A page from a diary of Ginger Kulkarni - 21st August 2026

21st August 2026
गेले दोन दिवस का कोणास ठाऊक प्राची माझ्यावर रागावली आहे. मी खरं तर काहीच केलं नाही. काल रात्री प्राची तिचं काम करत बसली होती आणि शंतनु मिहिकाला आणायला गेला होता तेव्हा फक्त मी त्यांच्या बेडरूममध्ये शिरून बेडवर 'खोदाखोदी' खेळलो.
पण शंतनु आल्यावर त्यानं पाहिलं तर कशी कोणास ठाऊक बेडशीट फाटली होती. मग प्राची काम सोडून आली आणि दोघं जोरजोरात काहीतरी बोलू लागले. मिहिका येऊन काहीतरी 'बेबी आहे गं तो.' म्हणाली. प्राची 'छळ आहे नुसता.' म्हणाली. शंतनु 'फटके दिले पाहिजेत‌.' म्हणाला. कोणावर एवढे रागावले होते काय की. पण मला त्यांनी अजिबात बेडरूममध्ये येऊ दिलं नाही. मी मिहिकाच्या रुममध्ये गरीब पडून राहिलो. मला ट्रीटपण दिली नाही रोजच्यासारखी. मग रात्री सगळे झोपल्यावर मी हळूच बेडरूममध्ये शिरून झोपलो.

आजपण दिवसभर प्राची माझ्याशी बोललो नाही. मीपण आज जास्त हट्ट न करता तिचं सगळं ऐकलं. बबिता दिदी आल्यावर मुकाट बाल्कनीत जाऊन बसलो. मी असं अधूनमधून प्राचीचं ऐकतो तरीही बबिता दिदी ' सिर्फ साबकी बात मानता है.' का म्हणते कोणास ठाऊक?
रात्रीपण मला ट्रीट न देताच प्राची झोपली. मी तिला उठवायचा प्रयत्न केला तर 'झोपू दे रे.' खेकसली. मग मी तिच्या रूमच्या दारात उसासे टाकत बसून राहिलो. पण मध्येच तिनं जरा हालचाल केली... मी लगेच उठून तिच्याजवळ गेलो आणि तिला पाय मारून उठवलं‌. ती उठली तर मी तिच्यासमोर एकदम शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. तिला एकदम हसायला आलं. मी ओळखलं की आता हिचा राग संपला.

मी बाहेर येऊन माझ्या बेडवर बसलो. 'माझं ऐकत नाहीस आणि मग माझ्याकडे का येतोस खाऊसाठी?' म्हणत तिनं ट्रीट दिली. ती लगेच ट्रीट देते. शंतनु, मिहिका 'sit, lie, jump, nose, twirl' खेळत बसतात. म्हणून मी त्यांच्याकडे जात नाही.

आता मी शहाण्यासारखं वागायचं ठरवलं आहे. म्हणजे तसा मी वागतोच, पण आता अजून शहाण्यासारखा वागणार आहे.

लेख: 

वर
0 users have voted.