जुने दिवस - स्मरण रंजन - भाग २

मी दुसरीत किंवा तिसरीत असेन. तेव्हा आम्हाला शाळेने कराड मधील मुतालिक वाडा आहे तिथे नेले होते. तिथे एक जण आम्हाला मुलांना गोष्ट सांगत होते.,'शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ'. तर ते गृहस्थ मला खूप आवडले. त्यानंतर ते एक दिवस चाळीतील कुणाकडे तरी आले होते, मी त्यांना कुठे पाहिले हे विसरून गेले होते. मी तिथेच खेळत होते. त्या ग्रस्तांना पाहिल्यावर का कुणास ठाऊक मला वाटले की हे माझ्या दादांचे मित्र आहेत. त्यामुळे मी दोन-तीनदा त्यांना म्हणाले की माझे दादा घरी आहेत. त्यांनाही वाटले कोण हिचा दादा आहे बघूया. मला म्हणाले चल तुझ्या दादांकडे. मी त्यांच्याबरोबर घरी आले माझे दादा दाढी करत होते, हे गृहस्त दादांकडे आणि दादा त्यांच्याकडे बघत होते प्रश्नार्थक नजरेने. शेवटी ते गृहस्थ दादांना म्हणाले की अहो तुमची मुलगी दोन तीनदा मला म्हणाली की आहेत माझे दादा घरी. ते दोघे एकमेकांना ओळखतही नव्हते. त्यानंतर गंमत म्हणून माझे दादा सगळ्यांना हे सांगत होते म्हणून मला माहिती झाले. कारण त्या दोघांना एकमेकांना भेटवून मी कधीच खेळायला पळाले होते. त्यांची फंकी पोझिशन करून. पण कसलाही प्रसंग हाताळण्यात माझे दादा हुशार होते.

मी चौथीत गेले तेव्हा तिथेच जवळ एक मुलगा होता, तो पाच पैसे घेऊन एक पुस्तक थोड्या वेळासाठी वाचायला द्यायचा. तेव्हा मुलांसाठी वेगळी पुस्तके नसत. मी जी पुस्तके वाचायचे ती जादूची पुस्तके असत, म्हणजे याचा जीव पोपटात किंवा आणखी कुठल्यातरी पक्षात. तरी त्यावेळी ते आवडायचे. चौथीतून पाचवीत गेले आणि आम्ही दुसरीकडे राहायला गेलो. मला शिवाजी विद्यालय कराड या शाळेत घातले. मी पाचवीत गेले आणि त्याचवेळी शासनाने स्वातंत्र्यसैनिकांच्या शालेयवयीन मुलांना शिष्यवृत्ती देण्याची योजना सुरू केली. माझ्या सात भावंडांपैकी मला ही संधी मिळाली. मुख्याध्यापकांनी शिष्यवृत्ती दहा रुपये होती त्यापैकी ॲडमिशनची दोन रुपये कापून घेऊन आठ रुपये मला दिले होते. आहाहा काय तो आनंद वर्णवा. जिन्यावरून मी अगदी फुलपाखरासारखे नाचत खाली वर करत होते. आता लाखोंची उलाढाल होते आहे पण त्यावेळी ते आठ रुपये मिळाल्याचा आनंद शब्दातीत होता. पाचवी ते सातवी पर्यंत दहा रुपये, आणि आठवी ते अकरावी पर्यंत 120 रुपये वर्षातून एकदा मिळत. आम्ही तिथल्या तिथे एकूण चार घरे बदलली होती. हा परिसर म्हणजे राज महाल टॉकीजच्या जवळचा आणि स्टँडच्या पूर्वेचा होता. तिथे एक मोठी वखार होती त्याचे मोठमोठे झाडाचे ओंडके पडलेले असायचे. त्याच्या साली लांब लचक निघत. त्या काढणे हा आमचा मुलांचा एक खेळ होता आणि त्या ओंडक्यांवर चढणे हाही. तिथे घरे थोडी अंतर राखून होती. तिथेही मला मित्र-मैत्रिणी मिळाले. या घरापासून सुद्धा शाळा जवळच होती, अगदी बेल वाजली तरी ऐकू यायची. विशेष म्हणजे इथेही माळ आणि त्या कबरी होत्या. इथल्या शेजाऱ्यांपैकी सुद्धा कोणी नोकरी वगैरे करत नव्हते. बुटाला म्हणून होते त्यांचा तांदूळ तयार करायचा कारखाना होता. दुसरे एक लाखोळे म्हणून होते ते गुळ विकत आणि कांदा लसूण मिक्स केलेला मसाला विकत. माझ्या दादांनी तेव्हा मिश्री तयार करायचा कारखाना सुरू केला होता. त्यासाठी लागणारे रॉ मटेरियल ते जयसिंगपूरहून मागवत. कारखान्यासाठी थोडी जागा गावापासून दूर घेतली होती. त्यासाठी खाकी कागद आणून त्यावर प्रेसमधून 'उमा मिश्री'असे छापून घेत. त्याचे पुन्हा कटिंग करून ते पुड्या करण्यासाठी बायकांना घरी दिले जायचे. तसा एक ग्रुपच होता. कागद कटिंग करण्याचे काम अर्थात आईच करायची. मिश्रीचे रॉ मटेरियल एका मोठ्या विटांनी बांधलेल्या चुलीवर मोठे तयार करून घेतलेले सुपा सारख्या आकाराचे भांडे होते त्यावर भाजावे लागायचे. हे काम अतिशय जिकिरीचे होते कारण ते भाजताना डोळे अक्षरशः मुटक्यासारखे सुजायचे आणि लाल भडक व्हायचे. त्यामुळे त्या कामासाठी डोंबारी सुद्धा तयार व्हायचे नाहीत. तेही काम माझी आई करायची. मिश्री तयार झाली की कारखान्यात येऊन ते काम पुड्या भरून चिकटवणे हे तो ग्रुप करायचा. पुन्हा त्या पुड्या भरून झाल्या की त्यांचा एक ठराविक पुड्या भरून मोठा पुडा तयार करायचा असायचा. तेही काम आईच करायची. माझे दादा म्हणायचे," सीताचा हात इतका सफाईदार आहे की पुडा असा फेकला तरी फुटत नाही". बाहेरची सगळी कामे दादा करत. पुड्यांचा एकत्र पुडा बांधायला मलाही आवडायचे.

मी पाचवीत असताना आमच्या शाळेत 'वयं मोठं खोटं' नावाचे नाटक बसवले होते. त्यामध्ये लहान मुले घरातली मोठी माणसे बाहेर गेलेली असतात. तेव्हा त्यांचे ऍक्टिंग करतात. मी आणि माझी मैत्रीण अलका इंगळे आणि इतर मुले त्यामध्ये होती. आम्ही आमच्या ड्रेसवरच साड्या नेसलो होतो. आधी दूधवाला येतो असा प्रसंग होता. दुधाचे पातेले घ्यायचे राहिले होते तेव्हा मी स्टेजवरूनच ओरडले,"बाई दुधाचे पातेले राहिले". सगळे लोक हसले तरीही आम्हाला काही कळले पण नाही की का हसताहेत. त्यानंतर कधीही कुठल्या नाटकात काम करायची संधी मिळाली नाही. पाचवीत असतानाच आमची सहल प्रतापगडावर गेली होती. तेव्हा सूर्यवंशी नावाच्या बाई होत्या. त्या माझे खूप लाड करायच्या. पूर्ण सहलीमध्ये मी त्यांचा पदर सोडला नव्हता. परत आल्यावर त्या सगळ्यांना सांगत होत्या की,"पूर्ण सहलीमध्ये हिने माझा पदर काही सोडला नाही". सहलीच्या बस मध्ये बसवायला माझे आई-दादा आले होते त्यांना टाटा करताना माझे डोळे भरून आले होते. आता ते आठवून खूप हसू येते कारण आता एवढी एवढी छोटी मुले ट्रीपला जातात

आम्हाला पाचवीपासूनच इंग्लिश शिकायला मिळाले. शिकवणारे शिक्षक चांगले असले की त्या विषयाची गोडी लागून तो विषय पक्का होतो. तसे माझे इंग्लिश देवल सरांमुळे खूप छान झाले होते आणि मला इंग्लिश आवडायला पण लागले होते. त्यामुळे आठवीत गेल्यावर सुद्धा सतत माझा हायेस्ट येत असे. वर्गात बाईंनी माझा पेपर सगळ्यांना दाखवला की मला जग जिंकल्याचा आनंद व्हायचा. म्हणून मला नेहमी वाटते की त्या त्या वेळेचा आनंद वेगवेगळ्या वस्तू परिस्थिती यावर अवलंबून असतो. हिंदी मराठी संस्कृत इंग्लिश या सगळ्या भाषा माझ्या आवडीच्या होत्या. गणित, सायन्स, इतिहास, भूगोल, हे विषय नावडते होते. त्यात मी बरी होते. तरी पहिल्या चार नंबर मध्ये असायचे. बाईंच्या कौतुकाच्या नजरेनेच मला अभ्यास करायची प्रेरणा मिळायची आणि वडिलांचे प्रोत्साहन.

पोलीस स्टेशनला लागून राज महाल टॉकीज होती. त्याचे मोठे गेट होते. आम्ही सातवीपर्यंत शिवाजी हायस्कूल मध्ये होतो. शाळा सकाळी असायची. शाळा सुटली की त्या टॉकीज च्या गेटला एक साखळी होती त्यातून आम्ही मुली आत जायचो. कारण तिथे एक पेरूचे झाड होते. तिथेच चहा बिस्कीट विकणाऱ्याचे टेबल असायचे. ते आम्ही उचलून पेरूच्या झाडाखाली आणायचो. ते डुगडुग करायचे म्हणून दोघांनी त्याला धरायचे. एकाने टेबलवर चढून पेरू काढायचे आणि एकाने बाहेरून कुणी येत नाही ना त्यासाठी गेट कडे लक्ष ठेवायचे. एकदा कुणीतरी गेट उघडले म्हणून आम्ही सगळे घाबरून पळत सुटलो. टेबलवर चढलेली जी मुलगी होती ती उतरली की नाही हेही पाहिले नाही. तसेच एकदा शिवाजी हाउसिंग कॉलनी मध्ये आमचे जगताप नावाचे सर राहायचे त्यांच्याकडे मी आणि माझी मैत्रीण सरला सोनी गेलो होतो. तेव्हा ती कॉलनी खूप श्रीमंत लोकांची होती. त्यांचे स्वतंत्र बंगले होते शिवाय बाजूला सुंदर फुलांची बाग. मी आणि सरला परत येत असताना, तिथे एका बंगल्या बाहेर डोकावणाऱ्या गुलाबाच्या फुलाचा मोह काही आवरला नाही, हळूच आम्ही दो.घी फुल तोडायला गेलो. तिथे हात लावतो न लावतो तोच त्या बंगल्यातील एक मुलगा धावत आला. मग काय आमची पळता भुई थोडी झाली. आम्ही दोघी पळत सुटलो आणि आधी राज महाल टॉकीज च्या त्या गेटमधून आत जाऊन लपलो. तिथून माझे घर जवळ होते त्यामुळे सरला म्हणाली मी थोडा वेळ तुझ्या घरी थांबून मग घरी जाते. आमच्या घरापासून जवळच एक बिरोबाचे देऊळ होते, त्या परिसरात चिंचेची झाडे होती तिथे आम्ही चिंचा गोळा करायला जायचो. दुसऱ्या एका बाजूला खाजाची मस्जिद होती, तिथेही जायचो. त्याचे कारण म्हणजे तिथे ठेवलेला मोठा ढोल, तो वाजवायचे आकर्षण असायचे. आता वाटते लहानपणी किती छोट्या छोट्या गोष्टीत आनंद मिळायचा.

माझी सहावी इयत्ता पूर्ण होई पर्यंत आम्ही देसाई बंधू वाड्यात राहायला गेलो. तोपर्यंत आमची तिथल्या तिथेच चार घरे बदलून झाली होती. वाड्यात गेल्यावर मात्र अजूनच मजा यायला लागली कारण तिथं एकूण बारा बिऱ्हाडे आणि त्यांची मुले होती . शिवाय घर मालकांच्या घरी एकूण वीस ते पंचवीस माणसे होती. त्यांच्यात पण मुले होती मग काय आनंदी आनंद होता. प्रत्येकी एकच खोली होती मातीच्या भिंती, कोपऱ्यात मोरी तेही भाडे करू ना. प्रत्येकाच्या घरात चाळीस वॉटचा एक बल्ब असायचा. ट्यूबलाइट वगैरे काही नाही. आम्ही राहायला गेल्या गेल्या अजून सामान लावले नव्हते तोपर्यंत तिथे आधीच राहणारे शिंदे म्हणून आले. ते म्हणाले," तुम्ही स्पेशल लाईट घेणार की कसे". आम्ही आल्या आल्या ते आल्यामुळे आईला वाटले की हा कोण माणूस चौकशा करतोय म्हणून ती म्हणाली ते बघू नंतर. पण एकंदरीत तिला ते बोलणे आवडले नव्हते. पण पुढे जाऊन हेच शिंदे भाऊ म्हणून आमची त्यांच्याशी चांगली गट्टी जमली. ते तहसील कार्यालयात क्लार्क म्हणून काम करत होते. त्यांना एक मुलगी होती. नंतर आम्हाला कळले की स्पेशल लाईट म्हणजे भाडे करूनी स्वतः बंद करायची. आणि ज्यांची स्पेशल लाईट नाही त्यांची लाईट घर मालक बंद करणार. ज्यांना स्पेशल लाईट हवी असेल त्यांना दरमहा बारा रुपये भाडे आणि बाकीच्यांना दहा रुपये घर भाडे. घर मालक म्हणजे अण्णा देसाई ते सतत मुख्य दरवाजातून आत गेल्या गेल्या एक ऑफिस होते तिथेच असत. फक्त आंघोळ आणि जेवण्यासाठी ते तिथून हालायचे. माझे दादाही बरेच वेळा त्यांच्या ऑफिसमध्ये दुपारच्या वेळेत डुलकी काढायला जायचे. स्पेशल लाईट सोडून इतरांच्या लाईट्स अण्णा दहा वाजता बंद करायचे आणि पुन्हा थोडा वेळ सुरू करायचे मधल्या वेळात ज्यांना कंदील दिवा काय लावायचे असेल तर लावता यावा म्हणून ही सोय होती. माझ्या दादांना वाटायचे त्यांची मुलगी म्हणजे मी खूप अभ्यास करते. म्हणून त्यांनी आमच्याकडे स्पेशल लाईट घेतली होती. तरीही रात्री उशीर पर्यंत जर लाईट दिसली तर अण्णा तिकडून बंद करायचे आणि मी इकडून आवाज दिला की लावायचे. त्यांना वाटायचे की विनाकारण लाईट जळते आहे की काय?. पण तसे नसायचे मी खरंच अभ्यास करत बसायचे. रात्री जागून अभ्यास करणे मला आवडायचे, कारण मला सकाळी लवकर उठायला आवडायचे नाही. सकाळी आई आणि दादा,"श्यामा उठ, श्यामा उठ". असे म्हणायचे. आणि मग वाड्यातील मुले मला शामा उठ म्हणून चिडवायची. सुरवातीला आम्ही वाड्यात राहायला आल्यावर घरमालकांच्यात कोणाची कोण मुले कोणाचे कोण भाऊ काही कळायचे नाही. पण नंतर सगळे माहिती झाले.

माझ्या आई-दादांची आणि घरमालकांची आधीपासून ओळख होती. तसेही घर मालक आणि सगळे भाडेकरू एका कुटुंबाप्रमाणे राहत होतो. कधी काही वाटले नाही. आणि आणि थोड्या फार फरकाने एकूणच सगळ्यांची परिस्थिती सारखीच होती. सगळ्यांची दारे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत उघडीच असायची. एक-एकच खोली असली तरी कोणीही कधीही कोणाकडे जायचे त्यावेळी त्याचे काही वाटत नव्हते. कोणाच्या घरात काय भाजी इथं पासून ते कोणाच्यात काय नवीन आणले, कोण कुठे गेले कोणी आजारी असले, सगळे एकमेकांना माहित असायचे. एकमेकाकडे हक्काने एखादी वस्तू मागायचे. उसने वगैरे पण सुरू असायचे. नुसते मीठ पीठ नव्हे तर कधी काडी पेटीतील चार काड्या सुद्धा मागितल्या जायच्या. कारण त्यावेळी आख्खे पुडे आणण्याची पद्धत नव्हती. एकदा तर पाहुणे आले म्हणून अंगाचा साबण आणि टॉवेल सुद्धा उसना नेल्याचे मला आठवते. त्यावेळी प्रत्येकाकडे सगळ्यांसाठी एकच टॉवेल एकच साबण आणि एकच कंगवा असायचा. नेहमी अंगाला लावायला लाईफ बॉय साबण आणि कपड्यांसाठी 501 साबण असायचा.

आम्हाला सगळ्यांना लहान मुलांची खूप आवड होती त्यामुळे वाड्यातील लहान मुले आमच्या घरी सतत असायची. घरमालकांच्या घरातली शरद, सुरेश, अरुणा आणि भारती या आमच्याकडे असत. अरुणा आणि भारती या दोघी माझ्यापेक्षा मोठ्या होत्या. शरद आणि सुरेश माझ्यापेक्षा थोडेसे लहान होते. शरद सुरुवातीला शर्टाला पैरण किंवा सदरा म्हणायचा. त्याला आम्ही हसायचो. नंतर सांगून सांगून तो शर्ट म्हणायला लागला. पण अजूनही त्याला ती गंमत आठवते. घर मालक माडीवर राहत, त्यांच्या घरात जाते आणि उखळ होते. काही दळायचे किंवा कुटायचे असेल तर वाड्यातल्या बायका त्यांच्या जात्यावर दळायच्या. त्यांच्या माडीवरून दोन्ही बाजूला खिडक्या होत्या त्यातून पत्र्यावर जाता यायचे आणि ते सगळ्यांच्या घरावर जाता यायचे. कुणाचे काही वाळवायचे असेल तर ते पत्र्यावर घालता यायचे. घरमालकांचे धान्य शेतातून पोत्याने यायचे आणि ते पत्र्यावर वाळत घातले जायचे. एकदा असेच त्यांचे ते धान्य एकत्र गोळा करत होते आणि तिथेच पत्र्यावर पोत्यात भरत होते. आमची खोली एक नंबरची होती, घराला लाकडी तुळया होत्या. त्या पोत्याचा भार एकाच ठिकाणी पडला आणि तुळळीचा कडकड असा आवाज झाला. आमच्याच पत्र्यावर ते झाले. आम्ही तिघे त्यावेळी जेवायला बसलो होतो. त्यानंतर त्या तुळळीला आधार म्हणून एक खांब लावला त्याला ठेपा देणे म्हणतात. काही वर्षांनी घरमालकांच्या माडीची पण थोडी पडझड झाली त्यामुळे ते खाली राहायला आले. मग आम्ही समोरच्या खोलीत राहायला लागलो. कारण तिथल्या अलकाच्या आई म्हणजे तोडकर यांनी दुसरीकडे घर बांधले होते. त्यांचा पोह्याचा कारखाना होता. ते नाना तोडकर खूप छान होते मी सतत त्यांच्यात असायची. एकदा अशीच दुपारची मी त्यांच्या घरी गेले तेव्हा ते त्यांच्या बायकोला म्हणाले अग ती आपली दस लाखाची पेटी आहे ना ती नीट ठेव नाहीतर श्यामा (म्हणजे मी) नेईल. कारण त्यावेळी दस लाख नावाचा सिनेमा लागला होता आणि त्यांनी तो बघितला होता. पण काय योगायोग असेल नंतर त्यांची परिस्थिती खूप सुधारत केली. त्यांनी नवा ट्रक घेतला. घरही बांधले आणि ते तिकडे राहायला गेले. पोह्यांचा कारखाना पण त्यांनी मोठा केला. चिरमुरे वगैरे पण तयार करायचे.

घरमालक खाली राहायला आले तरी त्यांचे माडीवरचे घर बऱ्यापैकी होते. त्यामुळे मला तिथे अभ्यासाला बसता यायचे. कारण भाडेकरूंची मिळून बरीच चिल्लीपिल्ली होती. शिवाय काम आवरले की बायका आईकडे गप्पा मारायला यायच्या. आम्ही वाड्यात राहायला यायच्या आधी थोडे दिवस माझा भाऊ विलास आर्मीत भरती झाला होता. तो जेव्हा पहिल्यांदा सुट्टीवर आला तेव्हा त्याला वाड्यात फारच बुजल्यासारखे झाले. आईकडे सतत बायका येत. त्यामुळे तो आईला म्हणायचा तुच जात जा ना त्यांच्याकडे. नंतर मात्र त्याच्याही ओळखी झाल्या मित्र मिळाले आणि तो चांगलाच रमला. घरमालकांच्यात एक नियम होता म्हणजे त्यांच्या घरापुरता. स्त्रिया आपापल्या नवऱ्यांचे आणि मुले जर लहान असतील तर त्यांचे कपडे धुवायच्या. बाकी मोठी मुले त्यांचे त्यांचे कपडे धुवायचे. त्यासाठी अण्णा त्यांना पाचशे एक साबणाचा मध्ये एक तुकडा करून तो द्यायचे. त्यांची शिस्त चांगली होती.

काही भाडे करू घर बदलून दुसरीकडे जात. मग नवीन भाडेकरू येत. पण सगळे लगेच एकमेकात मिसळून जात. देसाई बंधूंचा वाडा सगळ्यांना प्रेमाने सामावून घेई. मात्र भांडणे , शिवीगाळ असले अजिबात खपायचे नाही. तसे कोणी केले तर अण्णा त्यांना लगेच बजावायचे की आमचे घर सोडा. म्हणून भांडणे नव्हती असे नाही. कधी कधी भांडणे व्हायची पण शीतयुद्धासारखी. आणि मग ज्यांचे भांडण झाले आहे त्यांना कधी एकदा एकमेकांशी बोलतो असे व्हायचे. अगदी छोट्यात छोटी वस्तू आणली तरी सगळ्यांना ती दाखवली जायची आणि सगळ्यांना त्याचे कौतुक वाटायचे. तेव्हा कुणाकडेच ना मिक्सर, ना कुकर, ना गॅस, ना फॅन, तरी त्याची उणिव कधीच कुणाला भासली नाही. रेडिओ देखील एखाद्याकडेच असायचा. मला वाटते त्यामुळे सगळ्यांना भरपूर वेळ असायचा. स्टो असणे म्हणजे सुद्धा फार भारी वाटायचे. एका फळीवर सगळी भांडी मावलेली असायची. मोरीत बंब, मोरीच्या कट्ट्यावर पिंप कळशी हंडा असायचे. पिंपच्या तोटीतून हात वगैरे धुता यायचे, बेसिन वगैरे प्रकार माहितही नव्हता. शौचालय वाड्यात एका कोपऱ्यात आणि दुसऱ्या एका कोपऱ्यात उकिरडा पण होता. त्याचेच मग खत तयार झाले की घरमालकांच्या शेतात टाकायला न्यायचे. त्यांच्या घरी पण एक होते ज्यांना दादा म्हणत ते आणि त्यांची बायको ज्यांना आम्ही रानातल्या वहिनी म्हणायचो. ते दोघे शेतात जात. दुसरे आप्पा ते गादीच्या दुकानात असत. तिसरे एक तिथेच जवळ सासुरवाडीत घर जावई म्हणून रहात ते शिलाई करत. त्यांन सगळे भाऊ म्हणत. ते रोज रात्री जेवायला मात्र इकडे येत. आणि सगळ्यात मोठे अण्णा त्यांना ' एकुमॅ ' म्हणत. म्हणजे एकत्र कुटुंब मॅनेजर. जवळजवळ वीस वर्ष त्यांनी भाड्याची पावती दिली होती पण त्यानंतर राहील त्याचे घर असा नियम निघाल्यावर पावती देणे बंद केले.

Keywords: 

लेख: 

वर
0 users have voted.