहता हे सध्या होऊ लागलंच आहे. म्हणजे सध्या चीनमध्ये तयार झालेल्या डीपसीकला तियान्मेन घटनेविषयी बोलायची (म्हणजे उत्तर द्यायची) परवानगी नाही. चीनमध्ये दिसणारे नकाशे आणि अमेरिकेत दिसणारे नकाशे हे सगळे वेगवेगळे आहेत. कोणता चूक, कोणता बरोबर? उद्या आपल्याकडे कोणी नवी प्रणाली बनवली तर त्यात आपण काश्मीर किंवा फाळणी विषयी काय उत्तरे येऊ देऊ?

सध्या रशियाच्या इतिहासानुसार युक्रेन रशियाचा अविभाज्य (आणि फुटीर!) भाग आहे. तर युक्रेनीय इतिहासात ते युगानुयुगे स्वतंत्र आहेत, फक्त मध्ये काही वर्षं परचक्र आलं होतं आणि आता परत येऊ पाहात आहे. इतिहासाचे विद्यार्थी रशियन प्रणाली बरोबर शिकले तर एक, अमेरिकन प्रणालीने दुसरं आणि भारतीय प्रणालीने तिसरं 'सत्य' शिकतील. की एकच काय ते पूर्ण सत्य असलेली निःपक्षपाती, निरपेक्ष प्रणाली शक्य आहे? तसं झालं तर युद्ध करण्याची गरजच भासणार नाही. जर आपला सगळ्यांचा एकच इतिहास - खराखुरा - असेल, तो सगळ्यांना वस्तुनिष्ठतेनं मान्य असेल तर ..? आनंदी आनंद गडे ?

आहे ते सगळं ज्ञान एकत्र करून ठेवलं तर पुढच्या पिढ्यांना काही शंकाच उरणार नाही; मतभेद, युद्ध टळतील; आनंदी आनंद होईल असं वाटून ज्ञान एकत्रित करून ठेवण्याची कल्पना दरेक काही काळानं माणसांना सुचत असते. माणसाचा भित्तिचित्रे ते विकी हा सगळा इतिहास जे जे आपणासी ठावे याच सूत्रात बांधलेला आहे. जुन्या ग्रंथांत उदा. वेदात, किंवा अर्वाचीन मनुस्मृतीत किंवा बायबल वगैरे मधे दैनंदिन जीवन, लग्न, वारसाहक्क इथपासून ते पृथ्वीची निर्मिती, माणसाचे मूळ अश्या वाट्टेल त्या विषयावरची माहिती सगळीच एकत्रित करून ठेवलेली आहे. सगळ्यांनी सारखे नियम पाळले, सारखी गाणी गायली आणि शंका घेतल्या नाहीत तर एकोपा वाढीला लागणारच. शिवाय हे सगळं तंतोतंत पाठ करून, कोरून, लिहून, छापून ठेवलं तर लबाड लोकांना, भोंदूंना त्यात बदल करता येणार नाहीत; कोणी फसणार नाही. यातही मुख्य मुद्दा हेतूचा आहे, की हे का करायचं? आणि हा हेतू उत्तमच असतो. की सगळ्यांचं भलं व्हावं. समाज सुरळीत चालावा वगैरे. नक्की काय पाठ करायचं, एका मार्गाने जपून ठेवायचं हे ठरवण्यात गोंधळ झाला तर सगळंच मुसळ केरात.

यच्चयावत सगळे धर्म, त्यांची तत्त्व नि पुस्तकं या विचाराने प्रेरित आहेत. कि चांगले, न्याय्य, समाजाला एकत्र आणणारे धर्मनियम करावेत आणि ते न बदलण्याची काळजी घ्यावी. पुन्हा पुन्हा पंडित उपलब्ध माहिती गोळा करून, चर्चा करून धर्मग्रंथ सिद्ध करत; विविध मठांमध्ये, विद्यापीठांमध्ये हस्तलिखितांच्या प्रती निघत. नवे विद्यार्थी हे वाचून, पाठ करून पंडित बनत. आणि शास्त्रार्थाचं काम त्यांच्याकडे येई. काळ बदलता लिहिलेली माहिती तशीच्या तशी वापरता येईनाशी होई आणि परत नवा ग्रंथ, नवी स्मृती, नवी टीका आणि नवी आवृत्ती. शिवाय पुस्तकाच्या वेगवेगळ्या हस्तलिखितात एखाददुसर्‍या अध्यायात थोडा बदल होत होत मोठेच बदल घडत. कारण म्हणजे कितीही अपौरेषेय म्हटलं तरी शेवटी प्रती काढणारे लेखनिक माणूस आणि वाचून अर्थ सांगणारे पंडितही माणूस. बारीक स्वार्थ, 'ग्रेटर गुड' परमार्थ, किंवा निरागस चुका होत होत प्रती प्रतीत बदल हे अपरिहार्य. पंधराव्या शतकात छपाईयंत्र तयार झाले त्यानंतरच धर्मग्रंथातले शब्द बदलणे कमी झाले. पण मग पुढे जे प्रश्न उद्भवले त्यातून ग्रंथातल्या ज्ञानावरच शंका निर्माण झाली. प्रती काढण्याचा प्रश्न आता दारोदारी झेरॉक्स आणि छपाईची सोय झाल्यानं निकालात निघाला तरी पूर्ण आणि अंतिम सत्य काही आपल्या हाती अजून लागलेलं नाही. अध्यात्मिक गुरूंची गरज आताही भासतेच आहे. पण आता पाचेक वर्षात एआय हीही गरज पूर्ण करेल. आणि कदाचित एकेका अल्गोरिदमचे अनुयायी गट तयार होतील.

इतिहासाची पुनरावृत्ती होते असं म्हणतात. आणि दरेक वेळेला नवं तंत्रज्ञान येतं तेव्हा एकूण मनुष्यजातीचा सुखवस्तूपणा वाढतो पण पर्यावरणाची मोठी हानी होते. शिवाय काही गट अनपेक्षित दुष्परिणामांना सामोरे जातात आणि निःशेष होतात. संवाद आणि माहिती संकलनातील नवी शिखरे आणि एआयचं आगमन हे असं जगाचा चेहरा बदलणारं तंत्रज्ञान आहे. तेव्हा वेळी या आधी असं जगाचा चेहरा बदलून टाकणारं तंत्रज्ञान आलं तेव्हाच्या काळातून काही शिकता येतं का पाहू.

याआधी असा नवा गियर पडला होता तो युरोपात छपाईयंत्राचा शोध लागल्यानंतरच्या शंभर वर्षात. छपाईयंत्र उपलब्ध झाल्यावर सुरुवातीला केवळ बायबल आणि पापाची कबुली देण्याचे फॉर्म छापायचे काम गुटेनबर्गला मिळालं होतं. आणि त्यातून त्याचा मोठा फायदा झाला असंही म्हणता येणार नाही. मात्र पुढच्या पन्नासेक वर्षात यंत्रात अनेक सुधारणा झाल्या, छपाईसाठीची शाई, खिळे, आणि एकूणच यंत्र वापरायला सोपं होत गेलं. परिणामस्वरुप विविध प्रकारच्या पुस्तिका, माहिती भराभर प्रकाशित होऊ लागली. ज्ञानाचा प्रसार वेगाने वाढू लागला, इतका की छपाई तंत्रज्ञानाच्या आधी लिहिल्या गेलेल्या एकनएक हस्तलिखित शब्दाची मोजणी केली तर ती छपाईनंतरच्या १०० वर्षात छापल्या गेलेल्या शब्दांच्या संख्येहून कमीच भरेल. वानगीदाखल पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला केम्ब्रिजच्या प्रसिद्ध विद्यापीठात सव्वाशे वगैरे पुस्तकं होती एकूण.

या कालखंडात विज्ञानाची जी वायुवेगाने प्रगती झाली ते सर्वज्ञात आहे. सोळाव्या शतकाच्या मध्यात कोपर्निकसने त्याचे 'आकाशस्थ गोलांच्या भ्रमणाविषयी' पुस्तक प्रकाशित केलं. आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते असं दाखवलं. गॅलेलिओ, केप्लर, टायको ब्राहे वगैरे मंडळींनी हा वसा पुढे नेला. कोपर्निकसने त्याचं पुस्तक चक्क तत्कालीन पोपना अर्पण केलं होतं. त्यामुळे त्यावर लगेच टीकेची झोड उठली नाही. पण या नव्या सिद्धांताचा गाभा लक्षात आल्यावर कॅथलिक चर्चने या बायबलविरोधी मतांना विरोध केला. गॅलिलिओला डांबून ठेवलं. पण तरी ज्ञान हळूहळू झिरपत गेलं. आणि सूर्य मधे असो की पृथ्वी, कोपर्निकस आणि मंडळींची सूत्र नव्या प्रकारची यंत्रं तयार करायला वापरली गेली. आणखी शंभरेक वर्षांनी सतराव्या शतकात न्यूटनचं आगमन झालं. आणि तिथून पुढचा औद्योगिक क्रांतीचा इतिहास आपल्याला माहित आहे.

छपाई यंत्राचा दुसरा वारसा म्हणजे त्याकाळातली रीफॉर्म आणि रेनेसान्स चळवळ. कॅथलिक चर्चच्या तोपर्यंतच्या निर्विवाद सत्तेला नव्या ख्रिश्चन पंडितांनी आव्हान दिलं. बायबलमधला नक्की संदेश काय यावर अनेक बारीक, एखाद्दोन पानी पत्रकं छापली आणि वाटली. त्यातून पुढे प्रोटेस्टंट पंथ निर्माण झाला आणि त्याच्याही शाखा पडल्या. थोडक्यात म्हणजे प्रत्येक ज्ञानशाखेत, अगदी धर्माचाही अपवाद न करता, पंडितांच्या टीका, प्रश्न एकमेकांना सहज वाचायला उपलब्ध होऊ लागले. त्यातून खरे काय ते टिकले, आणि पुढे आले. गॅलिलिओ पासून डार्विन पर्यंत सगळ्यांना बायबलमधल्या विधानांच्या विरोधी मतं मांडता आली आणि ज्ञानाच्या प्रसारावर चर्चचा अंकुश नसल्याने या मतांना पाठिंबा मिळू शकला.

म्हणजे वरवर पहाता छपाई यंत्र -> कोपर्निकस -> गॅलेलिओ -> न्यूटन असा प्रगतीचा आणि ज्ञानाचा चढता आलेख दिसतो. आपल्याला चार पाचशे वर्षांनंतर बघत असल्याने सगळे मूलभूत शोध या काळात लागलेले दिसतात. एकंदरीत मध्ययुगातल्या अंधारातून ज्ञानाचा दीप उजळणारा असा हा काळ वाटतो. त्या काळाचं आपली कल्पना म्हणजे लिओनार्दो चित्रं रंगवतोय, कोलंबस वगैरे मंडळी जगाचे नकाशे काढतायत, शेक्सपिअर नाटकं लिहितोय, देकार्त भूमितीची प्रमेयं मांडतोय असं काहीसं असतं. पण पंधराव्या आणि सोळाव्या शतकातले युरोपीय जनजीवन या माहितीच्या महापुरामुळं ढवळून निघालेलं होतं. छपाईयंत्राने छापलेली सगळीच पुस्तकं नि पत्रकं शास्त्रीय प्रयोगांबद्दलची किंवा कॅथलिक रुढींवर टीका करणार्‍या पुरोगाम्यांची नव्हती. वेगात पसरणार्‍या लोकप्रिय पुस्तिकांमधे रहस्यकथा, प्रणयकथा आणि पॉर्नदेखील होतं. सनसनाटी गोष्टी जश्या आता इंटरनेटवर वेगाने पसरतात अगदी तश्याच (पण अर्थातच त्यामानाने खूप कमी वेगानं) बिनबुडाच्या अफवा छापील पुस्तकांमधून पसरू लागल्या होत्या. तोवर लिहिलेले साहित्य एकुणात धार्मिक, पवित्र आणि म्हणून विश्वासार्ह मानले जायचे. हस्तलिखिते काढणे हे खर्चिक काम होते. ते चर्च, राजे अश्याच संस्थांना परवडणारे होते. आणि लिहिलेलं सगळं बरोबर असावं याकडे कटाक्षाने लक्ष दिलेले असायचे. आता पै पैशाला मिळणार्‍या दोन पानी पत्रकांवर चर्च किंवा कोणत्याही संस्थेचा अंकुश नव्हता. त्यामुळे चर्चच्या धर्मसत्तेला आव्हान मिळू शकले हे खरेच पण अफवांचे, खोट्या दाव्यांचेही पेव फुटले. यातला एक काळा अध्याय म्हणजे युरोपातील विचहंट - निरपराध माणसांना चेटूक, भुताटकी समजून हालहाल करून मारणे!

खरं तर मूळ बायबलमधे आणि नंतरच्या टीका ग्रंथात चेटूक, चेटकिणी किंवा जादू या सगळ्या अंधश्रद्धा आहेत असं स्पष्ट सांगितलेलं आहे. तरी युरोपातल्या वेगवेगळ्या भागात स्थानिक लोककथांच्या आधाराने काळी जादू, करणी करणे वगैरेवर लोक थोडा थोडा विश्वास ठेवत. स्थानिक चर्चचे धर्मगुरू आपापल्या मतानुसार या कमीजास्त विरोधी बोलत किंवा क्वचित स्वतःच यावर विश्वास ठेवून चेटकिणींना शिक्षा वगैरे देत. एका भागातल्या चेटकिणींचा दुसरीकडच्यांशी संबंध जोडलेला नसे. १४८६ मध्ये ही परिस्थिती अचानक बदलली, कारण मालियस मेलफिकारनम, म्हणजे चेटुकाचा हातोडा या नावाचं एक छापील पुस्तक प्रसिद्ध झालं. याचा लेख होता, हेन्रीख क्रामर नावाचा एक निलंबित चर्च अधिकारी. त्याला अश्या अंधश्रद्धा पसरवण्यामुळेच निलंबित केलेलं होतं. पण नव्या छपाई तंत्रानं क्रामरला नवी संधी मिळाली. त्याने त्याच्या पुस्तकात तोपर्यंतच्या सगळ्या कथांना अंतिम सत्य असल्याच्या थाटात एकत्र केलं. शिवाय चेटकिणींचे किस्से म्हणून काही विचित्र लैंगिक चाळेही आपल्या मनाने रंगवून लिहिले. मुख्य म्हणजे या गोष्टी लोककथा, दंतकथा अश्या न दाखवता क्रामरने बायबलचा आणि नव्या शास्त्रीय पुस्तकांचा आदर्श समोर ठेवून चेटूक ओळखायची लक्षणे, त्यात सहज होऊ शकणार्‍या चुका आणि त्या कश्या टाळाव्यात, चेटकिणींचा आणि जादुई गोष्टींचा नायनाट कसा करावा याची पायरी पायरीने कृती असं नीट तपशिलात लिहिलं. मुळात एखाद्या माणसाचे चेटकिणीत रुपांतर कसे होते याची माहितीही दिली. उदा क्रामरच्या मते चेटकिणी सहसा स्त्रियाच असतात कारण स्त्रियांना आपल्या प्रणयभावना आवरता येत नाहीत. सैतान या गोष्टीचा फायदा घेऊन त्यांना वश करून घेतो व त्यांना जादूची शक्ती देतो. (आपल्याकडे लोणी-आग दृष्टांतान्वये पुरुषमंडळींना कामभावना आवरता येत नाहीत असा समज आहे. पाश्चिमात्य जगात प्रणय आणि कामभावना स्त्रियांमधे जास्त असतात असं समजलं जातं!) क्रामरच्या चेटकिणी मग आपल्या नवर्‍याला आधी वश करून घेतात आणि मग इतर पुरुषांकडे मोर्चा वळवतात. पुस्तकाचा गाभा मात्र चेटकिणींचा छळ करून त्यांच्याकडून चेटकाची कबुली घेणे आणि मग त्यांना हालहाल करून मारणे यावर आहे.

हातोड्याने सांगितलेली चेटकीण पडताळणीची तत्त्व साध्या शब्दात सांगायचं तर केवळ दुष्ट होती. जर समजा आरोपीनं चेटकीण असल्याचं मान्य केलं, तर तिला ताबडतोब सुळी दिलं जाई आणि तिची संपत्ती सगळे पंच, इन्क्विझिटर वगैरे मंडळी वाटून घेत. जर आरोपीनं चेटकीण नसल्याचा दावा केला तर ही सैतानानं दिलेली खोटेपणाची दीक्षा आहे असं समजून, हाच चेटकीण असल्याचा अंतिम पुरावा आहे असं मानलं जाई. मग त्या चेटकिणीकडून सत्य वदवण्यासाठी तिची बोटं चेचली जात, तिला गार आणि उकळत्या पाण्यात बुडवलं जाई, डाग दिले जात, हात आणि पाय बांधून शरीर पूर्ण ताणलं जाई. शेवटी ती मृत्युमुखी पडे नाहीतर एव्हढ्या छळानंतर चेटकीण असल्याचं मान्य करत असे. मान्य केलं की लगेच सुळी. एखाद्या कुटुंबात कोणी चेटकीण आहे असं कळल्यास आधी त्यातल्या लहान मुलांचा छळ केला जाई. मग आपली आई चेटकीण आहे हे त्यांनी मान्य केलं की मग पुढे पहिल्याप्रमाणे! सोळाव्या शतकात ४० ते ५० हजार लोकांना या दुर्दैवाला सामोरं जावं लागलं. एकदा कोणालाही बारीक शंका आली तर मग अगदी चार नि पाच वर्षाच्या मुलांपासून ते वृद्धांपर्यंत कोणीही हातोड्याच्या कचाट्यातून सुटू शके ना. वेगवेगळ्या काळात आणि वेगवेगळ्या ठिकाणी अनेक वेळा, विशेषतः चर्चच्या धर्मगुरूंनी या अघोरी रूढींना विरोध करायचा प्रयत्न केला. पण चेटूकविरोधी चळवळीतल्या धुरिणांनी अश्या कनवाळू पाद्र्यांनाच चेटकी सिद्ध करून त्यांचा काटा काढला. हातोड्याचे नियम, मूळ पुस्तक आणि त्यावरची पुढची पुस्तकं एकीकडे, पण पुढे पुढे छळातून मिळालेले हजारो कबुलीजबाब हाच मोठा पुरावा आणि दस्तऐवज ठरू लागला. क्रामर मनोरुग्ण असेल असं म्हटलं तरी ह्या अनेक लोकांनी स्वतः सैतानाशी मैत्री, प्रणय, सौदा केल्याचं कबूल केलं आहे त्याचं काय - असाच प्रश्न सतराव्या शतकातले पंडित विचारत. आपल्याकडे शिवाजी महाराज स्वराज्य स्थापन करत होते त्याकाळात युरोपात वर्षानुवर्षे हा माणुसकीला काळिमा फासणारा प्रघात चालू होता.

विचहंटचा पूर्ण दोष छपाई तंत्रज्ञानाला देता येणार नाही. छपाई यंत्राच्या शोधाच्या आधीही हे चालू होतं. पण तुरळक. पुस्तकं छापून स्वतःच वाटता येऊ लागल्यावर 'माहितीचा' प्रसार जोमात सुरू झाला. पण ती माहिती खरी की खोटी हे तपासण्याची नि ठरवण्याची व्यवस्था एकदमच मोडून पडली... ती त्यानंतर सावरलेली नाही.

छपाई सुरू झाल्यापासून आता कोणीही थोडेफार पैसे घालून काहीही प्रकाशित करू शकतात. ही सोय छपाई यंत्र अस्तित्वात येण्याआधी नव्हती. हस्तलिखितं लिहिण्याचे प्रती करण्याचे नियम अतिशय कडक होते. आणि सुरुवातीला ते योग्यही होते (किंवा नियमांचा हेतू चांगला होता असं म्हणू.) जगाच्या वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या अंधश्रद्धा माणुसकीच्या सुरुवातीपासून असणार. पण त्या पसरवण्याचे मार्ग अनेक वर्षं आपल्याकडे नव्हते. तोंडी गोष्टी सांगणं ते शिलालेख ते हस्तलिखितं इथवर पाठान्तराचे, लिखाणाचे कडक नियम उपयोगी (आणि बंधनाकारकही) होते. गेल्या पाचेकशे वर्षात पुस्तकं आल्यावर ही बंधनं कमी झाली. आता इंटरनेट आल्यावर जग अभूतपूर्व पद्धतीनं जोडलं गेलं आहे. 'माहितीचा' प्रसार अनिर्बंध होतो आहे. पडताळण्याची व्यवस्था नाही ते एक, ते तर पुस्तकांबाबतीतही खरं होतं. पण आता इंटरनेटवर काही प्रसिद्ध करायला दमडीही लागत नाही. मेसेजिंग ऍप वर 'माहिती' पुढे पाठवायला एक सेकंद लागतो. तेव्हढीच काय ते गुंतवणूक. खरं तर स्मार्ट फोन नव्हते तेव्हाच्या काळातही केवळ टीव्हीवरून गणपती दूध प्यायला लागल्याची 'माहिती' वाऱ्यासारखी - किंबहुना त्याहून अधिक वेगानं पसरली होती.

आता पुढची पायरी म्हणजे एआय. एआय जोपर्यंत आपले एक्सरे पाहून फुप्फुसात कर्करोग पसरला आहे की नाही हे सांगत होतं, आपले चेहरे ओळखत होतं किंवा अगदी धनादेशावरचे किंवा गाडीच्या नंबरप्लेटवरचे आकडे वाचत होतं तोवर ठीक होतं. पण आता ते स्वतःच नवं कार्टून, नव्या कविता आणि गोष्टी लिहायला लागलं आहे. जी विकीची पानं वाचून भाषेची प्रारूपं (एल एल एम) तयार केली आहेत, त्या पद्धतीची नवी पानं लिहायला जनरेटिव्ह एआयला सहज शक्य आहे.

सध्या विकीवर लाखो माणसं बारीक बदल करत असतात आणि हजारो संपादक पदराचा वेळ खर्च करून माहिती बरोबर आहे का पाहात असतात, संदर्भ जोडत असतात. एखाद्या एलएलएमनं प्रति विकी तयार करायचं ठरवलं तर अब्जावधी पानं थोडक्या वेळात ते लिहू शकेल. त्यातली समजा ८०% बरोबर माहिती असेल आणि २०% धादांत खोटी - खोटं विज्ञान, खोटा इतिहास, खोटेच संदर्भ - असं असेल तर ते कोण पडताळणार आणि कोण संपादित करणार? एआयला मर्यादेत ठेवायला दुसरे आणखी शक्तिशाली एआय आणावे लागेल. आणि मग त्याच्याकडे लक्ष ठेवायला ... ? हजारो माणसांना मिळून अशी पडताळणी करता येईल का? ते शक्य तरी आहे का?

विकीचा मूळचा, पूर्णपणे तपासलेलच साहित्य प्रकाशित करायचा, प्रयोग अगदीच फसला. मग आता या एआयच्या हाती नवी माहिती लिहायचं काम द्यायचं कि नाही? नाही म्हटलं, तर आपल्याकडे एकसंध माणूसजात म्हणून असा निर्णय घेण्याची क्षमता आहे का? समजा चीनने अशी परवानगी नाकारली आणि अमेरिकेने मात्र तिथल्या कंपन्यांना एआयकडून माहिती, पुस्तकं, इंटरनेटवरची पानं लिहून घ्यायला प्रोत्साहन दिलं तर काय होईल? आणि भारतानं काय करावं? आणि हे कोण ठरवणार? सरकारं, खाजगी कंपन्या, विद्यापीठं की सामान्य जनता? आणि कसं?

खुलेपणानं एआयला बहरू दिलं तर वैज्ञानिक प्रगती वेगानं होईल हे खरं, पण त्यात कोणी दुष्टबुद्धीनं किंवा अनवधानानं विचहंट सुरू केली तर ती कोण थांबवेल? त्यासाठी आपण काय करू शकू? काही करू शकू का? बरं, धार्मिक किंवा राजकीय परिघात एआय नको असं म्हटलं तरी, लोकप्रिय काय, काय खपतं, ते ओळखून त्या पद्धतीचं साहित्य लिहायला एआयला अगदीच वेळ लागणार नाही. आणि काय खपतं ते आपल्याला माहित आहेच. कोपर्निकसचं जगाला अक्षरशः बदलून सोडणारं पुस्तक - त्याची, ४०० पुस्तकांची एक आवृत्ती देखील खपली नाही पहिल्या पन्नासेक वर्षात. आणि त्याच्या काळात चेटकाच्या हातोड्याने १० आवृत्त्या पार केल्या. अद्भुत, चमत्कारिक आणि भीतीदायक - शिवाय थोडं पॉर्न हे आपल्या मनुष्यमनाला अडकवून ठेवणारे विषय. गणित आणि भूमिती नाही!

बुद्धिमान कॉम्प्युटर प्रोग्रॅम नव्याने आले असले तरी आधी म्हटल्याप्रमाणे असा गियर बदलणं काही नवं नाही. पुन्हा छपाईयंत्राच्या काळात पाहिल्यावर, विज्ञानाची कशी प्रगती झाली, सगळ्याच 'शास्त्रीय' थेयऱ्या काही खऱ्या असत नाहीत. मग चुकीच्या, खोट्या किंवा बिनबुडाच्या 'माहितीचा' प्रसार कसा रोखला गेला त्या काळात? एकीकडे विचहंट चालू असताना, रोममध्ये १६०३ साली 'अकॅडेमिया देई लिंची' स्थापन झाली. एकमेकांचे प्रयोग नि कल्पना पडताळणे, शास्त्रीय वादचर्चा करणे असं या गटाचं स्वरूप होतं. पुढे १६६० मध्ये लंडनमध्ये रॉयल सोसायटीची स्थापना झाली आणि शास्त्रीय नियतकालिक, जर्नल आणि त्यातले लेख याच प्रमाणीकरण सुरू झालं. नवे लेख/ पेपर लिहायला / प्रकाशित करायला आणि या गटाच्या सदस्यांसमोर वाचायलाही आधी त्या मजकुराला मान्यता मिळण्याची पायरी मध्ये आली. स्वतःच प्रकाशित केलेले पत्रक आणि रॉयल सोसायटी किंवा फ्रेंच अकादमी दे सायन्सेस अश्या संस्थांच्या नियतकालिकात प्रकाशित झालेला लेख यात काहीच तुलना नसे. मान्यताप्राप्त शास्त्रीय संस्थेच्या, गटाच्या प्रकाशनात आलेल्या लेखाला वजन असण्याची ही परंपरा हल्ली आर्काइव्हवर आपापले पेपर प्रकाशित करायची सोय (आणि मान्यवर शास्त्रज्ञांची सवय) असूनही कायम आहे. वेळोवेळी यावर टीकाही पुष्कळ होते कि वशिलेबाजी चालते, नव्या कल्पनांना पटकन स्वीकारले जात नाही किंवा एका जर्नलमध्ये आलेला लेख दुसरीकडले लोक मान्य करत नाहीत वगैरे. पण याच पद्धतीच्या आधारावर अनेक नव्या थेयऱ्या पुढे आल्या. न्यूटन, डार्विन, आईन्स्टाईन सगळ्यांच्या काही काही कल्पना नव्या शास्त्रज्ञांनी चुकीच्या आहेत हे दाखवलं. आणि त्यावर त्यांना भरपूर प्रशंसा आणि अलीकडच्या काळात नोबेल पारितोषिके मिळाली. "शास्त्रीय" प्रगतीचे मूळ हे आहे. की पूर्वसुरींच्या चुका दाखवून दिल्यावर, (पुराव्यासहित) तृटींवर बोट ठेवल्यावर कौतुक होतं आणि शिक्षा अजिबात होत नाही. मूलभूत इष्ट गुण हा शंकिष्टता आहे, श्रद्धा नाही.

आता एआयला कह्यात ठेवायला समजा कायदे केले आणि त्यात शंका काढायला वाव ठेवला नाही तर शास्त्रीय प्रगतीच्या मुळावरच हल्ला होईल.

याबाबतीतही इतिहासाकडून आपल्याला थोडी मदत मिळते. स्टॅलिनच्या काळात रशियात लायसेन्को म्हणून एका (कु)प्रसिद्ध शास्त्रज्ञ होऊन गेला. बोल्शेव्हिक रशियाचे सूत्र हे होतं की एका पिढीवर चांगले संस्कार झाले तर पुढच्या पिढ्याही सुसंस्कारी निपजतात. मुळात म्हणजे माणसांवर संस्कार करून त्यांची _मूळ_ प्रवृत्ती कायमची बदलते. हे कदाचित थोडं खरं असेलही, पण लायसेंकोने जाहीर केलं कि हेच तत्व झाडांनाही लागू होतं. जेनेटिक्स (अनुवंशशास्त्र) आणि उत्क्रान्ती याचे सगळे जुने सिद्धांत नाकारून रशियाने एक देश म्हणून लायसेन्कोइझमचा स्वीकार केला. बियाणं थंडी वाऱ्यात ठेवून त्यावर संस्कार केले जायचे आणि सरकारतर्फे हे बियाणं शेतकऱ्यांना दिलं जायचं. कमी प्रतीचं बियाणं आणि दुसऱ्या एका धोरणाद्वारे 'श्रीमंत' शेतकऱ्यांचा निःपात या दोन गोष्टींमुळे रशिया दुष्काळ आणि अन्नधान्याचा वर्षानुवर्षांचा तुटवडा या चक्रात अडकला. लायसेंकोच्या कल्पनांवर शंका घेणाऱ्या शास्त्रज्ञांना आणि समाजधुरिणांना तत्कालीन सरकारनं कैदेत टाकलं किंवा सरळ फाशी दिलं. आणि १९४८मध्ये कायदा करून लायसेन्को थेयरीच्या विरोधी संशोधन / प्रयोग करणे यावरच बंदी घातली! १९३० ते साधारण १९६० पर्यंत हे धोरण कायम होतं. त्याकाळात रशियनांचे अतोनात हाल झाले. ३०-४० च्या दशकात सोविएत रशियात भूकबळींची संख्या १ कोटीच्या पुढे गेली, त्यात प्रामुख्याने युक्रेनियन आणि कझाक लोक होते. (युक्रेनमध्ये पिकलेला गहू/ धान्य रशिया केंद्र सरकार काढून घेत असे. कुठेही रस्त्यात लोक मरून पडलेले असत. आणि अनेक ठिकाणी नरमांस भक्षण सुरू झाले होते!) पुढे ही कल्पना माओने चीनमध्ये राबवली आणि ४ ते ५ कोटी चिनी लोक अगदी सेम टू सेम दुष्काळ पडून ( ~ १९६० ) भुकेने मेले. इतिहासातून धडा शिकला नाही तर पुनरावृत्ती होतेच होते. पुढे स्टॅलिनच्या मृत्यूनंतर लायसेंकोचा प्रभाव ओसरला व कायदेही दुरुस्त करण्यात आले. पण अवकाशविज्ञान आणि अणुसंशोधनात जगाच्या पुढे असणारा रशिया जैविक शास्त्राच्या शर्यतीत अजून मागेच आहे.

इयत्ता तिसरीत सामान्य विज्ञानाच्या पुस्तकात "आपण काय शिकलो" असा एक भाग असायचा प्रत्येक धड्याखाली. तसं आता हा प्रश्न आपण आपल्याला विचारायची वेळ झाली आहे. इतिहासातून आपण काय शिकलो? नवीन तंत्रज्ञान सतत येत राहणार ते थांबवणे आपल्या हाती नाही. माणूसजात म्हणून एकोप्यानं आपल्या हिताचे निर्णय घेणं अजून तरी आपल्या आवाक्यात नाही. पण एकेक माणूस म्हणून आपण शंका विचारू. समोर आलेली माहिती पुढे प्रसृत करण्याआधी तिच्या सत्यतेची खातरजमा करायचा प्रयत्न करू. दोन चार उदाहरणांवरून सार्वत्रीकरण (जनरलायजेशन) टाळू. आणि समोरचा माणूस हा माणूस आहे, व्यक्ती म्हणून तिला तिची मतं आहेत, चुका करायची, सुधारायची संधी आहे, तसं एआयची मतंही परिपूर्ण, संशयाच्या पलीकडे नसणार हे लक्षात ठेवू. एआय मधला इंटेलिजन्स हा अनुभवातून येतो. आपण एआयला काय अनुभव देतोय त्यावर लक्ष ठेवू. आणि मुख्य म्हणजे आर्टिफिशल - म्हणजे मानवनिर्मित - हा शब्द ठळक अक्षरात घालू. जो अल्गोरिदम आहे त्याला चालवणारे आपण युजर आहोत. एकेक व्यक्ती म्हणून आपण इंटरनेटवर काय लिहितो आणि काय वाचतो यावर एआयची मतं आणि एकूण पुढची दिशा ठरणार आहे. ही आपली जबाबदारी आहे. आपल्या पुढच्या पिढीसाठीची.

मृदुला गोरे
पूर्वप्रकाशित महा-अनुभव जुलै २०२५

लेख: 

वर
0 users have voted.