माझ्या आईने तिच्या बालपणापासूनच्या आठवणी लिहिल्या आहेत, आणि त्या इथे सगळ्यांसोबत शेअर करायला मला परवानगी दिली आहे. भाग एक टाकला आहे. मैत्रिणींना वाचायला आवडल्या तर पुढचे भाग टाकेन.
वयाच्या 27 व्यावर्षापर्यंत मुंबई सुद्धा मी बघितली नव्हती. मला हे कळत नाही की आपल्याला वयाच्या कितव्या वर्षापासून घटना लक्षात राहायला सुरुवात होते. तेव्हा मला आठवले की, मी अगदी सात किंवा आठ महिन्यांची असेन त्यावेळी माझी आई मला कडेवर घेऊन बसने कुठेतरी निघाली होती. आणि बस स्टँडवर एक अपंग माणूस हातावर चालत होता, त्याला पाहिल्यावर मी रडून गोंधळ घातला, आईच्या अंगावर अजून वर वर चढायला लागले. त्यानंतर आम्ही बसमध्ये चढलो. मी थोडी शांत झाले पण दुसऱ्याच क्षणाला मी पुन्हा जोर जोरात रडायला लागले. कारण तो माणूस नेमका आम्ही ज्या बसमध्ये चढलो त्याच बसमध्ये चढला. बस मधल्या आजूबाजूच्या लोकांच्या लक्षात आल्यावर त्यांनी त्या माणसाला बहुतेक माझ्या नजरेआड केले किंवा रडून रडून मी झोपले. ते काही आठवत नाही. त्यानंतर मला वाटते की मी चार किंवा पाच वर्षांची असेन आम्ही शनिवार पेठेत एका दहा बाय दहाच्या खोलीत भाड्याने राहायला आलो. खोलीच्या मध्ये अगदी थोडे सामान ठेवले होते. आमच्या समोरच भुतकर वकिलांची चाळ होती. एकूण वीस बिऱ्हाडकरू भाड्याने राहत होते. प्रत्येकी दोन खोल्या दुमजली चाळ होती. दोन्ही बाजूने लाकडी जिने होते. त्या जिन्यामध्ये आम्ही मुले खेळत असायचो. चाळीतील लोकांना त्यांच्या नावाने बोलवण्याऐवजी त्यांच्या रूम नंबर वरून बोलवले जायचे. जसे की सात नंबर 11 नंबर. त्या चाळीत बरीच माझ्या बरोबरीची मुले मुली राहत होती. यापैकी आठ नंबर मध्ये एक गुजराती कुटुंब होते त्यांना पाच मुले होती. त्यामधली कांता नावाची मुलगी होती तिचे आणि माझे चांगले जमायचे. आणखी एक गुजराती कुटुंब पाच नंबर मध्ये राहत होते. त्यांचा बच्चू नावाचा मुलगा माझा मित्र होता. त्यांच्या घरात आम्ही पत्ते खेळत बसायचो.
सोडून सगळे धंदे केलेत. कधी आई आणि ते चर्चा करत असायचे की काय उद्योग करावा आता? मी लगेच म्हणायचे आपण हॉटेल काढूया, कारण मला हॉटेलमधील छान छान पदार्थ आठवायचे. खरंतर माझ्या वडिलांचे आजोबा सावकार होते. म्हणजे त्यांच्या आईचे वडील आणि ती एकुलती एक होती. त्यामुळे माझे आजोबा घर जावई होते. खूप शेती होती, मोठा वाडा होता म्हणजे ज्या दहा बाय दहाच्या खोलीत आम्ही राहत होतो तेवढे त्या वाड्यात बाथरूम अर्थात त्यावेळी न्हाणीघर म्हटले जायचे. मागच्या बाजूस आड पण होता. वाडा दोन मजली होता. आमचे गाव काले , कराड पासून सात किलोमीटर अंतरावर होते पण तिथे राहण्याचा कधी योग आला नाही. तिथे माझी वयस्कर आजी आणि माझे काका काकू त्यांच्या मुलांसह राहत होते. माझे वडील १९४२ च्या लढ्यात सहभागी झाले होते त्यामुळे सतत जेलमध्ये असायचे. माझी सावत्र आई नव्हती त्यामुळे माझ्या सावत्र भावंडांना माझ्या काका काकूंनी सांभाळले होते. अर्थात हे सगळे माझ्या जन्मापूर्वी. त्यामुळे माझी सावत्र भावंडे माझ्यापेक्षा खूप मोठी होती. माझ्या दोन बहिणींची लग्न माझ्या जन्मापूर्वी झाली होती, त्यापैकी मोठ्या बहिणीचा मुलगा माझ्यापेक्षा दोन किंवा तीन वर्षांनी लहान होता. माझ्या भावंडांना सावत्र म्हणणे मला आवडत नाही. कारण त्या सगळ्यांचा माझ्यावर खूप जीव होता. जरी घरचे गडगंज असले तरी नंतर त्या सगळ्या संपत्तीला ओहोटी लागली कशी ते मला माहिती नाही. पण गावात कडील तो वाडा ती शेती विकली गेली. माझ्या वडिलांनी वाटणीसाठी कधी आग्रह धरल्याचे आठवत नाही. मला वाटते माझ्या भावंडांना काका काकूंनी सांभाळले होते त्यामुळे असेल किंवा एकूणच त्यांचा स्वभाव तसा असल्यामुळे असेल. पण मला आश्चर्य वाटते की, वाडा व शेती विकली गेल्यावर माझे काका काकू सहकुटुंब कराडमध्ये राहायला आले पण कधीच कुणी रडगाणे गायले नाही की, आम्ही मोठ्या वाड्यात राहत होतो, काही नाही. अगदी एका खोली तेही राहत होते. कधी कधी माझे वडील व भाऊ मला सायकल वरून गावी आजीला भेटायला न्यायचे. वाडा विकल्यावर मात्र आम्ही माझ्या दादांचे मित्र यशवंतराव पाटील होते त्यांच्या घरी जायचो. कधी कधी राहायचो पण. तिथे आम्हाला घरच्यासारखे वाटायचे. खरंच त्यावेळी घरं छोटी छोटी होती पण अगत्य फार होते. अर्थात तेव्हा लोक एवढे बिझी नव्हते त्यामुळे कोणी आले गेले हाच त्यांचा विरंगुळा होता.
आम्हा मुलांचा मुक्त संचार असायचा. मुलं मुली एकत्र खेळायचो. त्यामध्ये मुलं जास्त असल्यामुळे पतंग उडवणे, मांजा तयार करणे, चाक फिरवणे हे खेळ खेळले जायचे. त्यापैकी पतंग उडवायला मला फार आवडायचे. वडिलांनी मला एक हात पाय हलवणारी बाहुली आणली होती. ते एकच खेळणे मला महागातले मिळाले होते. पण कधी खेळण्याची उणीव भासली नाही. कारण सतत बाहेर उंडारणे असायचे. मला अजून एक सवय होती, छोटा आरसा हातात घेऊन उंबऱ्यावर बसायचे, त्यामुळे आभाळ असे खोल खाली आहे असा भास व्हायचा. स्टॅन्ड जवळ होते आणि स्टॅन्ड च्या समोर एक हॉटेल होते तिथे मोठमोठ्याने रेडिओ लावलेला असायचा. त्यातले एकच गाणे मला तरी कळायचे, ते म्हणजे' 'जादू नगरी से आया है कोई जादूगर ', मला वाटायचे हे काहीतरी जादूगाराचे गाणे आहे. तेव्हा घरोघरी रेडिओ नव्हते मात्र काही हॉटेलमध्ये असायचे. खेळणी म्हणजे छोट्या पुठ्ठ्याच्या डब्यात कागदी नागोबा असायचा तो झाकण काढले की डुलायचा आणि एका तारेवर प्लास्टिकचे माकड असायचे ते खाली वर व्हायचे शिवाय पत्र्याच्या शिट्टी सारखे असायचे ते हाताने खाली वर केले की त्याचा आवाज यायचा.
गेले होते वडील मला सोडायला आले होते. त्यांच्या मागून ते कुत्रे आले होते ते त्यांना कळले नाही. तिथे समोर एक झोपडी होती त्या लोकांनी त्याला बांधून ठेवले. वडील मला न्यायला आल्यावर त्यांच्याकडून ते कुत्रे भांडण करून परत घेतले. शिवाय एक मांजर अशीच येऊन आमच्या घरी राहिली होती. मी जे खायचे तेच ती पण खायची अगदी तिखट असले तरी. तिच्यावर माझा खूप जीव होता. आमच्या दक्षिणेला पॉवर हाऊस होते तिथे मेंदीची खूप झाडे होती. आम्ही मुलं मुलं जायचो आणि मेंदीची पाने आणायचो आणि ती पाट्यावर वाटायचो. वाटता वाटता हात रंगायचे खूप मजा वाटायची.
इन्स्पेक्शन आहे तेव्हा नीट उत्तरे द्या. अर्थात त्यावेळी कशाचे काही गांभीर्य नव्हते. त्या साहेबांनी आम्हाला आंबा लिहा असे सांगितले आणि मी आबा लिहिले होते. बाई वर्गात चक्कर मारत होत्या त्यांनी हळूच मला सांगितले की आ वर टिंब दे, मी दिले. नंतर तिकडे ठिगळे नावाच्या बाई शिकवायला आल्या. त्यांनी एका मुलाला जोरात धपाटा मारला, ते पाहिल्यापासून मला शाळेचा धसकाच बसला. कारण मला घरी कधीच कुणी मारले नव्हते. त्यामुळे चल आवर शाळेत जा म्हटलं की मला पोटात कळ यायची. खरंतर त्यावेळी त्या बाईंचा इतका धसका घेतला होता आणि खरंच मला कळ यायची. पण वडिलांना वाटायचे हिला शाळेत जायला नको म्हणून ही बहाणा करते आहे. त्यांनी पण चंग बांधला मला शाळेत पाठवायचा. ते म्हणाले," चल शाळेत, शाळेजवळच माझा मित्र राहतो त्याला सांगतो, हिला जेव्हा कळ येईल त्यावेळी तू पाणी दे. तो तुला पाणी देईल. आणि तुझ्या गुरुजींना पण सांगतो जेव्हा हिला जायचे असेल त्यावेळी तुम्ही बाहेर सोडा". आणि खरोखर दिवसभरात मी बरेच वेळा गेले. शाळा सुटताना वडील मला न्यायला आले, त्यांनी त्या मित्राला विचारले तेव्हा तो त्यांना म्हणाला,"पोरगी दिवसभरात इतक्या वेळा गेली एवढी काही ती मॅट्रिकला आहे का? , कशाला एवढा अट्टाहास करतोस?." रस्त्याने आम्ही दोघे येत होतो, तेव्हा वडील मला म्हणाले की, "आपण तुझी शाळा बदलूया का?"मी हो म्हणाले. शाळा बदलण्यापूर्वी म्हणजे या प्रसंगापूर्वी माझा मोठा भाऊ जयप्रकाश ज्याला मी अण्णा म्हणायचे, त्याचे नुकतेच लग्न झाले होते, तो ग्रामसेवक होता. त्याचे पोस्टिंग किन्हईला झाले होते. तो आला होता आणि मला म्हणाला, "चल येतेस का किन्हईला ?". आणि मी लगेच तयार झाले, कारण शाळेपासून तेवढीच सुटका असे मला वाटले. खरंतर मी माझ्या आई दादांना सोडून कधीच कुठे गेले नव्हते. पण यावेळी मात्र एका पायावर तयार होऊन गेले सुद्धा.
घ्यायच्या. त्यामुळे मला छान वाटू लागले. मग मात्र मी आजारी वगैरे पडले तर शाळा बुडायची नाहीतर नाही. आणि घर पण तिथून जवळच होते. त्यामुळे मधल्या सुट्टीत सगळ्या मैत्रिणी आणि मी माझ्या घरी पाणी प्यायला पळत पळत यायचो. त्यावेळी प्लास्टिकच्या बाटल्या नव्हत्या. माझी एक मैत्रीण मृदुला जोशी तिला अजून पाणी प्यायला यायची ते आठवते.
वयस्कर होत्या त्यांच्या इथून आम्ही पाणी भरायचो. त्यावेळी घराघरात पाण्याचे नळ नव्हते, तर त्या बाईंना आई नेहमी सल्ले विचारायची. त्याही तिला स्वतःच्या मुलीप्रमाणे सल्ले द्यायच्या ,शिकवायच्या. त्या स्वतःचे ब्लाऊज स्वतः शिवायच्या. एकदा आई त्यांना म्हणाली,"मला पण शिवायला शिकवाल का ?". त्या म्हणाल्या,"अगं माझं कसलं होंगाडे शिवणे." त्यापेक्षा माझ्या ओळखीच्या एक लांजेकर बाई आहेत त्या तुला छान शिकवतील मी त्यांना सांगते." ही लगेच एका पायावर तयार झाली. तिच्यासोबत मी पण जायचे कारण त्यांची सखू नावाची मुलगी माझ्या एवढीच होती. पंधरा दिवसात ही शिकून तयार झाली. त्या लांजेकर बाईंचे संबंध अजून टिकून आहेत अर्थात त्या नाहीत पण त्यांची मुले संपर्कात आहेत.
किंमत 365 रुपये होती. तेव्हा आधी नोंदणी करावी लागायची आणि मग मशीन मागवले जायचे. महिना पंधरा रुपये हप्त्याने मशीन घ्यायचे ठरले. आईने ते शिलाई करून हप्ते भरले. एक पुस्तक होते त्यामध्ये एक हप्ता दिला की रेवेन्यू तिकीट लावून त्या दुकानदाराची सही घ्यायची. ते पुस्तक मी अजून जपून ठेवले आहे. वडिलांना पण तिचे फार कौतुक होते. त्यांनी मशीनच्या चाकावर तिचे नाव टाकून घेतले होते. शिलाईतून आई थोडे थोडे पैसे साठवून बाजूला ठेवायची. त्या नावडीकर बाईंना ती म्हणायची,"माझे एवढे पैसे तुमच्याजवळ ठेवा, घरी ठेवले तर खर्चून जातील. त्या तिला म्हणाल्या, "हे बघ त्यापेक्षा तू बँकेत खाते काढ आणि त्यामध्ये पैसे साठव." आईने तेही केले, अर्थात त्यावेळी तिचे वय 25 ,26 त्यामुळे उत्साह खूप. वडील तिला सायकल चालवायला शिकवायचे. माळ तिथून जवळच होता. दिवसा हिला वेळ नसायचा मग रात्री शिकवायचे. हिच्या उत्साही स्वभावामुळे आणि काहीही करण्याची तयारी असल्यामुळे तिथे महिला मंडळ अध्यक्ष आठवले बाई होत्या त्यांनी हिला विचारले की,"पावडरचे दूध करून वाटप करशील का?"ती लगेच तयार झाली. त्यांनी त्यासाठी लागणारा टाकीचा स्टोव, ह्याला लागणारे रॉकेल, मोठे पातेले, ओगराळं, दूध पावडर, असे सगळे सामान त्या पुरवायच्या. माझी आई ते दूध तयार करायची आणि ज्यांना हवे ते लोक ग्लास वगैरे घेऊन दूध न्यायला आमच्या घरी यायचे . या कामाचे त्या बाई आईला काही पैसे द्यायच्या . त्यावेळी मला या सगळ्या गोष्टींचे काहीच वाटले नव्हते मजा वाटायची. पण आता मात्र माझ्या आईने काय काय केले ते आठवून आश्चर्य वाटते आणि तिच्यासाठी मी दहा वेळा नतमस्तक होते. पूर्वी लोकांना रेडीमेड कपडे आवडायचे नाहीत. ते म्हणायचे त्याची शिलाई कच्ची असते आणि लगेच उसवते ते खरेही होते. त्यामुळे कपडे शिवून घेण्याकडे लोकांचा कल होता. सगळ्या चाळीतील मुला मुलींचे स्त्रियांचे पुरुषांचे कपडे आईकडे शिवायला यायचे. ती रात्र रात्र जागून ते शिवायची, तेही कंदीलाच्या उजेडात. माझे दादा तिला सोबत म्हणून जागत असायचे. दिवाळीमध्ये तर आईला अजिबात उसंत नसायची. त्यामुळे दिवाळीचा फराळ ती एका दिवसात तयार करायची. कष्ट करायला माझी आई वाघीण होती पण खोटेपणाचा तिला अतिशय राग होता.
कर्मवीर भाऊराव पाटील रिमांड होम मध्ये ठेवले होते. त्यांना भेटायला आई आणि दादा एकदा गेले तेव्हा मलाही नेले होते. त्या दोघांना सुट्टी असली की ते घरी यायचे, मग ते दोघेही माझे खूप लाड करायचे. मलाही खूप आनंद व्हायचा. नंतर विलास अठरा वर्षाचा झाल्यानंतर त्याला घरी सोडले होते. दादांनी विचार केला की विलास रिकामा बसणार त्यापेक्षा त्याला सायकल दुकान काढून देऊ. तेव्हा 250 रुपयाला एक याप्रमाणे सायकल मिळत होत्या. सहा सायकल आणल्या होत्या. एक खोके एका चौकात मोक्याच्या ठिकाणी ठेवले होते. सायकल भाड्याने दिल्यावर एका रजिस्टर मध्ये नोंद करायची असायची. सगळी जय्यत तयारी झाली. दादांनी गजराचे घड्याळ आणले. ते म्हणाले उद्या लवकर उठून दुकानात पूजा वगैरे करून सुरुवात करूया. पहाटे गजर होईल. बापरे मला वाटले घड्याळाला कसे कळणार साडेपाच वाजले?. या विचारानेच मला झोप आली नाही. सारखी उठून घड्याळ बघत होते. इतके सगळे झाले. पण भावाचा हट्ट होता की त्याला आर्मीत जायचे आहे, त्यामुळे त्याने सायकल कोणी भाड्याने नेली तरी नोंद ठेवत नव्हता, दुर्लक्ष करत होता. एक सायकल चोरीला गेली. खरंतर वडिलांना त्या सायकल्स घेण्यापुरते कशाचे तरी पैसे मिळाले होते. आईला सायकल चोरीला गेल्यामुळे खूप वाईट वाटले. ती म्हणाली,"काही नाही माझी मशीन तिथे नेऊन ठेवा. मी तिथे बसून शिलाई पण करेन आणि नोंदी पण ठेवीन."मग काय आम्ही सगळे त्या दुकानात असायचो. त्यानंतर काय झाले कुणास ठाऊक पण दुकान बंद केले. इतके काही कळण्याचे माझे वय नव्हते. त्या माझ्या भावाला विलासला जेव्हा आर्मी भरती असेल तेव्हा मी आणि माझे दादा आणि तो जायचो. त्यानंतर जवळजवळ एक वर्ष केवळ आईने केलेल्या शिलाईच्या पैशावर घर चालले. अर्थात हे मला थोडे कळायला लागल्यावर त्यांच्या बोलण्यातून कळाले. माझे दादा आईला कधी म्हणाले की ,"पैसे आहेत का ?"तेव्हा ती म्हणायची असतील बघा मशीनच्या ड्रॉवरमध्ये"त्यावर माझे दादा म्हणायचे,"तुझी मशीन म्हणजे कामधेनु आहे का?". पुन्हा त्यांची चर्चा सुरू व्हायची की आता काय उद्योग करूया?. मी तिथे आसपास असले की म्हणायचे आपण हॉटेल काढूया, कारण डोळ्यापुढे हॉटेलमधले छान छान पदार्थ दिसायचे. ते दोघे फक्त हसायचे. माझे दादा म्हणायचे, "मी केस कापायचा धंदा सोडून बरेच उद्योग केलेत, म्हणजे ट्रक होता, रेशन दुकान होते, आणखी बरेच काही. मी जन्माला येण्यापूर्वी माधव नगरला खानावळ होती. तिथेच माझा जन्म झाला. त्यावेळी माझे दोन चुलत काका मदतीला असायचे म्हणे. आई सांगायची त्या कामातून तिला सवड नसायची. त्यामुळे वडिलांनीच मला देवी टोचून आणल्या होत्या. नंतर माझे कान ही त्यांनी बाहेरून टोचून आणले. परत काय झाले कुणास ठाऊक पण त्यांनी सगळे मेढ्याला म्हणजे मेढे गाव आहे तिथे हलवले. तिथे खानावळ सुरू केली. तिथे शिंदे म्हणून एक तहसील कार्यालयातील जेवायला येत. आणखी काही दिवसांनी वडिलांनी ठरवले की आता कराडला जायचे. त्यावेळी जरुरी पुरते सामान घेऊन कराडला आले. बरीच छोटी मोठी भांडी आणि सामान त्या शिंदे म्हणून होते त्यांच्याकडे ठेवली होती. ते शिंदे सारखे पत्र पाठवून म्हणत होते की तुमची भांडी आणि सामान घेऊन जा. पण वडिलांनी लक्ष दिले नाही. आणि काही दिवसांनी वडील भांडी व सामान आणायला गेले तेव्हा, ते शिंदे म्हणाले,"कुठली भांडी माझ्याकडे काही भांडी वगैरे नाहीत." मग वडिलांना खडबडून जाग आली. कोर्टात जायचे तर वकिलाची फी भरण्याची पैसे कुठले? पण त्यांचे एक मुतालिक नावाचे वकील मित्र होते. ते सातार मध्ये होते. ते म्हणाले,"मी तुझी केस घेतो, मला काही पैसे वगैरे नको". केस सातारच्या कोर्टात असायची. त्यावेळी एसटी भाडे अगदी कमी होते तरीही परवडायचे नाही आणि मी लहान असल्याने मला ते आठ नंबर भाभींकडे ठेवून जायचे. त्या भाभी मला आंघोळ घालण्यापासून सगळे करायच्या. त्यांची आणि माझ्या आईची चांगली मैत्री होती. चाळीत त्यावेळी सगळ्यांकडे बंब होते. आणि हे दोघे म्हणायचे की त्या भांड्यात आपला बंब पण आहे. त्यामुळे ते दोघे सातारहून आले की मी उत्सुकतेने आपला बंब आला का म्हणून पहायची. पण निराशाच व्हायची. एकदा ते वकील म्हणाले की,"काहीतरी लेखी पुरावा असता तर बरे झाले असते". त्यावर आई म्हणाली,"त्यांची पत्रे आहेत तुमची भांडी घेऊन जा म्हणून , ती चालतील का?"त्यावेळी पाच पैशाची पोस्ट कार्ड असायची आणि ती एका तारेत खुपसून ठेवलेली असायची. तर त्यावर वकील म्हणाले,"हो हो चालतील ना."आणि मग ते शिंदे पण तडजोड करायला तयार झाले. सगळी भांडी नाही पण बरीच भांडी आणि ज्याची मी उत्सुकतेने वाट पाहत होते तो बंब परत मिळाला आणि मला खूप आनंद झाला. त्या त्या वेळेचा आनंद वेगळाच असतो. एकदा मला शाळेत जाताना 25 पैशाचे नाणे सापडले होते. ते मी मुठीत घट्ट धरून ठेवले होते आणि त्या 25 पैशात काय काय घेता येईल याचे स्वप्न रंगवले होते. कारण त्यावेळी रावळगाव चॉकलेट पाच किंवा तीन पैशाला मिळायचे.
