माझे आजोबा - म्हणजे माझ्या आईचे वडील - निळकंठ यशवंत काळे. त्यांना आम्ही नाना म्हणायचो.
६ सप्टेंबर १९१७ ही त्यांची जन्मतारीख. म्हणजे आज ते असते तर परवा त्यांचा आज १०९ वा वाढदिवस झाला असता.
माझ्या धाकट्या मावशीचा पंचांहत्तराव्या वाढदिवसाचा कार्यक्रम आम्ही योगायोगाने ६ सप्टेंबरला केला. त्यादिवशी सगळे जमल्यावर आज नानांचा वाढदिवस म्हणून त्यांची आणि आजीचीही सगळ्यांना खूप आठवण आली.
तसं पाहिलं तर नाना हे काही कोणी प्रसिद्ध व्यक्तिमत्व नाही - तरीही त्यांच्यावर मला लिहावसं वाटलं.
नानांचं बालपण नागपूरला गेलं. त्यांची धाकटी भावंडं त्यांना नाना म्हणत त्यामुळे त्यांच्या मुलीही नाना म्हणायच्या. त्यामुळे शेजार्या-पाजार्यांपासून पुढे जावई, नातवंडं आणि पतवंडांचेही ते नानाच!
मॅट्रिकची परीक्षा पास झाल्यावर त्यांच्या सावत्र आईनी त्यांचं शिक्षण बंद केलं. "या मुलाच्या शिक्षणावर अजून खर्च करुन मी काय माझ्या मुलांच्या हातात भिक्षापात्र देऊ का?" हा विचार तिनी बोलून दाखवला आणि नानांची रवानगी त्यांच्या वडलांच्या दुकानावर केली. त्यामुळे इच्छा असूनही परिस्थितीमुळे ते पदवीधर होऊ शकले नाहीत. पुढे त्यांच्या वडलांचा धंदा बुडला आणि नाना नातेवाईकांच्या आसर्याला मुंबईला आले. २-३ ठिकाणी नोकरी केल्यानंतर ते माटुंग्याला David Sassoon Industrial School होती, तिथे हेडक्लार्क म्हणून नोकरीला लागले.
त्यामुळे रुढार्थानं म्हटलं तर नानांकडे कोणतीही शिक्षणाची भक्कम पार्श्वभूमी नव्हती. शिक्षण बंद झालं तरी पण मराठी आणि इंग्रजी पुस्तकं कुठून कुठून मिळवून ते सतत वाचत असायचे. त्यामुळे भाषांवर उत्तम प्रभुत्व! त्यांचं इंग्रजी इतकं उत्तम होतं की माझी आई/मावशी सांगतात, त्याकाळी कोणाला परदेशात पत्र पाठवायची असली तर कित्येक लोक नानांकडून पत्रांचं ड्राफ्टिंग करुन घ्यायचे.
हा माणूस सतत काळाच्या पुढे चालला. सुशिक्षित आणि बाहेरचं जग बरंचसं बघितलेल्या कितीतरी लोकांपेक्षा सुजाण आणि पुढारलेला माणूस. त्यांना स्वतःला तीन मुली. माझी आई मोठी आणि त्यानंतर दोन बहिणी. पण तिन्ही मुलीच आहेत याबद्दल कधीच नकारात्मक सूर आजी-नाना दोघांनीही काढला नाही. माझ्या आईचं नाव आशा, मधल्या मावशीचं नाव उषा. त्यामुळे तिसरी मुलगी झाल्यावर कोणीतरी सुचवलं की हिचं नाव आता निशा ठेवा. आता निशा नावात तसं वाईट काहीच नाही पण आजी नानांनी विचार केला की कदाचित या नावामुळे या तिसर्या मुलीला असं वाटू शकेल की मुलगी झाल्याबद्दलची निराशा म्हणून नाव निशा ठेवलं आहे. तसं नको व्हायला म्हणून धाकटीचं नाव ठेवलं विजया.
आपल्या तीन मुली ह्या वेगळ्या आणि स्वतंत्र व्यक्तिमत्वाच्या आहेत, हे समजून त्यांना वाढवलं. एकाच साच्यात तिघींना घातलं नाही. आई आणि दोन मावशा - तिघींच्या आवडी-निवडी-छंद-अभ्यासाची पद्धत- सगळंच वेगळं होतं. तिघींनी त्यांच्या आवडीची वेगवेगळी क्षेत्र निवडली.
काही गोष्टी मात्र तिघींसाठी वयाच्या सहाव्या सातव्यावर्षापासून सक्तीच्या होत्या. त्यातली पहिली म्हणजे पुस्तकात पाहून रोज किमान ५ ओळी मराठी शुद्धलेखन लिहायचं. पुढे इंग्रजी आणि हिंदी भाषा अभ्यासक्रमात आल्यावर त्या भाषांच्याही ५-५ ओळींची भर त्यात पडली.
त्यानंतर रोज नवे इंग्रजी ५ शब्द पाठ करणं. दुसरी गोष्ट सक्तीची होती ती म्हणजे अवांतर वाचन आणि पाठांतर. मुलींना इंग्रजी वाचता येत नव्हतं तोवर गोष्टीची पुस्तकं ते मोठ्यानी वाचून दाखवत. आणि नंतर मुलींकडूनही मोठ्यानी वाचून घेत. शब्दांचे अर्थ, वाक्यात उपयोग, उच्चारसाम्य असलेले शब्द याबद्दल मुलींशी बोलायचे. भाषा प्रभावीपणे वापरता आली पाहिजे, आपले विचार स्वतंत्रपणे साध्या आणि योग्य भाषेत मांडता आले पाहिजेत यावरही त्यांचा कटाक्ष होता. त्यामुळे तिघींही बहिणींच्या भाषा अतिशय चांगल्या आहेत. आजही तिघी भरपूर अवांतर वाचन करतात, लिखाण करतात, नवनवीन गोष्टी शिकत असतात. तिघींचंही हस्ताक्षर अजूनही उत्तम आहे.
माझ्या आईनी शाळा संपतानाच जाहीर केलं की तिला पुढे जाऊन कॉलेजचं शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी/करिअर करण्यात फारसा रस नाही. तिला उत्तम गृहिणी व्हायला आवडेल, उत्तम संसार करायला आवडेल. त्यावर नाना तिला म्हणाले की अगदी काहीही हरकत नाही. पण मग संसार, बालसंगोपन करायचं तर तू कॉलेजमधे त्यातलाच उत्तम अभ्यास केलेला बरा. म्हणून मग आई B.sc Home Science ला गेली आणि child development हा मुख्य विषय त्यावेळी तिनी घेतला.
आता B.sc home science आणि child development वगैरेंची माहिती असायला नानांकडे काही आजच्या सारखं एका click वरचं Google वगैरे नव्हतं. किंवा career counseling ही नव्हतं. पण तरी ६० वर्षांपूर्वी आपल्या मुलीच्या पदवीच्या शिक्षणासाठी हे त्यांना सुचलं हे महत्वाचं. home science असा प्रकार असतो आणि त्यात डिग्री घेता येते याची देखील कल्पना तेंव्हा अनेकांना नव्हती. काही नातेवाईकांनी म्हणे त्यावरुन आईला, आजी-नानांना टोमणे मारले होते, हे काय हिला पिठलं भात शिकवायला पाठवलंय त्या कॉलेज मधे! पण त्या सगळ्यांनी याकडे दुर्लक्ष केलं. उषा मावशीचा गणिताकडे कल होता, तर विजू मावशीचा भाषांकडे. त्या दोघीनींही त्यांना हवे ते career चे मार्ग निवडले आणि त्यात यशस्वी झाल्या.
उषामावशीची खरी तर गणिताची पार्श्वभूमी. पण तिला तिच्या निवृत्तीनंतर, शाळेत शिकलेली संस्कृत भाषा पुढे परत एकदा शिकावी असं वाटलं आणि २०११ साली ती संस्कृत घेऊन M.A झाली. नाना असते तर निवृत्तीनंतर स्वस्थ न बसता पुढे परत एकदा पदवी मिळवावी, असं तिला वाटलं आणि तिनी ते करुन दाखवलं, ह्याचं त्यांना फार कौतुक वाटलं असतं. त्यांच्या खास शैलीत ते म्हणाले असते - शाब्बास रे पठ्ठेवाघा! you have made me proud!
पाठांतरा बाबतीत त्यांनी माझ्या आईला, मावशांना जे सांगितलं तेच आम्हा नातवंडांनाही ते सतत सांगायचे. ते म्हणायचे पाठांतर करत रहा, स्तोत्र, श्लोक, कविता, गाणी सतत पाठ करत रहा. वय वाढेल तसा शब्दांचा अर्थ आपोआप कळेल. अर्थ नाही कळला, रस नाही वाटला तरी सतत काहीतरी पाठ करत रहा. लक्षात ठेवा पाठांतरानं माणूस कधीही एकटा पडत नाही. ती त्याची कायमची सोबत असते. तेंव्हा या वाक्याचा अर्थ कळला नाही, पण आता वयाची पन्नाशी उलटल्यावर जेव्हा शरीरात hormones झोपाळ्यावाचून विनाकारण झुलायला लागल्यावर जो अकारण एकटेपणा येतो, विनाकारण मानसिक शांतता ढळते, त्यात नानांनी सांगितलेलं पाठांतराचं महत्व कळतं. आपलं कोणी नाही, असं उगाच वाटण्याचे जे क्षण येतात, त्या मनःस्थितीत नानांची शिकवण कामी येते.
आजी-नानांचा संसार हा त्याकाळी सर्वसामान्यांचा असायचा तसाच मध्यमवर्गीयांचा संसार होता. ऐपत बेताचीच होती. पण दोघंही उत्तमाचा ध्यास असलेले, अतिशय रसिक आणि कलात्मक दृष्टी असलेले. आमची आजी उत्तम शिवण शिवायची. स्वत:ची पोलकी, मुलींचे कपडे तर शिवायचीच पण शिवणाची कामं करुन संसाराला हातभारही लावायची. तिच्याकडे ७५ वर्षांपूर्वी सेकंड हँड घेतलेलं सिंगरचं मशीन होतं. माझ्या आईलाही शिवणाची आवड होती. आजीकडून आई शिवण शिकलीच. पण नानांनी मात्र तिला मशीनची उत्तम काळजी कशी घ्यायची, थोडक्यात त्याचं servicing आणि maintenance कसा करायचा ते शिकवलं. त्यांचं आवडतं वाक्य होतं - "अर्ध्या रात्री तुला गरज पडली तरी आपापलं मशीन दुरुस्त करता आलं पाहिजे". आता अर्ध्या रात्री कशाला तिला मशिन लागणार होतं! पण नानांच्या या शिकवणीमुळे आई अजूनही मशिनची उत्तम काळजी घेते. आणि खरंच सांगते वय वर्ष जवळजवळ ८० असलेलं ते सिंगरचं मशीन माझी ७७ वर्षांची आई अजूनही उत्तम वापरते. आणि इतक्या वर्षात फक्त एकदा तिला सिंगरच्या माणसाला काही दुरुस्तीच्या कामासाठी बोलवायची वेळ आली आहे. support and maintenance agreement वगैरेच्या फंदात न पडता आपण आत्मनिर्भर असायला हवं, याचं यापेक्षा उत्तम उदाहरण कसं सापडेल? आजीचं मशीन तर आई वापरतेच. पण आजीची गॅसची शेगडीही आईकडे अजून आहे. मध्यंतरी त्या शेगडीचा नॉब नादुरुस्त झाला तेंव्हा तो बदलायला जो माणूस आला, तो ही म्हणाला, ही अशी शेगडी आज बघायलाही मिळत नाही ताई! ही विकून कधीच दुसरी घेऊ नका! आजीच्या स्वैपाकातली उत्तम भांडीही आज तिघी मुलींकडे वापरात आहेत.
माझी आई जेंव्हा १५ वर्षांची झाली, तेंव्हा नाना म्हणाले की यावर्षी आशाच्या पंधराव्या वाढदिवसाबद्दल आपण तुम्हा तिघींना अभ्यासासाठी म्हणून मोठं टेबल करुन घेऊया. त्याकाळी म्हणजे ६०-६२ वर्षांपूर्वी डायनिंग टेबल वगैरेची पद्धत अगदी उच्चभ्रू वर्ग सोडून फारशी कुठे नव्हतीच. पण तरीदेखील नानांच्या मनात मुलींच्या अभ्यासासाठी म्हणून सहा मोठी माणसं बसू शकतील इतकं मोठं डायनिंग टेबल सारखं टेबल करावं असं का बरं आलं असेल? हा प्रश्न आम्हाला सगळ्यांनाच नेहमी पडतो. नाना कामाला असणार्या David Sassoon Industrial School मधे असणारी मुलं म्हणजे लहान वयात गुन्हेगार म्हणून गणली गेलेली मुलं असायची. त्यांना समाजात बाहेर पडल्यावर काम करुन आपल्या पायांवर उभं रहाता यावं यासाठी विविध शिक्षण त्या-त्या क्षेत्रातल्या तज्ञांकडून मिळायचं. तिथे सुतारकाम शिकवायला येणार्या कारागिराकडून नानांनी स्वतःला हवं तसं मोठं टेबल करुन घेतलं. मजा म्हणजे या टेबलाला एकही खिळा ठोकलेला नाही. सलग एकसंध लाकडातून हे मोठं टेबल तयार केलेलं आहे.
या तिघी बहिणींनी या टेबलाचा भरपूर वापर आपापल्या अभ्यासासाठी केला. तिघींचीही अभ्यासाची क्षेत्र वेगळी, पद्धत वेगळी पण त्या छोट्या घरात मोठ्या टेबलावर तिघींनी उत्तम अभ्यास केला, नानांनी काही लिखाण करण्यासाठी याचा वापर केला, क्वचित कोणी घरी आल्यावर जेवणासाठीही केला गेला. कालांतरानी हे टेबल विजूमावशीकडे गेलं. आजपर्यंत जवळजवळ गेली ४० वर्ष तिनी बदललेल्या १० घरांमधे हे टेबल सतत बरोबर आहे. या पूर्ण लाकडी टेबलला काही वर्षांनी तिनी काचेचा टॉप बसवून घेतला. हे टेबल आजी-नानांनी वापरलं, त्यांच्या तिन्ही मुलींनी वापरलं, नंतर त्यांच्या जावयांनी आणि आम्ही नातवंडांनी वापरलं. आता नातजावई-नातसुना आणि पणतू पणती पण हसत खेळत वापरतात. माझे भाऊ शैलेश-महेश कॉलेजमधे असताना जाड वहीच्या पुठ्ठ्यानी यावर टेबल टेनिसही खेळायचे. शाळेत आणि कॉलेजमधे असताना मी आणि मानसीनी पण याच टेबलवर अभ्यास केला, वाचन केलं, गप्पा-वादविवाद केले, अनेक गुपितं शेअर केली. अजूनही आम्ही कोणीही विजूमावशीकडे गेलो की सकाळच्या पहिल्या चहापासून जेवण झाल्यावर हात वाळेपर्यंत ह्याच टेबलावर बसून गप्पा होतात, हास्यविनोद होतात.
मध्यंतरी मावशीनी या टेबलाला पॉलिश करुन घेण्यासाठी दोन सुतारांना बोलावलं. मावशीनी त्यांना बजावलं की हे टेबल आमच्यासाठी फार महत्वाचं आहे त्यामुळे काळजीपूर्वक काम करा. ते दोघंही हरखून आधी टेबलाकडे बघतच राहिले. म्हणाले आम्हाला आता हल्ली ही अशी अस्सल वस्तू हाताळायला सोडा, बघायला सुद्धा मिळत नाही. हे अस्सल बर्मा टिक लाकूड आहे. काळजी करु नका... आम्ही अगदी मनापासून काम करु.
नंतर सलग २ दिवस खूप प्रेमानी जपून जपून टेबलाला सुंदर पॉलिश केलं. आणि काम झाल्यावर म्हणाले "गेली साठ वर्ष हे टेबल तुमच्याकडे आहे. काय माहिती आता अजून किती टिकेल ते!!" मावशीनी आवाक होऊन विचारलं की अजून किती टिकेल माहिती नाही म्हणजे काय? त्यावर ते दोघं म्हणाले, "अहो म्हणजे हे इतकं अस्सल बर्मा टिक लाकूड आहे की अजून कितीही वर्ष, कितीतरी पिढ्या अगदी आरामात टिकेल!"
आज आपण sustainability बद्दल इतकं बोलत असतो, एखाद्या वेळी चार खर्च कमी करा पण जो एक खर्च कराल तो अस्सल टिकाऊ गोष्टीत करा, तुमच्या सततच्या बदलणार्या आवडीनिवडी आणि फॅशनप्रमाणे निसर्गातल्या साधनांचं नुकसान करु नका असं ऐकतो-वाचतो. पण आमच्या आजी नानांनी हे तत्व कायमच अंगिकारलं होतं.
sustainability चे पुरस्कर्ते म्हणजे आमचे आजी-नाना!
"अर्ध्या रात्री तुला गरज पडली तर..." यासारखाच त्यांचा आवडता डायलॉग म्हणजे - "इतकं उत्तम काम कर की तू जंगलात रहायला गेलीस तरी त्या कामासाठी तुला शोधत लोकांनी जंगलात आलं पाहिजे." आमची आजी वैतागायची! ती म्हणायची - अहो..कोणाला अर्ध्या रात्री कुठल्या वस्तूंची गरज लागणार आहे! आणि कोण कशाला सगळं सोडून ह्यांना जंगलातच शोधायला येईल! पण ते काही ऐकायचे नाहीत.
साहित्य, भाषा, वाचन याखेरीज इतर अनेक उत्तमोत्तम गोष्टी आपल्या मुलींनी-नातवंडांनी पहाव्या, त्याचं सौंदर्य समजून घ्यावं, हे त्यांना फार वाटायचं. चांगलं म्हणजे काय, आणि ते का चांगलं यावर बोलत. उत्तम छपाई, उत्तम चित्र, उत्तम कलाकृती, उत्तम कापड हे नजरेनी टिपता आलं पाहिजे. आत्ता खिशात पैसे का नसेना, पण चांगली कला बघत रहावी, म्हणजे हातात पैसा आला, ऐपत आली की चांगलं काय खरेदी करायचं हे कळतं. पैसा गरजेचा आहे, पण पैसा हे सर्वस्व नाही. रोजचं साधंसुधं जगणंही रसिकतेनी जगता आलं पाहिजे, असं ते म्हणायचे.
माझ्या मावशांना त्यांनी आग्रहानी चित्रकलेच्या elementary आणि intermediate परिक्षा द्यायला लावल्या. खरं तर या परिक्षा द्याव्या इतकी काही त्यांना चित्रकला आवडत नव्हती आणि येतही नव्हती. पण ते म्हणाले "पास-नापास हा मुद्दाच नाही. परिक्षेच्या निमित्तानी जाणकार शिक्षकांकडून चार चांगल्या गोष्टी कळतील, चित्रकलेचं सामान हाताळता येईल, रंग-रेषा-आकृती यांची एक नजर येईल. आपल्या बरोबरीची मुलं कशा प्रकारे चित्राचा विचार करतात हे बघता येईल. पास-नापास हे माणसानी लावलेले ठोकताळे. आपल्याला त्या पलिकडे बघता आलं पाहिजे.”
आपल्या मुली कायम शाळेत पहिल्या नंबरांमधे चमकत असतात, तर त्यांना न आवडणार्या विषयाचा ताण देऊन नापासाचा शिक्का कशाला द्या, असा स्वार्थी विचार त्यांनी केला नाही. किंवा अभ्यासात चांगल्या आहेत तर चित्रकलेतही चांगल्या पास व्हायलाच हव्या, हा एक पालक म्हणून त्यांचा कधीही ego नव्हता. मी स्वतःला भाग्यवान समजते की माझी आई आणि माझ्या दोन्ही मावशा यांनाही हाच वारसा नानांकडून मिळाला आणि त्यांनी अनेक गोष्टी करुन बघण्यात, पास-नापासाच्या पलिकडेही अनुभवविश्व असतं, हे आम्हा मुलांपर्यंत पोचवण्यात त्यांनी नानांसारखाच हातभार लावला.
तिघी मुलींनी किंवा त्यांच्यापैकी एकीनी तरी सरळसोट शिक्षण घ्यायच्या ऐवजी कॉलेजमधून एखादं दोन वर्ष ब्रेक घ्यावा, चाकोरी बाहेर काहीतरी करावं, प्रवास करावा असं त्यांना फार वाटायचं. हल्ली इयत्ता १२वी नंतर gap year ही संकल्पना आपण अगदी सर्रास ऐकतो. पण ६० वर्षांपूर्वीही हा माणूस आपल्या मुलींनी हे करुन बघावं या मताचा होता.
फक्त स्वतःच्या मुलींच्या शिक्षणाच्या बाबतीतच ते आग्रही होते असं अजिबात नाही. माटुंग्याला staff quarters मधे त्यांच्या शेजारी खान मास्तरांचं कुटुंब रहायचं. त्यांची मुलगी होती नसीम नावाची. तिचं मॅट्रिक नंतर शिक्षण थांबलं होतं. नानांनी तिला विचारलं की तू का बरं नाही जात कॉलेजमधे? ती म्हणाली, “अब्बाजान म्हणाले आता शिक्षण बास.” तसं म्हटलं तर त्याकाळी मुलीचं शिक्षण थांबवणं इतकंही uncommon नव्हतं. पण नानांनी, जाऊदे आपल्याला काय करायचंय.. त्यांचं ते बघून घेतील असा विचार नाही केला. नाना चिडले आणि म्हणाले, “तुझ्या अब्बाजानची ऐशी की तैशी... मी बोलतो त्यांच्याशी.” मग खान मास्तरांशी बोलून त्यांना राजी करेपर्यंत कॉलेजच्या admissions संपल्या होत्या. पण अशा क्षुल्ल्क गोष्टींना नाना कसले भीक घालतायत! त्यांनी दादरच्या पिंगेज क्लासेस मधे तिला घालून १-२ वर्षं बाहेरुन परिक्षा द्यायला लावल्या. आणि नंतर ती व्यवस्थित कॉलेजमधे जाऊन शिकली. ते ही संस्कृत घेऊन BA B.Ed झाली. पुढे अनेक वर्ष ती शाळेत संस्कृतची शिक्षिका होती. हे सगळं मात्र आमच्या घरात कोणाला माहितीच नव्हतं. पुढे पुष्कळ वर्षांनी नसीमनी हे या तिघी बहिणींना सांगितलं, की नानांमुळे माझं शिक्षण झालं.
मी बर्यापैकी लहान असताना नाना निवृत्त झाले. मग आजी नाना काही वर्षं पुण्यात सहकारनगरला रहायचे. नंतर ते काही काळ माझ्या दोन्ही मावशांकडे आलटून पालटून पुण्यात-मुंबईला राहिले. त्यानंतर उषा मावशीच्या बेळगावच्या घरात काही वर्षं राहिले. त्यामु़ळे बाकी मावस भावंडांइतका त्यांचा सततचा सहवास आम्हाला नाही मिळाला. पण सुट्ट्यांमधे अर्थातच त्यांचा भरपूर सहवास मिळायचा आणि सतत पत्रांमधून ते आमच्या तिघांच्या संपर्कात असायचे. आम्ही तिघं भावंडंही त्यांना खूप पत्र लिहायचो. त्यामुळे आजही नानांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट त्या पत्रांच्या रुपानी आजही माझ्याकडे आहे.
माणसाला वेगवेगळ्या भाषा याव्यात, त्यावर त्याने प्रभुत्व मिळवावं असं त्यांना फार असोशीने वाटायचं. शैलेश जपानी शिकायला लागला, म्हणजे अगदी शिकायला सुरुवात झाली तेंव्हा नानांनी त्याला पत्रात लिहिलं होतं - तू जपानी भाषा शिकायला लागलास, याचा मला फार आनंद झाला आहे. मला खात्री आहे, जपानी भाषा शिकून तू नक्कीच जपानला जाशील, तिथे चांगल्या हुद्द्यावर नोकरी करशील आणि तुझ्या दारात टोयोटा गाडी उभी राहील. उत्तम नोकरी मिळवून अर्थातच शैलेश जपानमधे आला आणि कर्मधर्मसंयोगानी जपानमधे शैलेशनी पहिली गाडी घेतली ती नेमकी टोयोटा कंपनीची. त्यावेळी नानांच्या त्या पत्राची आठवण आली होती. नानांनी आधीच जे चित्र डोळ्यासमोर उभं केलं होतं, त्याला manifestation म्हणतात, आजकाल त्यावर how to do manifestation वगैरे नावानी reels देखील असतात, हे गेल्या काही वर्षात कळलं.
महेशनी नानांना एकदा पत्र लिहिलं होतं. त्यावेळी तो नोकरी करता करता M.Com करत होता. त्यात त्यानी लिहिलं होतं की नाना एक चांगली बातमी म्हणजे मी M.Com ची परिक्षा पास झालो. आणि त्याहून आनंदाची बातमी म्हणजे मनीला (म्हणजे मला) ऑफिसमधे पगारवाढ मिळाली. आणि शैलेशला त्याच्या ऑफिसतर्फे तीन महिने जपानला जाण्याची संधी मिळाली आहे.
नानांनी त्यावर उत्तर लिहिलं होतं की, M.Com ची परिक्षा पास झाल्याबद्दल तुझं अभिनंदन! पण अजून एका गोष्टीसाठी खास अभिनंदन, ते म्हणजे शैलेश आणि मनीच्या बाबतीत आनंदाची बातमी इतक्या अंत:करणपूर्वक कळवलीस. तुझ्यासारखा निर्मळ मनाचा भाऊ शोधून सापडणार नाही. शैलेश आणि मनी तुला तुझ्याच शरिराचे दोन भाग वाटतात, हाच तुझा मोठेपणा आहे. स्वतःच्या यशापेक्षा ज्याला बहिणीचा, भावाचा आनंद जास्त महत्वाचा वाटतो, असा भाऊ विरळाच. आयुष्यभर भावावर, बहिणीवर असंच प्रेम करत रहा. इतकी हुशार आणि चांगली नातवंडं मिळाल्याबद्दल मी आणि आजी मनापासून देवाचे आभारी आहोत!
पुढे मलाही पत्र लिहून त्यांनी कळवलं की स्वतःच्या रिझल्टपेक्षा बहिणीच्या पगारवाढीचा आनंद ज्याला झाला असा भाऊ फक्त आणि फक्त भाग्यवंताच्या नशिबात असतो. पुढे कधी तुला त्याला बहिणबीज द्यावी लागली तर तुझ्यासारखी नशिबवान तूच! कारण असा योग आयुष्यात यायला नशीब लागतं आणि दैव जागं असावं लागतं. तुझ्या बाबतीत दैवानी ही दुर्मिळ गोष्ट तुला दिली. परमेश्वर तुमचं बहिणभावांचं प्रेम असंच कायम ठेवो! आणि आजी नानांच्या आशीर्वादानी आम्हा भावंडांमधल्या प्रेमाचा बंध आजही तितकाच strong आहे!
नानांची ही पत्र आजही मला बर्याच गोष्टींचा reality check देत असतात.
gratitude practice, affirmations, manifestation, equality, sustainability इत्यादी अनेक गोष्टी आयुष्यात भिनवायला आम्हा भावंडांना कोणत्याही social media influencer ची गरज नाही लागली. हे सगळं आजी नानांनी फार पूर्वीच प्रत्यक्ष कृतीत आणलं होतं.
आज या सगळ्याबद्दल इतके शब्दबंबाळ अनेक व्हिडिओज, रील्स social media वर येत असतात. हे सगळे मोठे शब्द वापरुन प्रसिद्धी मिळवायचं फुटलेलं पेव ते वरुन बघत असतील तर नक्की आधी त्यांची एखादी शेलकी शिवी हासडून पुढे म्हणत असतील - "मूर्ख लेकाचे! अर्ध्या हळकुंडानी पिवळे होऊन बडबड करतायत! आणि त्यांना मनोभावे ऐकणारे महामूर्ख! कोणी सोम्यागोम्यानी इंग्लिश मधून सांगितलं की कळतं ह्याना! स्वतःचा विचार, वाचन-मनन-चिंतन करायला काही करायला नको!”
आम्हा नातवंडांना नानांची कुठली कुठली रुपं आठवतात! ते खरं तर कडक शिस्तीचे आजोबाही नव्हते किंवा लाडात लाडात बोलणारेही नव्हते. वेळेला अतिशय संतापीही होते. पण त्यांच्या संतापाची झळ मात्र आम्हाला कधीच लागली नाही.
सुट्टीत आम्ही सगळी भावंडं त्यांच्याकडे गेलो की मन लावून आम्हाला सगळ्यांना त्यांच्या हातानी भात कालवून द्यायचे. नानांनी कालवून दिलेला भात म्हणजे स्वर्गसुख! अशावेळी खरंच त्यांच्या मनातलं प्रेम थेट आमच्यापर्यंत पोचायचं. आजही नानांसारखा कोणी आम्हाला भात कालवून दिला तर आम्ही सगळी भावंडं तो आनंदानी खाऊ! उन्हाळ्याच्या सुट्टीत ते आमच्या गाद्या गच्चीवर घालायचे. मग रात्री आकाशात तारे बघत आम्ही सगळे गप्पा मारत बसायचो. कधी दिवसभर खेळून दमलो असलो की आमचे पायही ते चेपून द्यायचे.
रोज आंघोळ झाली की स्वत:चे सगळे कपडे स्वत: स्वच्छ धुवायचे. ते वाळत टाकायची त्यांची खास पद्धत होती. प्रत्येक ओला कपडा आधी झटकून, मग त्याची घडी घालून त्यावर ठोकून ठोकून मारायचे आणि मग वाळत घालायचे. काय बिशाद कधी त्यांनी वाळत घातलेल्या कपड्यांना इस्त्रीची गरज पडली असेल. हा शिरस्ता मला वाटतं शेवटची दोन-तीन वर्षं सोडली तर बहुदा ते ८४-८५ वर्षांचे होईपर्यंत चालला.
आजी नानांनी त्यांच्या हयातीत आणि त्यांच्या पश्चातही आमच्यासाठी काही त्यांच्या मोठ्या नावाचा वारसा वगैरे मागे ठेवला नाही. तसाच आर्थिक वारसा ठेवला नाही. आम्हाला कपडेलत्ते, खेळणी, खाऊला पैसे असे कुठलेही भौतिक लाड केले नाहीत. पण आयुष्यात स्वावलंबनाचे महत्व आधी त्यांच्या मुलींना आणि नंतर आम्हाला स्वतःच्या कृतीतून दाखवून दिलं. त्यांच्यातली शिस्त दिली. आज माझ्या स्वभावातल्या consistency बद्दल माझ्या काही मैत्रिणी कौतुक करतात. पण त्याचं १००% श्रेय आमच्या नानांचं आहे.
त्यांनी आम्हाला भाषांवर मनापासून प्रेम करायला शिकवलं. कलेवर प्रेम करायला शिकवलं. रसिकतेनी आणि आनंदानी आयुष्य जगायला पैसा हवाच असं नाही, हे शिकवलं. केवळ चारचौघांच्या मनाप्रमाणे, समाजाच्या नजरेतलं यशस्वी आयुष्य जगलात म्हणजे यशस्वी झालात असं नाही, हे शिकवलं. प्रवाहाविरुद्ध पोहण्यातली मजा सांगितली. मी स्वतः कधी प्रवाहाविरुद्ध जाऊन किंवा चाकोरीबाहेरचं फारसं काही करु शकले नाही. पण एक जागृक पालक म्हणून अवनीनी असं कधी काही करु पाहिलं तर नानांची आठवण ठेवून तिला प्रोत्साहन मात्र नक्कीच दिलं. आणि पुढेही देत राहीन.
आणि मुख्य म्हणजे नानांनी - माणसांवर - मग ती रक्ताची असोत की मनानी आपलं मानलेली, त्या नात्यांवर असलेल्या अपरंपार प्रेमाची, विश्वासाची ज्योत आमच्या मनात कायम ठेवली.
Happy Birthday dear Nana!!
